इलापुरे रम्यविशालकेsस्मिन समुल्लसन्तं च जगद्वरेण्यम ।
वन्दे महोदारतरस्वभावं घृष्णेश्वराख्यं शरणं प्रपद्ये ।।१२।।
शिवपुराण, स्कंदपुराण, रामायण महाभारत अशा प्राचीन ग्रंथात विशेष वर्णन केलेले भगवान शंकरांचे ज्योतिर्लिंग स्थान म्हणजे श्रीक्षेत्र घृष्णेश्वर.
येलगंगा नदीच्या किनाऱ्यावर असल्यामुळे या स्थळाला येलापुर असे नाव आहे. त्याचा अपभ्रंश इलापुर,ऐलापुर, एलोरा करत वेरुळ पर्यंत आला.
आज कैलास आणि इतर लेण्यांमुळे विश्वविख्यात असलेला हा प्रांत.
सुधर्मा नावाच्या ब्राह्मणाच्या घुष्णा नामक पत्नी अत्यंत निस्सीम शिवभक्त होती.
ती नित्य शंभर शिवलिंगांचे पूजन करीत असे. तिच्या या वैशिष्ट्यपूर्ण व्रताने संतुष्ट होऊन तिला दर्शन देण्यासाठी आलेले भगवान येथे तिच्या नावाला आपल्या नावात धारण करून, श्रीघृष्णेश्वर या नावानेच येथे विराजमान आहेत.
हिंदुहृदय सम्राट छत्रपती शिवरायांचे आजोबा श्रीमंत मालोजीराजे भोसले यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनीही जीर्णोद्धार केला असा येथील इतिहास.
याचे वैभव वर्णन करताना आचार्यश्री म्हणतात,
इलापुरे रम्यविशालकेsस्मिन् – या रम्य आणि विशाल अशा इलापुरामध्ये, समुल्लसन्तं च जगद्वरेण्यम – निवास करणाऱ्या जगातील सर्वश्रेष्ठ अशा,
वन्दे महोदारतरस्वभावं – महान उदार असा स्वभाव असणाऱ्या,
त्यामुळेच घृष्णेला तिचा गमावलेला पुत्र परत करणाऱ्या, तसेच शरण आलेल्या भक्तांच्या सकल मनोकामना पूर्ण करणाऱ्या,
घृष्णेश्वराख्यं शरणं प्रपद्ये – भगवान श्रीघृष्णेश्वरांना मी शरण जाऊन वंदन करतो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply