व्यास क्रिएशनच्या प्रतिभा दिवाळी २०२० च्या अंकामध्ये प्रकाशित झालेली वैभव दळवी यांची हि कविता
रोज देतसे पुन्हा पुन्हा मी, मनास खमकी तंबी;
नकोत कुबड्या आधारा वा, जगणे परावलंबी
पाय नीतीचे, पाऊल हे ना, कधी पडो वाकडे;
हेच घालतो लीन होऊनि, शुभंकरा साकडे
हात राबूनी नम्र जुळावे, माणुसकीवर भक्ती;
साथ द्यावया त्या बाहुना, ज्ञान-तुक्याची शक्ती
धमन्यांमधुनी अखंड वाहो, सृजनशक्तीचे रक्त;
रक्तामधल्या पेशीपेशीत, स्वत्वामधले सत्त्व
सुमंगलाचे स्वप्नचं व्हावे, ह्या जगण्याचे कारण;
तरून जाण्या भवसागर हा, विवेक व्हावा तारण
पूर्णत्वाचा ध्यास उरावा, निर्मुन अव्वल दर्जा;
श्वासामधुनि वाहो प्रगती, अखंड घेऊन ऊर्जा
कर्मभूमीवर सिंचन करण्या, घामच होईल पाणी;
कथा सांगण्या यशोफळाची, कामच होईल वाणी
हृदयी सागर करुणेचा तर, निर्मितीस त्या अर्थ;
संत नसे जर अंतरातला, समृद्धीही व्यर्थ
वेध भविष्या तुझा घ्यावया लाभो विशाल दृष्टी;
आशांचे नवकिरण व्यापुदे, प्रकाशणारी सृष्टी
– वैभव दळवी
Leave a Reply