माणूस आयुष्यभर कमाईसाठी मरत असतो.यासाठी आयुष्यभर शरीराचे हाल करून पैसा कमवितो…नि म्हातारपणी तो मिळविलेला पैसा शरीराच्या देखभाल दुरुस्तीसाठी खर्च करतो…शेवटी गोळाबेरीज करताना हाती उरतं एक मोठ्ठ शून्य….माणूस आयुष्यभर असा जगतो कि तो कधी मरणारच नाही….नि असा मरतो कि जो कधी आयुष्यभर जगलाच नाही.माणसाला जगण्याच्या या चेष्टयेपायी पावलो पावली कितीक मरण यातना सोसाव्या लागत असल्या तरी त्याचा चिरंजीव होण्यासाठीचा हव्यास काही कमी होत नाही..तिसरी कसम सिनेमातील गाणं … खुदाके पास जाना है..न हाथी है ना घोडा है वहा पैदलही जाना है त्याच्या गावी कधी उतरलेलं नसतं …..आपल्या स्वत:च्या कैफात वहावत जाताना त्याला दोन्ही किनाऱ्यावर मागे पडत जाणाऱ्या आपल्या हळव्या – भाबड्या – तरल – मुलायम – सानुल्या – आठवांच्या पाऊलखुणा ओळखता येत नाहीत…त्याला त्यावेळी पुढे धावणाऱ्या पाण्याच्या वेग भुरळ घालत असतो… कसलेच विधिनिषेध न पाळता त्याचा चाललेला हा कमाईचा अश्वमेध अडवायला कुठलेही लव- कुश येत नाहीत..अंधाऱ्या काळोखात आयुष्यभर चाललेला त्याचा सुखाच्या काळ्या मांजराचा शोध काही त्या कमाईच्या बळावर कधीच होणार नसतो…कारण एक तर शोध घ्यायचा ती वस्तू अनभिज्ञ नि तिच्या प्राप्तीसाठी सेतू बनून मदतीस येईल म्हणून केलेली ती कमाई त्या त्या वेळी चलनातून बाद होऊन गेलेली असते…आपण एवढंच उमजले पाहिजे कि प्रत्येक कमाईच्या चलनाची व्यवहारीक किंमत क्षणा-क्षणाला बदलत जाणारी असते…परंतु ज्या कमाईची भले व्यवहारीक किंमत शून्य असू दे…पण जिचं मूल्य कालातीत ..नि स्थळनिरपेक्ष शाश्वत आणि व्यक्ती निरपेक्ष आहे अश्या कमाईचा आग्रह असावा…तरी ईश्वरानं एक बरं केलंय कि pendrive मधून इथली जंगम- स्थावर मालमत्ता आपल्यासोबत वरती घेऊन जाण्याची सुविधा ठेवली नाही..नाहीतर या माणूस नावाच्या प्राण्यानं किती धुडगूस घातला असता याचा नेम नाही…विधात्याची लीला किती अबोध आहे बघा..माझ्या मते माणसाची खरी कमाई काय – तर तो गेल्यानंतर त्याच्या अंत्यविधीला त्याच्यावरील प्रेमापोटी जमलेला जमाव.परंतु ही खरी कमाई पाहायला तो हजर नसतो.शेवटचा दीस गोड व्हावा म्हणून सारा अट्टाहास ….आयुष्याचा डाव मोडल्यावर सगळेच मोहरे एकाच साडेतीन हात लांबीच्या खड्ड्यात विसावून जाणारे असतात.आणि हा डाव कधी मोडणार याचा सांगावा काही आगाऊ येत नसतो.आणि तीच तर खरी मज्जा आहे —
— रजनीकान्त
१९/०४/२०१३…