सह्याद्रिशीर्षे विमले वसन्तं गोदावरीतीरपवित्रदेशे ।
यद्दर्शनात्पातकमाशु नाशं प्रयाति तं त्र्यम्बकमीशमीडे ।।१०।।
भारतीय संस्कृतीचे सगळ्या विश्वाला आश्चर्यचकित करणारे वैशिष्ट्य असणाऱ्या, सिंहस्थ कुंभमेळ्याची महापर्वस्थान स्वरूपात विश्वविख्यात असणारी नगरी म्हणजे श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर. दिगंबर निर्वाणी आणि निर्मोही अशा तीन आखाड्यांच्याद्वारे सूर्याचा सिंह राशीतील भ्रमण काळात या महा कुंभाचे आयोजन केले जाते.
श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे शैवपंथाचा तर श्रीक्षेत्र नाशिक येथे वैष्णव संप्रदायाचा सिंहस्थ पर्वकाळ साजरा केला जातो.
गोदावरीचे उगमस्थान, संत शिरोमणी निवृत्तीनाथांची समाधी ही या क्षेत्राची आणखी वैशिष्ट्ये.
कालसर्प शांती साठी, नागबली ,नारायण बलीसाठी जगात त्र्यंबकेश्वर विख्यात आहे.
दहाव्या शतकात शिलाहार वंशातील झंझ राजाने गोदावरी ते भीमा बारा नद्यांच्या उगमस्थानावर शिव मंदिराची उभारणी केली त्यापैकी हे प्रथम स्थान.
येथे शिवपिंडी च्या जागी तीन उंचवटे असल्याने ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे एकत्रित निवासस्थान असे अद्भुत महात्म्य या स्थानाला प्राप्त झाले आहे.
भगवान रामचंद्र यांची कर्मभूमी असणार्या नाशिकच्या जवळ असणाऱ्या या क्षेत्राचे वर्णन करताना आचार्यश्री म्हणतात,
सह्याद्रिशीर्षे विमले वसंतम् – सह्य पर्वताच्या परमशुद्ध, निर्मल शिखरावर निवास करणाऱ्या,
गोदावरीतीरपवित्रदेशे – गोदावरी नदीच्या तीरावरील पवित्र प्रदेशात,
यद्दर्शनात्पातकमाशु नाशं प्रयाति – ज्यांच्या दर्शनाने सगळी पातके तत्काळ दूर होतात,
तं त्र्यम्बकमीशमीडे – त्या भगवान त्र्यंबकांना मी पूजितो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply