उषाने आम्हाला नंदिताच्या (तिच्या मुलीच्या) नृत्याच्या कार्यक्रमाला नेलं. कार्यक्रम छान झाला. मला माझ्या कॉलेजातल्या गॅदरिंगच्या कार्यक्रमाची आठवण झाली. उपस्थित तरूण मंडळी उगीचच हल्लागुल्ला करत होती, परत येतांना एके ठिकाणी मध्येच भर रस्त्यात कारंजातून पाणी उडत होतं-पाण्याचे फवारे उडत होते ते पाहिले, लहान थोर सर्वजण उन्हाळ्याचा आनंद घेत होते. मुलंच काय पण मोठी माणसं सुद्धा सचैल स्नान करत होती. हो- उन्हाळा म्हणून लोक आनंदाने-उत्साहाने वावरत होते.
इकडे मी सकाळी फिरायला जातांना मला रस्त्यात फार कमी लोक भेटत असत पण जे कोणी भेटत ते ओळखीचे असोत वा नसोत, अगदी आनंदाने हंसत शुभेच्छा देत असत. एके दिवशी मी घराच्या मागे असलेल्या हिरवळीत फिरायला गेलो तेंव्हा एक गोरी बाई एका लहानग्या काळ्या मुलाला घेऊन फिरायला आली. ते मूल तिचंच असावं असं मला वाटलं. सोबत एक काळी बाईही होती. मी थकलो होतो म्हणून तिथल्या लांकडी बांकावर बसलो. ह्या दोन्ही बायका आणि ते काळं मूल असे तिथेच बसले. त्या बायका माझ्याशी जे बोलत होत्या ते मला समजत नव्हतं. मी त्यांना मला नीट ऐकायला येत नाही हे माझ्या उजव्या कानाला लावलेल्या श्रवणयंत्राकडे बोट दाखवून सांगितलं. गोरी बाई पुढे सरसावली. I am an expert in hearing aids असं म्हणत तिने माझ्या उजव्या कानातलं श्रवणयंत्र नीट बसवलं. अधून मधून एक काळी बाई आपल्या कुत्र्याला फिरायला घेऊन येता जातांना भेटत असे. तिने पुरुषासारखे केंस छाटून ठेवले असल्यामुळे ती बाई आहे हे समजायला वेळ लागला.
नायगारा फॉल्सला जायचा बेत ठरला. मुलीने आम्हाला, मी, ही, तैशा, गीता या सर्वाना बरोबर नेलं. लहानपणी मी ह्या धबधब्याबद्दल पुस्तकात वाचलं होतं. आज प्रत्यक्ष पहायला मिळालं. ह्या नैसर्गिक चमतकृतीचं जवळून दर्शन घडलं. मुलीने एका giant wheel मध्ये बसवून ऊंच भागावरून सिंहावलोकन घडवून दिलं. पायपीट झाली खरी. रात्री मुलीने गरम पाण्याची रबरी पिशवी दिली. पायाचं दुखणं कमी झालं.
एका संध्याकाळी तळ्याच्या कांठावर आम्ही पायीं फिरायला निघालो. ते ठिकाण खूप छान होतं. परत येतांना माझ्या उजव्या पायाला कळा येऊं लागल्या. मला रस्त्याच्या कडेला एका दगडावर नातीने बसवलं. मुलगी लगबगीने घरी गेली. तिने आपली गाडी आणली आणि मला घरी आणून सोडलं. इतर सर्व पायी आले.
7 ऑगस्ट 2016. आज कॅनडात भारत दिवस साजरा होणार, त्यात “कुम् कुम् भाग्य” मधला हीरो शबीर अहलुवालिया भारतातून आला होता. हिने आणि गीताने त्याच्याशी हस्तांदोलन करून फोटोही घेतले, आणि ते फेस बुकवर छापून आले.
सायरस मार्फातिया नांवाचा मुलीचा एक मित्र येऊन आम्हा दोघांना भेटून गेला. पारसी माणूस पण गुजराथी छान बोलत होता. म्हणजे त्याच्या बोलण्यात पारसी उच्चार नव्हते.
मुलीने आधी दुर्गा देवीच्या नंतर बौद्ध देवळाला नेलं, बौद्ध देऊळ भव्य आणि सुंदर। त्यानंतर मुलीने आम्हाला एका भारतीय हॉटेलात जेवायला नेलं. मला जेवण जास्त झालं. घरी येईपर्यंत अस्वस्थ झालो. बोललो नाही. स्वस्थ पडून राहिलो. रात्री त्रास होऊं लागला. दरदरून घाम आला. हिने डोलो 650 ची गोळी दिली. मुलीने पंखा चालू केला. बरं वाटलं. मला शंका आली. हिला बोललो. हिने पटकन वाटीत साखर आणून दिली. रक्त तपासलं. 65 एम एल होतं. मुलीने मला एका डॉक्टरकडे नेलं. तपासून झालं. औषधं घेतलं
दुपारी गीता अमेरिकेला परत जायला निघाली. तिला विमानतळावर पोहोंचवायला, ही, मेघा, तैशा अशा जाऊन आल्या. रात्री मला कंबरेत डाव्या बाजूला दुखूं लागलं. (मूत खडा – kidney stone). हिने मला गरम पाण्याची रबरी पिशवी दिली. डोलो 650 ची गोळी दिली. दुखणं थांबलं. झोप छान लागली,
हिने माझ्या आवडीची कार्ल्याची भाजी बनवली. माझी प्रकृति बरी राहिली. हिने बार्ली वॉटर, मध आणि लिंबाचा रस असं मिश्रण दिलं. साबुदाण्याची खिचडी बनवली. माझ्या आवडीची भेंडीची भाजी आणि चपात्या असं जेवण मिळालं.
15 ऑगस्ट 2016. आज भारतात स्वातंत्र्यदिन साजरा होत होता. त्या निमित्ताने अभिवादनपर संदेश आले.
18 ऑगस्ट 2016 आज माझ्या पासपोर्ट आणि इतर रेकॉर्डप्रमाणे वाढदिवस. माझ्या वयाला 80 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने कौतुक झालं. 1941 साली मला विजापूरच्या पंचमित्र मराठी शाळेत घालतांना कोणीतरी माझ्या जन्मतारखेचा उच्चार अकरा ऑगस्ट 1936 ऐवजी अठरा ऑगस्ट 1936 असा केला म्हणून शाळेपासून ते आजतागायत सर्व रेकॉर्डसमध्ये अठरा ऑगस्ट ही तारीख पडली. म्हणून वर्षातून दोनदा माझा वाढदिवस। आज हिने माझ्या आवडीचं मोरखळी बनवलं. आज आम्ही देवळाला व तिथून उषाकडे गेलो. तिथे जनार्दन मामा, (हिचे मामा, महेश-उषाचे काका) सुभाषिनी मामी, त्यांची मुलगी अनीता, तिचा मुलगा अर्जुन असे अमेरिकेहून आले होते. तिथून आम्ही कविताकडे गलो. तिथे जेवण झालं. जेवणानंतर सर्वजण –मला सोडून- पत्ते खेळू लागले. (मी पत्ते खेळत नाही).
मुलीने तैशाला मर्फीक़डे- तैशाच्या वडलाकडे नेऊन सोडलं. घटस्फोट होऊनही माझ्या मुलीचे आणि जांवयाचे- दोघांचे आपसातले संबंध मैत्रीचे आहेत ही कौतुकाची बाब आहे. मागे माझ्या वकीलीच्या व्यवसायात घटस्फोटांच्या केसेसमध्ये मी शक्यतो पति-पत्नीमध्ये समझोता घडवून आणून घटस्फोट टाळायचा प्रयत्न करत असे. पण माझ्या मुलीच्या बाबतीत मी ढवळाढवळ केली नाही. 21 वर्षांपूर्वी आमच्या ऐयर जातीच्या मुलाऐवजी ख्रिश्चन मुलाशी लग्न करायच्या तिच्या निर्णयाला मी पाठिंबा दिला होता आणि आत्ता चार वर्षांपूर्वी तिने घेतलेल्या घटस्फोटालाही मी माझा पाठिंबा दिला.
1 सप्टेंबर 2016. आज नातीचा – तैशाचा वाढदिवसः तिच्या वयाला 17 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने संध्याकाळी पार्टी झाली. तिच्याच वयाच्या मैत्रिणी जमल्या होत्या.
मुलीने आम्हाला सार्वजनिक लायब्ररीला नेलं. लायब्ररी खूप छान वाटली.
15 सप्टेंबर 2016 आज मुलीला सुट्टी. संध्याकाळी देवळात श्री सत्यनारायणाच्या पूजेला आम्ही जाऊन आलो. श्री विष्णु सहस्रनाम स्तोत्राचं पारायण झालं. कथा झाली. प्रीतीभोजन झालं. जेवण छान झालं. मुलीने आम्हाला ”ट्रेलर पार्क” ह्या ठिकाणी नेलं. वाटेत दुतर्फा झाडांच्या पानांचे बदलते रंग दाखवले. हाही सृष्टीचा चमत्कार पाहिला. ‘ट्रेलर पार्क’ खूप छान आणि रमणीय वाटला. तिथे स्टीव्हने एक ट्रेलर भाड्याने घेतला होता. ते घर त्याने खूप छान मांडून ठेवलं होतं. मुलगी कामावरून आल्यावर तिने पिंक नांवाच्या पिकचरला नेलं.
26 सप्टेंबर 2016 मुलीने मला डॉ, गॉर्डन नांवाच्या एका डॉक्टरकडे नेलं. तिथे त्याची मदतनीस गुजराथी होती. ‘ केम छो, बद्धा सारू छे’ असे संवाद झाले. तपासून झालं. स्टीव्हकडे जायचा बेत ठरला. सकाळी साडेनऊ वाजता निघून तीन तासाच्या प्रवासानंतर आम्ही त्याच्या नव्या घराला पोहोंचलो. वाटेत पुन्हा एकदा मुलीने झाडांच्या पानांचे बदलते रंग दाखवले. स्टीव्हकडे पाहूणचार झाला. परत येतांना पावसाने गांठलं. मुलीने शिताफीने गाडी चालवली.
7 ऑक्टोबर 2016. उषाकडे जेवणाचा कार्यक्रम झाला. इतर सर्व जण पत्ते खेळत होते. मला आणि रविला त्यात इंटरेस्ट नव्हता. संध्याकाळी नातीला आणायला मुलीने रविला सांगितलं. रविने मला सोबत घेतलं. दीड तास जायला आणि दीड तास परतीयला असा प्रवास रवीबरोबर झाला.
8 ऑक्टोबर 2016. सकाळी साडेनऊ पर्यंत गीता आणि परीवार आला. उषा आणि परीवार नंतर आला. त्यानंतर आम्ही उषाक़डे गेलो. पावभाजीचा बेत छान झाला. गोपाल-शांती- टेक्सासहून, प्रताप कॅलीफोर्नियाहून असे आले होते. गोपाल-प्रताप हे दोघे भाऊ हिचे मावसभाऊ. त्यानंतर केरावके चा कार्यक्रम झाला. तो गोंधळ मला सहन झाला नाही.
9 ऑक्टोबर 2016.आज प्रथम गुरूलक्ष्मीमध्ये सर्वांना जेवण आणि महेशकडे विश्रांती असा बेत झाला. तिथे एम्. एस्. धोनी हा सिनेमा पाहिला.
10 ऑक्टोबर 2016. . आज दसरा म्हणून एके ठिकाणी पूजेचा कार्यक्रम झाला. प्रसादाचं जेवण मिळालं. हे लोक कानडी बोलणारे होते. मागे संजय सत्यनारायण, त्याची बायको आशा, मुलगा अर्जुन असे आमच्याकडे आले होते. 14 वर्षांचा अर्जुन तबला वाजवतो हे समजलं होतं. आज त्याने भजनात तबल्याची साथ केलेली पाहिली. ह्या मुलाला तबला शिकवायला दिवेकर नांवाचे गृहस्थ महीन्याच्या दुसर्या आणि चौथ्या मंगळवारी येतात असं कळलं. दिवेकर म्हणजे मराठी बोलणारे असावेत. त्यांची भेट झाली नाही. कदाचित होणारही नाही.
15 ऑक्टोबर 2016, आज मुलीने आम्हांला जिथे ती पूर्वी काम करत होती- त्या ठिकाणी – हडसन बे- इथे नेलं.
16 ऑक्टोबर 2016. आज मला मुलीने केंस कापायच्या सलूनमध्ये नेलं. एका तरूण बाईने माझे केंस कापले. ही बाई हिंदी बोलत होती. तिला विचारल्यावर ती पाकीस्तानी असल्याचं कळलं. कॅऩडा ह्या ठिकाणी केंस कापण्याचं काम तरूण मुली करतात हे पाहून मला अचंबा वाटला. त्यांना बार्बर (न्हावी) न म्हणता. ब्यूटीशियन म्हणतात असं मला सांगण्यात आलं.
21 ऑक्टोबर 2016. शाळेहून आल्यावर नात आपल्या वडलाकडे गेली. एक दिवस राहून येणार होती.
22 ऑक्टोबर 2016. मुलीने सुलतान नांवाचा सिनेमा लावला.
24 ऑक्टोबर 2016. जंगली हा सिनेमा अर्ध्यावर पाहिला. संध्याकाळी मला खूप ढेकरा आल्या. भूक लागली. हात पाय थरथरूं लागले. चक्कर येईल असं वाटलं. खाली गेलो. मुलीने ब्रेड स्लाईस आणि कढी असं दिलं. रसमलाई दिली. रात्री हिने मला ड्रिंकिंग चॉकलेट दिलं.
27 ऑक्टोबर 2016. आज मिशाल नांवाची मुलीची मैत्रीण आपल्या परीवारासह येऊन भेटून गेली. मुम्बईला सिडनहॅम कॉलेजात माझी मुलगी आणि मिशाल
– दोघी एके काळी शिकत होत्या.
29 ऑक्टोबर 2016. आज नरकचतुर्दशी, त्यानिमित्ताने, हिने, मुलीने आणि नातीने पणत्या लावून दिवाळी साजरी केली.
30 ऑक्टोबर 2016 आजही हिने पणत्या लावल्या. टेलीफोनवर दिवाळीच्या शुभेच्छा देऊन – घेऊन झाल्या. 11 वाजता सायरस आणि परीवार, रीटा आणि तिचा मुलगा असे आले. सहभोजनाचा कार्यक्रम झाला. पाव्हण्यांना कंटाळा येईपर्यंत मी बांसरी वाजवली.
8 नोव्हेम्बर 2016. आज भारतात 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा रद्द झाल्याची बातमी आली. संध्याकाळी मुलगी कामावरून आल्यावर चर्चा झाली. काळजी करण्याचं कारण नव्हतं. ट्रम्प जिंकत असल्याची बातमीही कळली.
11 नोव्हेम्बर 2016. आज माझे दांत दुखू लागले.
12 नोव्हेम्बर 2016. सकाळी दांतदुखी सुरू झाली. मुलीने व हिने माझ्यासाठी औषध आणलं. ढोकळा आणला. मी थोडा खाल्ला. दुपारी मी कॉंबिफ्लान घेऊन झोपलो. मुलीने जाट नांवाचा सिनेमा लावला. दांतदुखी निवळली. रात्री पुन्हा कॉंम्बिफ्लान घेऊन झोपलो.
13 नोव्हेम्बर 2016. हिने न्याहारीत कॉर्न फ्लेक्स दिले. गॅसचा त्रास होऊ लागला. मुलीकडून मी पुदीन हराचा डोस मागून घेतला. हिने माझ्या आवडीची साबुदाण्याची कंजी बनवली. छान लागली. मोबाईलवर विल्सन चर्चिल या चौकात चार गाड्यांची टक्कर असा मेसेज आला. मुलीला एस एम एस करून विचारलं. ती सुखरूप असं कळलं. ती लवकर आली. काळजी. मिटली.
14 नोव्हेंबर 2016. मुलीने आज माझ्यासाठी डेंटिस्टची अपॉईंटमेंट घेतली. दुपारी 12 वाजता तपासणी झाली. त्यावर इलाज ठरेना. पुन्हा दुसरी टेस्ट झाली. मुलीच्या दाताची सुद्धा ट्रीटमेंट झाली.
15 नोव्हेंबर 2016. आज दांतदुखी निवळली होती म्हणून हिने बनवलेल्या चपात्या, वांग्याच्या भाजीबरोबर आवडीने खाल्ल्या. दांतदुखीमुळे मी मध्यरात्री कंबिफ्लान घेऊन झोपलो.
16 नोव्हेम्बर 2016. मुलीने डेण्टिस्टकडे नेलं. लॅबमध्ये माझ्या जबड्याचं माप घेऊन झालं. दुपारच्या जेवणात कवळी नसल्यामुळे मला नीट जेवता आलं नाही.
17 नोव्हेंबर 2016. आज मुलीने मला माझ्या दांताच्या ट्रीटमेण्टकरता नेलं. दुखणारे दोन दांत काढून झाले. नवी कवळी बसली. त्याकरता 700 डॉलर्स इतका खर्च येणार असं ही म्हणाली. मुलीने नंतर खुलासा केला. 124 डॉलर्स इतका खर्च आला होता. डेण्टिस्ट एक सिंधी बाई- स्वाती अजवानी- चांगली वाटली. मुलीच्या ओळखीची. दुपारच्या जेवणात मला कालवलेला दहींभात मिळाला.
18 ऩोव्हेंबर 2016. दांताचं दुखणं हळूं हळूं निवळलं.
23 नोव्हेंबर 2016. मुलगी कामावरून उशीरा आली. रात्री साडेदहा वाजतां तिने बाहेर जमा झालेला बर्फ दाखवला. या सीझनमधला पहिला बर्फ !!
25 नोव्हेंबर 2016. आज नातीच्या शाळेत तिने लिहीलेल्या नाटकाचा प्रयोग झाला. तो फार चांगला झाला असं कळलं.
मला मुलीने डॉक्टरकडे नेलं. तपासून झालं. त्याने मला भारतात गेल्यावर अल्ट्रा साऊंड टेस्ट करून घ्यायचा सल्ला दिला. आज हिने पुरी-भाजी बनवली. छान लागली.
गिरीश, (महेशचा धाकटा भाऊ) त्याच्या दोन जुळ्या मुली, त्याची बायको रश्मी असे क्लीवलॅंडहून आले. त्यानंतर उषा, रवी, आदित्य. आर्यन, कविता, कृष्णा असे आले. रात्री खूप उशीरा पाहुणे निघून गेले. मला झोपेतून उठवून मुलीने आणि नातीने या सीझनचा बर्फश्राव दाखवला.
रात्री ऐन बर्फात मुलगी कामावरून आली. मुलीने आणि नातीने बर्फ साफ करून गाडीला वाट करून दिली. ऐन बर्फात ही व मुलगी खरेदीला जाऊन आल्या. खमण ढोकळा खायला मिळाला.
मुलीने ब्रेडचा उपमा बनवला. भर बर्फमय भागातून मुलीने आम्हाला खरेदीला नेलं. मजा वाटली. ढोकळा खायला मिळाला.
24 डिसेंबर 2016. आज ख्रिसमस ईव्ह म्हणून मुलीने सुट्ठी घेतली होती. साफसफाई सजावट झाली. संध्याकाळी पाहुणे मंडळी जमली. सायरस आणि परीवार, रीटा आणि परीवार, मर्फी वगैरे. एकदा पाव्हण्यांचं खान पान झालं. रात्री 12 च्या सुमारांस आम्ही मेर्री ख्रिसमस साजरा केला.
25 डिसेंबर 2016. आज मुलगी घरीच असल्यामुळे वेळ बरा गेला.
31 डिसेंबर 2016. आज सायरसकडे पार्टी झाली, इडली-सांबार, डोसा-चटणी आणि आईसक्रीम आसा बेत झाला.
1 जानेवारी 2017. नव्या वर्षाची सुरुवात चांगली झाली.
6 जानेवारी 2017. संध्याकाळी जया (सायरसची बायको) आणि तिची मुलगी -दक्षा आल्या. भेळची मेजवानी झाली.
11 जानेवारी 2017. आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. मुलीने व हिने सामानांची बांधाबांध आघीच केली होती. सायरसने आम्हाला आपल्या गाडीने विमानतळावर आणलं. मुलीने चेक-इन करून दिलं. निरोप घेतांना तिला हुंदका आवरला नाही. अश्रूपूर्ण नेत्राने तिने आम्हाला निरोप दिला.
13 जानेवारी 2017 पहांटे आम्ही आमच्या वृद्धाश्रमात परतलो.
— अनिल शर्मा