अलिकडे चांगल्या मराठी विषयांच्या चित्रपटांची निर्मिती होय, सर्वार्थाने आधुनिक तंत्राचा वापर जरुन प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न अनेकनिर्माते आणि प्रॉडक्शन हाऊसेस करत असताना, दुसरीकडे प्रेक्षक ही मराठी चित्रपट पहाण्यासाठी थिएटर्सकडे आकृष्ट होताना दिसत आहेत तात्पर्य, चांगल्या मार्केटिंगचा परिणाम आता मराठी बॉक्स ऑफिस वर पहायला मिळतो आहे. पण कधी कधी उत्तम मार्केटिंग करुनही तो चित्रपट लोकप्रिय होईलच किंवा उत्तम कथानकाचा असेलच असंही नाही.
“ताठ कणा, हाच बाणा” असा गवगवा करत रिलीज झालेला कोकणस्थ हा चित्रपट पाहिल्यावर प्रेक्षकांना कळून चुकतं की चित्रपटाचं शिर्षक आणि कथेशी कुठेही दूरदूर पर्यंत संबंधच नाही आहे, त्यामुळे ज्या आशेनी हा चित्रपट आपण पहायला चित्रपटगृहात जातो, त्यानंतर खरी हिरमोड होऊ शकतो.
चित्रपटाची कथा सुरु होते ती रामचंद्र गोखले अर्थात सचिन खेडेकर यांच्या मुलाच्या निवेदनातून जो त्यांचा दिनक्रम सांगतो, त्यांची पत्नी मिसेस गोखले ज्या निवृत्त प्राध्यापिका आहेत, त्यांच्या आयुष्या विषयी सांगतानाच चित्रपटाच्या कथेला सुरुवात होते, मि.आणि मिसेस गोखले हे पुण्यातील एका उच्च मध्यमवर्गीय कुटुंबातले जोडपं, सध्या निवृत्त असल्यामुळे “सिनिअर सिटीझन क्लब” मध्ये स्वत:चं मन गुंतवून ठेवत आहेत, मुलगा स्वित्झर्लंडला असल्यामुळे घरात एकमेकांचाच अधार आहे, पण दोघेही समाधानी, सुखी व निश्चिंत्त आहेत. कारण मुलगा ही अधून-मधून आईवडिलांना स्काईप आणि दूरध्वनीच्या माध्यमातून संपर्क ठेवून आहे. त्यातच रामचंद्र गोखले, हे ज्येष्ठ नागरिक म्हणून आपला वेळ कसा व्यतीत करतात हे दाखवण्यात आलं असून, त्यांच्या सोबत सिनिअर सिटीझन म्हणून वैभव मांगले, विजय केंकरे असे सहकलाकार ही पहायला मिळतात. पण हे सर्व दाखवण्यासाठीबराच वेळ खर्च झाला आहे असं वाटत राहतं, म्हणून मधूनच एखादा विनोदी किस्सा लेखकांनी घुसवलाय, पण त्यामुळे कथा काही केल्या वजनदार होत नाही आणि अशातच रामचंद्र यांचा भाडोत्री जो आपली जागा एका गॅरेजवाल्याला विकतो, ज्याचा मालक उपेंद्र लिमये आहे आणि त्यानंतर, मग सचिन खेडेकर आणि उपेंद्र लिमये यांचा चित्रपटात एकूण वावर कसा असतो आणि त्याचा शेवट ही कोणत्या नात्यानी होतो, हे बघणं ही रंजक आहे;
एक दिवस अचानक मि. आणि मिसेस गोखले यांच्या मुलाचा फोन येतो की तो स्वित्झर्लंड हून परत येत आहे, त्यानंतर मग कुठेतरी कथानकाला सुरुवात होते पण अगदी संथपणे, आणि भारतात परतल्यावर सुरुवातीचे काही दिवस खेळीमेळीचे जातात, त्यातच त्याचा वाढदिवस असतो, पण त्याआधी आपल्या मित्रांना भेटून मगच घरची “बर्थ डे पार्टी अटेंड करायची असं प्लॅनिंग असतं; पण एक प्रसंग असा घडतो ज्यामुळे संपूर्ण कुटुंब, मित्र-परिवर हादरुन जातो आणि त्या क्षणापासून चित्रपटाला कलाटणी मिळते; आनि सुरु होतो रामचंद्र गोखले चा ताठ कणा जपण्यासाठीचा संघर्ष.
इंटरव्हल नंतर काही प्रसंग, संवाद हे लक्षात रहाण्यासारखे नक्कीच आहेत पण, “फ्लो कॉन्स्टंट” नसल्यामुळे संथता येते, कारण इंटरव्हल नंतर चित्रपट भावविश्वात अडकलेला दिसतो; काही प्रसंग न पटण्यासारखे वाटतात; न्याय व्यवस्थेवर रामचंद्र गोखलेंचा विश्वास किती भाबडा आहे, किंवा दु:खाच्या गर्तेत असलेल्या एका जोडप्याचा न्यायावरचा विश्वास, त्यासाठी आवश्यक ती खटाटोप कशी असू शकते हे दिग्दर्शकांनी मांडलय. पण एक गोष्ट उजवी या चित्रपटाच्या बाबतीत सांगता येईल आणि ती म्हणजे सर्वच कलाकारांचा दमदार अभिनय, काहींनी पाहुणे कलाकारांच्या व्यक्तीरेखा साकारल्या आहेत ज्या सिनेमा पाहिल्या नंतर ही लक्षात राहतात. चित्रपटाचं संगीत काही प्रसंगांना समर्पक असून गाणी मात्र फारशी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतीलच असं नाही.
चित्रपटाचा शेवट ही तितकासा इंटरेस्टिंग नाही, किंवा “सस्पेंस”, “थरारक” प्रसंगही नाहीत, साध्या-सरळ मार्गाने बराचसा “गुडी गुडी” पद्धतीनं शत्रू वर मात होतो. अर्थात नायकाच्या बाजूनं असणार हे ठरलेलच असतं पण मनाला न रुचणार्या अशा प्रसंगामुळे, पटकथेची योग्य सांगड नसल्यामुळे चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत नाही; काही वर्षांपूर्वी अमिताभ बच्चन, शर्मिला टागोर, अनुषा दांडेकर, जॉन अब्राहम यांच्या अभिनयाचा परिपूर्ण कौटुंबिक सिनेमा “विरुद्ध“ प्रदर्शित झाला होता त्याची उचलेगिरी करुन मराठीत प्रदर्शित झालेला “कोकणस्थ”, ज्याचा आशय विषयात कोठेही चाकोरी बाहेरचा विषय नाही किंवा “प्रमोज” मधून, जाहिरातीतनं दाखवल्याप्रमाणे तडफदारता तर नाहीच नाही.
संकलन, तांत्रिकता, छायाचित्रण, “व्हीज्युअल इफेक्टस्”, लोकेशन्स या बाबींसाठी चित्रपटाला वाखाणावं लागेल, पण जर का आपण हिंदीतला “विरुद्ध” पहिला नसेल, तर मराठीतला “कोकणस्थ” केवळ डोकं बाजूला ठेवून एकदाच पहायला हरकत ही नाही.
— सागर मालाडकर
Leave a Reply