मी 1977 ला इस्टर्न कोलफिल्डस् लि. या कंपनीत नोकरी करण्यासाठी राणीगंज जवळच्या परसिआ या खाणीत 18.1.1977 ला जॉईन झालो.तो दिवस मला महत्वाचा वाटला होता ,माझ्याकरता.कारण एक चांगली वरचे पैसे कमवू देऊ शकणारी पीडब्ल्यूडी ची तीन वर्षांची महाराष्ट्रातील नोकरी सोडून मी इतक्या दूर बंगालमध्यें आलो होतो.मला खाणीत गेल्यावर ,कामामुळे बाकी जगाची दोन दिवस खबरबात नव्हती.केवळ 20 जानेवारीला मला कळलं की 18 तारखेला मा.पंतप्रधान इंदिराबाईंनी आणिबाणी मागे घेऊन निवडणूका जाहिर केल्या आहेत.म्हणजेच माझं नोकरी जॉईन होणं हे राष्ट्रीय दिवसाशी जो़डल्या गेलं होतं.
बंगालमध्यें रूळायला मला सुरवातीला खूप त्रास झाला.कारण सगळे कामगार बंगालीतच बोलणार.पण मी जरी ट्रेनी इंजिनीअर होतो ,तरी वर्कशॉप प्रमुख होतो.माझा जुन्या नोकरीच्या अनुभवाचा फायदा होत होता पण भाषेचे अनुवादाचे काम फोरमन लोकांच्या मार्फत करावे लागत होते.पण हळूहळू बोलायला शिकलो व स्थिरावलो.
मग मीच माझ्या इतर इंजिनीअर मित्रांच्या मागे लागलो की आपण शांतिनिकेतनला जाऊ या.माझा थोडासा साहित्यिक पींड असल्यामुळे एक श्रद्धा होती ,पण बाकीच्यांना तेवढ काही विशेष नव्हतं. शेवटी ते तयार झाले होते.पाचापैकी दोनच जण तयार झाले.मग बसने बोलपूर मार्फत तिथे पोहचलो.
तिथले खुल्या वातावरणातील शिक्षण अगदी मस्त वाटत होतं ,पण फक्त दोनच ठिकाणी वर्ग सुरू होते ,कारण तो रविवार होता.ते वर्ग पण संगीत व नाटकाचे होते.आम्ही जवळ गेल्यावर आम्हाला चूप राहण्याचे इशारे झाले होते.मग एका विद्यार्थाने येऊन आमची विचारपूस केली होती.महाराष्ट्रातून आलो म्हटल्यावर आपल्या नाटकांची त्याने प्रशंसा केली होती.
सगळ्यात आवडला तो तिथला नैसर्गिक परिसर , वेगवेगळी झाडे व फुलांचे ताटवे.
एक गंमत आणखिन सांगण्यासारखी म्हणजे , आम्ही एक सायकल रिक्शा पूर्ण वेळेसाठी 2-3 तास भाड्याने घेतला होता.त्याला सर्व परिसर माहित असल्यामुळे तो आम्हाला व्यवस्थित फिरवत होता.गंमत म्हणजे आम्ही तीघांनी आळीपाळीने तो रिक्शा चालवाला होता .रस्त्यावरून जाणार्यांना गंमत वाटत होती.रिक्शावाल्याला वाटलं की आम्ही रिक्शा चालवला तर आम्ही त्याला कमी पैसे देऊ.पण जेव्हा शेवटी आम्ही जास्तच पैसे दिले तेव्हा तो भारावला व आमच्या पाया पडू लागला .आम्ही त्याला मना केलं.
रविन्द्रनाथ टागोरांच्या पावनभूमीला जाऊन आलो , याच मला अत्यंत समाधान आहे.