येवा कोकण आपलाच आसा ही टॅगलाईन सांगणारी आमची सिंधुसंस्कृती ! शब्द स्पर्श रूप रस आणि गंध यांची अनुभूती देत मन आत्मा आणि इंद्रियाना सुखावून टाकणारी इथली लाल माती…. इथेच दिसेल,कोणत्याही संकटांचा सहजपणे सामना करण्यासाठी आवश्यक असलेली निधडी छाती… आणि मना मनाने जोडून ठेवलेली कोकणची नाती…
कोकणप्रांत म्हटला हिरवागार निसर्ग डोळ्यासमोर झुलू लागतो.आकाशाशी स्पर्धा करणारे ऊंच ऊंच डोंगर, त्याच ऊंचीला साजेशा खोल खोल दऱ्या नेत्रसुख देतात, तर दऱ्यामधून थेट कानात घोंगावणारा अल्लड वारा, वाऱ्यासोबत डुलणारी नारळीपोफळीची बाग, त्याच्या बाजूची ऐकू येणारी फेसाळत्या समुद्राची गाज आणि अंगावर उडणारे धबधब्याचे तुषार, डोळ्याला सुखावणारे आकाशात तरंगणारे इंद्रधनुष्य आणि पक्ष्यांचे थवेच्या थवे, पायाला स्पर्शवणारा मऊ मऊ गार वाळूचा गालीचा, आंबा, काजू करवंद जांभळे या रसदार फळांच्या ठिबकणाऱ्या चवी, आणि घमघवीत तिरफळाचा वास असलेली सोलकढी जीभेवर नाचू लागते. सोबत मत्स्याहारींना भुरळ घालणारे काही रांगडे सामुद्रीक तर काही ओल्या काजूच्या उसळीसारखे, अस्सल कोकणी घावन शेवयांसारखे लुसलुशीत पण चवदार खाद्यपदार्थ मनाला कोकणची आठवण करून देतात.
ईश्वराने निर्माण केलेली जगातील सर्वात सुंदर भौगोलिक रचना म्हणजे कोकण.. त्यातही कोकणात येणारे पाच सहा जिल्हे आणि त्यातही अत्यंत जैवविविधतेने नटलेला आमचा सिंधुदुर्ग.
अन्यत्र कुठेही दिसणार नाही अशा पश्चिम महाराष्ट्राच्या कडेकपारी….
त्यात समुद्रापर्यंत सामावलेली वनसंपत्ती….
तिथे असलेल्या वनौषधी…
येथील आहारपद्धती…
नद्यांच्या जाळ्यांनी विणलेली जलसंपदा…
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आमचे येथील लक्षात राहील असे आतिथ्य….
येवा कोकण आपलाच आसा ही टॅगलाईन सांगणारी आमची सिंधुसंस्कृती !
शब्द स्पर्श रूप रस आणि गंध यांची अनुभूती देत मन आत्मा आणि इंद्रियाना सुखावून टाकणारी इथली लाल माती….
इथेच दिसेल,
कोणत्याही संकटांचा सहजपणे सामना करण्यासाठी आवश्यक असलेली निधडी छाती..
आणि
मना मनाने जोडून ठेवलेली कोकणची नाती…
थेट गोव्यापासून सुरू होत सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे मुंबई पर्यंत पसरलेला हा कोकण प्रांत!
ही परशुराम भूमी म्हणजे अनेक वनौषधींचे माहेरघरच आहे. इथे मुद्दाम लागवड करण्याची आवश्यकताच नाही. एवढी संपत्ती आमच्याकडे ईश्वराने भरभरून दिलेली आहे. फक्त बाहेरून ओरबाडणारे हात आले आणि या जैवविविधतेचा पार बट्ट्याबोळ उडवून दिला. अशोक, नागकेशर सारख्या काही दुर्मिळ वनस्पती तर नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.
वावडिंग, कुडा, पळस, अर्जुन, बाहवा, शिंशप्पा, भोकर, किंजळ, सातवीण, हाडसांधी, शिवण, आईन, सप्तरंगी, सागवान, चंदना सारखे वृक्ष प्रत्येक गावातील संरक्षित जंगलात आढळतात. गुळवेल, सापसंद, करवंद, बेडकी, मंजिष्ठा, सारीवा, इ. छोट्या झुडुपापासून वेलीपर्यंत छोटीमोठी झाडे रस्त्यावरही आढळतात. कोहाळा, भोपळा, आवळा, नारळा सारखी फळे, हळद, मिरची, काळी मिरी, वेलची, लवंग, दालचिनी सारखे मसाले, कांदा, बटाटा, सुरणासारखे भूकंद, तांदूळ, नाचणी, भुईमूग, कुळीथ, पावटे, तूर, चणा, वाटाणा, वाल, कडवे, फजाव, उडीद, मूग, मोहोरी, तीळ इ. नगदी पिके तसेच आंबा, काजू, जांभूळ, कोकम, आवळा, जाम, अननस, केळी सारखी सुमधुर फळे कोकणभूमीत पिकवली जातात. आता तर त्यावर टिकण्याचा कालावधी वाढण्यासाठी विशेष प्रक्रिया उद्योग पण कोकणात आलेले आहेत.
औषधे निर्मिती म्हटली तर एमआयडीसीतील काही प्लॉटमध्ये लघुउद्योग म्हणून काही ठिकाणी प्रोसेस युनीट उभारली गेली आहेत. पण नगण्यच. अगदी हातापायाच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच.
या जैवसंपत्तीची रक्षण आणि पोषणाची योग्य रितीने काळजी घेतली तर भविष्यात त्याचे भक्षण होणार नाही.
ज्या वनस्पतीची पाळे, मुळे खोड, कंद वापरले जातात ते वृक्ष अथवा वेली कायमस्वरूपी नष्ट होतात. जसे शतावरी. पण जर एखादं मुळ जमिनीमधे ठेवून, योग्य रितीने या मुळांची तोड केली, तर परत निर्मिती होण्यासाठी काही अडथळा येणार नाही. मुळ जंगली वाण कायम राहील आणि उत्पादनही मिळेल.
आता तर शतावरी, मुसळी, बांबू, आले, अळू, करांदा, कणगी, चीने याची मुद्दाम लागवडही केली जात आहे. अर्थात आयुर्वेद सांगतो, जंगलात आपोआप निर्माण होणाऱ्या वनस्पती या अधिक कार्यकारी औषधी तत्त्वे सांभाळणाऱ्या असतात. पण ज्याची तोड करायला सोपे जावे, यासाठी मुद्दाम सोयीस्कर ठिकाणी लागवड केली जाते अशा वनस्पतींच्या गुणवत्तेत फरक आढळतो. याचाही विचार व्हायला हवा.
कमी श्रमात जास्त फायदा असे भासवून काही वनस्पती-खरेदीदार, शेतकरी वर्गाकडून औषधी वनस्पतीची पाने फुले पाळे मुळे विकत घेतात. दर जास्त मिळावा, आपला माल लवकर विकला जावा, तोड जास्त मिळावी या कारणासाठी, आवश्यक त्या दर्ज्याची पाने फुले काढली जात नाही. त्यांच्या छोट्याश्या हव्यासापायी वैद्यांना परिणामी पुनः सामान्य लोकांनाच औषधांची परिपूर्ण गुणवत्ता मिळत नाही. हे सत्य आहे. कच्ची वावडिंग, वाढ न झालेली शतावरी, आकाराने लहान गुळवेल, पोकळ अश्वगंधा, कडू चव नसलेला अडुळसा, किडलेली हळद अशा अनेक वनस्पतीचे नमुने विकत घेऊन, फुकट जातात. औषधांमध्ये ही भेसळ म्हणता येणार नाही, पण गुण कमी होतात. भेसळ किंवा मिलावट हा दुसरा भाग झाला. काळ्या मिरीमधे पपईच्या बिया, ज्येष्ठमधामध्ये गुंजा, नकली नागकेशर इ. भेसळयुक्त औषधी बाजारात मिळतात, यापासून सावध रहायला हवे.
कोकणात फोंडाघाट परिसरात कोल्हापुरातून काही एजंट येतात. कुडाळ परिसरात बेळगाव कर्नाटक येथून दलाल येतात आणि औषधांची खरेदी करतात.
जिथे पिकते तिथेच ते मानवते, या न्यायाने ज्या भागातील औषधी वनस्पतीवर त्या भागातच प्रोसेस होऊन औषध तयार व्हायला पाहिजे. पण कोकणात औषधी निर्माण कारखाने त्यामानाने कमीच आहेत. जारमाव, लक्ष्मीकेशव, श्रीराम, श्रीकृष्ण औषधालय, संजीवनी, अशा मोजक्या नावामधेच ही यादी संपते.
कोल्हापूरातील बाचूळकर सर, डॉ अशोक वाली, डॉ. बाळकृष्ण गावडे, कुडाळमधील रामचंद्र शृंगारे, डॉ निलेश कोदे, डॉ. संदीप नाटेकर, यांच्या सारखी काही मोजकी मंडळीच या औषधी माहितगार वैदूंच्या संपर्कात आहेत.
कोकणातील जैवविविधता जपण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावणारा कोकणी रानमाणूस हीच काय ती जमेची बाजू आहे.
या वनसंपत्तीतून कोकणी माणूस समृद्ध व्हावा, पण जैवविविधतेला कुठेही धोका निर्माण होऊ नये असे वाटत असेल तर युक्तीने यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. सर्व गोष्टी कायदा करून होत नसतात. ‘काही ठिकाणी कडक कायदा, काही ठिकाणी बघावा फायदा, पण निसर्गाशी करावा वायदा.’ निसर्गाने भरभरून दिलेलं ओरबाडून घेण्याची वृत्ती निर्माण झाली तर निसर्ग तर कोपतोच, पण आपणच पुढील पिढीला आणखी संकटात टाकत आहोत. याची जाणीव प्रत्येक मनात निर्माण व्हायला हवी.
आयुर्वेदाचा ‘विकास’ होताना कोकणभूमी ‘भकास’ होऊ नये, हीच माफक अपेक्षा!
-वैद्य सुविनय दामले
(व्यास क्रिएशन्स च्या कोंकण प्रतिभा दिवाळी २०२२ ह्या विशेषांक मधून प्रकाशित)
Leave a Reply