महाराष्ट्राच्या पश्चिमेला एकीकडे गगनाला गवसणी घालणाऱ्या उत्तुंग सह्यागिरीच्या रांगा अन् दुसरीकडे अथांग सागर आणि त्याची किनारपट्टी यांच्या दरम्यान असलेला चिंचोळा भूप्रदेश म्हणजे कोकण. कोकण म्हटले की नजरेसमोर येतात आंब्या फणसाच्या बागा, नारळी फो फळीची झाडे, काजू आणि सुपारी कोकण किनारा हा शब्द उच्चारताच नजरेसमोर येतात त्या समुद्रात वादळीवाऱ्याशी लढत किनारा गाठण्यासाठी स्पर्धा करणाऱ्या नौका, अलिबाग उरणची ताजी मासळी, रायगड ठाण्यातील भाताची खाचर. कोकण म्हणजे उल्हास आणि आनंद.दिवेआगर, गणपतीपुळे, हरिहरेश्वर- श्रीवर्धन, लोटा परशुराम या परशुरामाच्या तपाने पावन भूमीत तुम्ही कुठेही जा सृष्टीचे विलोभनीय दर्शन घडणारच. कोकण किनारपट्टी वनराईने नटलेली, हिरवे वस्त्र ल्यायलेली हे कोकणचं कालच चित्र आज धुसर झालं आहे. आधुनिकीकरणाच्या या चहूबाजूंनी पसरलेल्या धुरात कोकणचं सौंदर्य दिसेनास झालंय. या कोकणच्या बदलत्या चेहऱ्याने मन व्यथित होत अन् विचारात हरवत ,कोकण कालच आणि आजचं . वर्दळीपासून दूर शांत,निवांत निसर्गरम्य कालच कोकण .ना भविष्याची चिंता ना भौतिक सुखाची हाव. इथ भविष्याची चिंता करतंय कोण? खरोखर ग्लोबल समस्यांपासून दूर मंतरलेल कोकणी माणसाचं विश्व होत, अन् हे कालच कोकण होतं.
पिढ्यान पिढ्या आनंदात जगतील आणि अतिथ्यानाही देतील अशी विपुलता आणि समृद्धी होती. खाडीत मासोळी अन् मासोळीत गाभोळी भरलेली होती. आगोटीत हिरवीगार अन् सुगीला सोन्यासारखी भरलेली भातखाचर होती. इथल्या माणसांची मनही तशीच भरलेली होती.आधुनिकीकरण आणि विकास हे शब्द ठाऊक नसलेला कोकणी माणूस आनंदाने जगत होता. पण या सुंदर संपन्न कोकणाला कुणाची नजर लागली अन् कोकणचं रूप बदलत गेलं .*
कोकणातील खेडी स्वयंपूर्ण आणि स्वावलंबी होती. पूर्वानुपार चालत आलेली बलुतेदारी खेड्यामध्ये असल्याने खेड्यातील गरजा खेड्यात भागवल्या जात. घरासमोर भले मोठे अंगण, मागील बाजूला गाई गुरांचा गोठा,एका बाजूला परस अशी रचना असल्याने वापरासाठी जागेची कमतरता नव्हती. पण खासगी गृहप्रकल्प गावात आले आणि गावाचे स्वरूप बदलले. जमिनी कवडीमोल भावाने विकण्याचे सत्र सुरू झाले. नद्या आणि खाडी मधून अतिरेकी वाळू उपसा सुरू झाला. डोंगर कातरले गेले . भूमी ओसाड भकास झाली. त्याजागी टोलेजंग इमारती , टॉवर्स उभे राहिले. गावाचे स्वरूप बदलले . उत्तर कोकणात रोहा,पेण, उरण, ठाणे भागात औद्योगिक वसाहती स्थापन झाल्या. त्यामुळे लोकसंख्या वाढली. विविध कारणांमुळे प्रदूषण वाढले. जलचर व वन्यप्राण्यांचा अधिवास नष्ट झाला. विकास विकास म्हणतात तो हाच का? असा प्रश्न स्वतःला विचारत स्वतःच्याच थोबाडीत मारून घेण्याची वेळ कोकणी माणसावर आली आहे. कोकणात औद्योगिक वसाहती आल्या . उद्योगधंदे वाढले , व्यापार दळणवळण यात वाढ झाली .पण विकासाची आरोळी ज्याच्या नावाने दिली गेली तो कोकणी माणूस यात कुठे आहे? कुठेच नाही. कोकणातील सर्व प्रमुख ठिकाणच्या बाजारपेठेवर गुजराती, मारवाडी यांचे वर्चस्व आहे. जे औद्योगिक प्रकल्प उभे राहिले त्या कंपन्यांच्या प्रवेशद्वाराजवळ स्थानिक कोकणी माणूस तिष्ठत उभा आहे. ‘ *वामनरूप धरुनी बळीचया द्वारी तिष्ठसी ‘* गणपतीसमोर उभा राहून कोकणी माणूस भाबडेपणे विठ्ठलाची आरती म्हणतो पण सध्या त्याची अवस्था अशीच काहीशी झालेली आहे.
स्थानिक भूमिपुत्रांच्या जागेवर प्रकल्प उभे राहिले पण त्यांना रोजगार नाही. प्रकल्पग्रस्तांना स्वतःच्या हक्कासाठी लढा उभारावा लागतो यापेक्षा शरमेची बाब नाही.प्रकल्पग्रस्तांचे नेते दिबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या लढ्यात बलिदान दिल्यावर साडेबारा टक्के विकसित भूखंड मिळाले. आज कोकणच्या उरावर दूसरी तिसरी मुंबई , नवी मुंबई बसवताना कोकणी माणसावर हद्दपार होण्याची वेळ आलेली आहे.
कोकणातील शेतीव्यवसाय चुकीच्या शासकीय धोरणामुळे नामशेष होत चालला आहे. महागाई वाढली शेतीची साधने , बियाणे, खते महागली. शेतीतून मिळणारे उत्पन्न मर्यादित परिणामी शेती व्यवसाय नामशेष होत चाललाय धान्य विकत घेऊन खाण्याची वेळ त्याच्यावर आली आहे.
कोकण जंगल आणि वनौषधीनी समृद्ध होत . उद्योग आणि निवासी वसाहतींसाठी जी बेसुमार जंगलतोड झाली त्यामुळे कोकणचे अपरिमित नुकसान झाले आहे. लक्ष कोटीतील (कोटी म्हणजे प्रकार) वनस्पतींचे वैविध्य येथे आढळत होतें पण आज कोकण भकास झाले आहे.
कोकण रेल्वे आली, रस्ते महामार्ग आले. कोकणची आर्थिक भरभराट झाली पण माणसांच्या वाढत्या गर्दीत कोकणी माणसाचे घर शोधूनही सापडत नाही मग प्रश्न उपस्थित होतो- ती प्रगती तो विकास नक्की कुणासाठी होता?
भूषण स्टील सारख्या कंपन्या पण स्थानिक तरुणांना रोजगारात प्राधान्य नाही आणि हि बेरोजगारीची समस्या सोडवण्यात सर्वच राजकीय पक्ष अपयशी ठरले आहेत.
कालच कोकण सांस्कृतिकदृष्ट्या वैभवशाली होत. गौरी – गणपती बघावेत तर कोकणात. दशावतार, शिमगा, बाल्या नृत्य हा कोकणातील कलेचा एक ठेवा पण त्याला व्यावसायिक दर्जा प्राप्त करून देण्यात कोकणी असमर्थ ठरला.
सोंगट्या हा कोकणात अबालवृद्ध मंडळींकडून खेळला जाणारा एक प्रकार सोंगट्या गेल्या त्याची जागा सट्टा आणि जुगाराने घेतली. केवळ मनोरंजनासाठी खेळल्या जाणाऱ्या या खेळाचे व्यावसायी करण अशी ही अवदसा शिरल्यावर कोकणचे भले कसे होणार?
कोकणात भौतिक सुबत्ता आली हे मान्य पण त्याचा कोकणी माणसाला किती फायदा झाला. महाराष्ट्रातील सारस्वत मंडळींनी कोकणावर निरतिशय प्रेम केलं आहे आणि त्यांची साहित्यसंपदा समृद्ध बनवण्यासाठी कोकणाने त्यांना भरभरून दिलय. कुसुमाग्रज, गदिमा.पु.ल.आदींनी रेखाटलेला आणि नामवंत कवींनी काव्यबद्ध केलेला कालचा समृद्ध कोकण आज कुठेच दिसत नाही.
हा उद्याचा कोकणी माणूसआजूबाजूच्या टोलेजंग इमारतीचया घेरावात कुठल्यातरी कोपऱ्यात आपल्या झोपडीवजा घराच्या दारात उभा राहून डोळ्यांतले अश्रू पुसत हा आलेल्या अतिथ्याला म्हणेल,’ येवा कोकण आपलाच आसा ‘.
लेखक – कृष्णा हरिश्चंद्र हाबळे.
संपर्क – 7775993105
Leave a Reply