जीवनावरील असे भाष्य आपल्या पूर्वापार समजुतींना /गैरसमजांना तळापासून उद्ध्वस्त करते आणि परिपक्व होण्यासाठी लागणाऱ्या सत्याचे डोस पाजते.
( ” सिटी ऑफ गर्ल्स ” या पुस्तकातील काही दाहक किरणे !)
१) तुमच्या आयुष्यात तळापासून बदल घडवून यायचा असेल तर एक मोठा तडाखा बसणे आवश्यक असते.
२) आनंद आणि समाधान या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.
३) आपण जेव्हा तरुण असतो तेव्हा या गैरसमजूतीत असतो की काळ हे सगळ्या जखमांवरचे औषध आहे. पण जसं जसं आपलं वय वाढत जातं तसतसं हे कटू सत्यही आपल्याबरोबर कायम राहतं की काही गोष्टी कधीच पूर्ववत होत नाहीत. बिघडलेल्या काही गोष्टी कधीच दुरुस्त करता येत नाहीत – ना काळाच्या पुढे जाण्यातून, ना आपल्या तीव्र इच्छाशक्तीतून . आपण सगळेच त्यातली शरम, दुःख आणि भरून न आलेल्या जखमा शरीरात वागवत जगत राहतो आणि तसंच जगणार असतो.
४) एक सत्य मला गवसलंय , जेव्हा एकही पुरुष आजूबाजूला नसतो तेव्हा एकत्र येणाऱ्या बायांना कुठलीही भूमिका घ्यावी लागत नाही. त्यावेळी त्या फक्त “त्या” असतात.
५) प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात एक वेळ अशी येते , जेव्हा ती सतत लाज बाळगत , शरम सांभाळत जगण्याचे सोडून देते आणि ती खरी जी आहे, ते जगण्यासाठी मुक्त होते.
६) आयुष्य हे दोन्ही , धोकादायक तितकंच क्षणभंगुरही आहे. म्हणूनच आपले आनंदाचे क्षण नाकारण्यात ना काही अर्थ असतो, ना तुम्ही जे आहात त्यापेक्षा वेगळं बनण्याचा प्रयत्न करण्यात !
७) ज्यानं मला खरोखरच जन्म दिला (न्यू यॉर्क मधील लीली थिएटर ), ते ठिकाण कोसळताना पाहण्यासाठी माझी आत्या पेग हिच्यासारखा सहनशील पाठीचा कणा माझ्याकडे नव्हता. मी पाहात होते- इमारत जमीनदोस्त होताना आतल्या स्टेजचा तो भाग या क्रूर , संवेदनाहीन सूर्यप्रकाशात उघडा नागडा होत समोर आला, जो कधीही कुणी पाहाणं अपेक्षित नसतं. लक्तरं झालेलं त्याच ते रूप लोकांच्या साक्षीसाठी प्रकाशात आलं आणि ……. सगळंच संपून गेलं.
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply