माणसाच्या शरीरात अनेक जिवाणू म्हणजे बॅक्टेरिया असतात. सगळेच जिवाणू हे घातक नसतात, तर काही मानवाचे मित्रही असतात. ई-कोलाय या जिवाणूचे मात्र तसे नाही. तो आरोग्यास घातक असतो, पण त्याच्या सगळ्या जाती या हानिकारक नाहीत. त्याचा शोध जर्मनीतील बालरोगतज्ज्ञ थिओडोर इशरिच यांनी १८८५ मध्ये लावला.
हा जिवाणू दंडाकार असतो. जर्मनीत काकडीमधून या जिवाणूचा संसर्ग होऊन अनेक लोक आजारी आहेत, त्यामुळे तेथे ककम्बर क्रायसेस जोरात आहे. या काकड्या स्पेनमधून आलेल्या होत्या. आता मोड आलेल्या बीन्समुळे (उसळ) हा जिवाणू पसरल्याचे सांगितले जात आहे. अनेक ठिकाणी रुग्णालये ई-कोलायबाधित रुग्णांनी भरून गेली आहेत. ई-कोलाय म्हणजे इशेरिशिया कोलाय. तो मांसामधून माणसाच्या शरीरात प्रवेश करतो, पण आता कच्च्या भाज्या सेवन केल्यानेही मानवी शरीरात जात आहे. ई-कोलाय हा जिवाणू माणसाच्या आतड्यात वास्तव्य करीत असतो.
हा जिवाणू आपण सेवन केलेले अन्न पचवण्यास मदत करीत असतो, पण ई-कोलाय जिवाणूच्या काही जाती अशा आहेत की, ज्या आतड्यातून रक्तात मिसळल्या तर जंतुसंसर्ग होऊन माणूस आजारी पडतो. यात पोटात दुखणे, उलट्या, शौचास जास्त वेळा जावे लागणे, त्यातून रक्त पडणे अशी लक्षणे दिसतात. मानवास घातक असलेल्या जिवाणूचे अस्तित्व पहिल्यांदा १९९३ मध्ये फास्ट फूड हॅम्बर्गरमध्ये सापडले. त्यानंतर २००६ मध्ये पालकाच्या भाजीत हा जिवाणू सापडला. हा जिवाणू जनावरांना जास्त संसर्ग देत असल्याने त्यांच्या मांसात त्याचे अस्तित्व असते. जर पिकांना ई-कोलायमिश्रित पाणी दिले किंवा शेणखत दिले, तर हा जिवाणू त्या उत्पादनात येण्याची शक्यता असते. उन्हाळ्यात त्याची बाधा जास्त असते.
कमी शिजवलेले मांस, प्रदूषित पाणी, पाश्चरायझेशन न केलेले दूध यातून तो पसरतो. जनावरांचा सहवासही याला कारणीभूत ठरू शकतो. यात घातक गोष्ट अशी की, हा जंतुसंसर्ग विकोपास गेला तर विष्ठेतून रक्त जाऊन शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी होते. त्याला हिमोलेटिक अॅनिमिया असे म्हणतात. थ्रॉम्बोसायटोपेनिया (कमी बिंबिका), मूत्रपिंड निकामी होणे असे प्रकारही घडू शकतात. विष्ठेची तपासणी करून ई-कोलाय जिवाणूची बाधा शोधली जाते. जंतुसंसर्ग टाळण्यासाठी स्वयंपाक करताना हात साबणाने धुवा, कच्च्या मांसाची चवही घेऊ नका. ते उच्च तापमानाला शिजवा, कच्च्या भाज्या किंवा फळे धुतल्याशिवाय खाऊ नका. कच्चे दूध कधीच पिऊ नका. फ्रिजमध्ये शिळ्या भाज्या ठेवू नका, गरम अन्न गरम व थंड अन्न थंड ठेवा.
Leave a Reply