कावेरिकानर्मदयो: पवित्रे समागमे सज्जनतारणाय ।
सदैव मान्धातृपुरे वसन्तमोंकारमीशं शिवमेकमीडे ।।४।।
देवांचे खजिनदार असणाऱ्या भगवान कुबेरांनी भगवान श्री शंकराची उपासना केल्यानंतर त्यांच्या आनंदा करता भगवान शंकरांनी निर्माण केलेला जलप्रवाह म्हणजे नर्मदेची उपनदी कावेरी.
या कावेरी आणि नर्मदेच्या संगमावर असलेले श्री क्षेत्र म्हणजे श्री ओंकार मांधाता.
हे जसे भगवान कुबेरांचे तपस्यास्थान तसेच श्री मांधाता यांचे पण तपस्या स्थान.
इक्ष्वाकू वंशात झालेल्या युवनाश्व नावाच्या राजाच्या पोटी, पुरुषाच्या पोटी जन्मलेला जगातला प्रथम मानव रुपात पुराणांमध्ये वर्णन केल्या गेलेले दिव्य चरित्र मांधाता.
देवराज इंद्राने आपल्या करंगळीतील अमृताने ज्याला अमृतपान घडविले असा हा महापुरुष.
त्यांच्याच नावावर या क्षेत्राला ओंकार मांधाता असे संबोधिले जाते.
या एकाच मंदिरात पाच मजल्यांवर अनुक्रमे ओमकारेश्वर, महाकालेश्वर, सिद्धनाथेश्वर, गुप्तेश्वर आणि ध्वजेश्वर अशी पाच शिवलिंगे या मंदिरात आहेत.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या उपासनेचे हे अधिष्ठान. त्यांनी येथे कोट्यावधी शिवलिंगांचे आराधन केले. त्यांनी सुरु केलेली पार्थिव लिंग अर्चनाची पद्धती आजही इथे प्रचलित आहे.
अशा या वैशिष्ट्यपूर्ण ज्योतिर्लिंग स्थानावरील
या शिवलिंगाचे महत्त्व गातांना जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात,
कावेरिकानर्मदयो: पवित्रे समागमे सज्जनतारणाय ।
कावेरी आणि नर्मदा नदीच्या पवित्र संगमावर सज्जनांच्या उद्धारासाठी,
सदैव मान्धातृपुरे वसन्तमोंकारमीशं शिवमेकमीडे – सदैव मांधातृ पुरात निवास करणाऱ्या भगवान शंकरांची आराधना करतो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply