MENU
नवीन लेखन...

दुरून डोंगर साजरे – भाग १

  1. नवं शहर ! सुंदर नगरी

 

मेघा (माझी मुलगी) – तिच्याबरोबर महेशही विमानतळावर आला होता. (महेश हा हिचा मामेभाऊ. तो इथे जवळजवळ 17 वर्षांपासून स्थाईक झाला आहे.) त्याने आपली मोठी मोटर कार आणली होती. आधी आम्हाला गाडीत बसवून त्याने आमचं सामान डिक्कीत ठेवलं. विमानतळावरून गाडी शहराकडे निघाली. डाव्या बाजूला steering wheel आणि गाडी रस्त्याच्या उजव्या भागाने Keep right चालवायची हा प्रकार मला नवा नव्हता. दहा वर्षांपूर्वी आम्ही दोघे दुबाईला मुलीकडे आलो होतो, तेंव्हा तो अनुभव मिळाला होता. फरक इतकाच की दुबाई उष्ण प्रदेश तर कॅनडा थंड प्रदेश ! इथल्या थंडीचा अनुभव अजून यायचा होता. दुबाईला आणि कॅनडाला पाहिलं तर रस्ते रुंद, विस्तीर्ण, स्वच्छ, सुंदर, सुबक आणि आकर्षक ! महेश गाडी चालवत असतांना त्याच्या गप्पाही चालूं होत्या. इथे रस्ते रुंद असून दुतर्फ शानदार इमारती दिसत होत्या. टोलेजंग- गगनचुंबी इमारती फारच कमी दिसल्या  माणसांची वर्दळ – गर्दी अजिबात दिसत नव्हती. मोटर गाड्याच  जास्त. पण या गाड्या व्यवस्थित, शिस्तबद्ध आणि तरी वेगाने जात होत्या. बघतां बघतां गाडी मेघाच्या घरासमोर येऊन उभी राहिली.

नात (तैशा) ने आलिंगन देऊन स्वागत केलं.

आम्ही मेघाच्या घरात प्रवेश केला. खरोखर छान आणि सुंदर आटोपशीर घर ! घरात शिरल्यावर प्रथम पांच पायर्या चढून बैठकीची खोली. परत सात पायर्या चढून दुसरी बैठकीची जागा, सैंपाकघर, त्यानंतर बारा पायर्या चढून झोपायच्या खोल्या, न्हाणीघर. घराच्या आजूबाजूला सुरेख हिरवळ. खरोखर रमणीय आणि सुंदर घर ।

जुलै म्हणजे इथल्या उन्हाळ्याची सुरूवात असं कळलं. हवेत गरमी तशी जास्त नव्हती पण थंडीही नव्हती. महेश थोडा वेळ गप्पा मारून व कॉफी-फराळ घेऊन परत गेला. आम्ही स्थिरस्थावर झालो. तेव्हढ्यात उषा (हिची मामे-बहीण- महेशची बहीण) तिचा नवरा रवि, तिची मुलगी नंदिता – असे येऊन गप्पा मारून गेले. ते कुटुंबसुद्धा इथे कॅनडामध्ये गेल्या 18 वर्षांपासून स्थाईक झालं होतं. संध्याकाळचे साडेआठ वाजले तरी चक्क ऊन होतं. हळूं हळूं नव्या वातावरणाची संवय होऊं लागली. खूप दिवसानंतर चपात्या, भेंडीची भाजी, लसणाची चटणी असे पदार्थ खाल्ले. रात्रीचे नऊ वाजले होते तरी फटफटीत उजेड !  फार उशीर न करतां आम्ही लवकरच झोपायला गेलो.

 

दुसरे दिवशी मुलीने आम्हाला आपल्या गाडीने शहरात नेलं. कविताकडे (महेशच्या बायको) कडे-  तिच्या दुकानात नेलं. माझ्या मोबाइलला नवं सिम कार्ड बसवलं. एका साऊथ इंडियन हॉटेलात मिनि टिफिन घेऊन दिलं. आवडीचे पदार्थ- मसाला दोसा, इडली सांबार, रवा केसरी (शिरा) आणि कॉफी असे मिळाले. मुलीने आम्हाला एका हिंदु देवळाला नेलं. खरोखर खूप सुंदर आणि स्वच्छ ! नीटनेटकं आणि शांत ! असं देऊळ भारतात कुठेही पाहिल्याचं मला आठवत नाहीं. शांततेसाठी कुठे घंटाही दिसली नाहीं ! नाही म्हणायला एका विशिष्ट जागेत तबला-पेटी आणि गिटार अशी वाद्ये भजनाच्या कार्यक्रमाकरता म्हणून व्यवस्थित मांडून ठेवलेली दिसली.  ! मुलीने तिथून आम्हाला उषाकडे नेलं. तिथून उषा, रवी सह आम्ही एका गुजराथी हॉटेलात जाऊन जेवलो. छान झालं.

कविता आपल्या दोन मुलांसह आमच्याकडे आली. मोठा मुलगा 15 वर्षांचा आणि धाकटा 12 वर्षांचा. मोठा मुलगा –आदित्य- कर्नाटक शैलीत खूप छान गायला. लहानगा आर्यन आपल्या वयाच्या मानाने खूप विद्वान वाटला.

कविताने आम्हाला साईबाबांच्या मंदिराला नेलं. माझ्या मनाप्रमाणे झालं. दानपेटींत कवितानेच दिलेली कांही नाणी घातली.  विठ्ठल – रखुमाई आणि  इतर देव – देवतांचं दर्शन झालं. शेगांवच्या गजानन महाराजांचं दर्शन घडलं. तिथले संचालक कोल्हापूरचे – मराठी बोलणारे होते. ठाकूर असं नांव !  गुरु पौर्णिमा – चांगला योग ! तिथून कविताने आम्हांला एका तामिळ देवळाला नेलं. तिथे मला तामिळ वाध्यार (पुरोहित) दिसले. बायकांच्या आंबाड्याप्रमाणे लांबलचक शेंड्या नीट गांठ मारून ठेवलेल्या- आणि शरीराचा वरचा भाग उघडा- अगदी माटुंग्याच्या भटजी प्रमाणे. मला बरं वाटलं.  पौर्णिमा म्हणून तिथे श्री सत्यनारायणाची पूजा होती. आम्हाला उशीर होत होता म्हणून कविताने परत घरी आणून  सोडायचं ठरवलं. 12 वर्षाचा तिचा मुलगा –आर्यन –तिथेच पूजेला थांबणार होता. तिथे त्याला पंडिताप्रमाणे मानलं जात होतं. महेशने त्याला नंतर घरी आणून सोडलं असं कळलं.

हिच्या वयाला 75 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने पार्टी झाली. मोजकेच लोक आले होते. पार्टी छान झाली. हिने मेणबत्त्या फुंकून विझवल्या व केक कापला. कौतुक झालं. (या केक मध्ये अंडं असतं की नाही असा मूर्ख प्रश्न मी विचारला नाहीं !)

हिची बहीण ”गीता“ फ्लॉरिडाहून आली. मुलगी आणि ही  दोघी विमानतळावर जाऊन तिला घेऊन आल्या.

 

30 जुलै 2016 ला दुपारपासून पूजेच्या मांडणीला सुरुवात झाली. संध्याकाळी पूजेचा कार्यक्रम झाला. मला कांहींच करावं लागलं नाहीं. सर्वांबरोबर मी श्री विष्णु सहस्रनाम स्तोत्राच्या पारायणाला बसलो. त्यानंतर श्री हनुमान चालीसाचं पारायण झालं. मी बांसरी वाजवली, आजच माझ्या वाढदिवसाचा कार्यक्रम झाला. सर्वांच्या सोयीकरता आजचा दिवस निवडला गेला.

मला उषाने श्री शिव सत्यनारायण स्वामीच्या देवळाला नेलं. तिथे मला कर्नाटक शैलीतलं शास्त्रोक्त संगीत ऐकायला मिळालं. परत एकदा तमिळ वाध्यार (पुरोहित- गुरुजी) पहायला मिळाले. लहानगा आर्यन (कविता-महेशचा मुलगा) कर्नाटक शैलीतलं कंठ संगीत आवडीने ऐकत होता.  एकाद्या जाणकार रसिकाप्रमाणे विशिष्ट ठिकाणी दाद देत होता. मला जास्त वेळ रहावलं नाही. उषाने मला परत आणून सोडलं.

उषा, कविता, माझी  मुलगी-मेघा, उषाची मुलगी-नंदिता, सगळ्या शिताफीने मोटर कार चालवत होत्या. दहा वर्षांपूर्वी माझी मुलगी –मेघा दुबाईमध्ये गाडी चालवतांना मी पाहिली इक़डे प्रत्येकाला गाडी चालवता यायला पाहिजे अशी परिस्थिती. इकडे मोटर गाडी ही आवश्यक वस्तु मानली जाते.

— अनिल शर्मा 

क्रमश:

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Avatar
About अनिल शर्मा 15 Articles
वास्तव्य – बेंगलूरू-कर्नाटक, वय एक्क्यांशी, शिक्षण मराठी भाषेतून झाले. सध्या वृद्धाश्रमात रहातो. एके काळी वकीलीचा व्यनसाय केला. आता स्वस्थ बसून संगणकावर काहीेतरी लिहीत आसतो.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..