गजापूर गावातलं कोर्ट फारसं गजबजलेलं नसायचं कधीच. तसे फारसे गुन्हेच व्हायचे नाहीत म्हणा त्या गावात. आज मात्र एक खटला उभा राहिला होता सुनावणीसाठी. धर्माण्णा पंदारे आणि दुर्याप्पा कोरवी हे दोघे आरोपी म्हणून आणले गेले होते. धर्माण्णाची बायको धुर्पदा हिचा पाण्यात बुडवून खून करायचा प्रयत्न केल्याचा आरोप होता दोघांवर.
दोन्ही आरोपी बाकावर शेजारीशेजारी बसले होते. त्यातला धर्माण्णा होता तो ठेंगणा, पण जाडाजुडा, लहान हात, लहान पाय, गरगरीत पोट आणि छातीसुध्दा तशीच, असा होता. पुटकुळ्यांनी भरलेले गाल असलेलं गोल डोकं त्या गरगरीत छातीवर मडकं ठेवल्यासारखं दिसत होतं कारण मान जवळजवळ नव्हतीच. राहायला इंदरपेठेत, धंदा पाळलेली डुकरं विकायचा.
दुर्याप्पा किडकिडीत, मध्यम उंचीचा, आजानुबाहु, वाकुडमान्या, रुंद जबडा आणि चकणे डोळे असा होता. पातळ पण बहुतेक मेंदी लावून भुरकट झालेले केस डोक्यावर एकाच बाजूला चोपून बसवले होते. गुढग्याच्या खाली पोचणारा सदरा आणि कळकट लेंगा अशा अवतारात होता. न्हाव्याचा धंदा करायचा ‘गजापूर हेअर कटींग सलून’ होतं त्याचं आणि शिवाय घरच्या दोन म्हशींच दूध रतीबावर विकायचा. न्हावीगिरी करताना अखंडपणे संतवचनं सांगत राहायची सवय त्याला होती. या त्याच्या सवयीमुळं त्याची बरीचशी गिर्हाइकं त्याला ‘कीर्तनकार महाराजच’ म्हणायची.
धुरपदा साक्षीदाराच्या बाकावर बसली होती. चारचौघीसारखीच दिसणारी, पण झोपाळू असावी. आताही पेंगत असल्यासारखीच दिसत होती. डावा पंजा उजव्या मांडीवर आणि उजवा डाव्या मांडीवर ठेवून मख्ख बसली होती. जज्जमहोदयांचं प्रश्न विचारणं सुरू होतं.
“हं, धुरपदाबाई, तुमचं म्हणणं, हे दोघे आरोपी, यातला एक तुमचा नवरा आणि दुसरा त्याचा मित्र, तुमच्या घरात आले आणि त्यांनी तुम्हाला पाण्यानं भरलेल्या पिंपात टाकलं. बरोबर? आता जरा उभ्या रहा आणि सविस्तर सांगा बघू काय घडलं ते.”
धुरपदा उठून उभी राहिली आणि दोन्ही आरोपींकडं एकएकदा मारक्या म्हशीसारखं बघत बोलायला लागली.
“व्हय न्हवं काय ! आवो, सांजच्या व्यक्ताला म्या बसलीती बावचीच्या शेंगा मोडत तंवर ह्ये दोगंबी आले भाईरनं. म्या वळीकलं, की ह्येन्चं दोघांचं कायतरी घ्याटम्याट चालल्यालं हाय. त्याबिगार अशी इस्कटल्यावानी दिसनार न्हाईत. दुर्याप्पानं वाकडी मान करून माज्याकडं बगीतलं. आवो त्यो चकनाच हाय, पर माज्या ह्या दाल्ल्यानंबी मान तशीच वाकडी क्येली आनि बगीतलं. दोगं मुरदाड संगट असली म्हंजी अशीच वागत्यात. म्या इचारलं, “काय पायजे भाडयानो तुमास्नी?” तर येक न्हाई नि दोन न्हाई……..”
“मी पेलेलो, टाईट हुतो.” धर्माण्णा बरळला.
“आरं आपुन दोगंबी प्येलेलो हुतो, टाईट ! असं सांग की. भ्याचं काय तेच्यात? प्येलेलो तर प्येलेलो ! कोन पीत न्हई? काय वो जजसायेब ? ” दुर्याप्पानं री ओढली.
जज्जमहोदय कडकपणे म्हणाले, “म्हणजे तुम्ही दोघेही नशेत होतात. असंच ना?”
“काई संशोयच न्हाई !” धर्माण्णानं हमी भरली.
“आवो, कुनालापन हुतंच की असं कदी कदी.” दुर्याप्पा बरळला.
“तुम्ही दोघं गप्प बसा. ठीक आहे धुरपदाबाई, पुढं सांगा.” जज्ज महोदय धुरपदाकडं मोहरा वळवत म्हणाले.
“तर बगा, ह्यो माजा मुरदाड न्हवरा म्हन्तो कसा, ‘शंबर रुपय पायज्येत का तुला?’ मी म्हन्लं ‘पायज्येत की. दे.’ तसा त्यो भाईर ग्येला आनि तितं पागुळीचं पानी साटवायचं येक ब्यारल ठीवलं हुतं त्ये आडवं ढकलंत घीऊन आला आनि त्ये खोलीत मदूमद हुबं करून ठीवत म्हनाला, ‘जा बारडीबारडीनं पानी आन आनी ह्ये ब्यारल भर काटोकाट’. म म्या बारडी घ्येतली आन् लागली भराय पानी. आरदा तास लागला भराय. तवर दोगं बाटली काडून बसलेते प्याला. म्या म्हन्लं ‘आरं पिंडक्यांनो ह्या ब्यारलपरास भरून प्येलाईसा आत्तापावतोर. आता बास करा…. घ्या, ब्यारल भरलं काटोकाट.’
‘मंग ह्या दुर्याप्पानं खिशातनं शंबराची नोट काडून मला दिली. तसा न्हवरा बोलला, ‘आजून शंबर पायज्येत का?’ म्या म्हन्लं ‘द्या की’. तर त्यो म्हन्ला, ‘मंग तुजी कापडं फेड’.
‘कापडं फेडू? समदी ?’
‘पायज्येल तर एक बारकंसं पटकूर बांद कमरंला. आमी जंटलमॅन हाय, व्हय का नाय रे धर्माण्णा?’ दुर्याप्पा म्हन्ला.
‘सायेब, शंबर रुपय म्हन्जे शंबर रुपय ! म्या कापडं फेडली आणि इचारलं, ‘आता?’ तसा न्हवरा दुर्याप्पाला बोल्ला, ‘तैय्यार हाइस?’
‘तैय्यार हाय.’
मंग एकानं माजं मुंडकं धरलं, दुसऱ्यानं धरलं पाय आनि म्या ‘काय करता पिंडक्यांनो’ म्हनं म्हनंस्तवर ब्यारलात टाकलं की वो मला सुक्काळीच्यानी. पानी लई गार हुतं, बरफावानी, म्या वरडायली, तशी ह्यो धरम्या म्हन्ला, ‘झालं?’. दुर्याप्पा बोलला, ‘झालं!’ तर धरम्या त्येला म्हन्तो कसा, ‘पर हिचं मुंडकं रायलय की पान्याच्या वर. माप चुकनार मग.’
‘आरं, मग दाब की पान्यात खाल्ती.’
‘मग माज्या न्हवऱ्यानं माजं मुंडकं पान्याखाली दाबून धरलं. सायेब म्या पार घुसमाटली सायेब. मग न्हवराबी सटपाटला आत्ता ही मरती का काय म्हनून, आनि त्येनं तशीच मला मानगुट धरून उचलली आणि पान्याभाईर काडली. म्हणला, ‘जा सटवे, कापडं घाल.’
म्या, सायेब, लईच एडबाडलीती वो! पळतच भाईर ग्येली. तवर तिकडनं किशनमल कापड दुकानाचा मालक किशनमल भाईर आला, त्येनं दुकानातलं एक लुगडं आनून माज्या आंगावर टाकलं. आनि माजी चित्तरकथा ऐकून मला पोलिस चौकीत घिऊन ग्येला. मंग आमी दोन पोलिसांस्नी संगट घिऊन घरला आलो तर तितं या पिंडक्यांचं टकरीच्या एडक्यांगत आपसात भांडान सुरू हुतं.
धरम्या म्हनीत हुता ब्यारलात धा बारड्या पानी भराय लागलं, म्हन्जे अंजमास दोनशेहे लिटर. तर दुर्याप्पाचं म्हननं बारड्या फुल भरीत न्हवतास, म्हन्जे कटाकटी सा बारड्याच भरल्या, म्हणजे फक्त येकशेवीस लिटर.
तवा मग पोलिसांनी दोगान्लाबी दोन दोन लाता घातल्या कंबारड्यात आनि धरून न्येलं बगा. फुडचं काय मला ठाव नाय सायेब.”
धुरपदा खाली बसली. कोर्टात जमलेले लोक खुसूखुसू हसायला लागले होते. जज्ज महोदय आरोपींकडे वळून म्हणाले, “दुर्याप्पा कोरवी, या झमेल्याला तूच जबाबदार आहेस असं दिसतंय. आपल्या सफाईमध्ये तुला काय म्हणायचं आहे? सांग.”
दुर्याप्पा उठून उभा राहिला. “सायेब, मी फुल टाईट हुतो.”
“ते ठाऊक आहे आम्हाला. पुढं बोल.”
“बोलतो सायेब, ह्यो धर्मप्पा सकाळी नवाच्या सुमाराला माज्या दुकानात आला आनि म्हन्ला ‘चला दुर्यापशेठ, नवटाक मारून ईवूया. तुमी बी घ्या आम्च्यासंगट आज.’ मग आमी दोगंबी गुत्त्यावर गेलो. ह्येनंच मग नारंगीचं दोन नवटाक मागीवलं. दोगं बी प्येलो. पन आपन बी काय फुक्कट पिनाऱ्यातलं न्हई बरं का. मीबी मग दोन नवटाक मागीवलो. तित्नं फुडं, ह्यो माज्यासाटी, मी ह्येच्यासाटी आसं मागवीत मागवीत आम्मी पीतच ऱ्हायलो दुपार झाली तरी. मग येकदम ह्यो रडाय लाग्ला. मी इचारलो, का रं बाबा? तं म्हन्ला बेस्तरवारच्या आत त्येला कुनाचं तरी येक हज्जार रुप्पय मागारी द्याचं हाईत आनि त्येच्याकडं त्ये न्हईत. मग जरा वेळ तसंच मुकाट बसला आन् मग येकदम म्हन्ला, ‘दुर्यापशेट, मी माजी बायको धुरपदा इकतो तुमाला. तुमी खरीदी करा.’
आता, ध्यानात घ्या बरं का सायेब, मी फुल टाईट, त्यात्नं माजी बायको म्येल्याला चार वरसं हून ग्येल्याली. मान्साला जराशी कुटं तरी आस लागतीच की वो. काय ? खरं का न्हाई ? मी काय तंवर ह्येच्या बायकूला बगितल्याली न्हवती. पन काय झालं तरी बाई ती बाईच की वो ! म मी इच्यारलं, ‘कितक्याला इकनार?’
ह्येनं जरा येळ इचार करीत घालीवला आन् म्हन्ला, ‘मी तिला किबिक मीटर परमानं इकनार’. मला काय वावगं वाटलं न्हई. कारण मीबी फुल टाईट हुतो. आन येक किबिक मीटर म्हंजी येक हजार लिटर ह्ये मापबी मला ठाऊक हुतं. मं मी ईचारलं का किबिक मीटरला किती रुपय ? ह्यो म्हन्ला ‘सा हज्जार रुपय’.
मी मनातच हिशेब घातला. हजार लिटर ला सा हजार, म्हंजे सा रुपय लीटर. आवो सायेब, गाईचं दूद बी धा रुपय लिटरच्या खाली मिळत न्हाई. आनि आख्खी बाई? सौदा तर सस्ता हुता. पन मी हाडाचा बिजनेसम्यान! घासाघीस केल्याबिगर ऱ्हाईन का? म्हन्लं, ‘म्हाग हाय गड्या. मी बग जास्तीत जास्त किबिक मीटरला चार हजार भाव दीन.’ तसा ह्यो गयावया करत ‘परवडत न्हाई, माजी नुकसानी हुतीया’ असं म्हनाय लागला. पन मी काय हाटलो न्हई. म्हन्लं, ‘आरं धर्माप्पा, तुजी बायकू काय नवी ताजी न्हई, चार पाच वरसं तरी वापरली हाईस, मंजी शेकण्डह्यांडच झाली की!’ आखीरला ह्यो कबूल झाला. म्हन्ला, ‘कबूल हाय, चला म् जाऊया घराकडं.’ म आमी निगलो एकमेकांच्या गळ्यात हात टाकून, ‘मी तुजा भाऊ, तू माजा भाऊ’ आसं करत.”
खटला ऐकायला आलेल्या लोकांप्रमाणेच जज्ज महोदयांचंही हा अफलातून सौदा ऐकताना कुतूहल वाढत चाललं होतं. तरी त्यांनी समज दिली, “दुर्याप्पा कोरवी, पाल्हाळ लावू नको. लवकर लवकर सांगून टाक पुढं काय झालं ते.”
“सांगतो की सायेब, तर त्येवड्यात् माज्या मनात डाउट आला, की बाईचं मोजमाप काडायचं कस? ह्येला इचारलं तर ह्यो म्हन्ला, ‘सोप्पं हाय. येक ब्यारल घ्याचं, पान्यानं भरायचं, धुरपदेला त्यात ठीवायचं आनि ज्ये पानी भाईर पडल त्ये मापायचं. कळ्ळं का?’
‘आरं पर त्ये पानी भाईर सांडून जानार, मग मापायचं कसं म्हन्तो मी?’
‘सायेब, ह्यो त्येच्यामारी लई डोकेबाज. त्यात प्येलेला. मग काय? इचारायलाच नगो. म्हन्ला, ‘आवो दुर्यापशेट, शिंपल! धुरपदेला भायेर काडल्यावर ब्यारलात जागा हुईल का न्हाई? म आपन बारडी बारडीनं पानी भरून ती जागा भरून काडायची. किती बारड्या पानी लागंल त्ये माप धुरपदेचं. पन्नास बारड्यांचा येक किबिक मीटर हुतो. हाय का नाय शिंपल?’
तर बगा सायेब, आमी आनि धर्माण्णा त्येच्या घरला ग्येलो. त्येच्या बायकूला बगीतलं. काई खास न्हवती. म्या जरा खट्टू झालो. पर म इच्यार क्येला, रंभा काय आन् सूरपनखा काय, बाई ती बाईच की. दोगीबी उपेगाला येत्यातच की! खरं का न्हाई साययेब? काय म्हन्तासा? बरं त्ये जाऊ द्या. तर बगा, तिच्याकडं बगून मी अंदाज घीत्ला, दोनशे लिटरांच्या वर काय न्हवती ती. म्हंजे सौदा काई म्हागात जानार न्हवता. आणि, आवो, खरंच तिचं माप सा बारड्यांइतकं म्हंजे एकशेहे वीस लिटर यवढंच भरलं. आता फुडचं काय त्ये धुरपदेनं सांगितल्यालं हायच तुम्माला सायेब. माजी नुकसानी हुनार हुती तरी पन तिच्या आंगावर नामीनल तरी कापडं ठेवाय मीच सांगितली ह्यो पाइण्ट बी ध्यानात घ्या बरं का. पान्यातन भाईर आल्यावर ती पळून जावून पोलिसांना घीऊन आली. पोलिसांनी लाता घातल्या आनि आमाला वडत घीऊन ग्येले चौकीवर. ह्ये काय बरूबर न्हाई झालं. मी कायद्यानं चालनारा मानूस हाये, नुकसान भरपाई मिळाय पायजे मला. तसा हुकूम द्या सायेब. म बसू का आता खाली?” दुर्याप्पानं आपली साक्ष संपवली.
त्यानंतर धर्माण्णाची साक्ष झाली. त्यानंही दुर्याप्पाची री ओढली. पण एकच पालुपद लावलं, “धुरपदेच माप धा बारड्या म्हंजे दोनशेहे लिटर भरलं ह्येच् खरं हाय. कुनाची म्हन्शीला त्येची आण घेतो, सायेब, आगदी तुमचीसुद्दीक.”
जज्ज महोदयानी कपाळावर हात घेतला. आणि थोड्या वेळात आपला निर्णय सांगितला. धुरपदेचा मर्डर करण्याचा कट केल्याचा आरोप सिध्द होत नसल्यानं दोन्ही आरोपीना फक्त विवाहसंस्थेच्या पवित्रतेची शिकवणी देऊन कोर्ट उठेपर्यंत बाकावर उभं राहण्याची शिक्षा सुनावली.
शिक्षा भोगून झाल्यानंतर धर्माण्णा धुरपदेबरोबर इंदरपेठेतल्या त्यांच्या घरी गेला आणि दुर्याप्पा त्याच्या गजापूर हेअर कटिंग सलूनकडे.
— मुकुंद कर्णिक
धम्माल गोष्ट… संपूर्ण मनोरंजन …. वातावरण निर्मिती इतकी छान की प्रत्यक्ष खटला बघून मजा घेतेय असं वाटलं…
धन्यवाद
कथा एकदमच भन्नाट.
अनुवाद, अनुवाद न वाटता कथा इथल्याच मातीतील वाटते.
तिघांचीही व्यक्तिचित्रणं अफलातून!
तुमचा अभिप्राय वाचून हुरूप आला. धन्यवाद.