आपण आनंदाचा विचार करतो त्या वेळी खरे तर विचार दुःखाचा असतो. दुःख आहे म्हणूनच आनंदाचा शोध आहे. प्रश्न असा येतो की, माणूस दुःखी का होतो आणि माणूस आनंदी तरी का होतो? मध्यंतरी माणसाच्या आनंदाच्या, समाधानाच्या कारणांचा शोध घेण्यासाठी अमेरिकेत एक पाहणी करण्यात आली. माणसाकडे खूप पैसे असले की आनंदाची साधने त्याला खरेदी करता येतात, असा त्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता. खूप पैसा असला म्हणजे खूप आनंद, असा त्याचा अर्थ घेता येत नाही. म्हणूनच पैसेवाला माणूस आनंदी असेलच, असे नव्हे. पैशाने विकत घेता येतील, अशा गोष्टींसाठी पैसा असणे एवढ्या मर्यादित अर्थानेच ही पाहणी घ्यायला हवी, असे दिसते. भारतात अशीच पाहणी करण्यात आली तेव्हा भारतातील 40 टक्क्यांपेक्षा अधिक लोक समाधानी, आनंदी असल्याचा निष्कर्ष पुढे आला. हे सर्वंच आर्थिकसंपन्न होते, असा भाग नाही. त्यातील खूप मोठ्या प्रमाणावरचे लोक दरिद्री अवस्थेमध्येच होते. मात्र, तरीही ते समाधानी होते, आनंदी होते. अलीकडेच आपण वृत्तपत्रातून मोठ्या घराण्यातील वादविवादाविषयी खूप काही वाचतो. सुख खरेदी करण्यासाठी त्यांच्याकडे पैशाची कमतरता आहे, असे म्हणता येणार नाही. तरीही ते सुखी आहेत, आनंदी आहेत, असा दावाही करता येणार नाही. मग प्रश्न पडतो की आनंद किंवा दुःखाचे उगमस्थान कोणते असावे? आनंद किंवा दुःखाचे कारण आपल्यात असेल की बाहेर? याच स्तंभात पहिल्याच लेखात वास्तव स्वीकारण्याचा उल्लेख केला होता. आपण जे आहोत, जसे आहोत तसे स्वीकारण्याची तयारी किंवा समोरची व्यक्ती किंवा घटना आहे तशी स्वीकारण्याची तयारी असणे किंवा नसणे यात तर दुःखाचे मूळ नसेल. जर दुःखाचे मूळ सापडले, तर त्यावर मात करणे कठीण असावे. जर दुःखाचे अस्तित्वच शून्य होणार असेल, तर तेथे आनंदाशिवाय अन्य काय असेल? आपण अनेक वेळा किंवा सततच म्हणा कोणाशीही बोलताना, व्यवहार करताना त्या त्या व्यक्तीपेक्षा त्यांच्या प्रतिमांशी संवाद साधण्याचा, व्यवहार करण्याचा प्रयत्न करतो. माझा ज्येष्ठ अधिकारी माझ्याबद्दल नीट विचार करीत नाही, त्याला माझ्या कामाची किंमतच नाही, सातत्यानं तो मला रागावतोच आणि माझी काहीही चूक नसताना रागावतो असे वाटणे, ही काही फार अस्वाभाविक घटना आहे, असे नव्हे. अनेक कार्यालयांमध्ये ज्येष्ठ-कनिष्ठ संबंध असेच असल्याचे पाहायला मिळते. स्वाभाविकपणे या संबंधातून जी निर्मिती होते त्याला दुःख, वेदना, तणाव, राग, चिडचिड असेच म्हणावे लागते. ही स्थिती सहज टाळता येते. प्रश्न येतो तो स्वतमध्ये स्वतला शोधण्याचा, स्वतला ओळखण्याचा आणि मान्य करण्याचा. तसे होत नाही. मी आळशी आणि कामचुकार आहे, हे मी पाहायला हवे आणि स्वीकारायला हवे. हे जर झाले, तर तुम्ही आळशी किंवा कामचुकार राहण्याची शक्यताच संपते. मी तर कार्यतत्पर आणि कामसू ही स्वतची फसवणूक जेथे थांबेल तेथेच स्वतला मान्य करण्याची, स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू होईल. मी कोणाला घाबरत नाही, असे म्हणणे आणि घाबरणे, यापेक्षा मी भित्रा आहे, हे स्वीकारणे खर्या अर्थाने महत्त्वाचे. एकदा हा टप्पा झाला की भीतीचा मागमूसही तुम्हाला लागणार नाही. तुमचे काम तुम्ही योग्य पद्धतीने कराल. जे शक्य नाही त्यासाठी मदत घ्याल, जे जमणार नाही तेही मान्य करण्याची लाज वाटणार नाही. रोज कार्यालयात जाताना येणारा ताण आणि घरी आल्यानंतर त्या ताणाचा इतरांवर केला जाणारा भडिमार थांबेल. प्रश्न आहे तो स्वतला स्वीकारण्याचा, मान्य करण्याचा. हा प्रयोग करून पाहण्यासारखा आहे. मी करून पाहिला आहे आणि दुःखाचे मूळच मी नष्ट केलेय. दुःख संपेल तेथे आनंदाशिवाय अन्य काहीही असणार नाही, याची खात्री बाळगा. स्वतशी संवाद साधण्याची सवय नसते. नैसर्गिक क्रियेपासून दुरावलेलो असतो आपण अशावेळी आपल्या आराध्यदैवताशी बो , आपल्या अंतरात्म्याशी बोला. तुमचा संवाद सहज होईल.
— किशोर कुलकर्णी
Leave a Reply