नवीन लेखन...

दुःखाचा डोंगर कोसळला….

सजीवसृष्टीला आपल्या कुशीत खेळवणारा निसर्गही कधी कधी इतका क्रूर आणि हिंस्त्र होतो की त्याच्या क्रौर्याची परिसीमाच होते. गेली तीन दिवस सूरू असलेला हा जलप्रपात काही केल्या थांबण्याचे नाव घेईना तेव्हाच मनात भयचकित करणाऱ्या घटनांची शंका येऊ लागली होती. नियतीच्या मनात जे असत ते ती घडवतेच लहानस छिद्रदेखील जहाज बुडवत इथे तर आभाळच फाटलं होत.

रायगड जिल्ह्यातील चौकजवळील इर्शाळवाडीवर दरड कोसळली आणि संपूर्ण वाडी दगडमातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. पुण्यातील माळीण दुर्घटना आठवली.

रायगड जिल्ह्यात दरडी कोसळण्याच्या घटनांची पुनरावृत्ती होत आहे. मागील दशकात दासगाव, जुई, कोंडीवते या गावावर दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. 2021मध्ये तळीए गावावरदेखील असाच डोंगर कोसळला. आणि आता 20 जुलै 2023 इर्शाळवाडी दरड कोसळल्याने गाडली गेली. घटना जरी निसर्गनिर्मित असली तरी त्याची कारणे मानवनिर्मित आहेत मुंबई – पुणे पट्ट्यात विकासाच्या नावाखाली जो खेळ सूरू आहे तो विनाशाकडे नेणारा आहे हे वारंवार अधोरेखित झाले आहे. कर्जत, खालापूर पेण ही ठिकाणे सर्वाधिक दुर्गम व आदिवासी वस्ती असलेली सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या कितीतरी वाड्या, वस्त्या आणि तिथे कित्येक पिढ्या जीवन व्यतीत करणारे हजारो जीव ज्यांचा संबंध बाहेरील व्यवहारी जगाशी नाहीच नाही. रायगडमध्ये कुठेतरी कड्याकपारीत इर्षालवाडी हे छोटसं गाव होतं हे आजच्या घटनेनंतर महाराष्ट्राला कळलं असावं कारण इर्शालगड आणि परिसरात ट्रेकिंगला जाणाऱ्या गिर्यारोहक मंडळींशिवाय फारच कमी लोकांना या वाडीबद्दल माहीत असावं. या वाडीपर्यंत वीजदेखील अद्याप पोहचलेली नव्हती

ही घटना घडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक नेतेमंडळींनी घटनास्थळी धाव घेतली. आपत्ती व्यवस्थापनची टीम काम करत होतीच सोबतीला काही स्थानिक तरुण होते. कित्येक फूट मातीच्या ढीगाऱ्याखाली गाडल्या गेल्याने शोध घेणे अतिदुष्कर बनले होते.

माझा पत्रकार मित्र अजय गायकवाडची मघाशी दहा वाजण्याच्या सुमारास MRT कॉम्प्लेक्समधील मोबाईल रिपेअरींग शॉपमध्ये भेट झाली . इर्शालवाडी दुर्घटनेची बातमी कव्हर करण्यासाठी गेला होता.व्हिडिओ शूटिंग करताना पावसात मोबाईलमध्ये पाणी गेल्याने त्याचा मोबाईल बंद पडला होता.त्याने इर्शालवाडी दुर्घटनेचे केलेले कथन मन विषण्ण करणारे होते.

इर्षालवाडीची बिकट वाट त्यात विजेचा पत्ता नाही. प्रचंड जलप्रपातामुळे आधीच भुसभुशित झालेली जमीन दलदल बनली होती अशा दलदलीतून वाट काढत माणसे शोधण्याचे काम सुरू होते. दगड कोसळल्याने एकदम भुईसपाट झालेली कौलारू घरे, झाप झोपड्या, तुटल्या फुटल्या साहित्याचा खच पडलेला. मुळासकट खाली फेकली गेलेली झाडे असे निराशाजनक चित्र. कधीतरी या इर्षालगडाकडे गेल्यानंतर गिर्यारोहक व पर्यटकांनी या छोट्या वाडीत फिरून काढलेले फोटो व काही व्हिडिओ या आधारे या वाडीचे वर्णन करता येईल. विकासाच्या प्रवाहापासून दूर बाह्य जगापासून अलिप्त अशी ही वाडीत आणि त्या वाडीत वनोपज जिन्नसांवर जगणारे आदिवासी , त्यांचे हसरे आनंदी चेहरे आता काळाच्या पडद्याआड गेले आहेत रानफुलांनी भरलेल्या टोपल्या घेऊन चालणाऱ्या त्या हसऱ्या चिमुरड्या कुठे असतील. कितीतरी सुरकुतलेले वृद्ध चेहरे या ढीगाऱ्याखाली चिरनिद्रा घेत असतील. कधीकाळी या वाडीत वीज येईल हे स्वप्न उराशी घेऊन जगणारी माणसे एका क्षणात दिसेनाशी झाली. अशा मुख्य समाजप्रवाहापासून दूर घटकांसाठी खरेच समाज म्हणून आपण काय करतो हाच चिंतनाचा विषय आहे.

विचार करताना नजरेसमोरसमोर उभी राहिली कर्जत शहरापासून काही अंतरावर पाली भुतीवली धरणालगत असलेली धड रस्ता नसलेली बिकट वाटवहिवाट असलेली दुर्गम चिंचवाडी , पळसदरीजवळ असलेली वर्णे ठाकूरवाडी, व इतर आदिवासी वाड्या, रायगड व पुणे जिल्ह्याच्या सीमेवर मोग्रज गावापासून काही अंतर उंचीवर गिरीशिखराच्या पायथ्याशी असलेली आणि कर्जत तालुक्याचे टोक मानली जाणारी कळकराई अगदी या इर्शाळवाडीसारखीच उंचीवर आणि उंच डोंगराच्या पायथ्याशी.

ना दवाखाना, ना कुठल्या तातडीच्या सुविधा तरीही उन-वारा-पावसाची तमा न बाळगता हे लोक जगत असतात पण त्यांच्या गरजा लक्षात कोण घेतो? समाजघटक म्हणून आपण त्यांना दूरच ठेवतो त्यांच्या व्यथा जाणून घेण्याऐवजी दुर्लक्ष करतो हा त्यांच्यावरील अन्याय नव्हे का? त्यांच्या जीविताच्या

सुरक्षिततेचा विचार प्राधान्याने व्हायला हवा. अशा गावांना व वाड्यावस्त्यांना असलेला संभाव्य धोका लक्षात घेऊन त्यांना तिथून सुरक्षित स्थळी आणणे गरजेचे आहे. केवळ नैसर्गिक घटना आहे पावसाळ्यात असे घडायचेच म्हणून दुर्लक्ष करणे हा अन्यायच होईल .

या घटनेमागील मानवनिर्मित कारणे शोधून त्यावर उपाययोजना करणे आवश्यक आहे. डोंगरांचा होणारा विनाश व भुसखलन थांबवण्यासाठी वृक्ष लागवडीचे महत्वाकांक्षी उपक्रम तर हाती घेतले पाहिजेत पण वाढल्या डोंगरफोडीला आळा घातला पाहिजे.

प्रतिवर्षी दरडप्रवन क्षेत्रात जिथे गावांना अथवा वाड्यांना धोका आहे तिथल्या लोकांना संभाव्य धोका ओळखून तात्पुरते अशा ठिकाणाहून हलवण्याची दक्षता घेतली गेली पाहिजे. नैसर्गिक आपत्ती टाळता येत नाही पण जाणारे जीव मृत्यूच्या दाढेतून नक्किच वाचवता येतील.

इर्षालवाडी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करून इथेच थांबतो.

– कृष्णा हाबळे

Avatar
About कृष्णा हरिश्चंद्र हाबळे 3 Articles
नेरळ विद्यामंदिर, नेरळ (रायगड) माध्यमिक विद्यालयात शिक्षकपदी कार्यरत. वयाच्या 19व्या वर्षापासून वृत्तपत्र लेखनास सुरुवात दै. कृषिवल, दैनिक पुढारी, दै.मुंबई लक्षदीप,दै.आजचा महाराष्ट्र , साप्ताहिक आंदोलन (रायगड),साप्ताहिक दीपस्तंभ (मुंबई) , SPROUTS या इंग्रजी दैनिक वृत्तपत्रातून लेखन . संस्कारदीप दिवाळी अंकातून लघुकथा व काव्यलेखन तसेच सामाजिक ऐतिहासिक लेखांचे लेखन . आजीवन सभासद महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संघ मुंबई सभासद नक्षत्रांचे देणे काव्यमंच भोसरी पुणे रायगड जिल्हा संघटक कोकण विभाग पत्रकार संघ नेरळ विद्यामंदिर, नेरळ माध्यमिक विद्यालयात शिक्षक महाराष्ट्र राज्य माहिती अधिकार महासंघ सहसंपादक /संकलक संस्कारदीप दिवाळी अंक आजपर्यंत मिळालेले पुरस्कार १ अखिल महाराष्ट्र पत्रकार व वृत्तपत्र लेखक संघ आणि इन्फोटेक फीचर्स चेंबूर मुंबई यांच्या वतीने राष्ट्रीय एकात्मता फेलोशिप पुरस्कार २००८ (मराठी साहित्य मंडळाच्या अध्यक्षा सन्माननीय विजया वाड यांच्या हस्ते प्रदान स्थळ दामोदर नाट्यगृह परळ मुंबई) २. महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संघाचा राज्यस्तरीय महाराष्ट्र दीप पुरस्कार २०१० ज्येष्ठ पत्रकार व संपादक विनायक पात्रुडकर यांच्या हस्ते मुंबई येथे सन्मानित ) ३. राष्ट्रस्तरीय प्रतिभारत्न पुरस्कार २०१४ (राष्ट्रीय कीर्तनकार सोन्नर महाराज यांच्या हस्ते सन्मानित स्थळ दामोदर नाट्यगृह परळ मुंबई) शिक्षण क्षेत्रातील विविध पुरस्कार १. कर्जत तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार २०१४ २. राष्ट्रस्तरीय भारतज्योती शिक्षक प्रतिभा सन्मान २०२१ ३. कोकण विभागातील पाच जिल्ह्यातून देण्यात येणारा शिक्षण क्षेत्रातील मानाचा पुरस्कार वसंत स्मृती पुरस्कार २०२१ (कोकण शिक्षक आघाडी यांच्या वतीने केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील , आ. निरंजन डावखरे यांच्या हस्ते प्रदान स्थळ - टीपटॉप प्लाझा, ठाणे ) ४. रायगड भारत स्काऊट गाईड संस्थेचा रायगड डिस्ट्रिक्ट बेस्ट स्काऊटर अवॉर्ड २०१७ (रायगड जिल्हा मेळावा Nature hunt camp Site उंबरखिंड ) ५. कोकण विभागीय स्काऊट गाईड मेळावा रत्नागिरी येथे ट्रेनिंग कौन्सिलर म्हणून निवड व सहभाग

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..