ज्येष्ठ नाटककार आणि लेखक व ‘किरवंतकार’ प्रेमानंद गज्वी यांचा जन्म १५ जून १९४७ रोजी झाला. प्रेमानंद गज्वी हे सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून समाजातील विदारक सत्य प्रभावीपणे मांडणे यासाठी प्रसिद्ध आहेत. प्रेमानंद गज्वी यांचे ‘घोटभर पाणी’ अनेक भारतीय भाषांत अनुवादित झालं. ‘श्रेष्ठ भारतीय एकांकी’ या द्विखंडीय ग्रंथात प्रसिद्धही झालं. इंग्रजीत शांता गोखलेंनी ते अनुवादिलं आणि त्याचे प्रयोगही बंगलोरच्या एका नाट्यसंस्थेनं केले. त्यापैकी एक प्रयोग एनसीपीएच्या मिनी थिएटरमध्ये अलेक पदमसींनी आयोजित केला होता. पण ‘लघुनाट्य’रूप असल्यामुळे असेल कदाचित, समीक्षकांनी त्याची विशेषशी दखल घेतली नाही. ‘तन-माजोरी’ मराठीत विलक्षण गाजलं. त्याला राम गणेश गडकरी, मामा वरेरकर, अनंत काणेकर आदी लेखन पुरस्कारही मिळाले. नाना पाटेकरांना घेऊन ते व्यावसायिक रंगमंचावर आलं. महाराष्ट्र मंडळाच्या प्रेमामुळं त्याचा प्रयोग आणि ग्रंथप्रकाशन सोहळा लंडनमध्येही झाला. गोवा विद्यापीठात एम.ए.च्या अभ्यासक्रमात ते शिकवलं जाऊ लागलं. कोकणीत त्याचा अनुवाद झाला. पुढे सगीर अहमद चौधरी या मित्रानं ते हिंदीत अनुवादित केलं. त्याचे पृथ्वी थिएटरला प्रयोग झाले. ‘टाइम्स ऑफ इंडिया’नं त्याची दखल घेतली. अजमेरच्या (राजस्थान) ‘कृष्णा ब्रदर्स’नं ग्रंथरूपात ते प्रसिद्धही केलं. एवढंच कशाला, अमिताभ बच्चन आणि नासिरुद्दीन शाहला घेऊन त्यावर फिल्म करण्याची घोषणाही दिग्दर्शक राहुल रवैल यांनी केली होती. ‘किरवंत’खरं तर त्यांनी लिहिलं होतं १९८१ साली; पण त्याचं समीकरण नीट सुटलं नव्हतं. मग ते समीकरण पुन्हा सोडवून पाहिलं. डॉ. श्रीराम लागूंनी ते व्यावसायिक रंगमंचावर सादर केलं. आणि मग हा-हा म्हणता प्रेमानंद गज्वी हे नाव सर्वतोमुखी झालं. स्मशानकर्मे करणाऱ्या ‘किरवंता’चं उपेक्षित जीणं त्यातून प्रथमच मराठी साहित्याच्या केंद्रस्थानी आलं होतं. पं. वसंत देवांनी ‘किरवंत’चा हिंदी अनुवाद केला. तो ‘समकालीन भारतीय साहित्य’ या साहित्य अकादमीच्या नियतकालिकात प्रसिद्ध झाला नि पुढं दिल्लीच्या श्रीराम सेंटरनं ‘महाब्राह्मण’च्या रूपात हिंदी रंगमंचावर तो सादर केला. ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’च्या भारत रंगमहोत्सवातही ते सादर झालं व गाजलं. बघता बघता ‘किरवंत’ इंग्रजीत (अनुवाद- म. द. हातकणंगलेकर) आलं. कोलकाताच्या सीगल बुक्सनं ते प्रकाशित केले होते.
प्रेमानंद गज्वी यांचे पहिले नाव आनंद गजभिये.. या बद्दल ते म्हणतात.
मुळातच मला कव्वालीचा भारी नाद होता. गावी आमच्या बौद्ध समाजाचं ‘भीमबुद्ध भजनी मंडळ’ होतं. ते गावोगावी भजन गात. अशाच एका गावी कव्वालीचा सामना मी केला होता. सिनेमातील गाण्यांच्या चालीवर शेदीडशे गाणी मी लिहिली आहेत. तर मुद्दा मी प्रेमानंद गज्वी कसा झालो? आपली अंगीभूत आवड आपल्याला योग्य ठिकाणी घेऊन जाते. गोविंद म्हशीलकर हा मुंबईमधील प्रसिद्ध कव्वाल. मालाडमध्ये त्यांचा कार्यक्रम ठरलेला होता. ते यायला उशीर होत चालला होता. लोक चुळबूळ करायला लागले. कुणीतरी मला म्हणालं, ‘म्हशीलकर येईपर्यंत ‘गा’ की लेका.’ तोवर कुणीतरी तबला-पेटी आणली. मी गावू लागलो. दरम्यान म्हशीलकर आले. ‘आले; आले! ए तू थांब आता!’ मी थांबलो. गोविंद म्हशीलकरांची कव्वाली सुरू झाली. मी स्टेजवरच मागे बसलेला, ‘कोरस’ करीत. म्हणजे म्हशीलकर पुढं म्हणतील त्याच ओळी मागच्यांनी पुन्हा आळवणं. सकाळी कव्वाली संपली. जाता-जाता म्हशीलकरांनी विचारपूस केली, म्हणाले, ‘मला घरी येऊन भेट.’ मी परेलच्या बी.आय.टी. चाळीत त्यांच्या घरी भेटलो. मैत्रीचे धागे जुळले. मी गाणी लिहित होतो सिनेमातील गाण्यांच्या चालीवर नि गातही होतो कोरसमध्ये. एक दिवस ते म्हणाले, कितना लम्बा है तुम्हारा नाम.. ‘ग-ज-भि-ये’? छोटा कर दूँ? ‘गज्बी’! मी तसा शागिर्दच त्यांचा. कशाला नाही म्हणतो? दरम्यान माझ्या कानावर एक नाव आलं ‘गज्वी’ हे मुस्लीम आडनाव. गज्बीपेक्षा ‘गज्वी’ मला अधिक बरं वाटलं. मी गज्वी हे नाव स्वीकारलं. मी गाणी लिहित होतोच. आपल्या गाण्याची एखादी पुस्तिका प्रसिद्ध व्हावी ही इच्छा. तशी तयारी केली. पण पुस्तिकेला नाव काय देणार? म्हशीलकरांचा प्रश्न. मी म्हटलं ‘आनंद गीते’. तर ते म्हणाले, ‘या नावाची किताब तर आहे, मार्केटमध्ये.’ मी लगेच म्हणालो, ‘आनंद को प्रेमानंद कर देते है!’ आणि अशाप्रकारे मी आनंद गजभियेचा ‘प्रेमानंद गज्वी’ झालो. बाजारात माझी पुस्तिका आली. ‘प्रेमानंद गीते’ हे पुस्तक छापलं गेलं ‘बुद्धभूषण प्रिंटींग प्रेस’मध्ये. भैयासाहेब आंबेडकरांनी ते छापून दिलं. भैयासाहेब; डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चिरंजीव.
प्रेमानंद गज्वी यांची गाजलेली नाटके व एकांकिका: किरवंत, गांधी आणि आंबेडकर, छावणी, जय जय रघुवीर समर्थ, डॅम इट अनू गोरे, तन-माजोरी, देवनवरी, नूर महंमद साठे, शुद्ध बीजापोटी.
घोटभर पाणी, पांढरा बुधवार, बेरीज-वजाबाकी, (प्रेमानंद गज्वी) समग्र एकांकिका. प्रेमानंद गज्वी यांना वि. वा. शिरवाडकर पुरस्कार, मसापचा जीवनगौरव पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
ज्येष्ठ नाटककार आणि लेखक प्रेमानंद गज्वी हे ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष राहिले होते.
रंगभूमी/थिएटर, कला, प्रतिभा याविषयावर ड्रामा स्कूल मुबईच्या वतीने निलम सकपाळ यांनी प्रेमानंद गज्वी यांच्याशी साधलेला संवाद.
https://www.youtube.com/watch?time_continue=36&v=B65YsRASIng
संजीव वेलणकर
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply