चाळीस वर्षांपूर्वी मी ‘वासु-सपनाला’ पाहिलं.. नुकताच मी काॅलेज पूर्ण करुन बाहेर पडलो होतो. रास्ता पेठेतील ‘अपोलो’ टाॅकीजला ‘एक दुजे के लिये’ लागला होता. त्या चित्रपटाची वर्तमानपत्रात आलेली परिक्षणं मी वाचत होतो. काही दिवसांनी तो चित्रपट पाहून आत्महत्या करणाऱ्या प्रेमी युगुलांच्या एकापाठोपाठ एक अशा धक्कादायक बातम्या येऊ लागल्या.
एखादा चित्रपट पाहून मनावर इतक परिणाम होऊ शकतो? यावर माझा विश्वासच बसेना… त्यासाठी मी हा चित्रपट टाॅकीजमध्ये जाऊन एकदाचा पाहून घेतला…
अडीच तासांचा तो चित्रपट पाहून माझंही डोकं ‘सुन्न’ झालं.. हा चित्रपट सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रेक्षकाला दुसरा काही विचारच करु देत नाही. तो त्या वासु-सपनाच्या प्रेमात, सुख-दुःखात नकळत सामील होतो. त्याला शेवटपर्यंत वाटत रहातं की, सर्व अडथळे दूर होऊन, दोघांचं मीलन व्हावं.. मात्र तसं होत नाही.. ते दोघंही शेवटी आत्महत्या करतात.. चित्रपट पाहून बाहेर पडणाऱ्या सर्वसामान्य प्रेक्षकाच्या मनाला ही ‘चुटपुट’ दीर्घकाळ लागून रहाते.. मात्र जे प्रेमात पडून असफल झाले आहेत, त्यांना वासु-सपनाचा पराकोटीचा निर्णय योग्य वाटतो व ते आत्महत्येचा मार्ग अवलंबतात.. या चित्रपटामुळे भारतभर अशा शेकडो दुःखद घटना घडलेल्या आहेत…
या सर्वोत्तम चित्रपटाचे श्रेय जाते, ते या चित्रपटाच्या पटकथेला! ही पटकथा लिहिली होती, के. बालचंदर यांनी! के. बालचंदर हे या चित्रपटाचे दिग्दर्शक व पटकथा लेखक होते. व्यवसायाने अकौंटट असलेला हा माणूस भाव-भावनांचा अचूक ताळेबंद मांडणारा यशस्वी लेखक व दिग्दर्शक झाला. यापूर्वी त्यांनी मेहमूदला घेऊन ‘लाखों में एक’, ‘मै सुंदर हूॅं’ अशा काही हिंदी चित्रपटांचे लेखन व दिग्दर्शन केले होते. त्यांच्याच तेलगु चित्रपटाचा हा हिंदी ‘रिमेक’ होता. के. बालचंदर यांना फिल्मफेअरचे एकूण तेरा पुरस्कार मिळालेले आहेत. नऊवेळा राष्ट्रीय पुरस्कार, पद्मश्री पुरस्कार व चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कारही मिळालेला आहे.
या चित्रपटाला फिल्मफेअरची तेरा नामांकनं मिळाली होती, प्रत्यक्षात तीन पुरस्कार मिळाले. त्यातील पहिला पुरस्कार होता.. सर्वोत्कृष्ट पटकथेला, दुसरा सर्वोत्कृष्ट संकलनाचा आणि तिसरा आनंद बक्षींना, ‘तेरे मेरे बीच में’ या सर्वोत्तम गीतासाठी!! याशिवाय एस.पी. बालसुब्रम्हण्यम यांनी हिंदी चित्रपटासाठी गायलेल्या त्यांच्या पहिल्याच गीताला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
चित्रपटाची कथा, ही फिल्मी नाही, तर वास्तव वाटते. तेलगु युवक व पंजाबी तरुणी गोव्याच्या पार्श्र्वभूमीवर एकमेकांच्या प्रेमात पडतात. दोघांच्याही घरातून विरोध होतो. एक वर्षासाठी दोघांनी एकमेकांपासून दूर रहाण्याच्या अटीवर, दोन्ही कुटुंबात तह होतो. वर्ष संपेपर्यंत अनेक नाट्यपूर्ण घटना घडतात व सपनाचा भाऊ भाडोत्री गुंडांकडून वासुला मारहाण करतो. सपनावर अत्याचार झाल्यावर दोघे एकमेकांना भेटतात व आत्महत्येचा मार्ग अवलंबतात…
रती अग्निहोत्रीने वयाच्या दहाव्या वर्षापासून माॅडेलिंग केलेले आहे. तिचं ध्येय चित्रपटात काम करण्याचं होतंच.. सुरुवातीला सुमारे वीस तेलगु, मल्याळम, कन्नड चित्रपटात काम केल्यानंतर तिचं हिंदीतलं हे पदार्पण, या अजरामर चित्रपटानं झालं. एखादी नायिका, एखाद्या चित्रपटासाठीच जन्माला येते, हे अगदी खरं आहे! तशी रती, या ‘एक दुजे के लिये’ साठीच जन्माला आलेली असावी. या चित्रपटात तिचा अंत होतो, हे देखील क्षणभर खरंच वाटतं..
त्यामुळेच तिचे नंतर आलेले चित्रपट मी पाहिले नाहीत. रतीने पुढे सदतीस वर्षे, २०१६ पर्यंत हिंदी, तेलगु, कन्नड, बंगाली, इंग्रजी चित्रपटांतून काम केलेलं आहे. १९८५ ला तिनं विरवानीशी लग्न केलं. तीस वर्षांनंतर ते वेगळे झाले. आज ती एका मुलासह बहिणी समवेत परदेशात रहाते.
चाळीस वर्षांनंतर, आत्ताच्या पिढीने जर हा चित्रपट पाहिला तर त्यांच्या मनात नैराश्याने असा आत्महत्येचा विचार कदापिही येणार नाही.. कारण सध्याच्या पिढीमध्ये दोघांत, फक्त ‘ब्रेकअप’ होतो.. काही दिवसांतच तिची जागा ‘दुसरी’ किंवा त्याची जागा ‘दुसरा’ घेतो.. थोडक्यात, आपल्या पिढीतील हा चित्रपट ‘एक दुजे के लिये’ होता.. ‘एक, दुसरे के लिये’ नव्हता…
हा चित्रपट पाहिल्यानंतर गोव्याला जाणाऱ्या प्रत्येकाला ‘दोना पावला’ येथील हे पुतळे पाहिले की, ‘वासु सपना’ची तीव्रतेने आठवण होतेच…
© सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
९-८-२१.
Leave a Reply