एका अतिमहत्वाच्या कामासाठी गावी जायचे होते. मुळात गावावरून फोन आला त्यावेळी रात्रीचे साडेअकरा वाजले होते. तरीही मी ओळखीच्या ट्रॅव्हल्समध्ये “सांगली, मिरज, कोल्हापुरला जाणारी एखादी तरी गाडी आहे का?” म्हणून चौकशी केली. पण एकही नव्हती. मग या क्षणाला कशाने जायचे हा गहन प्रश्न होता.
शेवटी इकडे तिकडे खूप फोनाफोनी करून झाल्यावर द्राक्षे मुंबईत पोहोचवून मोकळी परत जाणार्या टेंपोवजा गाडीचा एक जुळून येण्यासारखा पर्याय समोर आला. नकार द्यायचा प्रश्नच नव्हता. मग ती गाडी आमच्या स्टॉपवर रात्रीच्या साधारण साडेबाराला येणार होती. स्टॉप आणि अंगावरच्या कपड्यांच्या खाणाखुणा सांगितल्यामुळे तसल्या अंधारातही ड्रायव्हरने मला बरोबर ओळखले. ओळख वगैरे सांगून त्याच्या बाजूला जरा आरामात बसतच होतो इतक्यात तो सुरु झाला, “आम्ही असं दुसर्या कुणाला घेत नाही. अगदीच ओळखीचा असेल तरच घेतो.”
ड्रायव्हरलोक तिकीटाचे पैसे डायरेक्ट मागता येत नसतील तर असे काहीसे सुरु होतात. त्याला तसा काही प्रॉब्लेम असेल म्हणून मी म्हणालो, “तुमचे जे काही तिकीट असेल ते मी देतो. किती द्यायचे?”
“तसं नाही हो. आजकाल माणसाचं काही खरं नाही. आपण मदत करायला म्हणून जावं तर तेच लुटतात.”
“काय सांगताय?”
माझा अशा गाडीतून प्रवास करण्याचा अनुभव जवळजवळ शुन्य टक्के असल्याचा अंदाज आल्यावर त्याला चेवच आला, “ड्रायविंगमध्ये पण आता राम नाही राहिला. काही खरे नाही. आपण मस्त चांगले चालवू. पण पुढचाच आपल्यावर येऊन धडकल्यावर काय करणार सांगा!” हा माणूस अपघाताच्या वार्ता का करत होता कळायला मार्ग नव्हता. मी आपला आलीया भोगासी म्हणून ऐकून घेत होतो.
“आणि एक गोष्ट आधीच सांगून ठेवतो, पुन्हा सांगितली नाही म्हणाल.”
“काय?”
“आपला जर काही अॅक्सिडेंट झाला आणि चुकून तुम्ही बचावला तर पॅसेंजर नाही म्हणून सांगा.”
“मग?”
“ओळखीचा आहे म्हणायचे. काय आहे, पॅसेंजर आहे म्हटला की विम्याची सगळी रक्कम आमच्याकडून वसूल करतात. अवघड होतं मग ते! गाडी विकून पैसे भरायला लागतात.”
हा माणूस नुसत्या मरायच्या वार्ता करून घाबरवत होता. बर सांगून गुपचुप तर बसेल की नाही, त्याच्या मित्राच्या गाडीला कसा अपघात झाला आणि त्यात तो व सोबत बसलेला कसे जाग्यावरच मेले ती खबर मिडीयासारखी पुन्हा पुन्हा सांगत होता.
ज्या कामाला चाललो होतो ते काम राहिले बाजूलाच आणि या गोष्टीचे टेंशन यायला लागले. कुठून अवदसा सुचली आणि याच्या गाडीने येतो म्हणून सांगितले असे होऊन गेले. मध्येच उतरून बायकोला फोन करून माझ्या कुठल्या कुठल्या पॉलिसी वगैरे आहेत आणि त्याचे पैसे मिळण्यासाठी कुठल्या पॉलिसी एजंटला कॉल करायचा याची माहिती द्यावी असे वाटू लागले.
त्यात त्याच्याच बाजूला बसले असल्याने झोपता येणे शक्य नव्हते. कारण ड्रायव्हरच्या बाजूचा माणूस झोपला तर ड्रायव्हरलाही झोप येते ही एक जागतिक समजूत आहे. मग झोप येत असतानाही डोळे मोठे करून जागे रहायचा प्रयत्न करत होतो. हा मात्र दर अर्ध्या एक तासाने दारुगोळ्यासारखा तंबाखुचा नवीन बार तोंडात भरत होता. त्याच्यासाठी तंबाखू खाल्ल्याने कॅन्सर होतो वगैरे या सगळ्या कल्पणा होत्या. त्याच्यासाठी जागे राहण्याचे तेच एकमेव साधन होते.
एक्सपे्रस हायवेचा रस्ता बाजूला गेल्यावर मी विचारले तर आम्ही जुन्या रस्त्याने जाणार आहेत ही नवीनच माहिती मिळाली. का म्हणून विचारल्यावर अजून तिघेजण आहेत शिवाय टोलही वाचतो! हे लेकाचे टोलचे चारशे रुपये वाचवायला खोपोली मार्गे जाणार्या जुन्या रस्त्याने जातात. जाऊ देत बिचारे! पण बाजूला बसलेल्या भाबड्या लोकांना याच रस्त्याने दरोडेखोर कसे लुटतात तेही सांगतात.
थोड्या अंशी ते खरेही आहे. यांच्याकडे मुंबईवरून परत जाताना कॅश असते म्हणून त्या घाटात लुटालुट होते. गाड्या नाही थांबवल्या तर तिथले दरोडेखोर टायर पेटवून गाडीवर टाकतात आणि पैसे घेऊनच्या घेऊन चांगला चोपही देतात अशी खबर पुरवून हे लोक आपल्या चेहर्याचा उडालेला रंग पहातात की काय कळत नाही.
मग तशा लुटालुटीचा प्रसंग आपल्यावर येऊ नये म्हणून हे चारजण मिळून तिथून जातात. पण मी म्हणतो एवढा जीवावर खेळ करण्यापेक्षा सरळ एक्सप्रेस हायवेने जावे. मी तर त्याला टोलचे पैसेही द्यायला तयार होतो. पण कशाला उगाच, जाऊया की सगळ्यांबरोबर म्हणत त्याने तशीच गाडी दामटली.
दिवसभर ऑफिसमध्ये काम केल्याने मेंदू थकून गेला होता आणि आतून झोपेच्या कमांड्स येत होत्या पण त्याला झुगारून मी सताड उघड्या डोळ्यांनी कुठून हल्ला होतो काय ते पहात बसलो होतो. मध्येच कधीतरी डुलका लागल्यासारखा व्हायचा आणि घाबरून उठल्यावर गाडी चालू आहे हे पाहून बरं वाटायचं.
हा बाबा असा गाडी चालवत होता की मी एकदा झोपलो की उठेन की नाही याची शाश्वती नव्हती. एका ठिकाणी गेल्यावर त्याने गाडी थांबवली आणि उतरा म्हणाला. दरोडेखोरांचे जाऊदे, ह्याचा मला लुटायचा प्लान आहे का ते समजायला मार्ग नव्हता. तसे लुटायला माझ्याकडे काहीच नव्हते हा भाग वेगळा.
मग त्याचे बाकीचे साथीदार येईपर्यंत आम्ही तिथेच थांबलो. ते आल्यावर पुन्हा एक तंबाखुचा राऊंड झाला आणि गाड्या सुटल्या. तो खोपोलीचा घाट पार होईपर्यंत माझ्या जीवात जीव नव्हता. कुठून पेटते टायर येईल याच्यावर माझे लक्ष होते. पण दैव आमच्या बाजूने होते. प्रवासात फक्त स्पीडब्रेकरचा त्रास सोडला तर विषेश असे काही झाले नाही. स्पीडब्रेकरवर गाडीचा वेग कमी करायचा असतो ही शिकवणी त्याने चुकवली होती. हवेत उड्डाण करून जमिनीवर आदळल्यावर तो “काय साले स्पीडब्रेकर बनवतात!” असे म्हणून एक शिवी घालायचा.
त्याने शेवटी एकदाचे मला सांगलीला पोहोचते केले. “असू देत.” म्हणून तिकीटाचे पैसे त्याच्या हातात सरकवत मी त्याच्याबरोबर हस्तांदोलन केले त्यावेळी तो सहज बोलून गेला, “पुन्हा कधीही यायचे असले की सांगा. आपली गाडी चार माहिने आहेच रोज!”
मी त्याला मनातल्या मनात कोपरापासून रामराम केला आणि पुढच्या प्रवासासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये चढलो.
…
— विजय माने
आपण माझ्या इतर कथा आणि लेख खालील लिंकवर वाचू शकता.
https://vijaymane.blog/
Leave a Reply