लोकसंख्या हा भारत देशाच्या दृष्टीने गेल्या काही वर्षांत खुप मोठा चिंतेचा विषय बनला आहे. लोकसंख्येच्या बाबतीत जगात द्वितीय क्रमांकावर असलेला हा देश लवकरच चीनलाही पाठीमागे टाकेल अशी शक्यता विविध माध्यमांकडून वर्तवली जात आहे.
सार्वजनिक व्यवस्थेवर येणारा ताण, सरकारी यंत्रणांपुढे लागणाऱ्या रांगा, नैसर्गिक साधन संपत्तीची पुरेशी उपलब्धता अशा अनेक मुद्द्यांवर लोकसंख्या वाढीचे परिणाम आपण रोज बघत आहोत. या सर्व यंत्रणा वरील ताण कमी करण्यासाठी प्रशासन “एक किंवा दोन बस” अशा प्रबोधन पर जाहिरातींमधून लोकसंख्या नियंत्रणाचा प्रयत्न करत आहे. या जाहिरातीला सकारात्मक प्रतिसाद देऊन बहुतांश जनमानस हे मागील काही वर्षांत एक कुटुंब एक मूल या विचारधारेकडे वळताना दिसत आहे.
एकच मूल जन्माला घालून त्याचे व्यवस्थित पालन पोषण करून राहणीमानाचा दर्जा उंचावण्याचा प्रयत्न त्या मुलाच्या पालकांकडून केला जात आहे.
राहणीमानाचा दर्जा ज्याला इंग्रजीमध्ये आपण “standard of living” म्हणतोत. मुलांच्या सुख सोयीचा विचार करणे यात खरे तर चूक काहीच नाही. जे आपल्याला मिळाले नाही ते आपल्या मुलांना मिळावे अशी प्रत्येक आई-वडिलांची नैसर्गिक अपेक्षा असते. मग सर्व सुख सोयी मिळवण्यासाठी बहुतांश कुटुंबात आई आणि वडील असे हे दोघेही जण जॉब करताना दिसतात. आपल्या मुलाला कुठल्याही सुखसोयी कमी पडू नये म्हणून बहुतांश पालकांची दुसरे मूल जन्माला घालण्याची देखील तयारी नाहीये. दुसरे मुल जन्माला घातले तर सहाजिकच खर्च वाढणार आणि राहणीमानाचा दर्जा खालावणार हे त्यामधील एक साधे आणि सरळ गणित असते.
मागची पिढी जेव्हा हा विचार करते की जे आपल्याला मिळाले नाही ते पुढच्या पिढीला मिळावे तेव्हा कळत नकळत एक विचार दुर्लक्षित होतोय की जे आपल्या पिढीला मिळाले आहे ते पण पुढच्या पिढीला अवश्य मिळावे. आई-वडिलांना त्यांच्या लहानपणी जर बहीण-भावांचा सहवास मिळाला असेल तर तो सहवास त्यांच्या मुलांना मिळावा असे वाटत नाही का?
गेल्या काही दशकात आपण एकत्र कुटुंब पद्धती कडून अलिप्त कुटुंब पद्धतीकडे वळालो. आता अलिप्त कुटुंब पद्धतीत देखील छोटेखानी कुटुंबाला प्राधान्य आहे. काळानुसार हा बदल घडताना भौतिक सुख सोयी वाढत आहेत आणि घरातील माणसांचा संवाद कमी होत आहे. आई, वडील आणि मुल अशा तीन माणसांच्या छोटेखानी कुटुंबात जर आई आणि वडील सतत बाहेर व्यस्त असतील तर त्या मुलाने संवाद साधायचा कोणाशी?
भौतिक सुख सोयी जर वाढणार असतील तर आई वडीलां व्यतिरिक्त घरातील मुलाला इतर कुठल्याच नात्यांची गरज नाही ही विचारधारा १००% बरोबर आहे का? आज एक अशी पिढी जन्माला येत आहे ज्या पिढीला सख्ख्या बहिण-भावाचे किंवा भावा भावांचे नातेच माहीत नसणार आहे. अशा अजुन एक किंवा दोन पिढ्या जर जन्माला आल्या तर या नाते संबंधाना जोडून ठेवणारे सणांचे महत्व देखील नामशेष होण्यास वेळ लागणार नाही. भावा – बहिणीच्या नात्यांचे महत्व सांगणारा रक्षाबंधन सण दोन ते तीन पिढ्या नंतर अबाधित राहील का? बहिणीच्या लग्नात भावजीचा कान पिळायला म्हेवणा उपस्थित असेल का?
प्रश्न फक्त नात्यांच्या उत्सवाचा नाही तर अजून पण बऱ्याच गोष्टींचा आहे. त्यापलीकडे जाऊन अजून काही गोष्टींचा विचार व्हायला हवा. आपण आयुष्यात सर्वच गोष्टी आई-वडिलांसोबत मोकळे पणाने बोलू शकतो का? काही अशा पण गोष्टी असतात ज्या भावा बहिणी सोबत बोलू शकतोत पण आई-वडिलांसोबत बोलू शकत नाही. पण आज किती घरात मुलांना आई-वडिलां व्यतिरिक्त भावना व्यक्त करण्यासाठी हक्काचे नाते उपलब्ध आहे?
एका मुलाचे पालन-पोषण व्यवस्थित व्हावे म्हणून आई वडिलांची काटकसर नेमकी दुसऱ्या मुलाच्या जन्माच्या बाबतीत होत आहे. पण काटकसर करण्याचे इतरही अनेक पर्याय उपलब्ध आहेत. आणि भौतिक सुखसोयी सांभाळून देखील ही काटकसर करता येऊ शकते. पण त्या आधी स्टॅंडर्ड ऑफ लिव्हिंग ची व्याख्या ज्याने त्याने आपल्या सुज्ञ बुद्धीने ठरवणे गरजेचे आहे. मोठे घर, मोठी गाडी, मोठा टीवी, ब्रँडेड कपडे म्हणजेच फक्त स्टॅंडर्ड ऑफ लिव्हिंग का? स्टॅंडर्ड ऑफ लिव्हिंग ची उंची गाठताना आपण उडी परिघाच्या आत मारत आहोत की बाहेर हा विचार ज्याचा त्याने करायचा.
ज्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती मुळातच हलाखीची आहे, मुलाला जन्म देणाऱ्या स्त्रीची तब्येत साथ देणारी नसेल तिथे एक कुटुंब एक मूल ही विचारधारा निसर्गतः क्रमप्राप्त आहे. परंतु जिथे रक्ताची नाती वाढवणे सहज शक्य असते तिथे देखील आज नात्यांपेक्षा भौतिक सुखांची उंची वाढवण्याचा प्रयत्न होताना दिसतो. शेवटी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे की परीघ सुख सोयींचा वाढवायचा की घरातील रक्ताच्या नात्यांचा??
लेखक : राहुल बोर्डे
Leave a Reply