अवन्तिकायां विहितावतारंमुक्तिप्रदानाय च सज्जनानाम ।
अकालमृत्यो: परिरक्षणार्थं वन्दे महाकालमहासुरेशम ।।३।।
आपल्या विश्व प्रसिद्ध असणाऱ्या मेघदूतम् नावाच्या काव्यात महाकवी कालिदास यांनी ज्या नगरीचे वर्णन करताना, वाट वाकडी करावी लागली तरी चालेल पण या नगरीला निश्चित जा. कारण ही सामान्य नगरी नाही. हा पृथ्वीवरील स्वर्गच आहे. कसा? तर
स्वर्गात राहणाऱ्या समस्त पुण्यवंतांनी त्या स्वर्गीय वातावरणाची सवय झाल्यामुळे, आपल्या पुण्याचा उरलेला भाग स्वर्गपतींना देऊन त्याबदल्यात स्वर्गाचा एक छोटासा तुकडा मागितला. तो पृथ्वीवर आणून त्यांनी जेथे ठेवला, या स्थानाला अवंतिका पुरी असे म्हणतात. असे अभूतपूर्व रोमांचक वर्णन केले त्या नगरीला सध्या आपण उज्जैन म्हणून ओळखतो.
तेथे निवास करणारे भगवान श्रीशंकर श्री महाकाल या रूपामध्ये पूजिले जातात.
सकल विनाशक काळावर त्यांची सत्ता चालते.त्यामुळे त्यांना महाकाल असे म्हणतात.
काल अर्थात मृत्यू. त्याचे भय सगळ्यात मोठे. या स्थानी भगवान शंकराची उपासना केल्यानंतर अचानक येणाऱ्या मृत्यूचे, अर्थात अकाली मृत्यूचे भय राहत नाही. मृत्यू तर अनिवार्य आहे. पण ज्या शिवकृपेने त्याचे भय नष्ट होते ते भगवान महाकाल.
त्या भगवान महाकाला चे वर्णन करताना आचार्यश्री म्हणतात,
अवन्तिकायां विहितावतारंमुक्तिप्रदानाय च सज्जनानाम ।
सज्जनांना मुक्ती प्रदान करण्यासाठी अवंतिका नगरी मध्ये ज्यांनी अवतार धारण केला, आपला निवास करून आपले स्थान तयार केले,
अकालमृत्यो: परिरक्षणार्थं वन्दे महाकालमहासुरेशम ।।
त्या भगवान महाकाल शंकरांना अकाल मृत्युच्या दुःखातून वाचवण्यासाठी मी वंदन करतो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply