मित्रहो,
नमस्कार,
आस्तिक, नास्तिक, श्रद्धा, अश्रद्धा आणि त्यांची प्रचिती ही स्वानुभवावर असते. अनादिकालापासून हे वैचारिक द्वंद चालू आहे. पण ही सृष्टि, या सृष्टितील चैतन्य निर्माण करणारी एक अनाकलनीय अद्भुत अशी अदृष्य शक्ती आहे हे मात्र खरं!
इथे मात्र वैचारिक एकमत होत असतं.!!
मानवी प्रकृती मध्ये सर्वार्थाने विविधता आहे. प्रत्येक व्यक्ती वेगवेगळी आहे . प्रत्येकाचे रंग, रूप, स्वभाव, विचार, आचार, विहार प्रत्येकाचे कर्म ( काम ) इत्यादि साऱ्याच गोष्टी एकसारख्या कुठेच दिसत नाहीत, कुणी गरीब, कुणी श्रीमंत आहेत. प्रत्येकाचे स्वभाव गुणदोष वेगळे आहेत. असे सर्वत्र वैविध्य जाणवते.
मानवी मनाच्या दृष्टिकोनाचेही विविध पैलू आहेत. त्यातून अनेक प्रश्न निर्माण होत असतात. त्या प्रश्नांच्या उत्तरांची उकल ही मानवाच्या वैचारिक प्रगल्भते नुसार होत असते. आशावाद, निराशावाद, यश, अपयश, सुख, दुःख, क्लेश, वेदनां म्हणजे प्रत्येकाच्या अनुभुतीची परिणीती असते.
कुठल्याही व्यक्तिची, लेखकाची, विचारवंताची कल्पनाशक्ती देखील ही वैयक्तिक स्वानुभूती किंवा वास्तवानुभूतीला अनुसरुन असते. त्याला त्याच्यातुन समाजापुढे काहीतरी ठेवायचे असते.सांगायचे असते . त्यातूनच वैचारिक भूमिकांची विरोधाभासी विविधता प्रत्ययास येते
कुणी म्हणते देव आहे? देव नाही? हे पाप आहे? हे पुण्य आहे? हे सत्य तर ते असत्य आहे . तसेच प्राक्तन, प्रारब्धभोग याही कल्पना आहेत हेही खरे!
पण या साऱ्या कल्पना संवेदनातून मुक्त होवुन प्रत्येकजण सुखी होण्यासाठी उत्सुक असतो, आपल्यापरीने अथक प्रयत्नशील असतो. यालाच जीवन म्हटले आहे!
अनेक प्राचीन ग्रंथसंपदेतुन, वांग्मयातून जीवनाबाबत उहापोह केलेला आढळतो, दृष्टांत दिलेले आढळतात.
प्रसार माध्यमातुन दर्शविले जाणारे बहुअंशी प्रसंग यातूनच निर्माण झालेले असतात. किंवा अशा दृष्टांतात आपल्याला साधर्म्य जाणवते.
शेवटी मानवी जीवनाचे विविध कंगोरे, किंवा जीवनात वाटयास आलेले सुख, दुःख, वेदनांचे क्षण व्यक्त करण्याची मानसिकता देखील विविध स्वरुपात पुढे येते यांची तुलना ही प्रत्येकाने विवेकाने आत्ममुख होऊन केली तर क्षणोक्षणी भेड़सावणाऱ्या अनेक मुलभूत प्रश्नांची उत्तरे सहज मिळतील.
जीवसृष्टित मानवी जन्म श्रेष्ठ मानला आहे.
कारण तो संयमाने, सतर्कतेने, विवेकाने विचार करु शकतो. चांगले काय? वाईट काय? याच्या निष्कर्षा पर्यंत येवू शकतो.
जो माणूस आहे तो स्वतः नेहमीच
जे अगम्य आहे! जे अतर्क्य आहे!
त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो आणि वसुधैव कुटुंबक ही मानवतेची पवित्र भावनां मनांत सातत्याने जागृत ठेवतो.
इती लेखन सीमा.
— वि.ग. सातपुते.
9766544908
पुणे.
Leave a Reply