पेपर मध्ये वाचले होते की पालक आणि शाळा यात चांगले संबंध नाहीत असे घडलेल्या बातम्या छापून आल्यावर मला वाटतं की असे का व्हावे. आणि दोघांच्या वादात मुलांना काय वाटेल ते कुणीही विचार करत नाही. मुलांना पालक व शाळा दोन्ही गोष्टी बद्दल खूप प्रेम असते. लळा जिव्हाळा असतो. मध्यंतरी एका पोस्ट मध्ये वाचले होते की शाळेत पालकांनी येऊन आपल्या मागण्या पूर्ण करण्यात याव्यात असे वाटते म्हणून ते येतात तेव्हा काही तरी घडून जाते तेव्हा ते वाचून .मन खूपच अस्वस्थ झाले. यावर मी काय बोलणार. माझा काळ बदलला आहे….
माझ्या शाळेत एक बाई..दोन मुलांची मावशी होत्या. रोज मधल्या सुट्टीत आपल्या भाच्यांना डबे आणून द्यायच्या ती मुले मित्रा सोबत डबा खाऊन झाल्यावर मावशीला देऊन घंटा वाजली की वर्गात जायचे. पण या बाई तिथेच शाळा सुटेपर्यंत मैदानावर मातीत बसून रहायच्या. मी त्यांना इथे बसण्याचे कारण विचारले असता त्या म्हणाल्या होत्या की घर लांब आहे. सकाळी त्यांचे वडिल सोडून जातात. काळजी वाटते आणि तसेही घरी बसायचे ते इथे बसते. काही चुकले असल्यास सांगा मी जाईन घरी परत येईन. मी म्हणाले हो तुमचे चुकलेच आहे चला माझ्या सोबत. त्यांना घेऊन मी शाळेत आले. त्यामुळे त्या खूप घाबरल्या होत्या. आणि शाळेच्या आतील बाजूस असलेल्या पॅसेज मध्ये एका खुर्चीवर बसवले व सांगितले की आता रोज इथेच बसायचे. बाहेर नाही.एवढी मोठी शाळा आहे आणि तुम्हा सर्व पालकांची आहे असे असताना बाहेर मैदानावर बसलात हे चुकले आहे म्हणून इथेच बसायचे रोज. त्यामुळे त्यांना खूप आनंद झाला पण अप्रुप वाटले व मलाही..
एखादेवेळी मंडईतील भाज्या वगैरे घेऊन एखादे पालक घरी जाताना माझ्या शाळेतील शिक्षक सायकलीवर जाताना पाहिले की ते सायकलीवरून खाली उतरून त्या पालकांना म्हणायचे की मी तुमची पिशवी घरी नेऊन देतो जाता जाता. तुम्ही या निवांतपणे. पालक कितीही नको नको म्हणत असतानाही. आणि एखाद्या वेळी बायका म्हणजे पालक मुलांची आई. आणि त्याच वेळी एखादी शिक्षिका पायी जात असताना दिसल्या की रिक्षात जात असताना अचानक पणे रिक्षा थांबवून विद्यार्थ्यांच्या आईस घरापर्यंत सोडून मगच घरी जायच्या. मग ते बाजारात असो की बसमध्ये असो पालक आणि शिक्षक यांचे संबंध जिव्हाळ्याचे आदराचे होते. भले त्यांची मुले कॉलेज मध्ये जात असतानाही हेच नाते होते.
अशा वातावरणात माझी शाळा होती म्हणून आता हे सगळे वाचताना किंवा ऐकून मनात कुठेतरी खंत आहे. आणि हे पूर्वीच्या काळी पण असेच होते ना. गुरुकुल मध्ये गुरुगृही गेल्या वर शिक्षकांच्या हातात मुले सोपवून पालक निर्धास्त असत. तर गुरु म्हणजे आईवडील मग आत्ताच असे का व्हावे. असो कालाय तस्मै नमः तरीही आतून मनापासून वाटते की पालक. मुले व शाळा यांच्यातील संबंध जिव्हाळ्याचे. आपुलकीचे व आदराचे असेच वातावरण निर्माण झाले तर मुलांचे भविष्य उज्ज्वल आहे..
माझ्या सर्व पालक व शिक्षकांना खूप खूप धन्यवाद.
–सौ. कुमुद ढवळेकर.
Leave a Reply