पूर्वोत्तरे प्रज्वलिकानिधाने सदा वसन्तं गिरिजासमेतम ।
सुरासुराराधितपादपद्मं श्रीवैद्यनाथं तमहं नमामि ।।५।।
“जवा आगळं काशी” अर्थात काशी पेक्षा देखील एक जव भर अधिक महत्त्व असलेले स्थान म्हणून प्रसिद्ध असलेले महाराष्ट्र स्थित ज्योतिर्लिंग म्हणजे भगवान परळी वैजनाथ.
कांतीपुरम्, वैजयंतीपुर, जयंती क्षेत्र ,प्रभाकर क्षेत्र अशा नावांनी संस्कृत ग्रंथात वर्णित असणाऱ्या या क्षेत्राचे अनेक वैशिष्ट्ये आहेत.
यादव काळातील प्रधान हेमाद्रीपंत यांनी उभारलेले हे मंदिर. त्यांनी निर्माण केलेल्या शैलीला हेमाद्रीपंती शैली असे म्हणतात. त्याचा अपभ्रंश पुढे हेमाडपंथी असे झाला.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. भव्य सभागृह, परकोट, पायर्या इत्यादी बांधल्या.
सामान्यता शिवमंदिर सभामंडप पेक्षा खोल असते मात्र येथे समतल रचना असल्याने सभामंडपातून थेट दर्शन होते.
येथे भगवान शंकर सहपरिवार निवास करतात.
येथे भगवान शंकरांनी वैद्यकशास्त्राचे ज्ञान जगाला दिल्यामुळे त्यांचे नाव वैद्यनाथ असे आहे. पुढे त्याचा अपभ्रंश वैजनाथ असा झाला.
भव्य सभागृह, लांबच लांब दगडी पायऱ्या, नजरेत भरणारा परकोट या मंदिराची वैशिष्ट्ये.
चैत्र पौर्णिमा आणि अश्विन पौर्णिमेला सूर्यकिरणे थेट भगवान वैजनाथच्या ज्योतिर्लिंगला स्पर्श करतात हे आणखीन एक वैशिष्ट्य.
अशा या महाराष्ट्र स्थित ज्योतिर्लिंगाचे वैभव सांगतांना आचार्य श्री म्हणतात,
पूर्वोत्तरे – पूर्व उत्तर अर्थात ईशान्य दिशा ही भगवान शंकरांची दिशा वर्णिलेली आहे. वास्तुशास्त्रातही त्यांचे स्थान तेथे वर्णिले आहे.
प्रज्वलिकानिधाने – प्रज्वलिका अर्थात पेटलेली चिता. तिचे स्थान अर्थात स्मशान.
सदा वसन्तं – तेथे सदैव निवास करणारे. गिरिजासमेतम – आई जगदंबा पार्वती यांच्या समवेत आहे असे.
सुरासुराराधितपादपद्मं – सुर म्हणजे देवतां आणि असुर म्हणजे राक्षस यांनी चरणकमलांची सेवा केलेल्या
श्रीवैद्यनाथं तमहं नमामि – त्या भगवान वैद्यनाथांना मी नमस्कार करतो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply