2003 च्या 19 नोव्हेंबरला माझी पदोन्नती होऊन मी महाराष्ट्र बँक श्रीवर्धन शाखेत लिपीक म्हणून जॉईन झालो.
खरं तर श्रीवर्धन हे एक रम्य ठिकाण आहे.
निळ्याशार समुद्रकिनारा व दांडा ते जिवना बंदरपर्यत पसरलेला वाळूचा किनारा!
बाजूला नारळी, पोफळीच्या बागा व केवड्याचे बन.
डिसेंबर महिना संपत आला व थंडीची गार हवा शांत झोप लागते. मी बँकेच्या समोरच्या यादव यांच्या घरात भाड्याने रहात होतो.शेजारी गावित म्हणुन पंचायत समितीचे अकाउन्टट सहपरिवार रहात होते. हळूहळू ओळखी वाढून मी नव्या जागेत रुळत होतो.
शाखा प्रबंधक अग्नीश्वरन, उपशाखाप्रबंधक प्रमोद सुळे, दप्तरी, चंद्रकांत राऊत, संतोष वाणी, दिपा हेन्द्रे, अनंता नाकती इत्यादी सर्व स्टाफ खेळीमेळीने काम करीत होते.
दर गुरुवार-शुक्रवार बागमांडला व बोर्ली शाखेतून अतिरिक्त कॅशचा भरणा स्टेट बँकेत भरायला तेथील स्टाफ यायचा, पण सगळ्यात जास्त कॅश बोर्लीपंचतन शाखेतून येई.
त्या दिवशी अगोदर सांगूनही बोर्लीची कॅश घेऊन स्टाफ उशिराने आला व स्टेट बॅकेची कामकाजाची वेळ संपत आली, तरी सुध्दा कॅश स्टेट बँकेत जमा करून फक्त व्हॉउचरवर श्रीवर्धन बॅकेत नोंद करण्यात येऊन सगळेजण आपापल्या घरी गेले. त्या दिवशी अग्नीश्वरन ठाण्याला मिंटीगसाठी गेले होते. जागेचे मालक जुगराज जैन आपल्या कामासाठी बाहेरगावी गेले होते.
श्रीवर्धन शहरात रात्री गस्त घालणारा गुरखाही नव्हता. पहाटे पाचच्या सुमारास बॅकेचा सायरन जोरजोरात वाजू लागला व सगळे श्रीवर्धनचे नागरिक बॅकेच्या बाहेर जमा झाले. मी बँकेच्या समोरच रहात असल्यामुळे काहीजण माझ्या दरवाजाची कडी वाजवून मला सांगू लागले, ‘साहेब काहीतरी गडबड झाली आहे. जोरजोरात सायरन वाजतो आहे चला लवकर.’ मी तसाच उठलो व बँकेकडे धावत गेलो. काल रात्री बँक बंद करताना सर्व नीट तपासूनच आम्ही बँक बंद केली.
मी, सुळे व संतोष वाणीला निरोप पाठवायला माणूस शोधतोय. तोपर्यंत सुळे व संतोष सायकलवरून आले. हेन्द्रे मॅडम, राऊत आपल्या दुचाकीवरून आले. सर्वांनुमते पोलीस स्टेशनला तक्रार करण्यासाठी सुळे व संतोष यांना जवळ असलेल्या पोलीस स्टेशनला पाठवून पोलीस अधिकाऱ्यांना सोबत घेऊन ते आले. पोलीस अधिकारी यांच्यासमोरच बँक उघडून आम्ही आत प्रवेश केला. पोलीस अधिकारी व पोलिसांसमोर बँक उघडून आम्ही बँकेत प्रवेश केला…
दरवाजा उघडताच सगळी लेजर (त्या वेळी शाखा संगणकीकृत झालेली नव्हती.) (नोडल सेंटरला दररोज शाखेत झालेला व्यवहार सप्लीमेटरीच्या मार्फत नोडल सेंटरला ठाणे येथे पाठविला जाई.) सगळीकडे व्हाउचर व इतर कागदपत्र विखुरली होती. क्षीण आवाजात सायरन वाजून आपले काम करण्याचा आटोकाठ प्रयत्न करीत होता.
संतोषने पहिल्यांदा तो बंद करून विजेची बटने चालू करायचा प्रयत्न केला पण विजेचा फ्युज काढून टाकलेला होता. फोनची वायर ओढून काढून फोन बंद केला होता. मी व संतोष कॅश कॅबिनकडे गेलो, तर त्या मागच्या खिडकीच्या ग्रीलचे दोन गज कापून त्या खिडकी वर काळा कपडा बांधून ती झाकलेली दिसली.
पोलीस अधिकारी यांनी ती बघितली व या खिडकीतून चोरटे आत शिरले असावेत व त्यांनी आपल्या हालचाली कोणाला कळू नयेत म्हणून काळा कपडा बांधला असावा. बघ्यांची गर्दी जमली व लोक नाना तर्क वितर्क काढून हैराण करीत होते.
सकाळचे साडेनऊ वाजले. पोलीस पंचनामा व जाबजबाब घेतले. मी बाहेर येऊन रायगड क्षेत्रीय कार्यालयाला फोन केला. परंतु तो लागेना, मी मुंबईतील नरीमन पॉईन्ट शाखेला फोन केला. सुरज दणाईत यानी फोन उचलताच मी त्यांना श्रीवर्धन शाखेत चोरटे घुसले.परंतु काही नुकसान झाले नसून शाखाप्रबंधक अग्नीश्वरन हे रायगड ऑफिसला मिंटींगला गेल्याचे सांगून त्यांना ही बातमी व क्षेत्रीय प्रबंधक आर. के. गुप्ता साहेबांना ही बातमी कळविण्यास सांगून यादव यांच्या फोन नंबरवर संपर्क साधण्यास सांगितले. कारण बँकेचा फोन चोरट्यांनी कट केला होता.
दणाईत सरांनी मला पुन्हा सगळी हकीगत सांगायला सांगून मी आर. के. गुप्ता यांना ही बातमी सांगतो म्हणून धीर दिला. मी दहा वाजता पोलीस तपास पूर्ण होताच बँक बारा वाजता पुन्हा सुरू होईल व बँकेचे फार नुकसान झालेले नसून रोकड सुरक्षित आहे. अफवा पसरवू नका असे आवाहन करून बोर्ड लिहून ठेवला.
या वेळेपर्यत अज्ञात लोकांना फक्त श्रीवर्धनला जास्त कॅश असावी असे वाटून ते बँकेच्या मागच्या शेतजमीनीत मोकळ्या होत्या तेथे रात्र होण्याची व संधीची वाट बघत राहिले. टेहळणी करताना कॅशियरच्या मागे असलेली खिडकी त्यानी बँकेत प्रवेश करायला निवडली.
श्रीवर्धनला अलिबागहून येणारी एसटी रात्री दहा ते अकरापर्यंत येते. त्यानंतर मुंबई सेंट्रलहून रात्री अकराला सुटणारी श्रीवर्धन एसटी पहाटे साडेचारपर्यंत येते व गावात फिरते.
यानंतर अलिबाग-महाड-मुंबई कोलमांडला वगैरे गाड्याची रहदारी सुरू होती. रात्री तीनच्या सुमारास चोरट्यानी खिडकीच्या ग्रीलचे गज कापून बँकेत प्रवेश केला व त्यांनी तिजोरीपर्यंत जाऊन उघडायचा प्रयत्न करताच अलार्म वाजायला लागला व त्यांना तिजोरीची रूम उघडता आली नाही.
त्यानी अलार्म बंद करता येत नाही म्हणून कागदत्र व लेजर फेकून ते पुन्हा बाहेर पडून पळाले. अलार्मचा आवाज ऐकून लोक जागे झाले व पहाटे एसटीची रहदारी सुरू झाली.
सकाळी पोलीस केस झाली. नंतर तपासही झाला. पण चोरट्यांचा शोध लागला नाही. धोक्याची घंटा वाजल्यामुळे चोरट्यांना रक्कम चोरता आली नाही.
ठाण्यात रायगड क्षेत्रीय कार्यालयात अग्नीश्वरन सरांना ही बातमी समजली व त्याना धक्का बसला. पण रोकड सुखरूप राहिली हे समजल्यावर त्यांना हायसे वाटले. या प्रसंगी गुरखा कुठे होता? हे कळायला मार्ग नव्हता. तसा तो बँकेचा नोकरही नव्हता. पण त्याला देखरेखीसाठी जे अल्प मानधन दिले जात असे ते देण्याचे बंद केले.
-शशी जाधव
(व्यास क्रिएशन्स च्या पासबुक आनंदाचे दिवाळी २०२२ ह्या अंकामधून प्रकाशित)
Leave a Reply