आजचा दिवस माझा
राजकीय “माणूस टिपणारा” चित्रपट
बर्याच अवधीनंतर सिने रसिकांना मराठीत राजकीय चित्रपट पहायला मिळणार आहे. “आजचा दिवस माझा” या चित्रपटातून नेहमीच्या राजकीय चित्रपटांतील विषयांपेक्षा एक वेगळा विषय दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी आपल्या समोर मांडला आहे. या चित्रपटात मुख्यमंत्री विश्वासराव मोहिते यांना केंद्रस्थानी ठेवून या चित्रपटाची कथा रचण्यात आली आहे, अर्थात प्रमुख भूमिका ही विश्वासराव मोहिते यांची आहे हे आपल्याला चित्रपटाच्या प्रमोशन मधून लक्षात आलंच असेल. अभिनेते सचिन खेडेकर यांना आपण अनेक छटा असलेल्या भूमिकांमधून, अनेक चित्रपटांतून पाहिलेलं आहे, पण “आजचा दिवस माझा” मध्ये मुख्यमंत्र्यांची भुमिका अगदी साजेशी अशीच सचिन खेडेकर यांनी निभावली आहे. कारण एका राजकारण्याचा दृष्टीकोन, त्याची चालण्या-बोलण्याची पद्धत, मोठ्या पदावर विराजमान झाल्यानंतरची त्याची ऐट, रुबाब, कौटुंबिक पातळीवर जाणवणारा फरक हे खेडेकरांनी अगदी उत्तमरित्या आपल्या अभिनय कौशल्यातून साध्य केले आहे. तर सिनेमातील इतर कलाकारांची भूमिका आणि चित्रपटात त्यांचं स्थान हे सुद्धा तितकचं महत्वाचं आणि लक्षवेधी आहे. यामध्ये अश्विनी भावे यांनी साकारलेली मुख्यमंत्र्यांच्या पत्नीची भूमिका, किंवा पी.ए.च्या भूमिकेत असलेले हृषीकेश जोशी, तसेच त्यासोबतच इतरही कलाकार ज्यांनी मंत्रालयातील कर्मचार्यांची भूमिका साकारली आहे, यामध्ये पुष्कर श्रोत्री, आनंद इंगळे, लीना भागवत, आणि किशोर चौघुले या सर्वांनी आपापल्या भूमिकेला न्याय दिला आहे.
चित्रपटाची सुरुवातच थोड्या अनोख्या पद्धतीनं करण्यात आल्याने, प्रेक्षकांची उत्सुकता ही शिगेला पोहचते आणि वेगळेपण असणार हे तेव्हाच जाणवतं, आणि कथा पुढे सरकत जाते. चित्रपटातील मुख्यमंत्री विश्वासराव मोहिते यांच्याविरुद्ध त्यांच्याच पक्षातील उद्योग मंत्र्यांनी थेट पक्ष श्रेष्ठींकडे मुख्यमंत्री हे अल्पमतात असल्याची तक्रार केली आहे. त्यामुळे मोहिते यांना दिल्लीहून ताबडतोब बोलावणं येतं आणि अनेक अंदाजांना ऊत यायला सुरुवात होते, पण दुपारीच मुख्यमंत्री मोहिते दिल्लीहून परततात तेव्हा चेहर्यावर कमालीचा उत्साह आणि पद शाबूत राहिल्याचा आनंद ही असतो. आणि मग नित्याचं कामकाज सुरु होतं यामध्ये व्याख्यान असेल, पाहुण्यांची सभा, त्यांना अपेक्षित असलेली मदत असेल, या सर्वच गोष्टींचा आढावा घेण्यात आला आहे.
अशातच ठरलेल्या एका लग्नसमारंभात जेव्हा मोहिते सपत्नीक हजेरी लावतात आणि सर्व मान्यवर पाहुण्यांची भेट घेतात तेव्हा एकच व्यक्ती त्यांना खटकते. असं का होतं? ज्यामुळे मुख्यमंत्री अस्वस्थ होतात, आणि आतून पूरते हेलावून जातात? त्या घटनेनंतर खर्या अर्थाने चित्रपटाला रंगत येते आणि मुख्यमंत्र्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करुन अंतर्मुखही करायला लावते.
त्या प्रसंगामध्ये झालेली मनाची उलथापालथ, सोबतच जबाबदार मुख्यमंत्री म्हणून सर्वस्व पणाला लावून त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आपल्या समोर उलगडत जातात. यामध्ये महेश मांजरेकर यांनी साकारलेली ”आय ए एस ऑफिसर” ची भूमिका आणि त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी ही सुद्धा चित्रपटामध्ये पहायला मिळते. अनास्थेपोटी आपण कोणताच विशेष बदल समाजासाठी करु शकलो नाही, याची ही त्यांना जाणीव होते, पण तोपर्यंत नोकरीचा टप्पा पूर्ण होत आलेला असतो.
अभिनेत्री अश्विनी भावेंनी “सी.एम.ची पत्नी” म्हणजे त्यासाठी वाटणारा थाट, आणि घरंदाजपणा या दोघांची सांगड अगदी समर्पकपणे साकारली आहे, त्यासाठी त्यांनी आवश्यक असा अभ्यास केल्याचे ही त्यांनी साकारलेल्या व्यक्तीरेखेतून दिसत आहे.
चित्रपटातल्या तांत्रिक बाजूंसोबतच गाणी आणि संगीत यांची बाजू उजवीच राहिली आहे, असं म्हणता येईल.
या चित्रपटाच्या कथेत मुख्यमंत्र्यांच्या अडचणीत पी.ए. कशा पद्धतीने साथ करतात, त्यांना कोणत्या गोष्टींचे भान ठेवावे लागते, हे हृषीकेश जोशींनी पी.ए. च्या भूमिकेतून अगदी नेमकेपणाने म्हणजेच “प्रोफेशनली” साकारले आहे.
सिनेमातला एक प्रसंग मात्र विचार करायला लावणारा आहे तो म्हणजे, मंत्र्याने उठवलेल्या खोट्या अफवेमुळे पक्षासह माध्यमांची सुद्धा दिशाभूल होते. अशातच एक पत्रकार त्या मंत्र्यावर त्यांच्या पद्धतीनं सर्व प्रकरणाचा भांडाफोड जगासमोर करणार असतो, तो का करत नाही हा प्रश्न शेवटपर्यंत अनुत्तरीत राहतो. चित्रपटात एकाच प्रसंगावर किंवा “फिरुन फिरुन तोच विषय” यावर जास्त लक्ष केंद्रित केल्यामुळे किंचितपणे संथता निर्माण झालेली असली तरी सुद्धा, विनोदी, भावपूर्ण वैशिष्ट्यपूर्ण संवादामुळे चित्रपट मूळ विषयापासून भरकटला जात नाही हे विशेष.
या चित्रपटात सुरुवातीचा पेचप्रसंग सोडला, तर राजकीय डावपेच, प्रतिहल्ले, शाब्दीक चकमकींमुळे शिगेला पोहोचलेली राजकीय कटुता अशा सर्व घटनांच्या पलिकडचा विषय असल्यामुळे पाहणार्या प्रेक्षकांना यातील वेगळेपण जाणवतं.
थोडक्यात राजकारणावर आधारीत असलेला, मुरलेल्या राजकीय पुढारी, मुख्यमंत्र्यामधील माणुसपण टिपणारा आणि त्याच्या कर्तव्याची आठवण करुन देणारा हा चित्रपट आहे. राजकीय पदाच्या अतिउच्च स्थानावर पोहोचण्याआधी व नंतर आपली माणूस म्हणून असलेली छबी कशी जपावी हे “आजचा दिवस माझा” मधून अधोरेखीत करण्याचा प्रयत्न लेखक आणि दिग्दर्शकाने केला आहे.
— सागर मालाडकर
Leave a Reply