सुताम्रपर्णीजलराशियोगे निबध्य सेतुं विशिखैरसंख्यै: ।
श्रीरामचन्द्रेण समर्पितं तं रामेश्वराख्यं नियतं नमामि ।।९।।
भगवान श्रीरामचंद्रांनी लंकेवर चढाई करण्यापूर्वी सेतुबंधासाठी आणि लंका विजयासाठी विशेष अनुष्ठान स्वरूपात ज्या स्थानाची निर्मिती केली ते लोकोत्तर स्थान म्हणजे श्रीक्षेत्र रामेश्वर.
येथे क्षेत्राचे नावही रामेश्वर आहे. भगवंताचे देखील नाव रामेश्वरच आहे.
मोठा सुंदर आहे हा शब्द. रामेश्वर शब्दाचा अर्थ सांगताना भगवान राम म्हणतात रामाचा जो ईश्वर तो रामेश्वर. पण गंमत म्हणजे त्याच वेळी देवी पार्वतीला भगवान शंकर म्हणतात राम ज्याचा ईश्वर तो रामेश्वर.
शैव आणि वैष्णव संप्रदायाच्या अशा एकात्मतेचे प्रतीक आहे, श्रीक्षेत्र रामेश्वर.
ताम्रपर्णी नदीचा समुद्राशी संगम होणाऱ्या पवित्र स्थानावर दक्षिणकाशी रूपात हे स्थान विराजमान आहे.
विश्वातील सगळ्यात मोठा प्रदक्षिणामार्ग असणाऱ्या या स्थानाचे वर्णन करताना आचार्य श्री म्हणतात,
सुताम्रपर्णीजलराशियोगे – ताम्रपर्णी आणि समुद्राच्या संगमावर,
निबध्य सेतुं विशिखैरसंख्यै: – अनेक पाषाणांच्या द्वारे सेतू निर्माण करून,
येथे आचार्य श्री विशिख असा विशेष शब्द वापरतात. शिखा म्हणजे टोक. टोकदार नसलेले गुळगुळीत दगड, वापरून सेतु ची निर्मिती झाली. त्यावरून चालत जाण्या करतात ते उपयोगी होते हा बारकावा आचार्य श्री सहज सुचवतात.
श्रीरामचन्द्रेण समर्पितं तं – श्रीरामचंद्रांनी ज्यांना समर्पित केला. अर्थात या कर्माचे फळ ज्या भगवंताला दिले. ज्यांच्या कृपेमुळे हे शक्य झाले असे म्हणून आपल्या कर्माचे फळ ज्या भगवंताच्या चरणी समर्पित केले
रामेश्वराख्यं नियतं नमामि – त्या श्री रामेश्वरांना मी सदैव वंदन करतो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply