प्रिय भारत,
काय बर आहे ना? नाही म्हटलं तुझा वाढदिवस जवळ येतोय म्हणून म्हटलं थोडी विचारपुस करावी तुझी. काय आहे या सोशल मिडिया नसलेल्या जमान्यात तु स्वतंत्र झालास पण आता याच सोशल मिडियावर तुझ्याबद्दल काही लिहीलं नाही तर एक वेगळाच शिक्का बसण्याची भिती असते रे.
(अहं तुझी नव्हे, तुलाही माहित आहे कोणाची ते)
तुझा वाढदिवस असला कि एक वेगळाच आनंद असतो आम्हाला. पण या आनंदावरही कधी कधी विरजण पडु लागतं रे जेव्हा तुझ्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येलाच…” दिल्लीत भूकेमुळे ३ लहान मुलींचा मृत्यू” असं काही कानी पडलं की. माहित नाही का पण हिम्मत होत नाही रे माझी असं काही ऐकण्याची. तु कसं सहन करतो रे हे सगळं?
मला नाही वाटत तुलाही हे सहन होत असेल. तुलाही वाटत असेल ओरडावं आपणही इथल्या बहीऱ्या झालेल्या सरकारच्या कानठळ्या बसाव्या इतकं. तुलाही वाटतच असेल ना त्या लेकरांसाठी आवाज उठवावा?
म्हणजे बघ ना पंतप्रधानांच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापासुन अगदी १०-१५ किलोमीटर अंतरावर असलेल्या एका घरात खायला काही नसल्यामुळे कोणाचा मृत्यू होतो, तर कधी कधी मृतदेह न्यायला इथे कधी कोणाला सरकारी रूग्णवाहिका मिळत नाही. का होत असेल रे हे असं?
तु तोच आहेस ना रे जो दुसऱ्या देशांंनाही कृषीची निर्यात करतो? तु तोच आहेस ना ज्याची १८% साक्षरता होती १९४७ मध्ये आणि आता ७४% च्या आसपास पोहोचलास तु . कुठे गेली रे मग ही साक्षरता? अर्थात शिक्षणाने साक्षरता येते पण सुशिक्षित प्रगल्भता येत नाही त्याला तु तरी काय करणार म्हणा.
काय दोष काय होता रे त्या लहान बाळांचा की तुझ्या कुशीत असतानाही त्यांचा फक्त भुकेमुळे मृत्यू व्हावा? ” त्या बाळांच्या पोटात अन्नाचा एकही कण नव्हता” असं ऐकुन तुलाही त्या रात्री जेवण गेलं नसणार हेही कळतयं रे मला.
इच्छाच होत नाहीये रे काही बोलण्याची. पण काय करणार हे ऐकुन मन अगदी सुन्न झालयं. म्हणून हे थोडसं बोलुन गेलोय. आणि हो काही चुकलं असेल तर मोठ्या मनाने माफ कर.!!!
तुझाच,
( नाव सांगणंं गरजेचचं आहे का? )
© समाधान आहेर
७२७६८१७६७१
Leave a Reply