त्या वेळी फक्त दूरदर्शन होते. तेही जेमतेम चार तास. त्यामुळे आज दिसणारी इतर मराठी आणि हिंदी चॅनेल्स आणि त्यावर होणाऱ्या झी सारेगमप आणि इंडियन आयडॉलसारख्या संगीत स्पर्धा त्यावेळी अस्तित्वातच नव्हत्या. आज या गोष्टीचे आश्चर्य वाटेल कदाचित. पण १९८० साली ही वस्तुस्थिती होती. त्यामुळे संगीतामध्ये पुढे येण्यासाठी धडपडणाऱ्या माझ्यासारख्या मुलामुलींना आंतरमहाविद्यालयीन गायन स्पर्धा हाच पर्याय उपलब्ध होता. सायन मेडिकल कॉलेजमध्ये शिकत असलेल्या डॉ. महादेव भिडे आणि डॉ. मुकुल आचार्य या माझ्या मित्रांनी त्या कॉलेजमध्ये आयोजित होणाऱ्या अश्वमेध या स्पर्धेबद्दल सांगितले आणि त्या स्पर्धेत मी भाग घ्यावा असा आग्रहही केला. आमच्या कॉलेजतर्फे मी या स्पर्धेत गाण्यासाठी गेलो. ही स्पर्धा माझ्या पुढील आयुष्यात किती मोठे परिवर्तन आणणार आहे याची पुसटशी कल्पनादेखील त्यावेळी मला नव्हती. स्पर्धा बरीच मोठी होती. जवळजवळ 142 गायक-गायिका या स्पर्धेत गाण्यासाठी आले होते. या स्पर्धे चे एक परीक्षक होते संगीतकार श्रीकांत ठाकरे. सुप्रसिद्ध गायिका शोभाताई गुर्टू यांनी त्यांच्या गायलेल्या ‘उघड्या पुन्हा जहाल्या जखमा उरातल्या’ ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ यासारख्या गझलांचा मी फॅन होतो. त्या आणि सुमारास सौ. मानसी कणेकर या गायिका गझल शिकवण्यासाठी माझ्या घरी येत असत. श्रीकांतजींना परीक्षक म्हणून पाहिल्यावर मी या स्पर्धेत एक गझल गाण्याचा धाडसी निर्णय घेतला. स्पर्धा सकाळी 9.30 वाजता सुरू झाली. माझा गाण्याचा क्रम दुपारी सुमारे 12 वाजता लागला. मी रंगमंचावर गाण्यासाठी बसलो. गझलच्या सुरवातीला दोन ओळींचा एक शेर पेश केला आणि आता गझल सुरू करणार तोच सभागृहातील वीज गेली. त्यामुळे दिवे आणि मुख्यतः साऊंड सिस्टिम बंद पडली. दोन मिनीटे मी स्टेजवरच बसून राहिलो. इतक्यात तो बंद पडलेला वीजपुरवठा परत सुरू झाला आणि परीक्षकांनी मला पुन्हा गाण्याची खूण केली. मधल्या दोन मिनिटात मी त्या शेरची वेगळी चाल मनात बांधून ठेवली होती. तेव्हा पुन्हा संधी मिळताच मी त्या सुरवातीच्या शेरच्या दोन ओळी निराळ्या चालीत पेश केल्या आणि गझलला सुरवात केली. आयत्या वेळच्या माझ्या प्रयोगामुळे मला भरपूर टाळ्या मिळाल्या आणि मी आनंदात गझल पूर्ण करून रंगमंचावरून उतरलो. स्पर्धा पूर्ण झाल्यावर निकाल जाहीर करण्यासाठी श्रीकांत ठाकरे रंगमंचावर आले. मला बक्षीस मिळणार अशी मला आशा होती. एकूण पाच बक्षिसे होती. ठाकरेसाहेबांनी शेवटून नावे जाहीर करायला सुरुवात केली. पाच-चार-तीन-दोन. नावे जाहीर झाली. पण मला बक्षीस नव्हते. हार्मोनियमची साथ करणाऱ्या विवेक दातारकडे मी प्रश्नार्थक मुद्रेने पाहिले. तोच श्रीकांतजीचे शब्द माझ्या कानावर पडले. ‘या स्पर्धेच्या पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक मी त्या मुलाला देत आहे, ज्याने आयत्यावेळी गाण्यात खंड पडल्यावरही त्याचा फायदा घेऊन गझलच्या आधीचा शेर निराळ्या चालीत सादर केला. अनिरुद्ध जोशी.’ मला अतिशय आनंद झाला. आज माझ्या आवडत्या आणि नावाजलेल्या संगीतकारांच्या हस्ते मला पारितोषिक मिळणार होते. श्रीकांतजींनी माझे अभिनंदन केले. माझी विचारपूसही केली आणि त्यांच्या घरी गाणे ऐकवण्यासाठी येण्याचे निमंत्रण दिले. हे त्यांचे निमंत्रण माझे आजचे सगळ्यात मोठे पारितोषिक होते.
– अनिरुद्ध जोशी
Leave a Reply