१)आयुष्यातील सगळी गणितं निव्वळ बेरीज,वजाबाकी,गुणाकार आणि भागाकार यांच्या मदतीने सुटत नाहीत वा उत्तराबद्दल ठाम भाकीत करता येत नाही.या गणिताचं संपूर्ण ज्ञान आणि भरपूर सराव काही हमखास उत्तरं मिळवण्याचा मार्ग नव्हे.शेवटी नियतीनं तिच्यापाशी राखून ठेवलेला एक हाच्चा सगळी गणितं सोडवीत असतो . आणि याच हाच्च्याचा ज्याला अर्थ कळला त्याला आयुष्यभर गणिताची भीती उरत नाही.— गणित हा सरावाचा विषय आहे.एकदा विशिष्ट प्रकारच्या गणिताला सोडविण्याची रीत कळली नि तशी भरपूर गणित सोडविण्याचा सराव केला कि परीक्षेतील शंभर पैकी शंभर गुणांची बेजमी झालीच म्हणून समजा….पण आयुष्यातलं गणित हे कुणालाच न कळलेलं कोडं आहे….इथं काही भाग्यवंताना ते सुटलेले असते…पण ते इतरांना समजावून देण्यात त्यांना यश येईलचं याची शाश्वती नाही….किंबहुना ते त्यांना सुटलेले आहे याचा भास होत असावा….काही भाबड्याना या सुटलेल्या कोड्याची खबर होत नाही …ते पुन्हा पुन्हा पाप – पुण्याचा ताळा करीत बसतात…प्रत्येकाला आपल्यापेक्षा शेजाऱ्याचे प्रश्न…कोडी सोपी वाटतात…शेजारच्या घरातील तोळाभर आनंदाचे ओझे त्याला स्वत:च्या मणभर दु:खापेक्षा जड होत असते…पूर्वी पावकी…निमकी..मुखोदगत असणाऱ्या जमान्यात स्वत:ची गणितं स्वत:च सोडविण्यास फार जिकिरी कधीच होत नव्हती…पण या कलियुगात … जिथं आजची तारीख विचारली तर मनगटावरल्या घड्याळाला विचारलं जातं … तिथं सगळ्याच सोप्या सोप्या पायऱ्यावर कुठल्या ना कुठल्या कुबड्यांची मदत अपरिहार्य ठरत आलीय…वास्तविक अशा परावलंबी वृत्तीने माणसाची प्रतिकारशक्ती…विचारशक्ती…नि स्व-गुण …कौशल्य…ओळखायची…जोपासायची सवय लुप्त झाली आहे…कायम साखळदंडात बांधला गेलेल्या सर्कशीतील हत्तीला जसं साखळदंडातून मुक्त केलं तरी मुक्त होण्यासाठी त्याचा पाय उचलत नाही …तसं आपलं होतं…शिक्षणामुळे माणूस सुशिक्षित झाला पण सुसंस्कृत झाला असं म्हणायला काही जीभ रेटत नाही…कारण सुशिक्षितपणा आणि सुसंस्कृतपणा या दोन वेगळया गोष्टी आहेत…या दोन गोष्टींपैकी पहिल्या गोष्टीचा केवळ अभ्यासाशी नि दुसऱ्या गोष्टीचा नेक संवादाशी संबंध आहे .भूकेपुरते खाणे ही झाली प्रकृती….भुकेपेक्षा जादा खाणे ही झाली विकृती….नि स्वत:च्या चतकोर भाकरीतला नितकोर तुकडा कुणा भुकेल्या प्राण्यास देणे ही झाली संस्कृती…आणि ह्याच संस्कृतीचा वारसा आपल्या पिढ्यांनी चालवावा असं म्हणणे हीच नाही का माणसाची माणूस म्हणून ओळख
१७.०४.२०१३