आपल्या मराठी साहित्यामध्ये अनेक वेळा वेगवेगळ्या प्रकारचे शब्द आपणांस वाचायला मिळतात. असे शब्द आपण बोलतो तेव्हा त्यामधून कधी कधी दोन अर्थ निघतात. एका वाक्यात ठराविक ठिकाणी स्वल्पविराम चिन्ह लिहीलं नाही तर गोंधळ उडतो. सरकारी कार्यालयांत, जिन्यांमध्ये किंवा ठळक भागावर सूचना लिहिलेल्या असतात. उदा. “येथे थुंकू नये”. हेच वाक्य “येथे थुंकून ये”. असा फक्त अक्षर लिहिण्यात गोंधळ झाला तर पूर्ण वाक्याचा अर्थ बदलला जाऊन, एखादा विनोद तयार होतो.
काही वेळा बोलण्यातून एखादा जरी शब्द चुकीचा गेला तरी अनर्थ घडतो. कोणीतरी एका कविने लिहीलं आहे, “शब्दांना दात नसतात, परंतु शब्द ज्यावेळी चावतात, त्यावेळी माणसांच्या हृदयावरील घाव भरुन निघत नाहीत आणि अशा शब्दाचे घाव इतके खोलवर असतात की, माणसाचे जीवन संपून जाते. परंतु शब्दांनी झालेले घाव भरुन निघत नाहीत.’
शब्द.. हे शब्द असतात, त्यांना हात व पाय नसतात. परंतु एका शब्दाने शंभर घाव होतात. तर दुसऱ्या शब्दाने दुःखावर हळुवार फुंकर घालता येते. शब्दामधील कठोरता परमेश्वराला सुध्दा मान्य नाही. म्हणून जीभ प्राणी मात्रांना जन्मल्यापासून आहे आणि मरेपर्यंत शिल्लक असते. परंतु दात कठोर असतात म्हणून ते प्राणीमात्रांला जन्मल्यानंतर येतात आणि मृत्यूपूर्वी पडूनही ते
जातात. पण वैशिष्ठ्य असं आहे, दाताने चावून झालेली जखम भरुन येते. परंतु जीभेने चावलेल्या जखमेची आठवण कायम राहते.
मित्रांनो, शब्द प्रपंच खूप मोठा आहे आणि मी इतका तज्ञ नाही की, शब्दांचे भांडार खोलून तुमच्यापुढे उघडून ठेवू, पण शब्द गंधाचा फुलोरा प्रत्येक शब्दांनी फुलत असतो. एखाद्या शब्दाने वातावरण स्वच्छंदी होते तर त्याच शब्दांनी वातावरण दुषीत होऊन माणूस एक दुसऱ्यापासून शरीराने व मनाने खूप दूर जातो. म्हणून शब्दांचा वापर असा करावा की, आपल्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द फुलासारखा असावा. ज्यामुळे त्या शब्दफुलांची जागा परमेश्वराच्या चरणावर असावी किंवा माणसांच्या हृदयावर कोरली जावीत.
आम्ही उठल्यापासून ते रात्री अंथरुणावर आडवे होईपर्यंत किती शब्दप्रयोग करतो, त्याचा विचारच करीत नाही. आज कितीतरी लोक शब्दांच्या जोरावर बोलण्याने जग जिंकतात. साधू संतांच्या वाणीतून बाहेर पडणाऱ्या शब्दांमधील गोडवा तर सर्व समाजाची मानसिकता बदलू शकतो, इतकी प्रचंड ताकद ह्या शब्दांत दडलेली असते.
आम्हा पोलिसांना तर रात्रंदिन अनेक प्रकारच्या लोकांच्या शब्दांना सामोरे जावे लागते. प्रत्येक येणारा नागरिक वेगळा, त्याचे शब्द वेगळे आणि त्या शब्दांचा अर्थ वेगळा असतो. काही शब्द, वाक्य यांनी हृदय हेलावून टाकणारी घटना समोर येते. तर काही शब्दांनी हलका-फुलका विनोद होऊन वातावरणातील गंभीरता नष्ट होऊन थोडा वेळ मनोरंजनही होऊन जात असते.
काही वेळा असे शब्द ऐकायला किंवा वाचनात येतात की, त्याचा अर्थ पूर्ण शब्दकोषात कुठेच सापडत नाही. पण त्याच शब्दाने मनाची अस्वस्थता वाढते. असे अनेक शब्द असतात. त्यांचे अर्थ दोन निघतात.
आपल्या मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक महान हिरो होउन गेला, तो म्हणजे कै. श्री. दादा कोंडके. दादा प्रत्येक सिनेमात प्रत्येक वाक्यात असे शब्द प्रयोग करत असत की, त्या शब्दातून वेगवेगळे अर्थ निघून लोकांचं मनोरंजन व्हायचं. दादा गेले आणि द्विअर्थी शब्दांची मजाच निघून गेली.
सध्या काही ठिकाणी असे शब्द ऐकायला मिळतात, परंतु त्यामधून इतकं मनोरंजन होत नाही. शब्द म्हणा किंवा वाक्य म्हणा काही वेळा इतके गैरसमज होतात की, मग त्यामधून वाद विवाद, भांडणतंटा होतो. कधी हा वादविवाद आपसांत समझोता होऊन जागीच मिटवला जातो. तर कधी कधी या गैरसमजातून मैत्री तुटते. नातेवाईक दुरावतात व आयुष्याचे एक दुसऱ्यांचे संबंध बिघडतात. तर कधी कधी हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहचतं आणि मग सुरु होते एक कायदेशीर लढाई. कायदेशीर प्रक्रिया करीत असतांना मग द्विअर्थी शब्दामुळे पोलिसांसमोर सुध्दा अडचणी निर्माण होतात आणि त्यावेळी पोलिसांची तारेवरची कसरत सुरु होते. दोन्ही पक्षकारांचं सर्वांना समजावून सांगून तर काही वेळा प्रबोधन करुन त्यांचे गैरसमज दूर करावे लागतात.
असाच एक किस्सा मी आपणांस सांगणार आहे. तसा मी गांव सोडून शहरात गेली ३५ वर्षांपासून राहत आहे आणि जवळ जवळ ३४ वर्षे पोलीस खात्यात काम करीत आहे. अनेक वेळा कामानिमित्त आम्हा पोलिसांना महाराष्ट्रातच नाही तर भारतभर भ्रमंती करावी लागते. अशी भ्रमंती करीत असतांना अनेक प्रकारचे लोक भेटले. त्या त्या प्रदेशातले रिती-रिवाज, बोली भाषा, प्रांतवार वेषभूषा पहायला मिळाल्या. अनेक प्रकारचे लोक पहायला मिळाले, त्यांचे अनुभव ऐकायला मिळाले. अनेक गुन्हेगार सुध्दा प्रांताप्रांतात फिरुन शोधले. त्यांची माहिती घेतांना प्रत्येक गुन्हेगाराची गुन्हा गाराची गुन्हा करण्याची पध्दत, त्याच्या सवयी पहायला मिळाल्या. वरील सर्व ठिकाणी फिरतांना प्रांतातील लोकांची माहिती घेतांना त्यांच्या भाषेची माहिती मिळाली. त्यांची बोलीभाषा ऐकायला मिळाली. त्यांच्या बोलीभाषेतून अनेक शब्दांचं आकलन झालं आणि मला सुध्दा नवीन शब्द ऐकायला, वाचायला मिळाल्यामुळे माझ्याकडे सुध्दा शब्द भांडार तयार झाले आहे.
तर अशा ह्या माझ्या पोलीस खात्याच्या व्यस्त कामातून वर्षातून चार दोन वेळा मी रजेवर गावी जात असतो. अलिकडच्या दहा वर्षाच्या काळात गावी जातांना एस. टी. किंवा रेल्वेचा प्रवास फार कमी होतो. स्वत:च्या गाडीने जातो आणि येतो. वेळ कमी असतो, रजा मर्यादित असल्यामुळे कमी कालावधीत जास्त कामं करावी लागतात. अनेक नातेवाईकांना भेटायला जावे लागते.
अशा वेळी गाडी असली म्हणजे वेळेची बचत होते. कमी वेळात जास्तीत जास्त लोकांना भेटण्याचा आनंद घेता येतो.
साधारण वीसएक वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मी असाच एका शहरामध्ये गेलो होतो. सिटी बस मधून प्रवास चालू होता, रात्रीचे नऊ साडेनऊ वाजले असतील, तशी बसमध्ये गर्दी बऱ्यापैकी होती. मुंबई शहर सोडले तर इतर शहरांत किंवा खेडे भागांत रात्रीचे नऊ साडेनऊ वाजण्याची वेळ म्हणजे खूप रात्र किंवा खूप उशिर झालेला वाटत असे. काही काही वेळा त्या काळात रात्री दहा नंतर बससेवा बंद होत असे. त्यामुळे बसमध्ये बऱ्यापैकी गर्दी होती. बसमधील प्रवासी मिळेल त्या आसनावर बसत होते. काही उभे राहून बसण्यासाठी जागा मिळते का याकडे लक्ष ठेवून होते. काही आपआपसांत बोलत होते. तर काही जण शांतपणे आपल्या गंतव्यस्थानाची वाट पहात होते. त्यावेळी कंन्डक्टर हातातील तिकीटाच्या बॉक्सवर तिकीट पंच करण्यांच्या मशिनने आपटून किंवा पंच मशिन हातात कटकट वाजवून तोंडाने “तिकीट तिकीट” ओरडत प्रवाशांना तिकीटे देत होता. कोणाकडे सुट्टे पैसे नव्हते म्हणून कन्डक्टर वाद घालत होता. तर दुसरीकडे प्रवासी तिकीटासाठी कंडक्टरशी वाद घालत होते.
कोणत्याही प्रवासात कोणी कोणाचा नसतो. “दोन घडीचा डाव, याला जीवन ऐसे नांव” या कवितेतील वाक्याप्रमाणे जो तो आपल्या आपल्या कामासाठी पुढे जात असतो. तास दोन तास तर काही क्षणीक वेळेसाठी प्रवासात सहप्रवाशांची ओळख होते. काही ओळखी जीवनात कायम साथ देतात तर काही प्रवास संपताच विसरुन मनुष्यप्राणी आपल्या पुढच्या कामाला लागतो. हा एक निसर्गनियम आहे. मी बसमध्ये बसल्याबसल्या माझे विचारचक्र सुरु झालं होतं. बस धावत होती आणि माझं मन त्यापेक्षा जास्त वेगाने जीवनाचे अनेक कंगोरे धुंडाळत पळत होतं.
अचानक बसमध्ये मागील बाजूस भांडणाचा आवाज आला. त्यामुळे माझी तंद्री भंगली. कंडक्टर आणि एक सहस्थ अंगात काळा कोट, हातात बॅग, डोळ्यावर चष्मा, साधारण पन्नाशी ओलांडलेले रागाने बडबडत होते. कंन्डक्टरही त्यांच्याशी वाद घालत होता. शब्दाने शब्द वाढत गेला.
कन्डक्टर त्यांच्याशी बोलत असतांना बसमध्ये इतर प्रवाशांचा आवाज, बसचा आवाज यामध्ये त्या दोघांमधील संभाषण निट एकू येत नव्हते. पण ते सदगृहस्थ खूप संतापून,
“कोण दारु प्यायले आहे? मला तुम्ही ‘दारु प्यायलास काय? असं का म्हणालात? ” असं विचारत होतं.
“अहो साहेब, मी कसा बोलेन तुम्हांला असं वेडंवाकडं”? कंडक्टर आपली बाजू मांडत होता.
ते आता खूप संतापले होते. त्यांनी सिटवरून उठून रागाने बसची घंटी वाजविली. तशी ड्रायव्हरने गाडी थांबिवली. आता बसमध्ये गोंधळ वाढला होता. काही लोक त्यांना समजावत होते, काही लोक कंन्डक्टरला समजावत होते. परंतु ते दोघेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. शेवटी मी माझ्या सिटवरुन पाठीमागे गेलो. त्या व्यक्तीचं एकच म्हणणं होतं ते म्हणजे,
“हे कंडक्टर प्रवाशांबरोबर अजिबात सरळ बोलत नाहीत. मला म्हणतो, तुम्ही दारु प्यायलात का?”
मी थोडा विचारात पडलो. मी एक पोलीस अधिकारी होतो, पण ह्या वेळी साध्या कपड्यांत होतो. मी मनात विचार केला, काय माहित, रात्रीची वेळ आहे, घरी जाता दोन पेग मारलेही असतील, हा विचार चालू होता, ते गृहस्थ अधिकच चिडल्याने माझी विचारधारा तुटली.
“चला. बस घ्या पोलीस ठाण्यात. मला तुम्ही दारु प्यायला म्हणता काय? ”, ते म्हणाले.
“कंन्डक्टर, तुम्ही त्यांना असं का बोललांत? ” मी विचारलं.
“अहो साहेब, असं कसं बोलेन मी यांना, मी असं काही वेडंवाकडं बोललोच नाही.” कंन्डक्टर म्हणाला.
त्या गृहस्थाने शेवटी बस जवळच्या पोलीस ठाण्यात घेण्यास भाग पाडलं. बस मधील इतर प्रवासी वैतागले होते. तसा मी ही त्रासलो होतो, पण काय करणार. “कालाय तस्मै नमः” असं समजून आमच्या बसची वरात पोलीस ठाण्यात पोहोचली. सर्व प्रवासी खाली उतरले. समोर एक पोलीस ठाण्याची कौलारु इमारत, मोजकेच पोलीस उभे होते. मी खाली उतरलो. त्या कंन्डक्टर व गृहस्थाबरोबर पाच-दहा प्रवासी पोलीस ठाण्याच्या कंम्पाउंडमध्ये गेले. समोर एक फौजदार आपल्या बुलेटवर बसले होते. कदाचित ते घरी जावयास निघाले होते. बस मधील गर्दी पाहून ते बुलेटवर बसूनच निरीक्षण करीत होते.
ते पॅसेजंर व कंन्डक्टर अजुनही तावातावाने बोलत होते. मी त्यांच्यासोबत चालत होतो.
बुलेटवर बसलेले फौजदार खाली उतरले, बुलेट स्टॅन्डला लावून, त्या व्यक्तीकडे पाहून म्हणाले, “या, या साहेब. नमस्कार, वकील साहेब, काय प्रकार आहे? ”
“नमस्कार साहेब”. ते म्हणाले. “अहो साहेब, हा कंन्डक्टर मला म्हणतो, ‘तुम्ही दारु प्यायला आहात काय? ”
फौजदार साहेबांच्या बोलण्यावरुन ते सदगृहस्थ शहरातील एक नामांकित वकील असल्याचं मला समजलं.
“काय हो कंन्डक्टर, तुम्ही असे का बोललात वकील साहेबांना? ”
तुम्हाला काही समजतं की नाही? कोणाला काहीही बोलता? ” फौजदार म्हणाले.
“साहेब मी असं बोललोच नाही. माझी काहीच चूक नाही, तर माफी का मागायची? ” कंन्डक्टर म्हणाला.
मला त्यावेळी लोकमान्य टिळकांचं वाक्य आठवलं, “गुरूजी, मी शेंगा खाल्या नाहीत मी फोलपटं उचलणार नाही. ” त्याच आवेशात कंन्डक्टर बोलत होता.
“साहेब, मी या गृहस्थांना म्हणालो, ‘तुम्ही मला दहा रूपये दिले का?” तर हे मला म्हणाले, “दारू प्यायले का?” असं म्हणालो. साहेब मी असं कसं बोलेन प्रवाश्यांशी? ” कंन्डक्टरने आपली बाजू सफाईदारपणे मांडली होती.
ते गृहस्थ दोन्ही हात जोडत कंन्डक्टरकडे पहात म्हणाले, “धन्य झाली कंन्डक्टर तुमची, अहो, मी एवढा नामांकीत वकील असून सुध्दा तुमच्या पुढे हात जोडतो. सरळ सरळ दारू प्यायलात असं बोलून वर म्हणताय, ‘दहा रूपये दिलेत का?’ वाऽऽऽ वाऽऽऽ फौजदार साहेब काय जमाना आलाय बघा.’ ते गृहस्थ म्हणाले.
फौजदार साहेब देखिल आता विचारात पडलेले दिसत होते.
“नाही साहेब, माझ्यावर विश्वास ठेवा, मी असं बोललो नाही. ” कंन्डक्टर म्हणाला.
कंन्डक्टरने शब्दांची फिरवाफिरव केल्याचं दिसत होतं. ते गृहस्थ उठून उभे राहिले व म्हणाले “चला फौजदार साहेब येतो आम्ही.
फौजदार साहेबांनी कंन्डक्टरला थोडं समजावून सांगून, पुन्हा असं बोलू नका असा दम दिला.
प्रकरण थोडक्यावर भागलं होतं. वकिल साहेबांचा राग आता कमी झाला होता. त्यांची काही तक्रार राहिली नव्हती. सर्वजण बसमध्ये जाउन बसले.
त्यानंतर मी फौजदार साहेबांना माझी ओळख सांगितली. आम्ही दोघेही खात्यात काम करणारी माणसं होतो. कंन्डक्टरची चलाखी लक्षात आली होती. परंतु त्या ठिकाणी कायदेशिर कारवाई करण्यासारखी परिस्थिती नव्हती. परंतु या सर्व प्रकारात बस मधील प्रवासी व पोलिसांचं चांगलं मनोरंजन झालं होतं. फौजदार साहेबांना घरी जायला उशिर झाला होता आणि मलाही उशिर झाला होता. पोलिसांना नेहमीच असं एक ना अनेक कारणांमुळे घरी जाण्यास उशिर होत असतो किंवा तो त्या व्यापातून मोकळा होईपर्यंत आपलं घर विसरून गेलेला असतो.
पोलिसांना तो कर्तव्यावर असो अगर नसो, त्याच्यासमोर कोणता प्रकार घडत असेल तर, हस्तक्षेप करावाच लागतो. असं हे पोलिसाचं जीवन असतं. पण काही म्हणा, पोलिसांना अशा धावपळीच्या व दगदगीच्या जीवनातही नवीन शब्द ऐकायला मिळतात. तो पोलीस असे प्रसंग कधीही विसरु शकत नाही.
आता केव्हाही बस मधून प्रवास करण्याची वेळ आली, तर मात्र त्या कंन्डक्टरच्या वाक्याची आठवण आल्याशिवाय रहात नाही.
–व्यंकट पाटील
व्यंकट पाटील यांच्या ‘घर हरवलेला पोलीस’ या लेखसंग्रहातील हा लेख.
Leave a Reply