अरुण शेवते यांचा जन्म ३० एप्रिल १९५८ रोजी झाला.
‘ऋतुरंगकार’ अशी ओळख असणारे अरुण शेवते १९९३ पासून ‘ऋतुरंग’ या दिवाळी अंकाचे संपादन आणि प्रकाशन करत आहेत. ‘ऋतुरंग’ या दिवाळी अंकातील विविध लेखांची ५० पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.
अरुण शेवते यांना नामवंत लोक लेख लिहून देतात, चित्रकार चित्रे काढून देतात, प्रकाशक पुस्तके छापून देतात आणि वाचक ती हातोहात विकत घेतात. ‘ग्रंथाली’, ‘लोकवाङ्मय’, ‘अनघा’, ‘मुद्रा’, ‘मेहता पब्लिशिंग हाऊस’, ‘पद्मगंधा’ यांसारख्या मान्यवर प्रकाशन संस्था शेवत्यांनी संपादित केलेली पुस्तके काढतात आणि हातोहात ती विकली जातात. शेवते स्वतःही लिहितात, शब्दांकन करतात, संपादन करतात, प्रकाशन करतात.
अरुण शेवते यांनी ‘ऋतुरंग’चा पहिला अंक १९९३ साली प्रसिद्ध केला. प्रत्येक अंकासाठी स्वतंत्र विषय घेऊन विविध क्षेत्रातील मान्यवरांना आणि नवोदितांनाही लिहायला लावण्याची पद्धत शेवते यांनी लोकप्रिय केली. अंकांचे विषय मानवी व्यवहारांशी, रोजच्या जगण्याशी आणि यशापयशाची सूत्रे उलगडून दाखविण्याशी संबंधित असतील याची काळजी घेतली. आठवणींच्या सावल्या, उरतात त्या आठवणी, सांगण्यासारखे बरेच काही, तेव्हाची गोष्ट, मागे वळून पाहताना, दोस्ताना, अज्ञात मनाचा शोध, ओळखीच्या पलीकडे, अनुभवांची शोधयात्रा, सांगायचं झालं तर, माझे अनुभव, माझे जन्मघर, माझे गाव-माझे जगणे, मी स्त्री आहे म्हणून, मला उमगलेला पुरुष, एकच मुलगी, नापास मुलांची गोष्ट… यांसारख्या विषयांवर त्यांनी दिवाळी अंक काढले.
लेखक, पत्रकार, नट, गायक, राजकारणी, समाजकारणी, विचारवंत, व्यापारी अशा विविध क्षेत्रांतील व्यक्ती ‘ऋतुरंग’साठी लिहितात. त्यांचे अनुभव वाचकाला अनोख्या भावविश्वाची सफर घडवून आणतात. आपल्या पंचवीस अंकांतून आणि त्या आधारे निघालेल्या पन्नास पुस्तकांतून शेवते यांनी अशा पाचशेहून अधिक व्यक्तींना बोलते केले आहे. जे लिहू शकतात त्यांना नेमके लिहायला शिकवले आहे. ज्यांच्याकडे लिहिण्याची हातोटी नाही पण सांगण्यासारखे खूप काही आहे त्यांच्यासाठी त्यांनी सिद्धहस्त लेखकांची फळी शब्दांकनासाठी उभी केली आहे. लता मंगेशकर ते गुलज़ार, दिलीप चित्रे ते शंकर वैद्य, सुशीलकुमार शिंदे ते यशवंतराव गडाख, रंगनाथ पठारे ते अरुण साधू, नरेंद्र चपळगावकर ते सदानंद मोरे अशी कितीतरी माणसे ऋतुरंगचे लेखक झाले आहेत.
शेवते यांनी इतर भाषांमधील लेखक-कलावंतांनाही मराठीशी जोडले आणि हे त्यांचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणावे लागेल. मराठीशी जोडले एवढेच नाही तर त्यांचे अनुभव मराठीत आणताना ते अधिक उजवे आणि प्रत्ययकारी होतील याची काळजी त्यांनी घेतली. अमृता प्रीतम, गुलज़ार, झाकीर हुसेन, जावेद अख्तर, हेमा मालिनी, हरिप्रसाद चौरसिया, एम्.एफ्. हुसेन, शबाना आझमी, बेगम परवीन सुलताना अशा साऱ्या मान्यवरांच्या अनुभवांचे सार ऋतुरंगाच्या अंकांतून मराठीत आले आहे. त्यांचे कोणतेही पुस्तक उघडावे आणि त्यातील कोणत्याही ‘प्रकरणा’त बुडून जावे असे असते. शेवते यांच्या ‘ऋतुरंग’ प्रकाशनाने काढलेल्या ‘नापास मुलांची गोष्ट’ या पुस्तकाच्या चाळीस आवृत्त्या निघाल्या. ‘नापास मुलांची गोष्ट’ मुंबई विद्यापीठात अभ्यास क्रमात सामील केले आहे.
अरुण शेवते यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply