नवीन लेखन...

एक अतूट बंधन

माझ्या प्रिय वाचकांनो, ‘विवाह’ हा एक अत्यंत जटिल प्रवास सोसण्याचा, आहे. करण्याचा, करून घेण्याचा, प्रसंगी दोन पावले मागे येण्याचा, कधी आक्रमक होण्याचा तर कधी आपले अश्रू कोणाला दिसू नयेत म्हणून एकांत शोधण्याचा, मायेचा, अंतरीच्या ओव्यांचा एक अथक प्रवास.

माझे लग्न १० नोव्हेंबर १९६६ मध्ये माझ्या वयाच्या २१ व्या वर्षी झाले. हे काही प्रेमलग्न नव्हते. अगदी कांदेपोहे खाऊन, बघून, ठरवून झालेला विवाह होता. आपणाकडे पूर्वीच्या काळी असेच ठरवून लग्न होई त्यामुळे मला त्यात विशेष काही वाटले नाही. ते टिकले… म्हणजे आम्ही दोघांनी टिकविले यातही काय विशेष नाही! पूर्वीच्या बायकाही सोशिक नि पूर्वीचे नवरेही सोशिकच! पण मी अमेरिकेत गेले तेव्हा मला एकदम या ‘टिकलेपणाचा’ साक्षात्कार झाला, की वा! काय विशेष गोष्ट झाली.

त्याचं असं झालं. मी एक दिवस अमेरिकन तुरुंगात काढला. म्हणजे ‘बघायला’ बरं का! गैरसमज नको म्हणून सांगितलं! तर तिथे ४० बायका कैद होत्या. शिक्षा ४ महिन्यांची. सारे प्राथमिक गुन्हे म्हणजे गाडीचे अपघात, मारामाऱ्या, दारू पिऊन वाहन चालविणे, शिवराळपणा, असभ्य वर्तन यासाठीची शिक्षा! त्या तुरुंगाचं नावही ‘हाऊस ऑफ करेक्शन’ असं होतं. म्हणायला तुरुंग पण एसी होता. हॅम बर्गर असा नाश्ता! क्या बात है! आणि कैदी म्हणून गणवेश नाही. किती मज्जा – असं वाटून गेलं.

‘या बायकांना काही चांगले संस्कार द्या.’ त्या तुरुंगाचा जेलर मला म्हणाला. मी आपली ‘साडी छाप’ आत गेले. माझे स्वागत ‘हाय विजया’ ने झाले. पॅट शर्ट मधील बायका खाली ४०, नि साडीवाली मी स्टेजवर सारे संभाषण इंग्रजीत झाले.

‘हे नेसायला खूप वेळ लागत असेल ना?’ त्यांचे कुतूहल.

‘छे हो! फक्त दोन मिनिटं! आत्ता मजजवळ दुसरी साडी नाही. नाहीतर तुमच्यातील एकीला नेसून म्हणजे नेसवून दिली असती. टू मिनिट्स मध्ये’ ‘ते कपाळावर काय आहे?’

‘कुंकू भारतीय स्त्रिया फार आवडीने लावतात.’
‘हो का? पुरुष काय लावतात? ‘ ‘नाही. ते काही लावत नाहीत.
क्वचित गंध लावतात. पण गंध मजजवळ दाखवण्यासाठी नाही.’ ‘हो का? असू दे. पण ते काळे मणी? गळ्यातले? ‘
‘अहो ते मंगळसूत्र. प्रत्येक लग्न झालेल्या भारतीय स्त्रीला मंगळसूत्र हा अलंकार फार आवडतो. तो ती आनंदाने धारण करते.’
‘बरं, पण तो काय घालतो? ‘
‘तो काही घालत नाही.’
कसे
‘अरे, मग तुम्ही
ओळखता, तो विवाहित की बॅचलर ते? ‘
‘सहजपणे! इंडियन नवरे विवाहित असतील तर इतर बायकांना डोळे मारीत नाहीत. नाकासमोर चालणारा माणूस बघितलात की समजा, तो विवाहित ! बहुतांश विवाहित इंडियन पुरुष फार फेथफुल असतात. यावर जोरदार टाळ्या झाल्या. मग एकीनं विचारलंच,

‘तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली?’ तेव्हा तेहेतास झालेली. मी म्हटलं, ‘तेहत्तीस!’

त्यावर त्या बायका एकजात टाळ्या वाजवीत उठून उभ्या !

‘थर्टी थ्री इर्स अँड ओन्ली वन हजबंड? वाऊ!’ मी बिचकलेच.
पण खूप आनंदले. त्या क्षणी माझ्या टिकलेल्या लग्नाचा मला खूपच अभिमान वाटला. खरंच सांगते.

पण हे सहजी टिकलेलं लग्न आहे का? मुळीच नाही मित्रांनो. त्यासाठी खूप पापड झेलावे लागले आहेत. अपमान गिळावे लागलेत. माझे लग्नच मुळी एका करारावर उभे होते. ‘मी आईवडिलांचा एकुलता पुत्र आहे. ना भाऊ ना बहीण त्यामुळे मी आयुष्यभर त्यांच्याच जवळ राहीन. त्यांना कधीही एकटं करणार नाही. ही अट मान्य असेल तर लग्न!’

मी आनंदाने होकार भरला होता. मोठ्या तोंडाने कुठे हो ठाऊक होते? सासू सासऱ्यांचे प्रेम अपेक्षा भरले’ असते ते! वडील माझे मी ११ ची असताना गेले नि आईने नि दादाने दुथडी भरून मायाच माया दिली ती अपेक्षाशून्य ! असो… लग्न झाले. मुली झाल्या. प्राजक्ता आणि निशिगंधा. अगदी चिमुकल्या होत्या. तीन आणि चार वर्षांच्या मला वाटतं काहीतर खोडी केल्याबद्दल मी प्राजक्ताच्या कुल्यावर एक चापट मारली. आईची चापट लेकराला लागते का? पण माझ्या सासूबाई भयंकर तापल्या. माझ्यासमोर धुणं वाळत घालायची काठी घेऊन उभ्या राहिल्या. हं, ही मार माझ्या टाळक्यात. म्हणजे तुझा आत्मा थंड होईल त्या ओरडल्या. मी तर चक्रावूनच गेले. पण राग आवरला नि म्हणाले, ‘प्लीज, मधे नका नं पडू. मी माझ्या मुलींना शिस्त लावायचा प्रयत्न करतेय. ‘

‘ते सर्व आपल्या घरी करा. माझ्या घरात नाही चालणार ही थेरं!’

बोला आता! वाचकहो, माझे आपले घर होणारच नव्हते ना! वादा जो किया था अपने पतिसे! मग काय? गप्प बसले. अपमान गिळला. दुसरा दिवस! ‘नाश्ता लवकर दे. माझा पेशंट लवकरचा आहे हे दाढी करीत म्हणाले. माझी तर गडबडच गडबड दोन बारक्या पोरी. त्यांना दूध काँप्लान सासू सारे, नवरा यांना चहा, कॉफी, खानपान, नि माझी आठ सोळा लोकल. मी चहा केला. वाजले होते साडे सात. सासूबाई दात घाशीत सिंक जवळ उभ्या. तिच्याच खाली पायाच्या अंगठ्यानं उघडायची डस्टबीन.

मी चहाचा गरम चोथा भरलेलं गाळणं घेऊन उभी पण बाईसाहेब दूरच होईनात. मी चापटीतून अंगठा सरकावला नि डस्टबिन उघडली. पण दुर्दैव! उकळत्या चहाचा चोथा त्यांच्या गोऱ्यापान नाजूक पावलावर पडला. त्यांनी किंचाळत ब्रश फेकला. चूळ कशीबशी भरली. मुद्दाम उकळता चहाचा चोथा पायावर टाकला ना कालचा सूड उगवलास’, त्या ओरडल्या.

‘अहो कसला हो सूड? ‘
पेपर वाचत असलेले सासरे पेपर फेकून तिथे आले, ‘तुझ्यासारख्या शिकलेल्या मुलीकडून ही अपेक्षा नव्हती.’ ते दमात म्हणाले. मी गप्प ! पण मग हे आले म्हणाले, ‘का गं असा मुद्दाम उकळता चोथा माझ्या आईच्या पायावर टाकला? ‘ आता मात्र माझा फ्यूज उडाला. राग छतापर्यंत पोहोचला. अरे मेल्या, तुलाही हे सारं ‘मुद्दाम’ वाटतं? मन रागानं भरलेलं! खूप एकटं! एकाकी ३ विरूद्ध मी!

पण मी का ऐकू? मी मिळवतीय. मग लगेच ओरडले. ‘अरे तुझाही मजवर अविश्वास? मग कशाला राहू मी इथे? चालले मी!’ जाणार कुठे? लगेच दादाला फोन केला. तो मुंबईत चिंचपोकळीला आर्थररोड येथे चीफ जेलर होता. मी फोनवर रडले, बरळले, दुःख मोकळं झालं. तो फोनवर म्हणाला, ‘मी ताबडतोब टॅक्सीने येतो. फक्त मी येईपर्यंत घर सोडू नको बरं विजू?’ माझी आठ सोळा बोंबलली होती.

ह्यांचा पेशंटही घरी परतला असेल.
घरात सन्नाटा नि पोरी बिचाऱ्या

मी घाईने माझी बॅग भरली. पोरींचे फ्रॉक भरले. नवरा गपचूप बघत होता, तो एकदम म्हणाला, ‘मुलींचे फ्रॉक कशाला टाकतेस बॅगेत?’ ‘मुली माझ्या आहेत. मी जन्म दिला. मी पोटात वाढवलं. म्हणून!’ मी खूप मी मी मी केलं. नवऱ्यावर बसा बसा केलं! तो गप्प झाला. (एरवी मी त्यांना अहो जाहो करते. पण रागावल्यावर अरे तुरे वर आले) दादा आला. लालबुंद, स्मार्ट, उंचापुरा, पूर्ण गणवेषातला दादा बघून मुलुंडची आमची रणजित सोसायटी गॅलऱ्यात उभी!

वाडांकडे जेलर आला! काय झाले काय? नशीब कोणी आत आलं नाही. दादा आला तेव्हा मुलींची आजी सुन्न पलंगावर बसलेली. दादा पायातले बूट काढून आजींच्या पायाशी बसला. चक्क! त्याने पाय हळुवारपणे हात फिरवून पाहिला. ‘फोड आलेयत. कुणी बर्नाल नाही लावलं?’ माझ्या सासऱ्यांचा नि ह्यांचा चेहरा पडला. काचेचा असता तर फुटलाच असता!

मी धावत बर्नाल घेऊन आले खोलीतून. दादाने ते सासूबाईंच्या पायाला लावले. हळुवार हाताने. त्यांचा सारा राग कोसळला, निमाला, विझला दादाने मजकडून फोनवर सारे ‘ब्ला ब्ला ब्ला’ ऐकले होतेच.तो म्हणाला, ‘विजूला मी बाप होऊन ११ व्या वर्षापासून सांभाळलीय. ती वेंधळी असेल, धांदरट असेल पण खोटारडी नाही. जळकुटी तर मुळीच नाही. मी काय? नक्की नेईन तिला. पण मग मुलींना आजी कुठली?’ झाले का पानीपत! आजीने दोन्ही हात पुढे केले. मुलींना म्हणाली, ‘कुठे चालल्या चिमण्या मला सोडून? कुठ्ठे नै जायचं!’ मुलींना माझ्यापेक्षा आजीचीच सवय ना! मी आठ ते साडेपाच घराबाहेर असायची. उदयांचल हायस्कूल, गोदरेज, विक्रोळीत! त्या धावत आजीस गच्च बिलगल्या. आजी आसवांनी भिजली. मऊ मऊ झाली तसा माझ्या नवऱ्याला धीर आला. तो मजकडे आला. ‘कुठे चाललीस मला सोडून? कुठेही जायचे नाही.’ त्याने माझे मनगट धरले. मीही म्हटलं, ‘बरंऽऽ’

मला तरी कुठे जावेसे वाटत होते त्याला सोडून?

मग ते सारे प्रकरण निवले. केवळ दादामुळे निवले. खरंच! जर मी घर सोडून निघून गेले असते तर? प्रकरण चिघळले असते. आई मुलास म्हणाली असती, ‘हिच्या सारख्या छप्पन मिळतील’. मुली बापाविना छत्रहीन झाल्या असत्या. संसाराचे वस्त्र इतकेही ताणू नये की ते मधोमध फाटेल. मित्रमैत्रिणींनो, त्या रात्री आम्ही मुली झोपल्यावर एकत्र बसलो नि एक ठराव केला.

‘आयुष्यभर एकत्र राहायचे तर मतभिन्नता, वाद, भांडणे होणारच. ती फोडणीपुरतीच असावीत. त्या दिवशीची त्या दिवशीच संपावीत. ती दुसऱ्या दिवशी उकरून काढू नयेत. रात गयी, बात गयी!’

हे तत्त्व मग आम्ही दोघांनी आयुष्यभर कसोशीनं पाळलं आणि जेहेते कालाचे ठायी सुखी झालो. मोकळ्या मनाने ही बात का शेअर केली प्रिय वाचकांनो? भांडणाची कारणं फुसकी असतात. पण आपण राईचा पर्वत रागे रागे करतो. अन् मग संसाराचे तलम वस्त्र फाटते, तुटते…. मुले असतील तर ती एकाकी पडतात. नको हो, नको !

छोट्या गोष्टीतले विसंवाद संसार न मोडोत.

मी खरंच सांगते, माझे सासरे नि सासूबाई शेवटच्या श्वासापर्यंत मजबरोबर होत्या. सासरे ७९ नि सासूबाई ८४ वर्षे अगदी थाटात जगल्या. नि सुनेचा त्यांना अभिमान होता. तेच माझे सर्वात मोठे पारितोषिक!

तुमचे संसार सुखाचे व्हावेत असे मनापासून वाटते म्हणून ही गोष्ट सांगितली बरं! आईच्या मायेनं माझ्या तरुण मित्रमैत्रिणींनो!

माझ्या मुलींनी मजवर निरतिशय माया केलीय. त्यांचा आधार, त्यांची सोबत हे माझ्या जीवनातलं सर्वात मोठं शक्तिवर्धक आहे. त्या दोघींनी प्रेमलग्ने केली. माझी प्राजक्ता भारतात सर्जन झाली. एम. एस. कुशाग्र बुद्धी. कामावर आणि आपल्या पेशावर नितांत श्रद्धा! तिची जे जे मधली ओपीडी फुल्ल असे. प्राजक्ता आणि डॉ. अभिजित एकमेकांच्या प्रेमात पडले नि अभिजितची एम.डी. झाल्यावर त्यांनी लग्न केले. निशिगंधा आणि दिपक देऊलकर व्हील ची जाहिरात करताना एकमेकांस आवडून गेले नि प्राजूचे लग्न होताच निशूही एका महिन्यात निघून गेली. दीपकशी गोव्याला तिचे लग्न मंगेशीच्या साक्षीने मंदिरात लागले.

पण ‘विवाह’ प्रेमाने होवो की दाखवून! तो विवाद, वाजणे, हरणे अशा गोष्टींनी युक्त असतोच असतो. प्रपोज्ड मॅरेजेस आर बेस्ट! का? तेथे हक्क कमी नि समझोता अधिक! ‘लग्नाआधी तू असा नव्हतास!’ हे वाक्य नवऱ्याला ऐकावे लागत नाही. असो, माझी निशू नि दीपक हे इतके भांडत की तिची सासू घाबरून म्हणे, मला वाटतं आता ‘घटस्फोट!’ होणारच… तर दार उघडून हातात हात घालून राजाराणी भेळ आईस्क्रीमसाठी पसार! म्हणजे सारेच ‘अधिक’ प्रेम, राग, मैत्री, सारंच प्रगाढ. निशू म्हणे, ‘अगं प्रत्येक जोडप्याची केमिस्ट्री अलग अलग असते. आमची ज्वालाग्रही आहे’. किती पटेलसे एक्सप्लेनेशन ना! पण त्या दोघांमध्ये इतका प्रगाढ विश्वास आहे की काय बिशाद तिसरा मधे घुसेल!

मित्रांनो, माझी मोठी मुलगी कुशाग्र बुद्धिमत्तेचे वरदान लाभलेली अतिशय ‘रेअर’ पोर आहे. पण तिला कोणीही अकारण अपमान केलेला म्हणून सहन होत नाही. ती स्वतःच इतकी सच्ची आहे ना! परफेक्शनिस्ट आहे. कामसू आहे. त्यामुळे समोरच्याचा भोंगळपणा तिला सहन होत नाही. अभिजित श्रीरामाचा अनन्यभावे सेवक आहे. ती आणि तो दोघंही अत्युच्च शिक्षण घेऊन बसलेत. तीन तीन मेडिकल पोस्टग्रॅज्युएशन पदव्या दोघांजवळही आहेत. त्या प्रदीर्घ परिश्रमांनी मिळतात हे मी डोळ्याने बघितले आहे ना! वयाच्या ३३ वर्षांपर्यंत शिक्षण ! बा बा बा ! पण एकदा समर प्रसंग आला. मुलाच्या मुंजीसाठी दोघे भारतात आले होते. दोघांचे गाडीतच कशावरून तरी भांडण झाले. ते वाढले. कडाक्याचे झाले. ड्रायव्हिंग सीटवर माझी धाकटी ‘निशू’ होती.

अभिजित म्हणाला, ‘तूच सांग. मी चूक का ती चूक. तुला कळतेय ना? सुरुवातीपासून ऐकतेयस ना? समजाव तुझ्या बहिणीला !’

त्यावर निशिगंधा म्हणाली, ‘ती माझी एकुलती एक बहीण आहे. मी येथे जज्जाच्या खुर्चीत नसून सपोर्टरच्या भूमिकेत आहे आणि तो सपोर्ट १०० टक्के माझ्या लाडक्या बहिणीस आहे. इट विल नेव्हर एव्हर डायव्हर्ट एनीव्हेअर एल्स’ तो बघतच राहिला नि म्हणाला, ‘आय विश मला एक तुझ्यासारखी बहीण असती’.

माझा हा जावई अमेरिकेत आणि प्राजक्ता भारतात ऑको सर्जरीत स्पेशलायझेशन करण्याकरिता आलेली. २ वर्षांचा ओजस माझ्याकडे नि प्राजू ‘टाटा’च्या रेसिडेन्सीत. अशी त्री स्थळी यात्रा हा विवाहात अवघड घाट होता. अशा प्रसंगी एक अमेरिकन डॉक्टर मैत्रीण अभिजितला म्हणली, ‘प्राजक्ता दीर्घ काळ भारतात असेल, तर आपण दोघं एकत्र राहू. मला खूप आवडतोस तू. ती आली की मी परतेन’ यावर अभिजित तिला म्हणाला, ‘मी श्रीरामाचा भक्त आहे ग बये.’ ‘म्हणजे?’ (तिला हो काय ठाऊक श्रीराम? ) मग तो म्हणाला ‘आयदर प्राजक्ता ऑर नो वन! डु यू अंडरस्टँड नाऊ?’ हे तिला चांगलेच समजले. मला माझ्या जावयाचे कौतुक वाटले. हे त्याने सांगितल्यावर प्राजू मात्र म्हणाली. ‘मलाही खूप तरुण डॉक्टर्स विचारतात. मी स्पष्ट नकार नोंदवते. अभि, तुझी बायकोही सुंदर, हुशार नि तरुण आहे!’ तर असं हे अजब रसायन. लग्नसंस्था शरीरसंबंधावर टिकते नि विश्वासावर तगते. एकमेकांवर विश्वास ठेवतात नि त्यास जागतात तेव्हा तो यशस्वी होतो. माझ्या लाडक्या तरुण मित्र मैत्रिणींनो तो विश्वास ‘जागवा’ माझ्या शुभेच्छा आणि प्रेमळ आशीर्वाद.

– डॉ. विजया वाड

व्यास क्रिएशन्सच्या कस्तुरी – महिला विशेषांकातून साभार

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..