नवीन लेखन...

‘लॉटरीचे तिकीट’- स्वप्न आणि इच्छा पूर्ती!

त्यादिवशी संध्याकाळी मला जरासा वेळ होता . दिवाळी जवळ आलीच होती त्यामुळे मार्केटमध्ये नवीन काय आल आहे हे पाहण्यासाठी मी मार्केटमध्ये  गेले .तिथे गेल्यावर एका दुकानात शिरणार तेवढ्यात एक मुलगा ,दिवाळी बंपर लॉटरीचे तिकीट विकण्यास माझ्या जवळ आला .अकरा -बारा वर्षाच्या  त्या मुलाचा तो गोंडस, गोड चेहरा पाहून, माझ्या शाळेतील असंख्य मुलांची मला आठवण झाली  .त्यांनी मला लॉटरीचे तिकीट घेण्याकरता खूप आग्रह केला . श्रमाचा आणि घामाचा पैसा एवढाच माहिती असल्यामुळे, मी ते तिकीट घेण्यास नकार दिला .पण तो म्हणाला” हे माझं शेवटचं लॉटरीचे तिकीट आहे .आजच्या  दिवसाची सर्व तिकीट खपली असून ,एकच आता बाकी आहे. हे संपलं की मी लवकरच मालकाकडे जाऊन हिशोब देऊ शकतो “ .त्याचे हे बोलणं ऐकून ,का कोणास ठाऊक पण माझ्या मनात त्याच्याबद्दल सहानुभूती निर्माण झाली आणि कळत नकळत का होईना मी  लॉटरीचे तिकीट विकत घेतलं आणि पर्समध्ये ठेवून दिले .

नंतर दिवाळीची खरेदी , फराळ ,  पाहुणे , भटकंती ,नातेवाईक व मित्रमंडळी यांच्या बरोबर पंधरा  वीस दिवस, कसे काय  गेले हे मला समजलं नाही . रोजच्या रोज नवीन बेत आणि  सरबराई यात मी इतकी रमून, गुंतून गेले की, त्या लॉटरीच्या तिकिटाचा मला विसर पडला . आणि एक दिवस सकाळी वर्तमानपत्र उघडून पाहिले ,तर त्यात बंपर लॉटरीचा निकाल आला होता. आता नको मग बघू , असा विचार करून तो पेपर मी जरा बाजूलाच ठेवला आणि दुपारी सर्व काम झाल्यावर पेपर वाचून झाल्यावर पर्स मधून मी ते लॉटरीचे तिकीट बाहेर काढले, नंबर तपासून पाहिला आणि काय आश्चर्य !अहो माझ्या बंपर ड्रॉ लॉटरीच्या तिकिटाला चक्क पहिल बक्षीस मिळालं होतं . आनंद तर झालाच पण मन अगदी चक्रावून गेले आणि मी देवापुढे नतमस्तक झाले .

मी प्रथम माझ्या व यांच्या बहिणीला फोन करून सांगितले . त वरून ताकभात ओळखणाऱ्या माझ्या दोघी काम करायला येणाऱ्या बायकांना, त्याची चाहूल लागली आणि अर्ध्या तासातच ही बातमी आमच्या सोसायटीत  वाऱ्यासारखी पसरली . व्हाट्सअप वर अभिनंदनाचे मेसेजेस येऊ लागले .दोघींनी तर इंटर कॉमवर फोन करून खात्री करून घेतली . आणि एक दिवस त्यानिमित्त   हॉटेलात पार्टी पाहिजे म्हणून मागणीही केली. व्हाट्सअप वरच्या अशा मेसेजचा मी कधी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता. दुसऱ्या दिवशी सर्व वॉचमननी माझे अभिनंदन केले व आमच्याकडेही लक्ष असू द्या असं जाता जाता सुचवलं. सोसायटीतील तरुण मित्र मंडळींनी , यंदाचा गणपती तुमच्यातर्फे साजरा करायचा ,असा आग्रह धरला . तर कोणी कोणी आपले कर्ज फेडण्यासाठी काही हजार रुपयांची मागणीही सांगून ठेवली . लाखो रुपयात काही हजार रुपये म्हणजे”  किस झाड की पत्ती” असं त्यांना सुचवायचं होतं .

दोन दिवसांनी सकाळी सकाळी बेल वाजली आता एवढ्या लवकर  कोण बाबा  आलं म्हणून जरा आश्चर्याने मी दार उघडले . पाहते तर आमच्या शाळेचे ट्रस्टी आणि खजिनदार , मी मनातल्या मनात विचार केला, अरे बापरे, ही बातमी शाळेपर्यंत सुद्धा पोचली. आता काही खरं नाही.खरोखरच ते देणगी मागण्यासाठी म्हणून आले होते. तसा त्यांनी प्रस्तावही माझ्यासमोर मांडला .

अजून लॉटरीची किंमत सुद्धा माझ्या हातात पडली नव्हती .तोवर नाना लोकांच्या, नाना मागण्या माझ्यासमोर आल्या. कुणाला मंदिराचा जिर्णोद्धार करायचा होता तर कोणाला मुलाच्या लग्नात  बडेजाव दाखवत  पैशांची उधळण करायची होती . एका नातेवाईकांना तर वर्ल्ड टूर करायची होती व त्यासाठी थोडा पैसा कमी पडत होता. पैसे परत करण्याच्या बोलीवर व्याजा विना पैसे  हवे होते लॉटरीचे तिकीट लागल्याचं आमच्या केबलवाल्यालाही समजलं .तुमची मुलाखत घ्यायला चॅनल वाल्यांना पाठवू का? असं तो फोनवर विचारत होता . पण मी मोठ्या  विनयाने नाही सांगितले ..

आम्ही दोघं आणि मुलं असे मिळून चौघेजण मात्र अगदी शांत राहिलो होतो . पैशाची हाव आम्हाला कधीच नव्हती . उलट आता या पैशाचं वाटप कसं करायचं, देणगी सुयोग्य ठिकाणी किती द्यायची ? याचा विचार आम्ही करू लागलो .आमच्या पुढच्या वयासाठी थोडी तरतूदही करून ठेवण्याकरता मुलांनी सुचविले .एवढ्या सगळ्या गोष्टींचा विचार करून ,माझ तर मन उदास झालं. डोकं भणभणू लागलं आणि अचानकपणे गाढ झोपेतून  मला जाग आली  .पाहते तर काय ? ते सर्व स्वप्नच होतं ! कुठलं लॉटरीच तिकीट आणि कुठल बक्षीस ?

मी विचारात मग्न झाले, या स्वप्नाचा अर्थ काय? मला नुकतेच काही वर्षांपूर्वी, मनोविश्लेषक सिग्मंड फ्रॉइड यांनी स्वप्नांच्या उत्पत्तीवर  लिहिलेले  पुस्तक वाचल्याचे आठवते, त्याने असा युक्तिवाद केला होता की ‘प्रकट स्वप्ने’ म्हणजे दडपलेल्या अचेतन इच्छांची पूर्तता. असे असल्यास, माझे स्वप्न इच्छापूर्तीच्या नियमाचे पालन करते किंवा ते अयशस्वी म्हणून या ‘नियमालाच’  नाकारते?

मला अचानक ज्ञान झाले आणि  खूप आनंद झाला की हा ‘नियम’ बरोबर आहे. मी स्वकष्टाने  आणि घाम गाळूनच  पैसा कमवावा,  हीच माझी आंतरिक इच्छा होती. होय, होय माझी आंतरिक,  इच्छा नकळत पूर्ण झाली आहे, कारण मी ‘लॉटरी’ पुरस्कार गमावला आहे! स्वप्नानंतरचा सकाळचा तास माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदी क्षणांपैकी एक होता!

— वासंती गोखले
२०/०२/२०२३

1 Comment on ‘लॉटरीचे तिकीट’- स्वप्न आणि इच्छा पूर्ती!

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..