एअर इंडियाच्या ड्रीम लायनरने जकार्ता एअरपोर्ट वरून टेक ऑफ घेईपर्यंत, जहाजावर इंडोनेशियातून भारतात जाण्यासाठी स्पेशल फ्लाईट ची व्यवस्था केली गेलीय ही बातमी मिळाल्यापासून ते एअर इंडियाच्या विमानात बसेपर्यंतच्या मागील आठ दिवसातील सगळ्या घडामोडी एखाद्या ड्रीम सारख्याच होत्या. स्पेशल फ्लाईट ज्या दिवशी असेल त्याच्या अगोदर जकार्ता शहरापासून 100 km खोल समुद्रात उभ्या असलेल्या जहाजावरुन जकार्ता शहरात जाण्यासाठी बोट सर्व्हिस मिळेल की नाही या शक्यते पासून, दूतावास आपल्याला भारतात परतण्याची संधी देईल की नाही आणि त्यानंतर स्पेशल फ्लाईट साठी आपले तिकीट जहाजावर असताना बुक होईल की नाही अशा सगळ्या घटना एकमेकांत जर तर च्या प्रश्नात अडकलेल्या होत्या. जहाजावरुन संध्याकाळी पाच वाजता उतरल्यावर दोन लहान बोट बदलून जकार्ता शहरात पोहचायला रात्रीचे बारा वाजले. एजंट गाडी घेऊन पीक अप साठी आला आणि हॉटेल मध्ये नेण्यापूर्वी रॅपिड टेस्ट करायला हॉस्पिटल ला घेऊन गेला. टेस्ट निगेटिव्ह आली त्याचा रिपोर्ट घेऊन हॉटेल वर पोचायला रात्रीचे दोन वाजले कारण नेहमीचे सगळे हॉटेल बंद असल्याने पर्यायी हॉटेल शोधायला तासभर फिरावे लागले. जकार्ता विमानतळावर फक्त एअर इंडियाच्या विमानासाठी भारतीय जमा होतं होते. भारतीय दूतावासातील कर्मचारी आपुलकीने सहकार्य आणि मार्गदर्शन करत होते. इंडियन नेव्हीचे एक कमांडर स्वतः अडचण असलेल्या प्रवाशाला शांतपणे ऐकून आणि समजून घेत होते तसेच त्याची समस्या दूर करत होते. भारतीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विमानतळावर भारतात परतण्यासाठी आतुर असलेल्या तणाव ग्रस्त भारतीयांशी आपुलकीने आणि सहजतेने वागतानाचे भावनात्मक क्षण पाहून भारावल्यासारखे झाले होते.
जहाजावरुन जकार्ता आणि जकार्ता हुन हजारो किलोमीटर लांब एअर इंडिया चे ड्रीम लायनर विमान साडेपाच तासात मुंबईला येऊन पोचले. मुंबईहुन घरी यायला आठ दिवस लागले कारण वाशीच्या हॉटेल मध्ये क्वारंटाईन साठी पाठवले गेले. विमानाचे तिकीट 36000 आणि हॉटेल साठी दिवसाचे 1500 ते 4000 हॉटेल च्या दर्जा प्रमाणे भरावे लागतील किंवा सरकारी क्वारंटाईन फॅसिलिटी मध्ये राहावे लागेल असे पर्याय दिले होते भारतात परतणाऱ्याना दिले होते.
सुरवातीला 14 दिवस हॉटेल क्वारंटाईन करावे लागेल अशी माहिती दिली गेली पण सरकारने नंतर सात दिवस हॉटेल क्वारंटाईन आणि उरलेले सात दिवस होम क्वारंटाईन करण्याची परवानगी दिली. सात दिवस झाल्यावर स्वाब टेस्ट केली गेली. टेस्ट निगेटिव्ह आली आणि हॉटेल मध्ये सात दिवस बंद खोलीतुन बाहेर पडून आज घराच्या खोलीत पुन्हा एकदा सात दिवसांसाठी बंद.
इंडोनेशियातील भारतीय दूतावासाकडून इंडोनेशियात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी केलेली व्यवस्था आणि सहकार्य कधीही न विसरता येण्यासारखे आहे. मुंबईत इमिग्रेशन क्लियर होऊन बाहेर पडेपर्यंत एक मिनिटभर सुद्धा कुठे खोळंबून राहावे लागले नाही. सान्वी मागील जहाजावर गेल्यापासून व्हिडीओ कॉल वर रोज एकच प्रश्न विचारायची की ड्याडा तू कधी येशील?? आज तिला कोणी बोललेच नाही की तुझा ड्याडा आज येणार आहे. गाडीतून उतरताना बघून तिला विश्वासच बसला नाही की तिचा ड्याडा खरोखरच आलाय. पावणे तीन वर्षाचा मुलगा माझ्याकडे बघतच राहिला ड्याडा ला हाक मारू की त्याच्याशी हसत राहू अशा विचारात कावरा बावरा झाला. त्या दोघांच्या चेहऱ्यावरील गोंधळ आणि आनंद कुठेच मावत नव्हता ते पण स्पीचलेस आणि मी पण. दोन्ही मुलांना घराबाहेरूनच लांब अंतर ठेवून नाचताना बघून सगळा ताण तणाव आणि शीण कुठल्या कुठे गायब.
© प्रथम रामदास म्हात्रे
मरीन इंजिनियर
B.E.(mech.), DIM.
कोन, भिवंडी, ठाणे.
Leave a Reply