प्रत्येकाला जीवनात, ‘मैत्रीण’ लाभतेच असं नाही.. पूर्वी एकाच वाड्यात, चाळीत अनेक कुटुंबं रहायची.. त्यामुळे समवयस्क मित्र-मैत्रिणी भरपूर असत, त्यांच्या मैत्रीसंबंधावर पालकांचाही विश्र्वास असायचा.. त्यातूनही शाळा, जर मुला-मुलींची एकत्र असेल तर वर्गातील मैत्रीण घरी आल्यावर तिलाही पालक कुटुंबात सामावून घेत असत.
काॅलेजमधील मैत्रिणी हा वर्गात व घरात, चर्चेचा विषय असे. ती जर सहज घरी आली तर तिला घरच्यांकडून, वेगवेगळ्या भूमिकांतून पाहिले जात असे..
लग्न झाल्यावर संपर्कात आलेली मैत्रीण, हा भांडणाचा विषय ठरतो. तिच्या नावापुढे पत्नीकडून, नाही नाही त्या विशेषणांचा पाऊस पडतो..
एवढं असूनदेखील उतारवयात एखाद्या मैत्रिणीची नितांत गरज, प्रत्येक पुरुषाला असतेच.. त्यासंबंधी मांडलेले काही विचार.. तेही काव्यात्मक स्वरुपात..
फक्त एक ‘छान मैत्रीण’ हवी..
४०/५० चीच स्त्री, आता सर्वात ‘तरुण’ असते.. अनुभवांच्या शिदोरीसह ‘बोल्ड’सुद्धा असते..
कुरकुरणाऱ्या गुडघ्यांना ती सहज ‘ॲडजस्ट’ करते.. मुलांबरोबर ती लहान होते, मुलींचीही मैत्रीण होते..
संसारात राहूनही स्वतःचीही ती ‘स्पेस’ जपते.. गाणी, गोष्टी, सिरीयल, नाटक हवं तेव्हा आवर्जून बघते..
हीच स्त्री, खरी ‘स्मार्ट’ म्हणणं वावगं काही ठरणार नाही… बाहेर जाण्यासाठी आता तिला ‘परमीशन’ लागत नाही… लोक
काय म्हणतील, याची ती ‘वरी’ मुळीच करीत नाही..
‘साडी’ आणि ‘सासू’ यावरची चर्चा आता, राहिलेली नसते.. अंगभर दागिन्यांची हौस तर, कधीच फिटलेली असते.. दोन वाट्यांचं मंगळसूत्रच, आता ती मिरवत असते…
जगायचं राहून गेलेलं, ती आता प्रसन्नपणे ‘जगत’ असते… ४०/५० चीच स्त्री, आता सर्वात ‘तरुण’ असते…
देवाला मी आज निवांत पाहिलं आणि लगेचच एक फूल वाहिलं.. देवानं मला हसून विचारलं, ‘सांग मला, तुझ्या मनात खूप दिवसांतून ‘साठलेलं’..’
‘देवा, मला दुसरं काही नको.. हवं तर कोऱ्या कागदावर माझी तू सही घे.. मला एक छान ‘मैत्रीण’ दे, हवं तर अजून दुसरं.. हे फुल घे..’
दिसायला ती छान नसली तरी चालेल.. पण बोलायला, ती छान असायला हवी.. डोळ्यांनी सुंदर नसली तरी चालेल, पण ‘नजरेनं’ ती बोलणारी हवी..
केस तिचे लांब नसले तरी चालतील.. पण सोबत तिची, क्षितिजापर्यंत हवी… ती माझ्या दुःखात, रडली नाही तरी चालेल.. फक्त माझ्या सुखात, थोडी तरी हसणारी हवी..
माझी व्यथा ती ऐकणार नसली तरी चालेल, मात्र तिची ‘कविता’ मी कान देऊन ऐकेन.. सांगणं आणि ऐकणं याच्याही पलीकडचं हे नातं, गप्प राहिलं तरी, ‘मन’ समजून घेत असेल..
यातलेही काही, कमी असेल तरीही मला चालेल.. मात्र एक छान ‘मैत्रीण’ द्यायला तुला कधी जमेल?..’
‘मैत्रीण’ हा एक अत्यंत जिव्हाळ्याचा विषय, व्हाॅटसअपवर माझ्या वाचनात आला.. मला आवडला म्हणून.. माझ्या लेखनशैलीतून, आपल्यापुढे सादर केला…
— सुरेश नावडकर.
२९-३-२२.
Leave a Reply