भुसावळ, सोलापूर आणि सांगली या ” माझ्या ” गावांमध्ये सकाळची प्रभातफेरी माझ्यासाठी अत्यावश्यक असते. शनिवारी सकाळी उठून ताजी फेरी मारली सोलापुरात ! हॉटेलातून मस्त गारवा अनुभवत सात रस्ता मार्गाने निघालो. वाटेत काही कोरोनाजन्य आणि काही काळाच्या चपराकीने पडझड झालेल्या इमारती दिसल्या. पण डफरीन चौकात “पुणेकर कामठे “रसपान गृह दिसलेच आणि मन थंड झाले. हदेप्र ला दुरूनच नमस्कार केला. शेजारील बाल विकासच्या (सोलापुरातील ज्ञानप्रबोधिनी) पुनर्निर्माणाचे काम दिसले आणि व्हाटसअप वरील फोटोला विश्वासार्ह दुजोरा मिळाला. वाटेतील “कामत” सुरु आहे की नाही कळायला मार्ग नव्हता.(नंतर दिवसभरात हिंडताना ते “सुरु “दिसले. वाचले बहुधा कोणत्यातरी तडाख्यातून) पार्क स्टेडियम जवळील “येवले ” चहा नित्यनियमाने प्राशन केला आणि अंगात तरतरी भरली (कारण हॉटेलातून निघण्यापूर्वी चहासाठी फोन केल्यावर टिपिकल उत्तर मिळाले होते- “रेस्टारंट सात वाजता सुरु होते “).
गावातला दिवस सुरु होताना दिसत होता. ग्रामदैवत सिद्धरामेश्वराला नव्याने भेटलो. तेथील दर्शन मंडपाचे काम द्रुतगतीने सुरु झाल्याचे दिसले. रोजच्या भक्तांची मांदियाळी भेटली. सांगलीतही अशीच नियमित भक्तमंडळी गणपती मंदिरात दिसतात. हा नेम कौतुकास्पद मानला पाहिजे. माझे एक नातेवाईक असेच पुण्यातील कसबा गणपतीच्या दर्शनाला रोज जायचे.
परतताना “काळजापुर ” मारुती मंदीर लागले.सोलापुरात असताना सायंकाळी महानगरपालिकेच्या समोरील रेलिंगवर बसलेले आम्ही डोळ्यांसमोर आले- मी, संज्या (झळकीकर- जो क्वचित आजही संपर्कात आहे), अब्या आणि त्याचा मोठा भाऊ आज्या (आडनाव विसरलो), कुरळे केसवाला जाधव्या (काही वर्षांपूर्वी अचानक तो फोनला आणि परत गडप झाला). रोज सायंकाळी काळजापुर चक्कर असायची.
शनिवार असल्याने (आणि कदाचित ऐरव्हीही असावे ) मंदीर लख्ख,टापटिपीत आढळले आणि १९७६ एकदम २०२२ झाले. सुंदर भजने,स्तोत्रे कानी पडली आणि पंधराहून अधिक मिनिटे तेथे खिळून गेलो. असेच मे महिन्यातील जळगावच्या फेरीत स्टॅन्ड समोरच्या राम मंदिरातील भारून टाकणारे प्रभातीचे वातावरण असेच जाणवले होते.
संगमेश्वर समोरून जाताना “के भोगीशियन ” हे प्राचार्य आठवले आणि स्वाभाविकपणे त्यांची मुलगी(जी आमच्याबरोबर सांगलीच्या वालचंदमध्ये एक वर्ष होती) – के सुजाथा आठवली.
हॉटेलच्या कोपऱ्यावर सवयीने स्थानिक वृत्तपत्र घ्यायला थांबलो.
अचानक एकजण जवळ येऊन विचारता झाला- ” मोदी रिक्षा स्टॅन्ड कोठे आहे?”
नकारार्थी मान डोलावत मी मनातल्या मनात म्हणालो – ” बाबा रे, मला कसे ठाऊक असणार? मी या गांवात १९७५ पासून मनाने राहतो, पण शरीराने आता दोन दिवसांसाठी आलोय.”
आमचे पाडगांवकर म्हणून गेले आहेत- ” ना ठेवते (गेलेल्या) फुलांची, माती इथे निशाणी ”
माझ्या स्मृतीत कोण असावे हे जसे मी ठरवितो, तसेच गावेही आणि त्यांचे “थांबे ” ही ठरवत असतीलच की !
– डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply