वसंत शंकर कानेटकर म्हणजे नाटककार, लेखक वसंत कानेटकर यांचा जन्म २० मार्च १९२० साली सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर या शहरात झाला. त्यांचे वडील शंकर केशव कानेटकर म्हणजे कवि गिरीश हे सुप्रसिद्ध रविकिरण मंडळातील कवि होते. वसंत कानेटकर यांनी सांगलीच्या विलिग्टन कॉलजमधून एम.ए. केले आणि प्राध्यापक म्हणून नाशिकच्या एच.पी. टी. कॉलजमध्ये शिकवू लागले. त्यांनी १९७० सालपर्यंत शिकवले. त्यांनी मराठीमध्ये खूप चागली नाटके लिहिली. तसेच त्यांनी पंख, घर, तेथे चल राणी, आणि पोरका ह्या कादंबऱ्याही लिहिल्या. त्यांच्या अश्रूंची झाली फुले गाजलेल्या नाटकवरून हिंदीमध्ये ‘ आसू बन गये फूल ‘ हा चित्रपट प्रदर्शित झाला त्यात अशोककुमार, निरुपा रॉय, प्राण आणि देब मुखर्जी यांनी काम केले होते. त्या चित्रपटाच्या कथेसाठी वसंत कानेटकर याना फिल्मफेअर अवॉर्डही मिळाले होते.
त्यांची रायगडाला जेव्हा जाग येते, मत्स्यगंधा, लेकुरे उंदड झाली, वेड्याचे घर उन्हात, हिमालयाची सावली, प्रेमा तुझा रंग कसा, बेईमान, प्रेमाच्या गावा जावे ही नाटके खूपच गाजली. त्याचप्रमाणे कस्तुरीमृग हे नाटकही खूप गाजले. त्यांच्या नाटकांची नावे सांगायची झाली तर ती यादी खूप मोठी आहे, त्यांची जवळजवळ सगळीच नाटके गाजली. त्यांच्या ओघवत्या लेखणीने संपूर्ण महाराष्ट्राला भुरळ पाडली होती. मला काही सांगायचे आहे, पंखांना ओढ पावलांची, गरुडझेप, रंग उमलत्या मनाचे, अखेरचा सवाल, बेईमान, सूर्याची पिल्ले ह्या प्रमाणे अनके नाटके लिहिली. त्यांनी सुमारे ३९ नाटके लिहिली. गगनभेदी नाटकात तर त्यांनी सर्वाना विचार करायाला भाग पाडले. त्यात अश्विनी भावे यांनी जबरदस्त भूमिका केली होती. त्यांची अनेक गाणी आजही अनेकांच्या ओठावर आहेत. अर्थशून्य भासे मज हा किंवा गुंतता हृदय हे अशी अनेक गीते सुप्रसिद्ध आहेत.
त्यांनी व्यासांचा कायाकल्प, गड गेला पण सिह जागा झाला, दिव्यासमोर अंधार अशा एकूण सहा एकांकिकाही लिहिल्या. ते १९८८ साली ठाण्यात झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. त्यांना भारत सरकारने १९९२ साली पदमश्री पुरस्कार दिला.
अशा सिद्धहस्त नाटककाराचे ३१ जानेवारी २००० रोजी नाशिक येथे निधन झाले.
— सतीश चाफेकर.
Leave a Reply