जुनी हिंदी गाणे मला आवडतात . ‘एक चतुर नार ,करके सिंगार — ‘ पडोसन (१९६८)मधील गाणे , माझ्या आवडत्या गाण्या पैकी एक . हे गाणे माझ्यासाठी ‘मूड सेटर ‘आहे . कधी उदास वाटू लागलं कि मी हे गाणं ऐकतो . एनर्जी मिळते . एकदम फ्रेश होतो . झोपेतून उठल्यावर ,गार पाण्याचा तोंडावर हबका मारल्या सारखा .
या गाण्यामागे एक छानशी आठवण पण आहे . परभणीस मी प्रमोशन वर बदलून आलो होतो . दोन -तीन समान म्हणजे जुन्या गाण्यांची आवड असणारे सहकारी भेटले . मंगेश ,सुभाष ,मुकुंदा ,आणि मी असा बघता बघता एक कंपू जमला . कधी मधी विलास ,दिलीप जॉईन व्हायचे ,पण आम्ही चौघे मात्र नियमित मेम्बर . मग काय ?(यांच्या संगतीतला हा माझा ‘सुवर्ण काळ ‘होता याची जाणीव आत्ता होतीयय ,आम्ही सारेजण विखुरल्यावर !)एखाद्या रविवारी आम्ही सुभ्या कडे (सुभाष तेव्हा सुभ्या ,सुब्बाराव संबोधण्या इतका जवळचा होता , हल्ली सम्पर्कात नाही -रुसलाय !) जमायचो . सुभाष , मंगेश सूर तालाला पक्के . मुकुंदा ठेक्याला ! आमच्या मुकुंदाला ठेका धरायला , पत्र्याचं डबडं , पिठाचा डब्बा , लाकडी टेबल काय पण चालायचं .! मग मंगेश गाण्यात सूर मारायचा ‘एक चतुर नार —‘ सुब्बाराव तयारीतच असायचा ,पुढच्या ओळी अलगत उचलायचा . मुकुंदाच्या हात टेबल बडवण्यात गुंतलेला ! मी सगळ्यात भाग्यवान ,डोळे मिटून हे सर्व कालवून कानाने ‘खायचो ‘,अधाशा सारखा !हे संपलं कि ‘ रामय्या वस्तावया —‘ (हे सुभ्याचे पेट्ट गाणं ),खूप गाणी व्हायची . पेटी नव्हती ,तबला नव्हता ,पण खरे सांगू त्याची कधी आठवण पण व्हायची नाही (–मित्रानो , हम ऊन दिनो अमीर थे ,जब तुम करीब थे !)असो .
विनोदी गाण्यात, या गाण्याला मी माझ्या अखत्यारीत ‘अढळ पदी ,अंबरात ‘ बसवलंय . क्लासिकल संगीतात विनोदी जुगलबंदी ! विरळच !एक कलाकृती म्हणून हे गाणे खूप ‘ कठीण ‘ काम . या गाण्याचे लिरिक्स अफलातून आहे . अहो चक्क अ ,आ, इ, ई —-ची बाराखडी यात फिट केलीयय ! वर –अयो घोडे –नमा नामा –अन काय काय ! शिवाय सिनेमाच्या सिचुएशनला परफेक्ट मॅच आणि कलावंताच्या कॅरेकटरला एकजीव होणारे ! या लिखाणा बद्दल राजेंद्रजीना (राजेंद्र कृष्ण ) सॅल्यूट !
तर अश्या या शब्दाना आपल्या सुरावटीवर पेलणारे , —पेलण कसलं ?अक्षरशः नाचवलंय हो , निस्ता हैबतधुला घातलाय या महाभागांनी , किशोर कुमार ,मन्नाडे आणि मेहमूद ! किशोरकुमार म्हणजे गाणं , विनोद ,अभिनय , सगळा सिनेमाचं अंगी मुरलेला माणूस !, मेहमूद विनोदाचा ‘राक्षस ‘ म्हणण्यास वावगे ठरू नये , आणि मन्नाडे, गाण्याची जाण आणि शास्त्रीय संगीताची बैठक असलेला , दादा ! त्या काळी मन्ना -दा ची तशी दहशतच होती !
विद्यापती -म्हणजे किशोर कुमार, एका लोकल थेटरचा संगीतकार , भोलाला (सुनीलदत्त )पोरगी -‘बिंदू ‘ -(सायराबानू )-पटवायला मदत करायला आलेला भोलाचा मित्र . गाण्याच्या नादापायी पोरीचा ओढा मद्रासी संगीत शिक्षक पिल्लई -मेहमूद -कडे ! भोला आणि पिल्लै यांच्या गाण्याची जुगलबंदी ठरते . भोला अन गाणं म्हणजे बोंबच ! मग भोलाचे गुरु विद्यापती,अशी तोड काढतो कि -भोलाने खिडकीत उभे राहून फक्त ओठ हलवायचे आणि मागे बसून भोलाचे गुरु -किशोर कुमार -पिल्लेच्या -मेहमूदच्या – गाण्याला उत्तर देणार ! हि या गाण्याची सिच्युएशन !या गाण्या नंतर सुनीलदत्त नि आपल्या खाजगी आयुष्यात सुद्धा, किशोर कुमारला ‘गुरु ‘ म्हणूच संबोधिले !अगदी शेवट पर्यंत !
सुनीलदत्त साठी किशोर कुमार आणि मेहमूदसाठी मन्नाडे गातात ,मधेच मेहमूदची वाक्ये आहेत . मेहमूदच्या पिल्लै या पत्राचा मद्रासी हेल मन्नाडेंनी लीलया सांभाळलाय . मन्नाडे तसे ‘हिंदुस्थानी ‘ म्हणजे उत्तर भारतीय संगीतातले ,पण दक्षणात्य लय हि साध्य असल्याचे त्यांनी या गाण्यात सिद्ध केलाय . किशोर कुमार आणि मेहमूद ,जबरदस्त ‘स्क्रीन प्रेझेंस ‘असणारे , तेव्हा यांच्या अभिनयाची ‘जुगलबंदी ‘ –‘सिर्फ देखनेसे तालूख रखती है !’
या गाण्याचे वैशिष्ट्य म्हणलंतर उस्फुर्तता !किशोर कुमार आणि मन्नाडेंनी हे गाणे इतक्या उस्फुर्ततेने गायलंय कि ऐकताना असे वाटते कि आधी हे मंडळ गाऊन गेलंय अन मगच ते लिहून घेतलय ! मन्नाडे सारख्या कसलेल्या गायकाला किशोर कुमार तोडीस तोड गायला आहे . आर .डी .बर्मन (संगीतकार ) यांनी हे गाणे केवळ बारा तासाच्या सरावावर ध्वनिमुद्रित केले आहे ! फायनल रेकॉर्डिंग चालू होती . मन्नडे ‘नाच ना जाने आंगन तेढा ‘हे वाक्य संपवून ,’तेहहSSS डा ‘ ची आवर्तने करत होते . किशोर कुमार अवलिया , गीतरचनेत नसलेले ‘ ओय SS तेढे सीधे हो जा ‘म्हणून मधेच तोंड घातले ! मन्नाडे सगट सगळे सटपटले . आर .डी नि मन्नाडेला कंटिन्यू करण्याची खूण केली आणि सावरून घेतले . गाणं झकास झालं . या गाण्याच्या वेळेस किशोर कुमारचा वारू उधळा होता हे बारीक खरं !
गाण्याच्या शेवटच्या कडव्यांच्या आसपास ‘ताल पे नाचे लंगडी घोडी ‘ या किशोरकुमारच्या वाक्यानंतर , मेहमूदचे ‘चतुर नार ‘ आणि किशोर कुमारचे ‘ आयो SSS घोडे ‘ यांची रस्सीखेच सुरु होते . किशोर कुमार ज्या बेरकी पणे आपले ‘ आयो SSS घोडे ‘ मेहमूदच्या गळ्यात मारतो ते क्षणभर ऐकणाऱ्यालाही चकित करून जाते . मला येथे Tom &Jery च्या एका क्लिप ची आठवण झाली . वात पेटवलेला बॉम्ब टॉम मांजर जेरी उंदराच्या हाती देत ,उंदीर पुन्हा बॉम्ब मांजराला देते , असे हे चालू असताना मधेच डाम्बिस उंदीर तो बॉम्ब मांजराच्या हातून हिसकावून घेते , सवयीने मांजर तो बॉम्ब उंदराकडून हिसकावते चार दोन आवर्तने झाली कि उंदीर मागे हात बांधून उभारते . मांजराला काय झाले कळायच्या आत तो बॉम्ब मांजराच्या हातात फुटतो ! तसेच काहीतरी या गाण्यात घडते ! आपण गंडवले गेल्याचे मेहमूदच्या लक्षात आल्यावर तो वैतागतो . ‘ अरे ,ये घोडा ,चतुर ,घोडा ,चतुर क्या ?एक पे रहेना ! ग्गा ! ‘ मेहमूदच्या आवाजाची लय मन्नाडेंनी मस्त सांभाळी आहे . मेहमूदचे वाक्य आणि मन्नाडेचा आवाज याचा जोड कानाला जाणवत पण नाही .
या गाण्याची प्रेरणा पण इंटरेस्टिंग आहे . याची प्रेरणा आहेत तीन गाणी ! पैकी एक -संत तुलसीदास (१९३९)साठी विष्णुपंत पागनीसांनी गायिलेले –बन चले राम रघु राई . दुसरे आहे — १९४१ साली अशोक कुमारांनी ‘झुला ‘मध्ये चार ओळी गुणगुणल्या होत्या –एक चतुर नार कर कर सिंघार — .’तेव्हा मेहमूद आणि आर .डी .बर्मन खूप तरुण होते . त्यांच्या मनात या ओळींनी घर केले . साधारण वीस वर्षांनी जेव्हा मेहमूदने ‘पडोसन ‘करायला घेतला तेव्हा आर .डी . ला या ओळी घेण्यास सुचवले . आर .डी नि त्या ओळी या गाण्याच्या मुखड्यासाठी उचलल्या आणि बाकी गाणे आपल्या स्टाईलने राजेंद्रजी कडून लिहून घेतले . तिसरे गाणे आहे –जिद्दी (१९४८)मधील — चंदा रे जा रे जा रे . या तिन्ही गाण्यांची झलक ‘चतुर नार –‘मध्ये डोकावते .
जेव्हा मन्नाडेंनी या गाण्याची सिच्युएशन ऐकली तेव्हा त्यांनी गाण्यास नकार दिला होता . कारण एक प्रशिक्षित गायक जुगलबंदीत एका सामान्य अ -प्रशिक्षित गायका कडून मात खातो हे काही हे काही त्यांना पटेना . मागे म्हणजे ‘बसंत बहार ‘ (१९५६ )च्या वेळेस मन्नाडे आणि प. भीमसेन जोशींनी अशीच एक जुगलबंदी गायली होती . मन्नाडे’ बैजू बावरा’ साठी आणि प. भीमसेन जोशी’ तानसेन ‘ या पात्रांसाठी गायले होते . ‘केतकी ,गुलाब ,जुही ,चंपक बन –‘ त्यात तानसेन म्हणजे प. भीमसेन जोशी ,हरतात . स्क्रीन वरील पात्रांच्या हार -जीत मध्ये गायकांनी अडकायचे नसते . याची आठवण मेहमूद आणि आर .डी नि मन्नादांना करून देऊन गाण्यास राजी केले . या गाण्याचे संगीतकार जरी आर .डी . बर्मन असले तरी हे गाणे किशोर कुमारनीच कम्पोज केल्याची कबुली एकदा आर .डी नी दिली होती .
या गाण्याचे अजून एक वैशिष्ट्य सांगण्याजोगे आहे . या गाण्यात चार राग वापरले आहेत ! खाजम ,बिहाग , देस आणि छाया नट हे ते राग , हे गाणे म्हणजे एक राग मालिकाच आहे !
Indiatimes Movies यांनी पाहण्याजोग्या पंचेवीस हिंदी सिनेमाची यादी प्रसिद्ध केली होती , त्यात ‘पडोसन ‘ होता . या सिनेमाची कथा अरुण चौधरी यांच्या पाशेर बारी (Pasher Bari )कथेवर आधारित आहे . या घट्ट बांधणीच्या विनोदी सिनेमाचा शेवट मात्र चटका लावून जातो . सुनीलदत्त आणि सायरा बानूच्या लग्नाचा सोहळा असतो . मांडवाबाहेर लांबलचक पिपाणी वाजवत येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करताना मेहमूद दाखवला आहे . ज्या पंगतीत हाता -तोंडाशी आलेला घास हिरावला जातो ,या दुर्दैवी जीवाला तीच पंगत वाढावी लागतेय ! क्षणभर मेहमूदच्या डोळ्यातील पाणी चमकून जाते . हा क्षण पाहणाऱ्यांचे काळीज फाडून जातो ! जुगलबंदी हरलेला मेहमूद येथे ‘जिंकतो ‘ !
— सु र कुलकर्णी
आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय , पुन्हा भेटूच , Bye