अंधेरीतलीच गोष्ट आहे ही.एक मध्यमवर्गीय कुटुंब होतं.कर्ता पुरूष उपजीविकेसाठी कंपाउंडरची नोकरी करायचा.सुशील पत्नी होती.अधूनमधून देवळात वा गावातल्या कार्यक्रमात भजनं म्हणायचा.किर्तनकाराला पेटीवर साथ द्यायचा.त्यांना एक ८-१० वर्षाचा मुलगा होता आणि एक सहा सात वर्षाची मुलगी होती.सुखी कुटुंब होतं ते.त्यांत आणखी एका भावाचं आगमन झालं आणि आनंदात भर पडली.मग नियतीला ते त्या कुटुंबाचं सुख पाहवेना.तिन्ही मुलांना त्यांच्या वडिलांच्या हवाली करून अल्पशा आजारांतच आई ह्या जगांतून निघून गेली.कुटुंबावर, विशेषतः मुलांवर दुःखाचा डोंगर कोसळला.धाकट्या मुलाला फारसे कळत नव्हते.आईच्या आठवणीही त्याच्या गांठी नव्हत्या.मग त्या तिन्ही लहान मुलांची खाण्यापिण्याची आबाळ होऊ नये म्हणून त्यांच्या वडिलांनी दुसरा विवाह केला.निदान त्यांनी तसे सांगितले.इतरांनी त्यांची स्वतःची गरज न सांगताच ओळखली.ती वयाने त्यांच्यापेक्षा बरीच लहान होती.मग त्यांचा नवा संसार सुरू झाला.
▪
सावत्र आईने आपल्या सवतीच्या मुलांशी कसं वागावं ह्याचा पाठ धृव बाळाच्या सावत्र आईने घालून दिला आहेच.बऱ्याच सावत्र आई होणाऱ्या स्त्रिया तोच पाठ गिरवणं पसंत करतात.अर्थात याला अपवाद मी पाहिले आहेत.ते सुध्दा त्यावेळच्या अंधेरीतच.सावत्र आईसुध्दा सवतीच्या मुलांवर प्रेम करू शकते.पण ह्या मुलांच्या आईने सावत्र आईचा पारंपारिक पाठच अवलंबला.तीने त्यांना कामांना जुंपून टाकले.सर्वात जास्त त्रास मुलीला होऊ लागला.आठ वर्षाच्या मुलीला धुणी भांडी, केरवारे करणं, नशिबी आलं.लाड होणं तर बाजूलाच राहिलं.मुलांसाठी दुसरं लग्न करणारे वडिल त्याबद्दल चकार शब्द काढीनात.अर्थात मी हे त्या मुलांकडून ऐकलेलं लिहितोय.सावत्र आईची कांही बाजू असली तर ती मला माहित नाही.पण ती मुलगी, आपण तिला ताई म्हणूया, तिच्या छळाच्या परीसीमेची कहाणी सांगत असे, तेव्हां तिच्या डोळ्यांत पाणी असे. चीडही असे.काम करणं, मार खाणं इ. नित्याचच होतं.शाळा तर सुटलीच.अनेकदा भांडी घासायला रात्री बारा किंवा एक वाजता तिला त्या वाडीत एका बाजूला असलेल्या विहिरीवर एकटं जावं लागे.आठ वर्षाच्या त्या मुलीचा भितीने थरकांप होत असे.पण तिला जावच लागे.अशा हालात तीन चार वर्षे काढल्यावर तो छळ असह्य होऊन ती घरांतून पळाली आणि गावातल्याच एका नातेवाईकाकडे तिने आश्रय घेतला.वडिलांना कळले पण त्यांचे कांही चालले नाही.त्या नातेवाईकांनी तिला ठेवून घेतले.तिथेही ती काम करी.पण कामाची सक्ति नव्हती.ती गेल्यावर मोठ्या भावाचा, अण्णाचा, छळ वाढला.तो मुलगा असल्यामुळे धुणी भांडी करायला लागत नसत इतकेच.चौदा-पंधरा वर्षाचा झाल्यावर तोही घरातून पळाला.त्या काळांत केमिकल कंपन्यामध्ये मुलांना कामे मिळत असत.त्याने नोकरी मिळवली.कांही काळ एका मित्राकडे राहिला.मग त्याने अंधेरी पूर्वेच्या एका वाडीत एक छोटी दहा बाय दहाची खोली भाड्याने घेतली.खोलीच्या बाहेर तेवढीच ओटी होती.तिथे त्याने आपल्या बहिणीलाही आणले.नातेवाईकांच्या आश्रयाला किती दिवस रहाणार ?ताईने काटकसरीचा पण टापटीपीचा संसार मांडला.धाकटा भाऊ, नाना, अजून सावत्र आईकडेच होता.नाना एस.एस.सी. झाल्यावर ह्या दोघां भावंडाच्या घरी आला.तो फारच गरीब स्वभावाचा होता.त्यामुळे त्याच्या वाट्याला जो कांही त्रास आला, तो त्याने मुकाट भोगला.कदाचित दोन भावंडे निघून गेल्याने त्याला त्रासही कमी झाला असेल.तो आणि मी एकाच शाळेत होतो.तो एक वर्ष पुढे होता.आमची तोंडओळख होतीच.एसएससीच्यानंतर आम्ही खूप जवळचे मित्र झालो.आमच्या गृपमधेच होता तो.तो जेव्हा भावंडाबरोबर राहू लागला तेव्हां आम्ही सर्व मित्र खुपदा त्यांच्या घरी जाऊन बसत असू.ताई हव्या तितक्या वेळां चहा करून द्यायची आणि आमच्या गप्पा रंगायच्या.
▪
त्या भावंडांनी घरासाठी जे सामान घेतलं त्यांत रेडिओला अग्रक्रम होता.गाणी ऐकणे आणि म्हणणे हा त्या भावंडांचा आवडता छंद होता.अण्णाचा आवाज बरा होता.ताईचा आणि धाकट्याचा अतिशय सुंदर होता.त्यांचं गाणं ऐकत रहावं असं वाटे.रेडिओवर ऐकलेली बरीच गाणी ते आपापल्या आवडीप्रमाणे तोंडपाठ करत.आम्ही त्यांच्या घरी गेलो की गाणे होतच असे.बरोबर साथीला वाद्ये नसूनही त्यांच्या गाण्यात कांही कमी वाटत नसे.एकानेही गाण्याचं शिक्षण घेतलं नव्हतं.पण दैवाने त्यांना उपजतच ती देणगी दिली होती.कदाचित भजने गाणाऱ्या वडिलांनी तेवढाच वारसा त्यांना दिला असावा.नानाचा आवाज तर हवा तितका वर चढू शकत असे व तिथून तो सहज खालीही येई.मला गाण्यांतलं फारसं कळतं नव्हत.गाण्याची फार आवडही नव्हती.पण त्याच्या गाण्यामुळे मला गाणं ऐकण्याची आवड निर्माण झाली.गाणी माहित झाली.गायक माहित झाले.त्या तिघांच्या आयुष्यांतली त्या सिंगल खोलीतली ती सहा सात सुरेल वर्षे हा त्यांच्या आयुष्यांतला अत्युच्च आनंदाचा काळ असावा.
▪
नाना नोकरीच्या शोधात असताना त्याला एम्प्लॉयमेंट एक्स्चेंजमधून इंटरव्हयूसाठी बोलावणे आले.मी सहज त्याला कंपनी म्हणून त्याच्याबरोबर गेलो होतो.जुन्या सचिवालयामधे त्यांना बोलावलं होतं.तिथे दहापासून बारापर्यंत थांबल्यावर त्यांतल्या वीस जणांना मुलाखतीसाठी त्यावेळचे मुंबईचे कडक शिस्तीसाठी गाजलेले महानगर पालिकेचे कमिशनर पिंपुटकर यांच्याकडे दोन वाजतां हजर होण्यास सांगितले.त्यांत नानाचेही नांव होते.पिंपुटकरांकडे मुलाखत म्हटल्यावर बरेच जण घाबरले होते.माझा मित्रही काळजीत होता.वीसही जणांचा जथ्था चालत चालत महानगरपालिकेच्या कार्यालयाकडे निघाला.सगळे घाबरले होते असं मी म्हटलं तरी जाताना त्यातले दोघेजण मोठ्या आवाजात खूप बोलत होते.”अरे, कसली ही फडतुस नोकरी.बिनधास्त रहायचं.घाबरायचं काय त्यांत ?नाही मिळाली तर काय बिघडतय ?”असा त्यांच्या बोलण्याचा सूर होता.दोन वाजता पिंपुटकरांनी त्या सर्वांची मुलाखत घ्यायला सुरूवात केली.प्रत्येकाची फक्त दहा बारा मिनिटे मुलाखत घेतली गेली.निकाल लागलीच देणार होते म्हणून सर्वाना थांबायला सांगितले होते.मुलाखती संपल्या आणि अर्ध्या तासात एका अधिकाऱ्याने बाहेर येऊन निवड झालेल्यांची नांव जाहीर केली.नानाची निवड झाली होती.पण जे दोघे, वाटेत ह्या नोकरीला फडतुस म्हणत होते, त्या दोघांना पिंपुटकरनी बरोबर खड्यासारखे बाहेर काढले होते.पिंपुटकरनी त्यांचा अतिशहाणपणा (oversmartness) दहा मिनिटांच्या मुलाखतीतही बरोबर ओळखला होता.
▪
नानाला रेशनिंग ऑफीसमधे सरकारी नोकरी मिळाली.एक दोन वर्षात तो रेशनिंग इन्स्पेक्टरही झाला.एकदा एका वाण्याचा खोटेपणा त्याने चोराच्या उलट्या बोंबा ह्या न्यायाने नानाविरूध्दच तक्रार केली.परंतु नाना त्यातून ताऊन सुलाखून बाहेर पडला.तो अत्यंत प्रामाणिक आणि पापभीरू होता.त्याची नोकरी चालू झाल्यावर तिघांच्या घराला थोडे बरे दिवस आले.गाणे आता जास्त खुलत होते.हिंदी चित्रपटातील त्याकाळची गाणी, नाट्यसंगीत आणि भावगीते त्यांच्या तोंडून ऐकताना आम्ही तन्मय होत असू ह्यात नवल नाही.पण गणपतीच्या आरतीला सुध्दा ते बहार आणत.त्यांच्या मालकाकडे दरवर्षी गणपती येत असे.मालकाकडची आरती यांच्याशिवाय पूर्ण व्हायची नाही.आम्ही कांही मित्रही जात असू.गणपतीच्या आरत्या कानठळ्या बसवणाऱ्या आवाजात न म्हणता, मधुर आवाजात म्हणतां येतात, हे गणपतीला सुध्दा तिथेच कळलं असेल.ते कांही खास वेगळ्या आरत्याही म्हणत.त्या तर फारच सुंदर असत.शब्द, ताल, सूर आणि भक्तीभाव यांचा सुंदर मेळ ऐकून आम्ही तरी खूष होत असू.पुढे अंधेरी सोडल्यावर मी ह्या आनंदाला मुकलो.
▪
नाना आमच्या गृपमधलाच असल्यामुळे ज्ञानदेवाच्या भिंताडावर गायला असायचा.मोकळ्या मैदानांत त्याचा आवाज आणखीच खुलत असे.आम्ही पिकनिकला गेलो की नानाचे खुल्या आवाजातले गाणे ऐकायला आसपासचे लोक जमा होत असत.इतकं त्याच गाणं प्रभावी होतं.आम्हाला पिकनीकला, समुद्रावर आणि होळी, कोजागिरी असेल त्या रात्री आमच्या इतर कांही मित्रांबरोबर तो महफील रंगवून टाकत असे.मोहम्मद रफी, मन्ना डे, मुकेश यांची गाणी त्याच्या आवाजात ऐकायला फारच मजा येई.”मन तडपत हरी दर्शनको आज”हे त्याच्या हृदयांतून आल्यासारखं वाटे.”ओ दुनियाके रखवाले”ला साद घालताना त्याच्या आवाजात दर्द असायचा.तेच “चम्पी, तेल, मालिश” म्हणून”सर जो तेरा चकराये”म्हणताना जॉनी वॉकरचा मिष्कीलपणा त्याच्याही स्वरांत उमटायचा.जागृतीमधलं “हम लाये तुफानसे किश्ती निकालके” म्हणताना त्याचा स्वर वडिलधाऱ्या व्यक्तीचा वाटे.”ये मेरा दिवानापन है”हे गाणेही त्याचे आवडते होते.”लपक झपक तुफान बदरीयां” पुढे किशोरकुमारची गाणीही तो तितक्याच ताकदीने पेलत असे.पडोसन मधली जुगलबंदी “एक चतुर नार” तो सर्व छटांसकट पेश करत असे.”मेरे देशकी धरती” हे महेंद्र कपूर यांच गाणं म्हणताना तो आवाज हवा तेवढा चढवू शके.साधारणपणे नाना काय किंवा ताई काय, दोघेही वाद्यमेळाशिवाय गात.परंतु एखादे वेळेस वाद्यमेळाबरोबर गाण्याची संधी मिळाल्यास त्यांना ते बिलकुल कठीण जात नसे.जणू कांही नेहमीच ते वाद्यमेळासह गातात, इतक्या सहज ते त्यावेळीही गात.गाणं ही जणू त्यांना सहज वश झालेली विद्या होती.कितीही लोकांसमोर केव्हाही गायला त्यांना कधीच भीती वाटत नसे.
▪
नाना जशी हिंदी गाणी म्हणत असे तशी मराठीही सुंदर म्हणत असे.पंडितराव नगरकरांची”आनंदकंदा प्रभात झाली”हे सूर आळवून तो वातावरण प्रसन्न करत असे.तर दुरीतांचे तिमिर जावो मधलं”आई, तुझी आठवण येते”हे त्याच्याकडून ऐकताना ऐकणाऱ्याचे डोळे नक्कीच ओलावत.”तू जपून टाक पाऊल जरा”हे ही तो छान म्हणत असे.जय जय गौरीशंकरमधील”नारायणा रमारमणा”हे देखील त्याचं अत्यंत आवडीचं गाणं होतं.ते गाताना तो भक्तीमय होऊन जात असे.पंडितराज जगन्नाथ मधील गाण्यांवरही त्याची घट्ट पकड होती.प्रसाद सावकारांची गाणी गायला त्याला फार आवडत.”सावन घन बरसे”किंवा”जय गंगे भागीरथी”मी त्याच्याकडून कैकदा ऐकली तरी मला नेहमीच ताजी वाटली. सुधीर फडके, अरूण दाते यांची भावगीतं आणि शाहिराचा पोवाडा तोसारख्याच सहजतेनेम्हणे.ही गाण्यांची यादी कितीतरी वाढवतां येईल.नवीन गाणीसुध्दा तितक्याच तत्परतेने आत्मसात करत असे. ऑफीसच्या कार्यक्रमात तो गाणी सादर करी.कुठेही गाणं सादर केलं तरी त्याला खूप मोठा प्रतिसाद मिळे.
▪
अण्णाने बऱ्याच उशिराने विवाह केला.पण तो त्याला आणि त्याच्या पत्नीलाही लाभला नाही.पत्नीला कांही वर्षातच कर्करोगाने गांठले आणि अण्णाही ४३-४४ वर्षांचा असताना गेला.ताईला खूपच उशिरा एका बीजवराकडून मागणी आली.मी तिचा नवरा होऊ इच्छिणाऱ्या गृहस्थांना ओळखत होतो.ते गाडीमधे आमच्याबरोबर ब्रिज खेळायला असत.मी ते चांगले असल्याचा निर्वाळा दिला.ताई लग्न होऊन पार्ल्याला पतिगृही पार्ल्याला गेली.पण ते गृहस्थ विचित्र निघाले.त्यांची मुलगी मोठी होती.ताईने तिला त्रास देण्याचा प्रश्नच नव्हता.त्या सावत्र मुलीलाच नव्हे तर त्याच बंगल्यात रहाणाऱ्या पुतण्यांनाही तिने लळा लावला.पण ते गृहस्थ तिला पुरेसे पैसे न देणं, संशय घेणं, नाना परी बोलणं इ. प्रकारे तिला त्रास देत रहात.तिच्या गाण्याचं तर त्यांना कांहीच कौतुक नव्हत.पुढे त्यांचा मृत्यू झाल्यावरही त्यांनी तिच्या नावेही कांहीच ठेवलं नाही.सर्व लग्न झालेल्या मुलीच्या नांवे केलं.जणू कांही ताईच्या सावत्र आईने केलेल्या छळांत राहिलेली कसर त्यांनी भरून काढली.मात्र तिचा त्या घरांत रहायचा हक्क ते नाकारू शकले नाहीत.जवळजवळ अखेरपर्यंत ती तिथेच राहिली.तिचा पुतण्या अमेरीकेत स्थायिक झाला. तो मात्र तिला चार महिन्यांसाठी अमेरीकेत घेऊन गेला. तिथे त्याने तिची सरबराई केली.तिला बरीच अमेरीका बघता आली.एवढाच लग्नानंतर आनंदाचा भाग.वंशपरंपरेने त्या कुटुंबाचा एका मुंबईत असलेल्या सुप्रसिध्द मंदिराच्या पेटीत ठराविक काळांत जमणाऱ्या पैशावरच्या हक्कामुळे प्राप्त होणाऱ्या उत्पन्नावर तिने दिवस कसेबसे निभावून नेले.शेवटी ती खूप आजारी झाली तेव्हां मात्र तिची सावत्र मुलगी तिला आपल्या घरी घेऊन गेली.एखाद्या वर्षाच्या आत तिचा मृत्यू झाला.जिचे गाणे ऐकल्यावर तीचा आवाज लता, आशाच्या तोडीचा वाटतो असं अनेक ठिकाणी तिला ऐकायला मिळालं तिचा सूर निमाला.नानालाही तिचा आधार वाटे.त्याचाही आधार गेला.
▪
ऑफीसमधून नानाला पुढे वरळी डेरीला बदली मिळाली.नानाचा विवाह अण्णा आणि ताई यांनीच ठरवला.विवाह झाल्यावर नानाने गोरेगांवला जागा घेतली.पुढे सरकारी कर्मचाऱ्यांनी बांद्रा रेक्लमेशनला बांधलेल्या सोसायटीत नानाने छोटा फ्लॅट घेतला.संसारात रमला.नानाचे गाणं चालू होतं.पण आता ते आम्हाला वर्षातून एकदा आम्ही सर्व भेटत असू, तेव्हाच ऐकायला मिळे.नाना नोकरीतून निवृत्त झाला.तिथल्या ज्येष्ठ नागरिक संघाचा आवडता सदस्य झाला.मंदिर आणि ज्येष्ठ नागरिकांचं केंद्र ह्या दोन ठिकाणी नानाला गायची विनंती केली जाऊ लागली.तिथेही त्या वयातसुध्दा त्याची वाहवा होऊ लागली.मी माझ्या निवृत्तीनंतर दोन वर्षे बांद्रा रेक्लमेशन येथेच रहाणाऱ्या माझ्या मुलीच्या घरी राहिलो.नानाची आणि माझी पुन्हा रोज भेट होऊ लागली.ती दोन वर्षे मी त्याचं गाणं पुन्हां भरपूर ऐकलं.त्याने आपल्या नेहमीच्या गाण्यात कांही नवीन गाण्यांची भर घातली होती.त्यावेळी मला जाणवलं की नानाच्या काय किंवा ताईच्या काय या उपजत गुणांच खरं चीज झालं नाही.शेजारपाजारचे, आप्त, मित्र यांनी कौतुक करणं वेगळं आणि एक गायक म्हणून समाजात ओळख मिळवणं वेगळं.नाना जसा उत्तम गायचा तसाच तो चांगल्यापैकी नकलाही करायचा.त्याचं निरीक्षण दांडग होतं.शाब्दीक कोट्या, विनोद ह्यातही त्याला गति होती.त्याची आणखी एक आवड म्हणजे संवाद करताना समोरचा बोलेल त्याच्याशी यमक जुळवत बोलायचं.नोटा म्हटलं की कोटा शब्द वापरून तो उत्तर देणार.जर समोरच्याने त्यावर तोटा शब्द वापरून जबाब दिला तर ह्याच्या पुढच्या वाक्यात ‘खोटा’ असणारच.असं त्याचा आनंद निर्माण करण्याकडे ओढा होता.त्याला एक मुलगी व दोन मुलगे आहेत.मुलीचा आणि मोठ्या मुलाचा, दोघांचेही विवाह नाना व त्याची पत्नी हयात असतानाच झाले.पण नंतर नानाची पत्नी किडनीच्या आजाराने अनेक वर्षे अंथरूणाला खिळून राहिली. नानाच्या मोठ्या मुलाने रोहितने तिची खूप सेवा केली. पण हॉस्पिटलच्या चक्करांमधे नानाचीही प्रकृति बिघडली.नानाची पत्नी गेल्यावरही एक दोन वर्षे नाना होता.आम्ही सर्व मित्र भेटलो असताना गाणंही म्हणाला.संवयीने त्याचा आवाज चढत होता पण सूर थकलेला होता.वयाच्या ७८ व्या वर्षी नाना आम्हाला सोडून गेला.
▪
नानाचा स्वर आणि त्याचे सूर आजही माझ्या कानांत सांठवलेले आहेत.त्याचं “नारायणा, रमारमणा” आणि “मन तडपत हरीदर्शनको आज” माझ्या मनांत आजही घोळतयं.आम्ही कोणी त्याचं एखादं गाणंही रेकॉर्ड करून ठेवलं नाही.मी त्याच्या मुलाला विचारलं तर तो चुकचुकला.म्हणाला, “काका मीच तुम्हांला विचारणार होतो.टेपरेकॉर्डर असूनही त्यांचे एकही गाणं आम्ही रेकॉर्ड करून ठेवलं नाही.आणि आम्हा तीनही मुलांपैकी एकाकडेही त्यांचं गाणं आलेलं नाही.”नानाचा उपजत गुण त्याला भाग्यशाली कां नाही ठरला ?ताईचे वा त्याचे सूर दूरवर कां पोहोचले नाहीत ?केवळ परिस्थितीमुळे ?परिस्थिती साथ देणारी नव्हती हे खरंच आहे.पण ते कारण पुरेसं नाही.कांही कलांना आवश्यक गुण असले तरी ते जोपासावे लागतात.हिऱ्याला पैलू पाडावे लागतात.त्यांनी गुरू शोधला नाही, साधना अपुरी राहिली.ध्यास घ्यायला हवा होता.हे त्याला तरूण वयात सांगणारं कोणी भेटलं नाही.आम्हीही त्याचं गाणं ऐकण्यात धन्यता मानली.त्याला कांही सांगण्या-सुचवण्याएवढा पोंच आम्हालाही नव्हता.रेडीमेड गाणं ऐकून ते तसंच म्हणणं आणि रागांवर हुकुमत मिळवून गाणं ह्यातला फरक जाणून घ्यायला हवा होता.गायनाचा आनंद त्याने भरपूर लुटला.पण गाणं शिकायचा प्रयत्न त्याने केला नाही.त्याच गाण्यावरचं प्रेम गाण्याला जीवनाच्या केंद्रस्थानी बसवायला धजावलं नाही.दुर्दैवाने आजच्यासारखी माध्यमे आणि व्यक्त होण्यासाठी इतके मंचही उपलब्ध नव्हते.मग त्याच्या हयातीतही आणि नंतरही दूर दूर पोहोचण्याची क्षमता बाळगणारे त्याचे सूर दूर पोहोचलेच नाहीत.नानाची ही कहाणी कदाचित प्रातिनिधिकही असेल.असे अनेकांचे उपजत सक्षम सूर दूर पोहोचले नसतील.
— अरविंद खानोलकर.
Leave a Reply