संध्याकाळचे फिरणे झाल्यानंतर शेजारच्या बागेत जावून शांत बसणे हे नित्याचे झाले होते. एक प्रकारचा आनंद व समाधान मनाला त्यामुळे लाभत असे. शांत झोप मिळण्यासाठी ते गरजेचे वाटत होते.
एक गोष्ट माझ्या दररोज बधण्यात येवू लागली होती. एक वयस्कर गृहस्थ नियमीत त्याच वेळी मला बागेत दिसत होते. ते सहसा कुणाशी बोलत नसत. एकटेच शांत बसून बागेतल्या गवतातील दुर्वा काढीत असत. पिशवीत एक दोऱ्याचे रिळ असे. जमविलेल्या दुर्वांची ते जुडी बांधून ती त्या पिशवीत टाकीत असत. जवळ जवळ एक तास पर्यंत दुर्वा काढणे, जुड्या बांधणे व जमा करणे हाच कार्यक्रम ते करीत असल्याचे दिसून येत होते. कदाचित् २१, ५१, वा १०१ दुर्वांच्या जुड्या ते बांधीत असावेत. पुजेमधला मिळणारा आनंद घेण्याचा त्यांचा तो प्रयत्न असावा. हा माझा अंदाज होता. पण मी त्याना तसे कांही विचारले नाही.
एक दिवस अचानक त्यानी दुर्वा काढण्याचे थांबवून, ते माझ्याच शेजारी बाकावर येवून बसले. पिशवीतून पाण्याची बाटली काढून ते पाणी प्याले. मला त्यांचा परिचय करुन घेण्याचा अवसर मिळाला होता. ” आपली प्रकृती तर बरी आहे ना ? ” मी विचारणा केली.
” हां, ठिक आहे. किंचीत् थकवा वाटला, म्हणून बसलो. ह्या वयांत सारे कांही अनिश्चीत. पाणी प्यालो. आता थोडी हूरहुरी वाटते. ” ते माझ्याशी मोकळेपणाने बोलू लागले. ते एक वरिष्ठ निवृत्त शासकिय अधिकारी होते. छोटे कुटुंब. मुलीकडे रहात होते. फक्त दोन मुली त्यांना. एक परदेशांत स्थायीक झालेली. आनंदी व समाधानी वृत्तीने जीवन क्रम चालू होता. चौकस बुद्धी म्हणून मी त्याना त्यांच्या नियमीत दुर्वांच्या जुड्या जमाकरण्या बद्दल विचारणा केली.
ते हसले. “खर सांगू. ह्या दुर्वा खोडणे, जमा करणे, त्याची जुडी बांधणे आणि अशा अनेक जुड्या पिशवीत जमा करणे हे सारे मी केवळ आनंदासाठी, समाधानासाठी करीत असतो. माझे वय सध्या ८० च्या पुढे गेलेले आहे. प्रकृति सध्यातरी टिकवून आहे. त्यामुळे शरिराच्या हलचाली व्यवस्थित व ताब्यात असलेल्या आहेत. फक्त ईश्वरी नामस्मरण करतो. चिंतन करतो. ध्यान करतो. कोणतेही कर्मकांड करीत नाही. पुजाअर्चा ह्यांत मन केव्हांच रमले नाही. म्हणून ती करीत नसतो. मनाला पटले वा भावले तेच करत गेलो. कुणी सांगतो, सुचवितो म्हणून अथवा पुस्तकांत वा कोणत्यातरी ग्रंथात मार्गदर्शन आहे म्हणून मी ते मान्य करीत नाही. हां ! ह्या दुर्वांच्या जुड्या कशासाठी ? हे सारे फक्त मानसिक समाधानासाठीच आहे. सर्व दुर्वा अंदाजाने मी जमवून त्याची जुडी बांधतो. त्याकडे माझे लक्ष नसते. त्या गणरायाचे मात्र सतत नामस्मरण चालू ठेवतो. ह्या साऱ्या जुड्या मी मंदिराशेजारच्या फुलवाल्याला देत असतो. तो मला त्याचे दहा रुपये देतो. बस. श्रमाच्या पैशाचा मिळणारा आनंद हा कांही वेगळाच असतो, नव्हे काय ? मंदिरा शेजारी कांही भिकारी बसलेले असतात. ते पैसे मी त्याना देवून टाकतो. त्या भिकाऱ्याची गरज, ही त्या क्षणी माझ्या आनंदाचा, समाधानाचा मार्ग निर्माण करणारी असते. ह्य़ातच माझ्या मनाची शांतता दडलेली आहे. त्याच शांततेच्या शोधांत मी उर्वरीत जीवन व्यतीत करतो. ”
एका छोट्याशा प्रसंगातून, एक रोमांचकारी भावनिक आणि जीवनाच्या महान तत्वज्ञानाचे विवरण मी त्या गृहस्थाकडून ऐकत होतो. त्यानी जे सांगीतले, त्यानी मी भारावून गेलो. जीवन म्हणजे काय ? जगायचे कसे व कां हे त्यानी जाणले असावे, हे मला उमगले. मी उठून त्याना अभिवादन केले. त्यांच्या चरणाला स्पर्ष केला.
— डॉ. भगवान नागापूरकर
४००५०७९८५०
Leave a Reply