महाभारत पाहणं हा लहानपणी हृद्य सोहळा असायचा… त्या वेळेत भूक लागली म्हणायची बिशाद नव्हती… आजी लोक सॉलिड बडवत. रस्त्यांवर शुकशुकाट सगळे tv समोर …साधारण अर्धा तास आधी प्रक्रिया सुरू व्हायची. घरावर भले मोठे अँटीना नावाचे विमानसदृश्य उपकरण असायचे….काका /दादा पैकी कुणाला तरी वर चढवून ते adjust करावे लागे… “आले आले रे चित्र …गेला रे आवाज ” खालून वर अशी बोंबाबोंब झाली की “म्हैसमाळ कडे फिरवं रे…” म्हणत अनेक जेष्ठ लोक त्यात उडी घेत… हे म्हैसमाळ कुठल्या दिशेला आहे आणि तिकडे का फिरवायचे? हे प्रश्न आजही तसेच आहेत…… आणि एकदा चित्र आणि आवाज दोन्ही एकत्र सापडले रे सापडले की…. महाभाsssरत असं तुतारी फुंकल्या सारखे टिपेच्या स्वरात निनादू लागे.आज HD tv पाहतांनाही तो भला थोरला tv चा डब्बा आठवून जातो …
अजूनही महाभारत जसेच्या तसे आठवते.ते मंत्र म्हणून बाण सोडणे मग ते पेटणे आणि बाणांची टक्कर … अविस्मरणीय… अभिमन्यूचे चक्रव्यूहात अडकणे…त्याचा मृत्यू मग अर्जुनाची चितेची तयारी आणि हा पहा सूर्य आणि हा जयंद्रथ … असे एकसे एक प्रसंग. त्यापैकीच एक द्रौपदी वस्त्रहरण. दुर्योधन केस धरून ओढत आणतो … दुःशासन साडी ओढतोय कृष्ण पुरवतोय.. द्रौपदी गरागरा फिरतेय… दुःशासनाच्या पायाशी साड्यांचा ढीग साठलाय. आता तुम्ही म्हणाल हा सीन आवर्जून लक्षात रहावा याचे काय बरे कारण असावे ? उत्तर आहे ऑनलाइन साड्यांची विक्री रोज सकाळी व्हाट्स अँप उघडले की द्रौपदी इतक्याच किंवा अंमळ जास्तच साड्यांच्या images जमा झालेल्या असतात. त्यामुळे ह्या प्रसंगाची नकळत मनात उजळणी होते आणि त्या वेळी पितामह भीष्म ह्यांच्या चेहऱ्यावर दाटलेला उद्वेग आणि हतबलता माझ्या चेहऱ्यावर दिसू लागते.
सध्या online वस्तू विक्रीचं जबरदस्त फॅड आहे. बिनभांडवली असा हा उद्योग .. अनेक लोक मध्यस्थाची भूमिका स्वीकारत ऑनलाइन कपडे दागिने वस्तू ह्या विक्रीस मांडतात… ऑर्डर मिळाली की टाकायची नी दोन दिवसांत स्वतः चे कमिशन घेऊन त्या व्यक्तीला द्यायची…. उत्तम व्यवसाय मी बापुडी काय बोलणार?? परंतु हे फार सोपे किंवा कमी रिस्की म्हणून की काय ह्या online विक्रेत्यांमध्ये शतपटीने वाढ झाली आहे. अनेक groups वर ढीगाने साड्या दागिने आणि इतर कपडे ह्यांच्या images पॊस्ट केल्या जातात बरे! आपण auto downloading off केलेलं असलं तरी सुद्धा चॅट delet करणं हे एक नियमित काम होत जातं.
स्त्री सुलभ प्रवृत्तीनं तुम्ही साड्या पाहण्याचा मोह आवरुच शकत नाही (मी तर मुळीच नाही) बघायला काय लागतं म्हणत म्हणत तुमचा अख्खा फोन हँग होईपावेतो साड्यांचा हा ढीग जमा झालेला असतो.त्यातही तुम्ही अशी प्रतिक्रिया दिली किंवा अजून रंगांची चौकशी केली की तुमच्या पर्सनल चॅट वर रोजच्या 10/15 साड्यांचा अभिषेक ठरलेला. यात विक्रेत्यांचे गैर काहीच नाही हो! पुश मार्केटींग ही भारतीय मार्केटिंग ची सर्वाधिक प्रचलित पद्धत आहे.परंतु किमान समोरची व्यक्ती customer आहे की नाही हे तरी पडताळून पाहायला हवेच. मुळात जी व्यक्ती व्हाट्स अँप/ फेसबुक उत्तम वापरू शकते ती व्यक्ती चार ऑनलाइन साईट्स शोधून साडी किंवा इतर गोष्टींची खरेदी सहजी ऑनलाइन करूच शकते.आता तर COD अर्थात कॅश ऑन डिलिव्हरी -वेळेवर रोख रक्कम हा पर्याय उपलब्ध असतोच. शिवाय वस्तू घरपोच मिळते ते वेगळंच. म्हणून खरंतर ह्या images च्या बाँबरडींगचा म्हणावा तसा उपयोग होत नाही. त्यामुळे ही सगळीच प्रक्रिया मुरमाड जमिनीत पीक घेण्यासारखी निष्फळ आहे.
दुसरा आणि अधिक महत्वाचा भाग असा की साडी किंवा एकुणातच कपडे नुसते चित्र पाहून खरेदी करता येतात का ?? शिवाय त्यातील रंगछटा बदलणार हे घोषित केलेले असतेच.आमच्या आधीची आई लोकांची पिढी साड्यांमध्येच वावरली… आम्ही लोक मात्र पंजाबी सूट, कुडते,जीन्स, वनपीस सगळे प्रयोग करतो त्यात साडी नेसणे अगदी विरळाच… तरीदेखील साडी खरेदी ह्या विषयाला अजूनही अनन्यसाधारण महत्व आहे… असायलाच हवे… कारण ती प्रक्रिया नाही नुसती एक अख्खा प्रवास आहे. प्रत्येक साडी एक वस्त्र नाही तर आठवणींचा खजिना, सहवासाचे अत्तर आहे. प्रत्येक सुखी विवाहित पुरुषासाठी अनंत फलदायी असे हे व्रत आहे.
साडी खरेदी ह्या विषयावर अनेक पुरुषांनी परखड टीका केलेल्या आहेत… असे असूनही तुमचा नवरा साडी खरेदीला तुमच्या सोबत येत असेल तरच तुम्ही जिंकलात. साडीची किंमत अगदीच बिनमहत्वाची आहे . मुळात नवऱ्यासोबत साडी खरेदी ही अत्यंत रोमँटिक बाब आहे. (शक्यतो आपले वारस घरीच ठेवून दोघांनीच निघावे) नवरे मंडळींनी मोबाईल खिशात आणि सारे लक्ष आपल्याच बाईल वर ठेवावे. हा वेळ आपण वेस्ट करीत नसून इन्व्हेस्ट करीत आहोत हे ध्यानी धरावे. चेहरा कायम हसतमुख ठेवावा. साधारण चार ते पाच दुकाने आणि काही हजार साड्यांचे ढीग उपसल्या नंतर … शॉर्ट लिस्ट केलेल्या साडीतही मनाजोगा रंग नसतो किंवा हव्या त्या रंगाला हवे ते काठ नसतात … हे अगदीच क्षुल्लक आहे…. दुर्लक्ष करावे.त्या वेळी शिव तांडव न करता श्रीकृष्णाला स्मरावे. त्याने स्वर्गातून पारिजात आणला होता … आपण फक्त साडीच तर घेतोय … खोल श्वास घ्यावा….
अखेर आपली अर्धांगी काही साड्या खांद्यावर लावून भुवया उडवीत प्रतिक्रिया विचारते .. हा सगळ्यात महत्त्वाचं क्षण .. प्रत्येक साडीला उत्तम म्हणणे आवश्यक …अखेर उरलेल्या साड्यांमधून तिला साडी निवडण्यास मदत करावी. एका ऐवजी दोन साड्या घेणे किंवा बजेटच्या बाहेर साड्या घेणे …called cherry on top नंतर दहीपुलावरील एखाद्या दुकानात आईस्क्रीम लस्सी किंवा rk वर पाईनॅपल ज्यूस पाजून ह्या व्रताचे उद्यापन करावे.(स्थळ सोयीनुसार बदलू शकता) त्या वेळी तिचा हात हातात घेऊन किंवा डोळ्यात डोळे घालून तू कित्ती करतेस घरासाठी किंवा सारखी काय काटकसर? स्वतः साठी घेतांना काय विचार करायचा… किंवा शक्य झाल्यास अमुक रंग तुला कित्ती खुलून दिसतो ह्या विषयी बोलणे अत्यावश्यक आहे.या व्रताच्या प्रभावाने घरात चिरंतन शांतीचा वास होतो, गृहलक्ष्मी प्रसन्न असल्याने लक्ष्मीची कृपा लाभते.
साडी प्रत्यक्ष हातात घेऊन पाहणे त्याचा पोत, त्याचा रंग ह्या साऱ्या गोष्टी अनुभवण्याचा आहेत.त्याहीपलीकडे ते निमित्त आहे .. पत्नीवरील प्रेम व्यक्त करण्याचे. .. ती जी अहोरात्र स्वतःचे सारे जग विसरून घरासाठी राबतेय कष्ट करतेय तिला आनंद देण्याची एक संधी आहे. मनाजोगी साडी खरेदी केल्यानंतर तिच्या चेहऱ्यावरील ओसंडून वाहणारा आनंद पहावा… साध्याश्या चेहऱ्यावर समाधानाचं तेज झळकत असतं … ती खुश असते ते त्या काही हजारांच्या साडीसाठी नव्हे तर आपली कुणीतरी दखल घेतंय ह्या जाणिवेनी….आपलं अस्तित्व ,आपले कष्ट ह्याची जाणीव आपल्या जोडीदाराला आहे … त्याच्यासाठी आपण मोलाचे आहोत ही त्या क्षणभरातून लाभलेली भावना आयुष्याला पुरणारी असते..म्हणून तर साडी घ्यावी तर नवऱ्यासोबतच.
पाच वीर योद्ध्यांची पत्नी असणाऱ्या द्रौपदीचेही दुःख कदाचित हेच होते. वस्त्रहरणात होणाऱ्या अपमानापेक्षाही अधिक जळजळीत निखारा तिनं काळजावर ठेवला होता… तो म्हणजे आपल्या पतींनी आपल्याला वस्तू मानले..आपले अस्तित्व, आपला त्याग, आपले समर्पण ह्याची पतीला शून्य किंमत आहे. हा पराभूत भाव अनेक घराघरांतील गृहिणीच्या मनात बोचत असतो, खोल खोल रुतत असतो. आयुष्यभर ज्याचा हात धरून सारं हसतमुखानं सावरते, जपते तिच्या अस्तित्वाची दखलही न घेणं .. हेही आत्महरणच नव्हे का?
-यशश्री रहाळकर
Leave a Reply