नवीन लेखन...

एक डल्गोना कॉफी अशीही

“त्यांचं गेल्यावर्षीच लग्न झालं होतं .नवदांपत्याचे सुरवातीचे दोनेक महिने मस्त मजेचे गेले पण नंतर मात्र दोघेही आपापल्या कामात व्यस्त झाले . दोघंही ऑफिस आणि घर या जबाबदाऱ्यांमध्ये अगदी गुरफटून गेले. तसे ते अगदी कॉलेजपासून ओळखत होते एकमेकांना पण त्यांची मनं मात्र नवरा-बायको म्हणून , अजून म्हणावी तशी गुंतली नव्हती . कारण असं काही नव्हतं ; पण फक्त दोघांचाच संसार…… आणि त्यात वेळ देऊ शकत नव्हते एकमेकांना…

मधल्या काळात जगभरातल्या सगळ्या घडामोडींमुळे सगळ्यांवरच ही घरी राहण्याची परिस्थिती ओढवली . त्यातले सुद्धा काही दिवस work from home मध्ये गेले . इतके दिवस बाकी ऑफिस बंद असल्याने आता work load ही कमी झालं होतं . आताशा जरा कुठे एकमेकांबरोबर निवांत वेळ घालवता येईल अशी आशा निर्माण झाली होती . मनसोक्त झोप , सोशल मीडिया , TV , laptop ,वाचन , पिक्चर यात बराचसा वेळ जातच होता तसा त्यामुळे एकांत असुनही निवांतपणा नव्हता.

त्यातच आज त्यांची “पहिली वहिली Anniversary”. दोघांनीही त्यासाठी आधी खूप मनसुबे रचले होते. फिरायला कुठे जायचं , डिनरला कुठे जायचं , शॉपिंग कुठल्या दुकानात करायचं , गिफ्ट काय द्यायचं ; सगळं सगळं ठरवलं होतं पण सद्य परस्थितीत हे काहीच शक्य नव्हतं . घरीच राहण्यावाचून पर्यायच नव्हता . त्यामुळे मग घरच्या घरीच celebrate करायचं ठरवलं . सुग्रण असलेल्या तिच्या हातचे एकसेएक पदार्थ खाऊन , आराम करून दुपार नंतरच्या Tea Time ला कधीनव्हे ते दोघं छान गप्पा मारत बसले एकदम निवांत बोलता बोलता ठरलं की आज “चहा नको” , काहीतरी वेगळं-हटके करूया Anniversary Special … कायम लक्षात राहील असं काहीतरी . तेवढ्यात तिला मोबाईलवर कुठलासा मेसेज आला तिनी तो सहज बघितला आणि एकदम खुशीत म्हणाली .

“ए SSS चल … Dalgona Coffee करूया ??????” .. तो ही लगेच “हो” म्हणाला लग्नाला जेमतेम एक वर्षच झाल्याने लगेच एकमत होण्याचा कालावधी होता त्यांचा . “अरे पण करायची कशी ??” … ती म्हणाली … “त्यात काय ?? बघू net वर”…असं म्हणत तो लगेच “गुगलला” आणि ती “युट्यूबली” . options म्हणून चार पाच video बघून त्यातला एक Follow करायचं “तिच्याच एकमताने” ठरलं

ती लगेच कामाला लागली . २ चमचे साखर , कॉफी आणि गरम पाणी घालून ब्लेंडरनी फेटायला लागली . थोड्यावेळानी तिचे हात दुखायला लागले म्हणून कॉफी फेटण्याची जबाबदारी त्यानी उचलली. दोघेही याचा अगदी मनमुराद आनंद घेत होते . बोले तो Full to Enjoy…. ब्लेंडर फिरवता फिरवता तो एकदम खुदकन स्वतःशीच हसला … हरवलेलं काहीतरी गवसल्यासारखा . . त्याची ही अदा बघून फिदा होत तिनी लगेच विचारलंच .. का रे …असा मध्येच गोड का हसलास ??

तो म्हणाला . गंमत आहे !! कधी कधी कुठली छोटी गोष्ट आपल्याला काय काय शिकवून जाते … म्हणजे रे ???. ती कुतूहलाने ऐकू लागली बघ ना !!., आता ही साखर आणि कॉफी म्हणजे आपण दोघं आणि हे ढवळणं चालू आहे ते आपले कॉलेजचे एक एक दिवस . आपली ओळख होऊन छान मैत्री होईपर्यंतची प्रक्रिया … आणि हे मिश्रण तयार होतंय न ; ती आपली मैत्री … आणि बघ ; जसजसा काळ पुढे जातोय तसं हे मिश्रण म्हणजे आपली मैत्री कशी दृढ होत गेली ते!!” तो ते घट्ट आणि क्रीमी झालेलं मिश्रण दाखवत हे सांगत होता आणि तीही तितक्याच तन्मयतेने ऐकत होती.

जुने दिवस , तेव्हाच्या गमती जमती ,लपून छपून भेटी , propose चा दिवस , घरच्यांच्या प्रतिक्रिया , मित्रमैत्रीणींच चिडवणं हे सगळं तिच्या नजरेसमोर तरळत होतं …आणि त्या सगळ्या आठवणीत ती मनोमन रमली होती … या सगळ्यात तो दुधाचं पातेलं घ्यायला फ्रीजपाशी कधी गेला ते तिला समजलंच नाही

एका ग्लासात दुध ओतत तो पुढे बोलू लागला .. “बघ ते तयार केलेलं मगाचचं मिश्रण म्हणजे आपलं लग्नाआधीचं मैत्रीचं घट्ट नातं आणि आता हे पाऊण ग्लास दुध म्हणजे आपलं लग्नानंतरचं नवरा-बायकोचं नातं जे या दुधाप्रमाणेच पातळ , विरळ आणि… हे sssss असं थोडसं दोलायमान !!!” हिंद्काळणारा ग्लास टेबलपर्यंत सांभाळून आणत आणत तो बोलत होता ..

“आता या डालगोना कॉफी ची पुढची कृती म्हणजे हे घट्ट मिश्रण या ग्लासमधल्या दुधावर अलगद ठेवणे !! . म्हणजेच आपला लग्नाचा दिवस” . अगदी हळुवारपणे ते कॉफीचं मिश्रण दुधावर ठेवत ठेवत तो म्हणाला . “हे बघ , आपल्या लग्नाआधीच्या घट्ट मैत्रीच्या नात्याला आणि लग्नानंतरच्या नवरा-बायकोच्या नात्याला एकत्र आणण्याचा हा दिवस . म्हणजे “लग्न” . आता अजून एक गंमत अशी कीलग्नाच्या दिवशी कसे आपले मेकअप करून छानछान फोटो काढतात आणि नंतर सगळ्यांना कौतुकानी दाखवतात , अगदी तसंच या कॉफीची सुद्धा ही फोटो काढायची Stage”

दोन रंगाच्या दोन थरांची सुंदर कॉफी तयार झाली होती आणि तो एकीकडे फोटोशूट करत होता पण ती मात्र मंत्रमुग्ध होऊन त्याचं बोलणं ऐकत होती .. “just see the fun now . लग्नाच्या फोटो सारखेच एकदा ह्या दोन layer च्या नटवलेल्या कॉफीचे फोटो सोशल मीडिया वर टाकले की पुढे त्याचं काय होतं ??? …. ह्याच्याशी बाकी जगाला नंतर काही घेणं देणं नसतं … आता आपली जबाबदारी सुरु लग्नाआधी आणि नंतरच्या अशा दोन्ही नात्यांना म्हणजेच या कॉफी च्या दोन्ही layer ना आपण आपल्या सहवासानी , दोघांनीही एकत्र होत , एकमेकांना समजून घेत याला एकरूप करायचंय” … चमच्यानी ढवळत ढवळत एकीकडे तो व्यक्त होत होता . आपसूकच “मम” म्हंटल्यासारखा तिचा हात त्याच्या हाताकडे वळला . दोघांनीही एकत्र ढवळत….कॉफीच्या दोन्ही थरांची सरमिसळ करत , दोन्ही नात्यांना एकसंध , “”एकजीव”” केलं होतं अगदी नकळतपणे !!! .दोन्ही नाती एकत्र होत एक नवीन नातं तयार झालं होतं “मैत्रीपूर्ण नवरा-बायकोचं नातं “
गेले अनेक महिने जे राहून गेलं होतं ते अनाहूतपणे घडून गेलं होतं तेही अगदी लग्नाच्या वाढदिवशी आणि निमित्त ठरली होती एक Dalgona Coffee..

©️ क्षितिज दाते.

ठाणे.

Avatar
About क्षितिज दाते , ठाणे 79 Articles
केवळ एक हौस म्हणून लिखाण सुरू केलं . वेगवेगळ्या विषयांवर पण साध्या सोप्या भाषेत लेखन . आकाशवाणीवरील कार्यक्रमात काही लेखांचं प्रसारण झालं आहे .काही लेख/कथा पॉडकास्ट स्वरूपात देखील प्रसारित झाल्या आहेत . Snovel या वेबसाईट / App वर "सहज सुचलं म्हणून" या शीर्षकाखाली तुम्ही ते पॉडकास्ट ऐकू शकता.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..