शिक्षणतज्ज्ञ अनुताई वाघ यांचा जन्म १७ मार्च १९१० रोजी झाला.
अनुताई वाघ यांच्या वडिलांचे नोकरीनिमित्त वेगवेगळ्या गावी बस्तान असे आणि घरची परिस्थिती बेताचीच होती. वयाच्या १३ व्या वर्षी अनुताईंचे लग्न झाले आणि सहाच महिन्यात त्या विधवा झाल्या. पण या प्रसंगाला धैर्याने तोंड देत त्या ताठ उभ्या राहिल्या. त्यांच्या आईच्या मैत्रिणीच्या मदतीने त्या अकोल्याच्या राष्ट्रीय शाळेत शिकल्या. इगतपुरीला फायनलच्या परिक्षेत जिल्ह्यात प्रथम आल्या. चार वर्ष नाशिकला नोकरी केली. त्यानंतर पुण्याला येऊन त्या हुजूरपागा शाळेत रुजू झाल्या. त्यांचे वडील थकल्यामुळे त्यांच्या भावंडांची जबाबदारी त्यांनी समर्थपणे सांभाळली.
अनुताई हुजुरपागेत तेरा वर्ष नोकरी करीत होत्या. नोकरी करत असताना नाईट स्कूल मध्ये शिकून १९३८ मध्ये त्या चांगले गुण मिळवून मॅट्रिक झाल्या. पुढे अनेक वर्षांनी त्यांनी पदवीची परिक्षा दिली आणि उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाल्या. त्या वेळेस त्यांना मोतीबिंदू झाला होता, दुसरा वाचक घेऊन त्यांनी अभ्यास केला होता. त्यांचे वय त्या वेळेस एकावन्न होते. १९४५ मध्ये अनुताईंची ताराबाई मोडक यांच्याशी एका शिबिरात गाठ पडली. ताराबाई मोडक यांच्या विचार व कार्यामुळे अनुताई खूपच प्रभावित झाल्या आणि त्यांच्यासमवेत बोर्डीला गेल्या. तिथे त्यांनी बालवाडी सुरू केली. अनेक अडचणीना तोंड देत त्यांची विकासवाडी उभारी धरू लागली. पण अजूनही आदिवासी यापासून कोसो दूर होते. ताराबाई मोडक आणि अनुताई वाघ या दोघींनी आपला मुक्काम कोसबाड येथे एका खोपटेवजा घरात हलवला. तिथेच त्यांनी शाळा सुरू केली. त्याला ‘अंगणवाडी’ असे नाव दिले.
जुन्या नव्याचा समन्वय साधत अनुताईंनी ताराबाई मोडकांची, आपल्या गुरूची, स्वप्ने सत्यात उतरवली. पारंपारिक चौकटीच्या बाहेर जाऊन आधुनिक पद्धतीने शिक्षणाची क्रांती घडवली. त्यांची आपल्या कामावर अत्यंत निष्ठा होती. या शाळेत त्यांनी मुलांना आंघोळीपासून सर्व स्वच्छता शिकवली. अनुताईंनी वारली आदिवासींच्या मुलींना शिक्षण दिले.
अनुताईंच्या सर्व थरातील कार्याची दखल सरकारने घेतली आणि त्यांना पद्मश्री देऊन सन्मानित केले. महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षिका पुरस्कार, दलित मित्र पदवी, सावित्रीबाई फुले पुरस्कार, तसेच आंतरराष्ट्रीय बालकल्याण पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. हे पुरस्कार मिळाल्यावर त्या म्हणाल्या, ‘‘मला केवळ एवढ्याचसाठी बरे वाटले की, संस्थेची कामे आता भराभर होतील. बाकी कोणत्याही मानाने हुरळून जायचे माझे वय नाही आणि सेवाव्रती माणसाला कोणत्याही लाभाची व नावाची अपेक्षा नसते.’’ यातून त्यांची सेवाभावी वृतीच ध्वनित होते. ‘शिक्षणपत्रिका’ व ‘सावित्री’ ही मासिके, तसेच ‘बालवाडी कशी चालवावी’, ‘विकासाच्या मार्गावर’, ‘कुरणशाळा’, ‘सहज शिक्षण’ ही पुस्तके – यांच्या माध्यमातूनही त्यांनी आपल्या शैक्षणिक विचारांचा प्रसार केला. ‘कोसबाडच्या टेकडीवरून’ हे त्यांचे आत्मवृत्त प्रसिद्ध आहे.
अनुताई वाघ यांचे २७ सप्टेंबर १९९२ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply