नवीन लेखन...

Dream11- “परदेशी भारतीय” कसोटीवीरांची

आम्ही क्रिकेटशौकीन मित्रमंडळी पूर्वी एक आवडीचा खेळ अधूनमधून खेळत असू, तो म्हणजे आपल्या पसंतीचा एक सर्वोत्तम संघ निवडणे. उदाहरणार्थ – सगळ्यात उत्तम जागतिक संघ किंवा सर्वकालिन उत्तम भारतीय संघ किंवा एखाद्या दशकातील सर्वोत्कृष्ट संघ वा फक्त डावखुऱ्या खेळाडूंचा श्रेष्ठ संघ वगैरे वगैरे. सध्या डिजिटल च्या जमान्यात युवक मंडळी मोबाइल वर “ Dreams11”, “MPL”, “My11Circle” अश्या मोबाईल अॅपस् द्वारे मनोरंजक प्रकारे विविध संघ निवडत असतात.

आज असाच एक विशेष संघ मी आपल्यापुढे सादर करत आहे तो म्हणजे भारताशिवाय इतर देशांकडून कसोटी क्रिकेट खेळलेल्या भारतीय वंशाच्या सर्वोत्कृष्ट खेळाडूंचा संघ. ह्यात फक्त एकदिवसीय आणि टी-ट्वेंटी खेळलेल्या खेळाडूंचा विचार केलेला नाही कारण माझ्या मते कसोटी क्रिकेट हेच खरे, आव्हानात्मक, नावाप्रमाणे क्रिकेटपटूंची कसोटी पहाणारे क्रिकेट आहे. (काही अपवाद वगळता) अतिशय उच्च दर्जाचे क्रिकेटीय कौशल्य असणारे खेळाडूच आपल्या देशाचे कसोटी क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधीत्व करू शकतात.

मित्रांनो आपण जाणताच की क्रिकेट हा खेळ मूळ ब्रिटिशांचा असून ते जिथे जिथे म्हणून राज्यविस्तारासाठी गेले तिथे तिथे क्रिकेट हा खेळही पोहोचला आणि लोकप्रिय ही झाला. तसेच आपले भारतीय लोकही जगाच्या विविध कानाकोपऱ्यात नोकरी धंदयानिमित्त स्थायिक होतात आणि आपली क्रिकेटची आवड तेथेही जोपासतात. आपणांस आढळेल की इंग्लंड आणि न्यूझीलंड तर्फे खेळलेले बहुतेक भारतीय हे आधुनिक काळातले स्वत:हून त्या देशात स्थायिक झालेल्या पालकांचे अपत्य आहेत. परंतु वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेच्या बाबतीत मात्र असे झाले आहे की ब्रिटिशांनी १९ व्या शतकात आणि २० व्या शतकाच्या सुरुवातीला भारतातून विशेषत: उत्तर आणि दक्षिण भागातून अनेक गरीब लोकांना, तिकडे मनुष्यबळ कमी असल्याने उस मळ्यांतून आणि शेतांतून काम करायला शेतमजूर म्हणून नेले. ही मंडळी तिथेच स्थायिक झाली आणि ब्रिटिशांनी त्या देशाचा कब्जा सोडल्यावरही तिकडेच स्थिरावली. त्यांच्याच वारसांमधून मग अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू निर्माण झाले आणि त्या त्या देशांकडून खेळले.

तर असे अनेक भारतीय वंशाचे खेळाडू अन्य देशांतर्फे पूर्वीही कसोटी क्रिकेट खेळले आहेत व आताही खेळत आहेत. देशनिहाय अशा खेळाडूंची यादी आपण खाली बघू शकता. यामधून आपण प्रथम एक सर्वोत्कृष्ट संपूर्ण १६ जणांचा संघ निवडणार आहोत ज्यामध्ये ७ फलंदाज, ७ गोलंदाज आणि २ यष्टीरक्षक असतील. त्यानंतर अंतिम ११ जणांचा संघ निवडू ज्यामध्ये २ सलामीचे फलंदाज, ३ मधल्या फळीतील फलंदाज, १ यष्टीरक्षक. २/३ जलदगती/मध्यमगती गोलंदाज आणि २/३ फिरकी गोलंदाज असतील.

आत्ता यामध्ये लक्षात घ्यावे लागेल की पाकिस्तान व बांगलादेश हे पूर्वी भारताचाच भाग असले आणि तेथील लोक हे मूळ भारतीय वंशाचेच असले, तरी ते भारतापासून फुटून वेगळे झाल्यानंतरच एक देश म्हणून क्रिकेट खेळू लागले त्यामुळे त्यांच्या खेळाडूंचा येथे समावेश करता येवू शकत नाही (नाहीतर त्यांच्या सर्वच कसोटीपटूंना येथे समाविष्ट करावे लागले असते). सर्वाधिक भारतीय वंशाचे खेळाडू आपल्याला वेस्ट इंडिज च्या संघामध्ये दिसतात ज्यांची संख्या ३५ च्या आसपास आहे. पण लांबण टाळण्यासाठी आपण त्यांच्या ५ पेक्षा कमी कसोटी खेळलेल्या खेळांडूना वागळणार आहोत, तरीही त्यांची संख्या २१ इतकी भरते.

कृपया नोंद घ्यावी की, खाली खेळाडूंच्या नावासमोर कंसामध्ये त्यांनी आतापर्यंत (२४ ऑगस्ट २०२२) खेळलेल्या कसोटी सामन्यांची संख्या आहे.

# हे चिन्ह दर्शविते की हा खेळाडू अजून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असून, त्यांच्या कसोटी सामन्यांच्या संख्येमध्ये आणखी भर पडू शकते.

* हे चिन्ह दर्शविते की ह्या खेळीच्या वेळी तो खेळाडू नाबाद होता.

१० पेक्षा अधिक कसोटी खेळलेल्या खेळाडूंची – धावा, धावांची सरासरी, बळी, बळींची सरासरी, यष्टीमागे घेतलेले बळी ही माहितीही दिलेली आहे जेणेकरून अंतिम १६ आणि ११ जणांच्या संघात विशिष्ट खेळाडूंचीच निवड का झाली आहे हे आपल्याला कळू शकेल. (सर्व आकडेवारी ही २४ ऑगस्ट २०२२ पर्यंतची आहे)               

झिंबाब्वे :-

१ अली शाह – फलंदाज/मध्यमगती गोलंदाज (३)

२ उजेश रणछोड – फिरकी गोलंदाज (१)

 दक्षिण आफ्रिका :-

१ हशीम अमला – फलंदाज (१२४) (धावा=९२८२, सरासरी=४६.६४)

२ केशव महाराज – फिरकी गोलंदाज (४३#) (बळी=१५२, सरासरी=३०.५०)

३ सेनूरन मुथूसामी – फिरकी गोलंदाज (२#)

 

 न्यूझीलंड :-

१ जीत रावळ – सलामी फलंदाज (२४#) (धावा=११४३, सरासरी=३०.०७)

२ रचिन रवींद्र – फिरकी गोलंदाज/अष्टपैलू (३#)

३ दीपक पटेल – फिरकी गोलंदाज/अष्टपैलू (३७) (धावा=१२००, सरासरी=२०.६८) (बळी=७५, सरासरी=४२.०५)

४ जीतन पटेल – फिरकी गोलंदाज (२४) (बळी=६५, सरासरी=४७.३५)

५ ईश सोधी – फिरकी गोलंदाज (१७#) (बळी=४१, सरासरी=४८.५८)

६ एजाज पटेल – फिरकी गोलंदाज (१२#) (बळी=४३, सरासरी=२७.६५)

 

 श्रीलंका :-

१ एंजेलो मॅथ्यूज – फलंदाज/मध्यमगती गोलंदाज (१००#) (धावा=६९५३, सरासरी=४५.१४)

२ रसेल अरनॉल्ड – सलामी फलंदाज (४४) (धावा=१८२१ , सरासरी=२८.०१)

३ मुथय्या मुरलीधरन – फिरकी गोलंदाज (१३३) (बळी=८००, सरासरी=२२.७२)

४ श्रीधरन जगन्नाथन – फिरकी गोलंदाज (२)

५ रवींद्र पुष्पकुमारा – मध्यमगती गोलंदाज (२३) (बळी=५८, सरासरी=३८.६५)

६ विनोदन जॉन  – मध्यमगती गोलंदाज (६)

 

 इंग्लंड :-

१ रमण सुब्बाराव – सलामी फलंदाज (१३) (धावा=९८४, सरासरी=४६.८५)

२ हसीब हमीद – सलामी फलंदाज(१०#) (धावा=४३९, सरासरी=२४.३८)

३ ईफ्तेकार अली खान पतौडी –  फलंदाज (६)

४ रणजीतसिंहजी – फलंदाज (१५) (धावा=९८९, सरासरी=४४.९५)

५ दुलिपसिंहजी – फलंदाज (१२) (धावा=९९५, सरासरी=५८.५२)

६ नासिर हुसैन – फलंदाज (९६) (धावा=५७६४, सरासरी=३७.१८)

७ मार्क रामप्रकाश – फलंदाज (५२) (धावा=२३५०, सरासरी=२७.३२)

८ रवी बोपारा – फलंदाज (१३#) (धावा=५७५, सरासरी=३१.९४)

९ रॉनी इराणी – मध्यमगती गोलंदाज/अष्टपैलू (३)

१० मॉन्टी पनेसर – फिरकी गोलंदाज (५०) (बळी=१६७, सरासरी=३४.७१)

११ समित पटेल – फिरकी गोलंदाज (६)

१२ मीन पटेल – फिरकी गोलंदाज (२)

 

वेस्ट इंडिज :-

अ] सलामी फलंदाज :

१ डॅरेन गंगा (४८) (धावा=२१६०, सरासरी=२५.७१)

२ एड्रीअन बराथ (१५#) (धावा=६५७, सरासरी=२३.४६)

३ सुनील आंब्रिस (६#)

ब] मधल्या फळीतील फलंदाज :

१ शिवनारायण चंद्रपॉल (१६४) (धावा=११८६७, सरासरी=५१.३७)

२ रामनरेश सारवान (८७) (धावा=५८४२, सरासरी=४०.०१)

३ ऑलविन कालीचरण (६६) (धावा=४३९९, सरासरी=४४.४३)

४ फौद बाकस (१९) (धावा=७८२, सरासरी=२६.०६)

५ नरसिंग देवनारायण (१८) (धावा=७२५, सरासरी=२५.८९)

६ शिवदत्त शिवनारायण (८)

क] जलदगती गोलंदाज :

१ रवी रामपॉल (१८#) (बळी=४९, सरासरी=३४.७९)

ड] फिरकी गोलंदाज :

१ सोनी रामाधीन (४३) (बळी=१५८, सरासरी=२८.९८)

२ देवेंद्र बिशू (३६#) (बळी=११७, सरासरी=३७.१७)

३ दीनानाथ रामनारायण (१२) (बळी=४५, सरासरी=३०.७३)

४ रफिक जुमादिन (१२) (बळी=२९, सरासरी=३९.३४)

५ इनशां अली (१२) (बळी=३४, सरासरी=४७.६७)

६ वीरसामी पेरमॉल (९#)

७ सुनिल नारायण (६)

८ डेव्ह मोहम्मद (५)

९ महेंद्र नागामुट्टू (५)

इ] यष्टीरक्षक :

१ दिनेश रामदिन (७४) (धावा=२८९८, सरासरी=२५.८७) (२०५=झेल + १२=यष्टीचीत)

२ रोहन कन्हाय (७९) (धावा=६२२७, सरासरी=४७.५३) (५०=झेल)

*************************************************

इथे आपण वरील सूचीमधील काही विशेष खेळाडूंची आधी नोंद घ्यावी घेऊ, जरी त्यांचा समावेश अंतिम १६ जणांच्या संघात काही कारणांनी होऊ शकणार नाही. जसे की,

ईफ्तेकार अली खान पतौडी : ईफ्तेकार अली खान पतौडी हे एकमेव असे खेळाडू आहेत की ज्यांनी भारत व इंग्लंड या दोन्ही देशांचे (प्रत्येकी ३) कसोटी सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केले आहे, तसेच त्यांनी भारताचे त्या तीनही कसोटी सामन्यांत नेतृत्व केले होते. ते पतौडी या संस्थानचे नवाब होते व पुढे भारतीय कसोटी संघाचे कर्णधारपद भूषवलेले मन्सूर अली खान पतौडी हे त्यांचे पुत्र होत.

 

 

रणजीतसिंहजी : गुजरात मधील नवानगर या संस्थानचे महाराजा असलेल्या ‘रणजितसिंहजी विभाजी जाडेजा’ हे इंग्लंड कडून कसोटी क्रिकेट खेळणारे पहिले भारतवंशीय खेळाडू होते. ते १८९६ ते १९०२ या कालावधीत इंग्लंड कडून १५ कसोटी सामने खेळले ज्यात त्यांनी ४४.९५ च्या सरासरीने ९८९ धावा केल्या. त्यांनी लेग-ग्लान्स ह्या मुलायम फटक्याचा शोध लावला असे म्हणतात. ते एक महान भारतीय फलंदाज म्हणून गणले जातात आणि त्यांच्याच नावे भारतातील प्रतिष्ठित ‘रणजी’ क्रिकेटस्पर्धा आयोजित केली जाते. (असे असले तरी हा भारतीय स्वातंत्र्यपूर्व काळ असल्याने, तसेच त्याकाळी फक्त इंग्लंड, ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका हे तीनच देश आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असल्यामुळे  आणि त्याकाळी जागतिक क्रिकेटमधील अनेक नियम वेगळे असल्याने, त्यांचा समावेश अंतिम संघांमध्ये केलेला नाही)             

दुलिपसिंहजी : रणजितसिंहजी ह्यांचे पुतण्या असलेले ‘कुंवर श्री दुलिपसिंहजी’ यांचा जन्म काठियावाड येथे नवानगर संस्थानच्या राज्यघराण्यात झाला. काकांप्रमाणेच ते इंग्लंडसाठी १९२९ ते १९३१ या कालावधीत कसोटी क्रिकेट खेळले. त्यांनी १२ कसोटी सामन्यांमध्ये ५८.५२ च्या सरासरीने ९९५ धावा केल्या. ते सुद्धा एक महान भारतीय फलंदाज म्हणून गणले जातात आणि भारतातील प्रसिद्ध ‘दुलिप’ चषक क्रिकेटस्पर्धा त्यांच्याच नावे आयोजित केली जाते. (असे असले तरी हा भारतीय स्वातंत्र्यपूर्व काळ असल्याने, तसेच त्याकाळी फक्त ठराविक चारच देश आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असल्यामुळे आणि त्याकाळी जागतिक क्रिकेटमधील अनेक नियम वेगळे असल्याने, त्यांचा समावेश अंतिम संघांमध्ये केलेला नाही)             

नासिर हुसैन : मद्रास(आत्ताचे चेन्नई) मध्ये जन्मलेल्या नासेर हुसैन चे वडील तमिळ-भारतीय-मुस्लिम होते तर आई ब्रिटिश. ईसेक्स परगण्याच्या हुसैन ने इंग्लंड कडून ९६ कसोटी सामने खेळले आणि त्यात तब्बल ४५ सामन्यांमध्ये नेतृत्व केले. ३७.१८ च्या सरासरीने त्याने ५७६४ धावा काढल्या. त्याचबरोबर तो ८८ एकदिवसीय सामने खेळला आणि त्यातील ५६ सामन्यांत त्याने इंग्लंडचे नेतृत्व केले.

 

रॉनी इराणी : रॉनी इराणी चे वडील जिमी इराणी हे मुंबईत जन्मलेले पारसी गृहस्थ होते तर आई ब्रिटिश होती. लॅंकेशायर मध्ये जन्मलेला अष्टपैलू रॉनी इंग्लंडसाठी ३ कसोटी आणि ३१ एकदिवसीय सामने खेळला. विशेष म्हणजे तो आपला पहिला कसोटी, तसेच पहिला आणि शेवटचा एकदिवसीय सामना भारताविरुद्धच खेळला. इंग्लंडसाठी खेळलेला तो आतापर्यंतचा एकमेव भारतीय-पारशी समुदायाचा क्रिकेटपटू आहे.

दीपक पटेल : केनियातील नैरोबी येथे जन्मलेला दीपक पटेल हा न्यूझीलंड साठी खेळणारा पहिला भारतीय वंशाचा क्रिकेटपटू ठरला. त्याने ३७ कसोटी सामन्यांमध्ये २०.६८ च्या सरासरीने १२०० धावा केल्या आणि ४२.०५ च्या सरासरीने ७५ बळी घेतले. ९९ ही सर्वोच्च धावसंख्या नोंदवल्यावर इंग्लंडविरुद्ध तो दुर्दैवीरित्या धावबाद झाला. असे असले तरी तो खरा हीरो ठरला ते त्याच्या १९९२ च्या एकदिवसीय विश्वचषकातील कल्पक फिरकी गोलंदाजीमुळे.

 

एजाज पटेल : मुंबईत जन्मलेला एजाज पटेल हा वयाच्या १० व्या वर्षी कुटुंबासहित ऑकलंड येथे स्थायिक झाला आणि आता न्यूझीलंड कडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे. नुकताच डिसेंबर २०२१ मध्ये भारताविरुद्ध मुंबईतच वानखेडे स्टेडियम वर खेळताना त्याने एका डावात ११९ धावा देवून १० बळी मिळवण्याचा पराक्रम केला. असे करणारा तो जिम लेकर आणि अनिल कुंबळे यांच्या नंतरचा जगातील तिसराच गोलंदाज ठरला.

तरी वरील सर्व खेळाडूंमधून, त्यांच्या कारकिर्दीतील कामगिरी आणि आकडेवारीनुसार आपला अंतिम १६ जणांचा (किमान १० कसोटी खेळलेल्या खेळाडूंचा) संघ खालीलप्रमाणे बनू शकतो. आपण त्यांच्या कारकीर्दीचा संक्षिप्त आढावाही सोबतच घेऊ. आपल्याला इथे जाणवेल की आपल्या संघात उच्च, जागतिक दर्जाचे मधल्या फळीतले फलंदाज आणि फिरकी गोलंदाज बरेच असले तरी दर्जेदार सलामीचे फलंदाज आणि वेगवान गोलंदाज यांची वानवा जाणवत आहे, तसेच पूर्ण यादीत जेमतेम दोन यष्टीरक्षक मिळाले आहेत. परंतु आपल्याला इतिहास आणि वास्तव यांचा अभ्यास करून, उपलब्ध पात्र खेळाडूंमधूनच संघाची निवड करावी लागत आहे. असो, चला तर मग !

१. रमण सुब्बाराव (सलामी फलंदाज) आंध्र प्रदेशी मूळ असलेले वडील आणि ब्रिटिश आई असलेल्या रमण सुब्बाराव यांचा जन्म २९-०१-१९३२ ला इंग्लंड ची राजधानी लंडन येथे झाला. शैलिदार डावखुरे सलामी फलंदाज असलेल्या रमण यांनी प्रारंभिक क्रिकेट केंब्रिज विद्यापीठ आणि सरे परगण्यासाठी खेळल्यावर त्यांनी आपला पहिला कसोटी सामना न्यूझीलंड विरुद्ध २४-जुलै-१९५८ मॅन्चेस्टर येथे खेळला. त्यांनी एकूण १३ कसोटीत ९८४ धावा ४६.८५ च्या सरासरीने काढल्या, ज्यात ३ शतके आणि ४ अर्धशतके होती. १३७ ही त्यांची सर्वाधिक धावसंख्या आहे. स्लिप मधील चपळ क्षेत्ररक्षक म्हणून त्यांची ख्याती होती. जनसंपर्क क्षेत्रातील आपल्या व्यवसायाकडे पूर्णवेळ लक्ष्य देण्यासाठी त्यांनी वयाच्या अवघ्या २९ व्या वर्षी निवृत्ती घेतली. ते आपला शेवटचा कसोटी सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध ओव्हल येथे ऑगस्ट १९६१ मध्ये खेळले. १९६१ सालीच त्यांना ‘विस्डेन क्रिकेटियर ऑफ द इयर’ हा बहुमानही मिळाला. निवृत्तीनंतर काही वर्षांनी त्यांनी इंग्लिश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामान्यांचे रेफ्री म्हणूनही काम बघितले.

२. जीत रावळ (सलामी फलंदाज) २२ सप्टेंबर १९८८ ला गुजरात मधील अहमदाबाद येथे जन्मलेला ‘जीत अशोक रावळ’ १६ व्या वर्षांपर्यंत भारतातच होता आणि भारताचा माजी यष्टीरक्षक असलेल्या पार्थिव पटेल याच्याच शाळेचा हा विद्यार्थी गुजरात साठी अंडर-१५ व अंडर-१७ पातळीचे क्रिकेटही खेळला. पण १६ व्या वर्षी त्याचे वडील कुटुंबासहित न्यूझीलंड मधील ऑकलंड येथे स्थायिक झाले आणि मग जीतने तिथेही आपली क्रिकेटमधली प्रगती चालू ठेवत न्यूझीलंड साठी नोव्हेंबर २०१६ मध्ये पाकिस्तान विरुद्ध ख्राईस्टचर्च येथे कसोटी पदार्पण केले. चिवट डावखुरा सलामीवीर असलेल्या जीतने आतापर्यंत २४ कसोटी सामन्यांत ३०.०७ च्या सरासरीने ११४३ धावा केल्या असून त्यात १ शतक आणि ७ अर्धशतके आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या १३२ असून हे एकमेव शतक त्याने २०१९ मध्ये बांगलादेश विरुद्ध झळकावले आहे. त्याने शेवटचा कसोटी सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध जानेवारी २०२० मध्ये खेळला आहे.

३. हशीम अमला (मधल्या फळीचा फलंदाज) सुरत, गुजरात येथील पूर्वज असलेल्या ‘हशीम मोहम्मद अमला’ याचा जन्म दक्षिण आफ्रिकेतील दरबान,नाताळ येथे ३१ मार्च १९८३ ला झाला. भरघोस लांब दाढी, पूर्ण टक्कल आणि कायम शांत चेहरा, अशा व्यक्तिमत्वमुळे अमला क्षेत्ररक्षणावेळी लक्ष्य वेधून घेत असे तर फलंदाजीच्या वेळी मात्र त्याची सहजसुंदऱ, सातत्यपूर्ण फलंदाजी क्रीडारसिकांची नजर खिळवून ठेवत असे. त्याचे कसोटी पदार्पण नोव्हेंबर २००४ मध्ये भारताविरुद्ध कलकत्ता येथे झाले तर अखेरचा सामना तो श्रीलंकेविरुद्ध पोर्ट एलिझाबेथ येथे फेब्रुवारी २०१९ येथे खेळला. या दरम्यान १२४ कसोटी सामन्यांत त्याने २८ शतके आणि ४१ अर्धशतके यांच्या सहाय्याने ४६.६४ च्या सरासरीने ९२८२ धावा काढल्या. अतिशय सुरक्षित क्षेत्ररक्षक असणाऱ्या अमलाने १०८ झेल पकडले असून १४ कसोटीत आफ्रिकेचे नेतृत्व करण्याची संधी त्याला मिळाली. ३११* ही त्याची सर्वोच्च धावसंख्या त्याने इंग्लंड विरुद्ध ओव्हल येथे जून २०१२ मध्ये नोंदवली आणि त्रिशतक झळकवणारा तो आफ्रिकेचा पहिला फलंदाज ठरला. २०१० साली त्याने कसोटी आणि एकदिवसीय सामने ह्या दोन्हीही प्रकारात एका वर्षात १००० धावा काढण्याचा विक्रम केला. २०१० चा भारत दौरा त्याला चांगलाच फलदायी ठरला, कारण दोन कसोटीत केवळ एकदा बाद होत तब्बल ४९० धावा त्याने ठोकून काढल्या. कलकत्ता कसोटीमध्ये त्याने दोन्ही डावात शतके करण्याचा पराक्रम केला. फेब्रुवारी २०१३ मध्ये ICC फलंदाजांच्या क्रमवारीत तो अग्रस्थानी होता. कसोटी प्रमाणेच वन-डे क्रिकेट मध्ये ही त्याने धावांचा व विक्रमांचा पाऊस पाडला.

४. एंजेलो मॅथ्यूज (मधल्या फळीचा फलंदाज) तमिळ पिता आणि बर्घर वंशीय माता यांच्या पोटी ‘एंजेलो डेव्हिस मॅथ्यूज’ याचा जन्म श्रीलंकेतील कोलंबो येथे २ जून १९८७ रोजी झाला. २००८ साली श्रीलंकन एकदिवसिय संघात अस्सल अष्टपैलू खेळाडू (मध्यमगती गोलंदाज+उपयुक्त फलंदाज) म्हणून पदार्पण करणारा मॅथ्यूज कसोटी संघात मात्र कधीतरी उपयुक्त गोलंदाजी करणारा भरवश्याचा मधल्या फळीतील फलंदाज म्हणून स्थिरावला. महेला, संगकारा, दिलशान अशा प्रमुख फलंदाजांच्या निवृत्तीनंतर तो आता श्रीलंकेच्या फलंदाजीचा प्रमुख आधारस्तंभ बनला आहे. जुलै २००९ मध्ये पाकिस्तान विरुद्ध गॉल मध्ये कसोटी पदार्पण करणारा मॅथ्यूज नुकताच जुलै २०२२ मध्ये पाकिस्तान विरुद्ध गॉल मध्येच आपली १०० वी कसोटी खेळला आहे. आतापर्यंत त्याने ४५.१४ च्या सरासरीने ६९५३ धावा केल्या असून, त्यात १३ शतके आणि ३८ अर्धशतकांचा समावेश आहे. आपली २००* ही सर्वोच्च धावसंख्या त्याने झिंबाब्वे विरुद्ध २०२० साली नोंदवली. आपल्या मध्यमगती गोलंदाजीने ५३.५१ च्या सरासरीने ३३ बळी घेतले असून ७० झेलही टिपले आहेत. आतापर्यंत त्याने ३४ कसोटीत श्रीलंकेचे नेतृत्व केले असून वयाच्या २५ व्या वर्षी तो श्रीलंकेचा सर्वात तरुण कप्तान झाला. २०१४ मध्ये त्याच्या कर्णधारपदात श्रीलंकेने इंग्लंडविरुद्ध इंग्लंडमध्येच कसोटी मालिका प्रथमच जिंकण्याचा पराक्रम केला.

५. शिवनारायण चंद्रपॉल (मधल्या फळीचा फलंदाज) कामराज आणि उमा ह्या भारतीय वंशाच्या जोडप्याच्या पोटी ‘शिवनारायण चंद्रपॉल’ ह्याचा जन्म वेस्ट इंडिज मधील गयाना येथे १६ ऑगस्ट १९७४ रोजी झाला. मधल्या फळीतील हा डावखुरा फलंदाज नेत्रसुखद नसला तरी खडूस, लढवय्या आणि सातत्यपूर्ण खेळासाठी लक्षात रहात असे. स्टंपवरच्या बेल ला बॅट ने पिचमध्ये ठोकून ठोकून बॅटिंग गार्ड घेणे, यष्टींच्या समोर गोलंदाजांकडे तोंड करून उभे न राहता यष्टींना समांतर राहून स्क्वेअर लेग च्या दिशेने पाय करून फलंदाजीचा पवित्रा घेणे आणि सूर्यप्रकाशापासून डोळ्यांचे संरक्षण करण्याकरीता दोन्ही डोळ्यांखाली अमेरिकन फुटबॉल खेळाडूंप्रमाणे उष्णताप्रतिरोधक पट्ट्या (antiglare stickers) लावणे, ह्या तीन गोष्टींमुळे चंद्रपॉल प्रथमदर्शनीच विशेष लक्ष्यवेधी ठरे. मार्च १९९४ मध्ये जॉर्जटाउन येथे इंग्लंड विरुद्ध कसोटी पदार्पण करणारा चंद्रपॉल इंग्लंड विरुद्धच मे २०१५ मध्ये ब्रिजटाउन येथे अखेरचा सामना खेळला. २१ वर्षांच्या प्रदीर्घ कारकीर्दीमध्ये त्याने तब्बल १६४ कसोटींमध्ये ५१.३७ च्या सरासरीने ११८६७ धावा काढल्या ज्यामध्ये ३० शतके आणि ६६ अर्धशतके आहेत. त्याचा ज्येष्ठ सहकारी आणि वेस्ट इंडिज चा महान फलंदाज ब्रायन लारा याच्यापेक्षा (११९५३ धावा, ५२.८८ सरासरी) ही कामगिरी काही अंगुळेच कमी आहे, पण लाराच्या वाटेची प्रसिद्धी, लोकप्रियता आणि कौतुक चंद्रपॉलला मिळाले नाही. १४ सामन्यांत त्याला नेतृत्वाची संधी मिळाली पण तो फार यशस्वी ठरू शकला नाही. मायदेशात भारताविरुद्धच्या २००२ सालच्या मालिकेत ४ कसोटीत ३ शतके फटकावण्याचा पराक्रम त्याने केला. तसेच २००३ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध चौथ्या डावात विश्वविक्रमी ४१८ धावांचा यशस्वी पाठलाग करून कसोटी जिंकताना त्याचे १०४ धावांचे मोलाचे योगदान होते. संथ आणि संयमी फलंदाजी साठी ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपॉल ने २००३ सालीच ऑस्ट्रेलिया विरुद्ध अवघ्या ६९ चेंडूत शतक झळकावले होते. त्याची विशेष कामगिरी म्हणजे लाराच्या निवृत्तीनंतर अतिशय दुबळ्या झालेल्या विंडीजच्या फलंदाजीला त्याने स्थैर्य दिले व अनेकदा आपल्या संघाला आपल्या चिवट, लढाऊ फलंदाजीने सावरले.

६. रामनरेश सारवान (मधल्या फळीचा फलंदाज) वेस्ट इंडिज मधील गयाना देशात २३ जून १९८० रोजी जन्मलेल्या रामनरेश सारवान याने ८७ कसोटी सामन्यांत वेस्ट इंडिज चे प्रतिनिधित्व केले. त्यात ह्या मधल्या फळीतील आकर्षक फलंदाजाने ४०.०१ च्या सरासरीने ५८४२ धावा केल्या असून त्यामध्ये १५ शतके तर ३१ अर्धशतके आहेत. पाकिस्तान विरुद्ध मे २००० मध्ये ब्रिजटाउन येथे पदार्पणातच नाबाद ८४ धावांची खेळी करून त्याने क्रिकेट जगताला आपली दखल घेण्यास भाग पाडले. कसोटी व एकदिवसीय दोन्ही प्रकारच्या क्रिकेट मध्ये त्याची सरासरी ४० च्या वर आहे. त्याची सर्वोच्च धावसंख्या २९१ त्याने इंग्लंड विरुद्ध फेब्रुवारी २००९ मध्ये  ब्रिजटाउन येथे नोंदवली. अखेरचा कसोटी सामना ही तो ब्रिजटाउन येथेच जून २०११ मध्ये भारताविरुद्ध खेळला. ब्रायन लारा निवृत्त झाल्यावर ४ कसोटी सामन्यांत त्याला नेतृत्वाची संधी मिळाली. २००६ मध्ये सेंट किट्स येथील कसोटी सामन्यात त्याने भारताच्या मुनाफ पटेल या जलदगती गोलंदाजाला एका षटकात ६ चौकार ठोकण्याचा पराक्रम केला. चंद्रपॉल प्रमाणेच सारवान देखील स्टंपवरच्या बेल ला बॅट ने पिचमध्ये ठोकून बॅटिंग गार्ड घेत असल्याने लक्ष्यवेधी ठरत असे.

७. ऑल्विन कालीचरण (मधल्या फळीचा फलंदाज) तमिळ मूळ असलेल्या भारतीय वंशाच्या ‘ऑल्विन आयझॅक कालीचरण’ यांचा जन्म वेस्ट इंडिज मधील गयाना देशात २१ मार्च १९४९ ला झाला. उंचीने कमी पण आकर्षक डावखुरा मधल्या फळीतील फलंदाज असलेल्या कालीचरण यांनी कसोटी पदार्पण न्यूझीलंड विरुद्ध एप्रिल १९७२ ला जॉर्जटाउन येथे केले. त्यांनी पदार्पणात शतक तर ठोकलच पण लगेच दुसऱ्या कसोटीत पोर्ट ऑफ स्पेन येथेही शतक झळकावले. त्यांनी ६६ सामन्यांत ४४.४३ च्या सरासरीने ४३९९ धावा काढताना १२ शतके आणि २१ अर्धशतके फटकावली. पॅकर सर्कस च्या वादावेळी क्लाइव्ह लॉईड ने विंडीज चे नेतृत्व सोडल्यावर कालीचरण यांना ९ सामन्यांमध्ये नेतृत्व करण्याची संधीही मिळाली.

कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या १८७ त्यांनी भारतीय दौऱ्यात डिसेंबर १९७८ मध्ये मुंबईत नोंदवली. मात्र १९८२ साली बंदी घातलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या बंडखोर खेळाडूंच्या दौऱ्यात सामील झाल्याने त्यांची क्रिकेट कारकीर्द अकाली संपुष्टात आली. ते अखेरचा कसोटी सामना जानेवारी १९८१ मध्ये पाकिस्तान विरुद्ध मुलतान येथे खेळले. १९७५ आणि १९७९ च्या एकदिवसीय विश्वचषक विजेत्या वेस्ट इंडिज क्रिकेट संघांचेही ते सदस्य होते.

८. दिनेश रामदिन (यष्टीरक्षक) ‘दिनेश रामदिन’ याचा जन्म वेस्ट इंडिज मधील त्रिनिदाद या बेटावर १३-मार्च-१९८५ ला झाला असून त्याचे यष्टीरक्षक म्हणून पदार्पण जुलै २००५ मध्ये श्रीलंकेविरुद्ध कोलंबो येथे झाले. त्याने आतापर्यंत ७४ सामन्यांमध्ये २०५ झेल आणि १२ यष्टीचीत असे यष्टीमागे एकूण २१७ बळी घेतले आहेत. या कामगिरीत वेस्ट इंडिज साठी त्याचा जेफ दुजॉ (२७०) आणि रिडले जेकब्स (२१९) यांच्यानंतर ३रा क्रमांक लागतो. याबरोबरच त्याने फलंदाजीत २५.८७ च्या सरासरीने २८९८ धावा केल्या असून त्यात ४ शतके आणि १५ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची सर्वोच्च धावसंख्या १६६ ही त्याने इंग्लंड विरुद्ध मार्च २००९ मध्ये बार्बाडोस येथे नोंदवली. तो शेवटचा कसोटी सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध जानेवारी २०१६ मध्ये सिडनी येथे खेळला. डॅरेन सॅमी नंतर २०१४-१५ मध्ये त्याने १३ कसोटी सामन्यांमध्ये वेस्ट इंडिज चे कर्णधारपद भूषवले पण तो फार यशस्वी ठरू शकला नाही.

९. रोहन कन्हाय (मधल्या फळीचा फलंदाज/यष्टीरक्षक) : कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील एक महान फलंदाज म्हणून ओळखले जाणाऱ्या ‘रोहन भोलालाल कन्हाय’, या मूलत: तमिळ-भारतीय क्रिकेटपटूचा जन्म वेस्ट इंडिज मधील गयाना ह्या बेटावर २६ डिसेंबर १९३५ ला झाला. मे १९५७ मध्ये इंग्लंड विरुद्ध बर्मिंगहॅम येथे पदार्पण करणाऱ्या कन्हायने पहिल्या तीन कसोटीत यष्टीरक्षक म्हणून संघात स्थान मिळवले पण फ्रान्झ अलेक्झांडर ह्या दर्जेदार यष्टीरक्षकाने संघात बस्तान बसाविल्यावर कन्हायने मधल्या फळीतील शैलिदार व आक्रमक फलंदाज म्हणून क्रिकेटविश्व गाजवले. प्रथम दर्जाच्या क्रिकेट मध्ये यष्टीरक्षक/क्षेत्ररक्षक म्हणून ३२५ झेल आणि ७ यष्टीचीत अशी जबरदस्त कामगिरी करणाऱ्या कन्हायने, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मात्र गॅरी सोबर्स च्या साथीने, दीड दशकाहून अधिक काळ आपल्या नेत्रदीपक फलंदाजीने क्रिकेटरसिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. त्यांनी ७९ कसोटीत ४७.५३ च्या सरासरीने ६२२७ धावा केल्या ज्यात १५ शतके आणि २८ अर्धशतके होती. आपली सर्वोच्च २५६ ही धावसंख्या त्यांनी १९५८ च्या भारत दौऱ्यात कलकत्ता येथे नोंदवली. आपला अखेरचा सामना ते एप्रिल १९७४ मध्ये इंग्लंड विरुद्ध पोर्ट ऑफ स्पेन येथे खेळले. जानेवारी १९६१ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध अॅडलेड येथे त्यांनी एकाच कसोटीच्या दोन्ही डावात शतक झळकावण्याचा पराक्रम केला. कारकिर्दीच्या अखेरीस सोबर्स नंतर त्यांना १३ कसोटीत देशाचे कप्तानपद भूषवण्याची संधीही मिळाली. त्यांचा एक वैशिष्ट्यपूर्ण फटका म्हणजे अनेकदा वेगवान गोलंदाजांना हूक मारताना ते खेळपट्टीवर पाठीवर पडून लोळण घेत असत. आपला महान फलंदाज ‘सुनिल गावसकर’ म्हणतो की रोहन कन्हाय हा त्याने पाहिलेला सर्वश्रेष्ठ फलंदाज होय. इतकेच नाही तर सुनिल तसेच ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज बॉब हॉलंड यांनी कन्हायबद्दलच्या आदर व प्रेमापोटी आपापल्या मुलांचे नाव “रोहन” असे ठेवले आहे.

 

१०. रवी रामपॉल (जलदगती गोलंदाज) ‘रविंद्रनाथ उर्फ रवी रामपॉल’ याचा जन्म वेस्ट इंडिज मधील त्रिनिदाद या देशात १५ ऑक्टोबर १९८४ ला झाला. उंच व दणकट बांध्याचा रवी वेगवान गोलंदाजी करतानाच चेंडू दोन्ही बाजूंना स्विन्ग करू शकत असे, तसेच गोलंदाजीचे मोठे स्पेल न थकता टाकू शकत असे. कसोटी पदार्पणाची संधी त्याला नोव्हेंबर २००९ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध ब्रिस्बेन येथे मिळाली. त्याने १८ कसोटींमध्ये ३४.७९ च्या सरासरीने ४९ बळी घेतले असून, एका डावातील सर्वोत्तम कामगिरी ४/४८ अशी तर सामन्यातील सर्वोत्तम कामगिरी ७/७५ अशी आहे. त्याचा शेवटचा कसोटी सामना बांगलादेश विरुद्ध मिरपूर येथे नोव्हेंबर २०१२ मध्ये झाला. पुढे दुखापतींमुळे तसेच एकदिवसीय आणि टी-ट्वेंटी क्रिकेट वर अधिक लक्ष्य दिल्याने तो जास्त कसोटी क्रिकेट खेळला नाही.

११. रवींद्र पुष्पकुमारा (जलदगती गोलंदाज) ‘करूप्पियागे रवींद्र पुष्पकुमारा’ ह्या मिश्रवंशीय श्रीलंकन खेळाडूचा जन्म २१ जुलै १९७५ ला पांडूरा या गावी, तमिळ व सिंहली मातापित्याच्या पोटी झाला. त्याचे कसोटी पदार्पण ऑगस्ट १९९४ मध्ये पाकिस्तान विरुद्ध कॅन्डी येथे झाले. तो आंतरराष्ट्रीय स्तरावर आला तेव्हा अतिशय वेगात गोलंदाजी करत असे आणि श्रीलंकेचा तेव्हापर्यंतचा सर्वात वेगवान गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिले जाई. तसेच श्रीलंकेचा प्रमुख वेगवान गोलंदाज चामिन्डा वास याचा सुयोग्य जोडीदार म्हणून क्रिकेटरसिक त्याच्याकडे आशेने बघत होते. परंतु वेग, दिशा व टप्पा यावर नियंत्रण नसल्याने तो पुढे अपेक्षित यश मिळवू शकला नाही. त्याने २३ सामन्यांत ३८.६५ च्या सरासरीने ५८ बळी मिळवले. एका डावात ५ बळी त्याने ४ वेळा मिळवले तर ११६ धावा देवून ७ बळी ही त्याची एका डावातील तसेच सामन्यातील सर्वोत्तम कामगिरी त्याने झिंबाब्वे विरुद्ध हरारे येथे नोंदवली. तो अखेरचा सामना बांगलादेश विरुद्ध कोलंबो येथे सप्टेंबर २००१ मध्ये खेळला. १९९६ मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकणाऱ्या श्रीलंकन संघाचा तो सदस्य होता.

१२. मुथय्या मुरलीधरन (फिरकी गोलंदाज) “मुथय्या मुरलीधरन” ह्या फिरकीच्या जादूगाराचा जन्म सिंहास्वामी व लक्ष्मी या तमिळ आईवडिलांच्या पोटी श्रीलंकेतील कॅंडि येथे १७ एप्रिल १९७२ ला झाला. उजव्या हाताने ऑफ स्पिन टाकणारा हा मुलगा ‘मुरली’ ह्या नावाने जगप्रसिद्ध झाला आणि त्याने गोलंदाजीतील अनेक विक्रमांना गवसणी घातली. मुरली चे वैशिष्ट्य म्हणजे इतर ऑफ स्पिनर प्रमाणे तो बोटांनी चेडू वळवत नसे तर आपल्या निसर्गदत्त अतिशय लवचिक अशा मनगटाच्या सहाय्याने चेंडू ऑफ स्पिन करत असे. मुरली ने कसोटी पदार्पण ऑस्ट्रेलिया विरुद्ध सप्टेंबर १९९२ ला कोलंबो येथे केले. सुरवातीला तो चेंडू हातभर वळवत असला तरी इतर वैविध्ये नसल्याने तो फार भेदक ठरत नसे. पण दोन-तीन वर्षात त्याने आपल्या भात्यात सरळ जाणारा जलद चेंडू (टॉप स्पिन), बाहेर वळणारा चेंडू (दुसरा), चेंडू टाकण्याचा कमी जास्त वेग, अशी विविध अस्त्रे जोडल्याने तो फलंदाजांचा कर्दनकाळ ठरू लागला. चेंडू भरघोस वळवण्याची जणू जन्मजात देणगी लाभलेल्या मुरलीला त्यासाठी खेळपट्टीच्या अनुकूलतेची गरज लागत नसे. असे म्हणत की मुरली दगडावर किंवा काचेवरही असाच हातभर चेंडू वळवू शकेल.

मुरली आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकू लागला असतानाच त्याला जणू दृष्ट लागली आणि १९९५ ते १९९९ ह्या काळात काही ऑस्ट्रेलियन पंचांनी तो अवैधरित्या चेंडू फेकतो म्हणून त्याला दंडित केले व गोलंदाजी करण्यास प्रतिबंध केला. असे सांगतात की त्याच्या कोपरांमध्ये जन्मत: काही दोष होता ज्यामुळे त्याचे कोपर गोलंदाजी करताना नियमांपेक्षा अधिक वाकत असे आणि त्यामुळे तो चेंडू ‘फेकतो’ असे वाटत असे. ह्या त्याच्या अडचणीच्या काळात कर्णधार अर्जुना रणतुंगा आणि श्रीलंकन बोर्ड ठामपणे त्याच्यामागे उभे राहिले व त्यांनी ICC बरोबर दीर्घकाळ लढा दिला. त्यामुळे काही वैद्यकीय उपचार करून, गोलंदाजीच्या शैलीत थोडा बदल करून, तसेच गोलंदाजीचे नियमही शिथिल करून मुरली ची ह्या किटाळातून सुटका झाली व पुढे अनेक विक्रम करत तो दीर्घकाळ क्रिकेट खेळू शकला. तो अखेरची कसोटी जुलै २०१० मध्ये भारताविरुद्ध गॉल येथे खेळला ज्यामध्ये त्याने ८ बळी मिळवत श्रीलंकेला विजय मिळवून दिला. त्याने एकूण १३३ सामने खेळत २२.७२ च्या सरासरीने ८०० बळी मिळवले. डावात ९/५१ ही सर्वोत्तम कामगिरी त्याने २००२ साली झिंबाब्वे विरुद्ध मायदेशात केली तर, कसोटीत १६/२२० ही सर्वोत्तम कामगिरी १९९८ मध्ये इंग्लंड विरुद्ध ओव्हल मैदानावर केली. एकदिवसीय क्रिकेटमध्येही सर्वाधिक ५३४ बळी त्याच्या नावावर असून १९९६ च्या एकदिवसीय विश्वविजेत्या श्रीलंकन संघाचा तो अविभाज्य घटक होता.

मुरलीने जागतिक क्रिकेटमध्ये केलेले विक्रम आणि साध्य केलेल्या काही विशेष गोष्टी खालील प्रमाणे :-

→कसोटी क्रिकेट मध्ये सर्वाधिक बळी = ८००

→एकाच मैदानावर (SSC कोलंबो, श्रीलंका) सर्वाधिक बळी = १६६

→डावात ५-बळी सर्वाधिक वेळा = ६७

→सामन्यात १०-बळी सर्वाधिक वेळा = २२

→सामन्यात १०-बळी सलग ४ कसोटीत, तेही २ वेळा – २००१ आणि २००६ मध्ये

→कसोटी कारकीर्दीत सर्वाधिक चेंडू टाकणे = ४४०३९

→सर्वाधिक फलंदाज त्रिफळाचीत करणे = १६७

→सर्वाधिक फलंदाज क्षेत्ररक्षकाद्वारे झेलबाद करणे = ३८८

→सर्वाधिक फलंदाज स्वत: आपल्याच गोलंदाजीवर झेलबाद करणे = ३५

→सर्वाधिक फलंदाज यष्टीचीत करणे = ४७

→मालिकावीराचा पुरस्कार सर्वाधिक वेळा जिंकणे = ११

→कसोटी खेळणाऱ्या सर्व संघांविरुद्ध सामन्यात १० बळी मिळवणे

→दर कसोटी सामन्यामागे बळी मिळवण्याचे ६.०१ असे सर्वाधिक गुणोत्तर

→४००,५००,६००,७०० व ८०० बळी मिळवणारा सर्वात तरुण गोलंदाज, जी कामगिरी त्याने सर्वात जलदही केली.

→भारत व ऑस्ट्रेलिया वगळता ईतर देशांविरुद्ध त्यांच्या देशात जाऊन प्रथमच सामना व मालिका जिंकणेही श्रीलंकेला मुरलीमुळेच शक्य झाले.

१३. केशव महाराज (फिरकी गोलंदाज) दक्षिण आफ्रिकेतील दरबान,नाताळ येथे ०७ फेब्रुवारी १९९० ला जन्मलेला ‘केशव आत्मानंद महाराज’ हा डावखुरा फिरकी गोलंदाज आता दक्षिण आफ्रिकेचा कसोटी संघातील अविभाज्य घटक बनलेला आहे. १८७४ मध्ये त्याचे पूर्वज उत्तर प्रदेश मधील सुलतानपूर येथून दक्षिण आफ्रिकेत स्थायिक झाल्याची नोंद आढळते. त्याचे कसोटी पदार्पण ऑस्ट्रेलिया विरुद्ध पर्थ येथे नोव्हेंबर २०१६ मध्ये झाले. आतापर्यंत ४३ कसोटी सामन्यांत ३०.५० च्या सरासरीने त्याने १५२ बळी घेतले आहेत. आतापर्यंत एका सामन्यात १०-बळी १ वेळा, तर डावात ५-बळी ९ वेळा घेतले आहेत. श्रीलंकेविरुद्ध २०१८ मध्ये कोलंबो येथे त्याने डावातील ९/१२९ तसेच सामन्यातील १२/२८३ ही सर्वोच्च कामगिरी नोंदवली. जून २०२१ मध्ये त्याने वेस्ट इंडिज विरुद्ध हॅटट्रिक घेतली आणि असे करणारा तो दक्षिण आफ्रिकेचा जेफ ग्रीफीन (१९६०) नंतरचा दुसराच गोलंदाज ठरला. त्याच्या नावावर ४ अर्धशतके असून ७व्या किंवा ८व्या क्रमांकावर येवून अनेकदा तो संघाचा डाव सावरण्यास हातभार लावत असतो.

१४. मॉन्टी पनेसर (फिरकी गोलंदाज) :परमजित सिंग आणि गुरुशरण कौर या भारतातून इंग्लंड मधील ल्यूटन येथे १९७९ मध्ये स्थलांतरित झालेल्या शीख दांपत्याच्या पोटी, बेडफोर्डशायर येथे २५ एप्रिल १९८२ रोजी जन्मलेल्या ‘मधुसूदन सिंग उर्फ मॉन्टी पनेसर’ या मुलाने पुढे इंग्लंड तर्फे डावखुरा फिरकी गोलंदाज म्हणून नाव कमावले. नॉर्थहॅम्पटनशायर कडून काउंटी क्रिकेट खेळणाऱ्या मॉन्टी ने मार्च २००६ मध्ये नागपूर येथे भारताविरुद्ध कसोटी पदार्पण केले. त्याचे पदार्पण स्वप्नवत म्हणावे लागेल कारण त्याचा पहिला कसोटी बळी हा “द ग्रेट सचिन तेंडुलकर” होता. त्याशिवाय त्या डावात त्याने राहुल द्रविड व कैफ यांनाही बाद केले. २०१२ च्या भारत दौऱ्यात भारताला २-१ असे पराभूत करण्यात त्याचा ग्रॅमी स्वान बरोबर मोठा वाटा होता. मुंबई येथील दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याने ११/२१० अशी कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली तेव्हा भारतात एका सामन्यात १० बळी मिळवणारा तो १९३४ मधल्या हेडली वेरिटी नंतर पहिला फिरकी गोलंदाज ठरला. तसेच ग्रॅमी स्वान सोबत त्याने त्या सामन्यात १९ बळी मिळवले, आणि त्यापूर्वीच्या ५४ वर्षात अशी कामगिरी करणारे ते पहिलेच इंग्लिश फिरकी गोलंदाजीचे दुक्कल ठरले. त्याने ५० कसोटी सामन्यांमध्ये ३४.७१ च्या सरासरीने १६७ बळी घेतले, त्यामध्ये एका सामन्यात १०-बळी २ वेळा, तर डावात ५-बळी १२ वेळा घेतले. तो अखेरचा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध मेलबोर्न येथे डिसेंबर २०१३ मध्ये खेळला.

१५. सोनी रामाधीन (फिरकी गोलंदाज) : वेस्ट इंडिज मधील त्रिनिदाद येथे १ मे १९२९ ला जन्मलेले ‘सोनी रामाधीन’ हे वेस्ट इंडिज साठी कसोटी क्रिकेट खेळणारे भारतीय वंशाचे पहिले खेळाडू होते. मुख्यत: उजव्या हाताने ऑफ स्पिन गोलंदाजी टाकणारे रामाधीन, चेंडू टाकण्याच्या शैलीत फार बदल न करता दुसऱ्या बाजूलाही चेंडू वळवत असत. म्हणजे त्याकाळचे त्यांना ‘मिस्ट्री स्पिनर’ म्हटले पाहिजे. त्यामुळे अनेक फलंदाज त्यांना खेळताना गोंधळत असत. ते आपला पहिला सामना जून १९५० मध्ये इंग्लंड विरुद्ध मँचेस्टर येथे खेळले. पहिल्याच मालिकेत ते अतिशय यशस्वी ठरले. आल्फ वॅलेन्टाईन बरोबर त्यांची चांगली जोडी जमली आणि त्यांनी इंग्लंडची भंबेरी उडवली. त्यांच्या पराक्रमामुळे वेस्ट इंडिज ने प्रथमच इंग्लंड विरुद्ध मालिका ३-१ अशी जिंकली. इंग्लंड विरुद्धच १९५७ च्या मालिकेत एजबॅस्टन येथील कसोटीत त्यांनी एका डावात सर्वाधिक ५८८ चेंडू टाकण्याचा, तसेच पूर्ण सामन्यात ७७४ चेंडू टाकण्याचा विश्वविक्रम केला जो अजूनही अबाधित आहे. त्या डावातील त्यांचे गोलंदाजीचे पृथक्करण ९८-३५—१७९-२ असे होते तर सामन्यातील गोलंदाजीचे पृथक्करण १२९-५१-२२८-९ असे होते. आपल्या कारकिर्दीत त्यांनी ४३ कसोटीत २८.९८ च्या सरासरीने १५८ बळी घेतले. एका सामन्यात १०-बळी १ वेळा, तर डावात ५-बळी १० वेळा घेतले. डावातील ७/४९ आणि सामन्यातील ११/१५२ ही सर्वोत्तम कामगिरी त्यानी इंग्लंड विरुद्ध केली होती. आपला शेवटचा कसोटी सामना ते डिसेंबर १९६० मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध मेलबोर्न येथे खेळले. नुकतेच २६ फेब्रुवारी २०२२ ला त्यांचे निधन झाले.

१६. देवेंद्र बिशू (फिरकी गोलंदाज) वेस्ट इंडिज मधील गयाना येथे ‘देवेंद्र मोहनलाल बिशू’ याचा जन्म ६ नोव्हेंबर १९८५ ला झाला. लेगब्रेक फिरकी गोलंदाज असणाऱ्या बिशू ने कसोटी पदार्पण पाकिस्तान विरुद्ध मे २०११ मध्ये प्रोविडन्स येथे केले. तो चेंडू फार वळवत नाही तर चेंडू सतत टप्प्यावर टाकून हलकीशी फिरकी देणे हे त्याचे बलस्थान आहे. आत्तापर्यंत त्याने ३६ सामन्यांत ३७.१७ च्या सरासरीने ११७ बळी मिळवले आहेत. त्याने १ वेळा सामन्यात १०-बळी तर ४ वेळा डावात ५-बळी मिळवले आहेत. डावातील ८/४९ आणि सामन्यातील १०/१७४ ही सर्वोत्तम कामगिरी त्याने पाकिस्तान विरुद्ध दुबई येथे ऑक्टोबर २०१६ मध्ये एका प्रकाशझोतातील दिवस-रात्र कसोटी सामन्यात केली. दिवस-रात्र कसोटी सामन्यात १० बळी मिळवण्याची कामगिरी करणारा तो पहिलाच गोलंदाज होता. शेवटचा कसोटी सामना तो नोव्हेंबर २०१८ मध्ये बांगलादेश विरुद्ध मिरपूर येथे खेळला आहे.

**************************

आता शेवटी वरील १६ जणांमधून कामगिरी, आकडेवारी, दर्जानुसार आणि संघाचा समतोल साधण्याच्या दृष्टीने अंतिम अकरा जणांचा संघ निवडायचा झाल्यास, तो फलंदाजीच्या क्रमवारीनुसार खालीलप्रमाणे असेल :-

१ रमण सुब्बाराव (सलामी फलंदाज)

२ जीत रावळ (सलामी फलंदाज)

३ हशीम अमला (मधल्या फळीचा फलंदाज)

रोहन कन्हाय (मधल्या फळीचा फलंदाज) – (कप्तान)

५ शिवनारायण चंद्रपॉल (मधल्या फळीचा फलंदाज)

दिनेश रामदिन (यष्टीरक्षक)

केशव महाराज (फिरकी गोलंदाज)

८ रवी रामपॉल (जलदगती गोलंदाज)

रवींद्र पुष्पकुमारा (जलदगती गोलंदाज)

१० मुथय्या मुरलीधरन (फिरकी गोलंदाज)

११ सोनी रामाधीन (फिरकी गोलंदाज)

तर मित्रांनो कसा वाटला “भारताशिवाय इतर देशांकडून कसोटी क्रिकेट खेळलेल्या भारतीय वंशाच्या सर्वोत्कृष्ट खेळाडूंचा संघ”? तुम्हाला माझी ही संकल्पना नक्कीच आवडली असेल अशी आशा आहे.

— गुरुप्रसाद दिनकर पणदूरकर

Avatar
About गुरुप्रसाद दिनकर पणदूरकर 8 Articles
माजी बँकर, मुक्त लेखक. विविध संकेतस्थळे, दिवाळी अंकांतून क्रिकेटविषयक, बँकिंगसंबंधी व व्यक्तिचित्रणात्मक लेखन. विशिष्ट संकल्पनांवर आधारित शब्दकोडी रचण्याचा छंद. या शब्दकोड्यांना विशेषत: अनेक दिवाळी अंकांमधून प्रसिद्धी. मराठी साहित्य, खेळ (क्रिकेट), भारतीय इतिहास यांमध्ये विशेष रुची.
Contact: Twitter

8 Comments on Dream11- “परदेशी भारतीय” कसोटीवीरांची

  1. अतिशय माहितीपूर्ण, परिश्रमयुक्त , सुरेख लेखन.
    क्रिकेटप्रेमींना पर्वणी

  2. माहितीपूर्ण लेखन. संकलनासाठी घेतलेले अविरत परिश्रम विशेष प्रशंसनीय

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..