नवीन लेखन...

ए फुलों की रानी

१९६५ साली फिल्मफेअर पुरस्कारांसाठी पाच नामांकने असलेल्या ‘आरजू’ या चित्रपटाला दुर्दैवाने एकही पुरस्कार मिळाला नाही… चित्रपट निर्माते रामानंद सागर यांची घोर निराशा झाली.. तरीदेखील रामानंद सागर यांना हा चित्रपट, करोडो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याचं मानसिक समाधान होतं..

हा चित्रपट मी लहान असताना विजय टाॅकीजला लागला होता. मी रोज फिरायला बाहेर पडल्यावर थिएटरवर जाऊन, तेथील शोकेसमध्ये लावलेले फोटो पहात असे. ते पाहताना प्रोजेक्टरच्या खोलीमधून चित्रपटातील गाण्यांचे सुमधुर स्वर कानी पडायचे. त्या फोटोसेटमधील एका फोटोकडे मी टक लावून पहात असे.. तो फोटो ‘फुलों की रानी’ साधनाचा होता..

साधनाचा जन्म १९४१ सालचा. ‘लव्ह इन सिमला’ चित्रपटापासून तिची कारकिर्द सुरु झाली. सुमारे ३५ चित्रपटात काम केल्यानंतर तिनं चित्रसंन्यास घेतला. कृष्णधवल चित्रपटातही ती आकर्षकच दिसली व रंगीत चित्रपटांतील तिच्या लोभस दर्शनाने सिनेरसिक ‘घायाळ’ झाले…

‘आरजू’ चित्रपट मी खूप उशीरा पाहिला. गाणी तर रेडिओवर ऐकून तोंडपाठ झालेली होती. राजेंद्रकुमारच्या प्रत्येक चित्रपटातील गाणी ही श्रवणीयच होती. त्यामुळेच त्याचे सर्व चित्रपट सिल्व्हर ज्युबिली होऊन त्याला ‘ज्युबिलीकुमार’ म्हटलं जायचं..

‘आरजू’ची कथा, पटकथा, संवाद व दिग्दर्शन रामानंद सागर यांचच होतं. हसरत जयपुरी यांची एकाहून एक सरस गाणी व शंकर जयकिशन यांचं सुमधुर संगीत ऐकतच रहावं असं आहे..

‘ए फुलों की रानी..’ या गाण्याच्या चित्रीकरणप्रसंगी दिसणारी सर्व फुले ही नकली आहेत हे सांगूनही कुणाला खरे वाटणार नाही.. निर्मात्याने त्या नकली फुलांसाठी भरमसाठ खर्च करून ते गाणं डोळ्यांना सुखावणारं केलेलं आहे..

‘बेदर्दी बालमा तुझको..’ या विरह गीतात काश्मीरमधील उजाड बागा दाखविलेल्या आहेत. ‘ए नर्गिसे मस्ताना..’ या गाण्यात घोड्यावर बसलेली साधना व घोड्याचा लगाम हातात घेऊन तिच्या सौंदर्याची स्तुती करत चालणारा राजेंद्र कुमार.. हे गाणं कधी संपूच नये असं वाटत रहातं…

तिच्या वाढदिवसाला वेषांतर करुन गेलेला, राजेंद्र कुमार जेव्हा ‘छलके तेरी आॅंखोंसे..’ हे गाणं गातो तेव्हा प्रेयसीची उडालेली तारांबळ तिने कमालीची साकारलेली आहे..

या चित्रपटात एक कव्वाली आहे. ‘जब इश्क कहीं हो जाता है..’ आशा भोसले व मुबारक बेगमने हे गाणं अजरामर करून ठेवलं आहे.. कितीही वेळा ऐकलं तरी समाधान होत नाही…

या चित्रपटातील सर्वोत्तम गाणं ‘अजी रुठ कर, अब कहाॅं जाईयेगा..’ हे आहे. या गाण्यासाठी फिल्मफेअरचं नामांकन झालेलं होतं.. लतानं हे इतक्या आर्ततेनं गायलेलं आहे की, ते सरळ आपल्या काळजातच घुसतं… आणि मन व्याकुळ होतं.. या गाण्यात साधना अप्रतिम दिसलेली आहे.. तिचे शब्दागणिक बदलणारे हावभाव लोभस वाटतात..

प्रेमाच्या त्रिकोणाची कथा तीन तास प्रेक्षकांना बांधून ठेवते. यातील चाळीस मिनिटे ही गाण्यातच जातात.. विनोदासाठी मेहमूद, धुमाळ ही जोडगोळी आहे. काश्मीरचं सौंदर्य पहायला डोळे अपुरे पडतात..

चित्रपट आवडला म्हणून व्हिडिओ सीडी खरेदी केली. काॅम्प्युटरवर ती सीडी लावून अनेकदा पाहिला. नंतर यु ट्युबवरुन पहात राहिलो.. आता मोबाईलवर पाहतो.. तरीदेखील पुन्हा पुन्हा पहावासा वाटतो.. तो फक्त ‘साधना’साठीच!!

२०१५ साली साधना या जगातून निघून गेली.. आता राहिल्या त्या, फक्त तिच्या आठवणी.. आज ती असती तर ऐंशी वर्षांची झाली असती… कदाचित ती स्वर्गात राजेंद्र कुमारला म्हणत असेल.. जहाॅं जाईयेगा, हमें पाईयेगा…

— सुरेश नावडकर.

मोबाईल: ९७३००३४२८४

२-९-२१.

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 407 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..