आजची कथा : ड्रॉवर
पूर्व प्रसिद्धी : मासिक अंतर्नाद
सप्टेंबर , १९९९
‘ रस्त्यावरून जात असताना मैलाचे दगड दिसतात , म्हणून त्यांना कुणी बरोबर घेऊन जातं का ? त्या दगडाचं स्थान , त्या ठिकाणाहून जाणाराला आपण किती चाललो , हे कळण्यापुरतं असतं ! ‘
अशी एक मध्यवर्ती कल्पना केव्हातरी मला सुचली होती .
दैनंदिन व्यवहार चालू असताना अशा अनेक कल्पना मला नेहमी सुचत असतात . मग खिशातल्या छोट्या वहीत मी त्या लिहून ठेवत असतो . आणि स्वस्थचित्त असताना मग त्यातल्या एखादया कल्पनेवर मनातल्या मनात एखादा आकृतिबंध आकाराला येत असतो .
त्यादिवशी असंच झालं. संपादकांचं पत्र आलं आणि मी विचार करू लागलो. वही चाळता चाळता मैलाच्या दगडाच्या मध्यवर्ती कल्पनेविषयी मन घुटमळू लागलं.
अशावेळी एक अस्वस्थता असते. काहीतरी सुचू पाहत असतं आणि मनातल्या आकृतिबंधाला योग्य शब्द मिळत नसतात.
मग नुसतं फिरणं , नको असलेल्या कामात व्यस्त राहणं असं काहीतरी माझं होत राहतं.
तर अशाच एका अवचित क्षणी मला टेबलाचा ड्रॉवर साफ करण्याचा मूड आला आणि मी ड्रॉवर उघडला. त्यातल्या वस्तूंची गर्दी बघून मलाच चमत्कारिक वाटू लागलं. परस्परविरोधी अनेक वस्तू मी त्यात कोंबून कशाही ठेवल्या होत्या. पेनं , पेन्सिल , खोडरबर , नेलकटर , सुटे पैसे , किल्या , कागदाचे तुकडे , कुठली कुठली बिलं …कशाचा कशाला पत्ता लागू नये इतकी गर्दी .. आणि लक्षात आलं की हे अगदी आपल्या मनासारखं आहे .
नको असणाऱ्या अनेक गोष्टींनी मन खच्चून भरून गेलेलं असतं आणि जेव्हा केव्हा काही आठवायला हवं असतं तेव्हा काहीच आठवत नाही. आठवणींचा चिखल झालेला असतो डोक्यात …
असं काहीतरी लक्षात आलं आणि त्याक्षणी मी तो उघडा ड्रॉवर तसाच ठेवून पॅड आणि पेन हाती घेतलं. आणि कागदावर लिहायला सुरुवात केली …
‘आळसावलेल्या कुत्र्यानं उठावं , अंग झडझडावं आणि उडी मारण्याची तयारी करावी , तसा दिवस उगवला …’
कथेला सुरुवात तर चांगली झाली .
मग त्यात रवी आला. प्रेम विवाह करूनसुद्धा नको इतक्या चिकित्सक वृत्तीनं राहिल्यानं होणारी भांडणं आली. त्यामुळे वैतागून माहेरी गेलेली त्याची बायको किरण त्यात आली. रवीची भावनाप्रधानता , किरणची जमिनीवर राहून विचार करण्याची वृत्ती , त्यातून बिघडलेले नाते संबंध हे सगळं आलं. कथा पुढे पुढे सरकत असताना लक्षात आलं की हे सगळ्यांच्या कथेत असतं. मग आपल्या ड्रॉवर कथेमध्ये वेगळं काय?
मग मैलाच्या दगडाचं स्थान , ड्रॉवर मधील वस्तू असं काही काही आठवत गेलं, सुचत गेलं. त्याअनुरोधानं प्रसंग येत गेले. माझीच कथा असूनही मी त्या पात्रांच्या विश्वात गुंतत गेलो आणि शेवट करण्याआधी पुन्हा विचारात पडलो. दोघं एकत्र का येत नाहीत असा मलाच प्रश्न पडला आणि केव्हातरी ड्रॉवर साफ करताना जुनी टाचणी बोटाला टोचली होती ती आठवण आली आणि कथेचा शेवट सुचला.माणसाच्या जुन्या सवयी , जुन्या आठवणी कधी कधी अनपेक्षितपणे सुखद धक्का देतात आणि आयुष्य बदलून जाते. मैलाच्या दगडाला उचलून घेऊन जायचे नसते, ही जाणीव किंवा ड्रॉवर मधल्या सगळ्याच वस्तू टाकाऊ नसतात ही जाणीव होणे महत्त्वाचे असते.
कथा लिहिताना फ्लॅशबॅक तंत्राचा , वर्तमानातल्या भानाचा , छोट्या छोट्या प्रसंगांचा , आशयघन संवादाचा उपयोग केल्याने कथेला वेगळी गती प्राप्त झाली . कथेतील किचन , आरसा , बस ही सगळी पात्रं म्हणून अवतरली . १९९९ मधली कथा असली तरी आत्ताच्या गतिमान युगातील जोडप्यांची व्यथा मांडणारी कथा म्हणून आजही ती तितकीच वाचनीय वाटते .
— आजही ड्रॉवर उघडला की ड्रॉवर ची निर्मिती प्रक्रिया आठवते .
आणि खूप समाधान वाटते .
— डॉ .श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी .
९४२३८७५८०६
———-
कथा-सांगोपांग मधील माझ्या कथांचा मी करून दिलेला परिचय कसा वाटला हे जाणून घेण्याची आस आहेच .
Leave a Reply