जगातील प्रत्येक जण आपल्या जीवनात त्याच्या आवडीनुसार काही ना काही छंद जोपासतोच. त्या छंदाला जर योग्य खतपाणी मिळाले तर त्याचा विशाल वटवृक्ष होतो व त्या सावलीत अनेक उत्सुक वाटसरु रममाण होतात.
पुण्यातील बाजीराव रोडवरील राजा दिनकर केळकर संग्रहालय हे एक प्रेक्षणीय स्थळ आहे. मी शाळेत असताना ते पाहिले होते. पुण्याला भेट देण्याऱ्या पर्यटकांसाठी ‘पुणे दर्शन’च्या स्थळांमध्येही त्याचा समावेश झालेला आहे.
पूर्वी लक्ष्मी रोडला एलआयसी बिल्डींगच्या जागेवर एक संग्रहालय होतं, ते आता घोले रोडवर स्थलांतरित झालंय. वर्दळीच्या जागेत असताना ते पाहण्यासाठी गर्दी असायची. आता घोले रोडला त्या संग्रहालयाकडे सहसा कोणी फिरकतही नाही.
संग्रहालयात आपल्याला दुर्मीळ वस्तू, कागदपत्रे, जुन्या गोष्टी पहायला मिळतात. त्या गोष्टी पाहून आपल्याला आनंद होतो, त्याचे श्रेय त्या संग्राहकाला जाते. त्याच्या अथक परिश्रमातून ते संग्रहालय उभे राहिलेले असते.
असंच सिने बुकलेट्स, पोस्टर्सचं संग्रहालय उभं करण्याचं एका अस्सल पुणेकरांचं ‘स्वप्न’ होतं. त्यासाठी त्यानं खूप प्रयत्न केला मात्र त्याचं ते ‘स्वप्न’ शेवटपर्यंत अपुरंच राहिलं…त्या अवलियाचं नाव होतं… नारायण फडके!
माझं बालपण सदाशिव पेठेत गेलं. त्या वेळी उंबऱ्या गणपती चौकात नारायण फडकेंना न्यूज पेपर्सची विक्री करताना पाहिल्याचं मला चांगलं आठवतंय. सहा फूट उंचीचे, अंगात चेक्सचा हाफ शर्ट व खाली डार्क रंगाची पॅन्ट, पायात चपला असे फडके भारदस्त दिसायचे.
आम्ही नाटक, चित्रपटांच्या जाहिराती करण्यास सुरुवात केली. तेव्हा नारायण फडके, गोखले हाॅल जवळील एम. आर. जोशी यांच्या दुकानात काम करीत होते. जाहिराती केल्यानंतर चित्रपटाच्या प्रिमियरला आलेल्या कलाकारांच्या स्वाक्षऱ्या घ्यायला आलेले नारायण फडके आम्हाला नेहमीच भेटायचे. कधी मनोरंजन, पुणे च्या आॅफिसमध्ये मोहन कुलकर्णीला भेटायला आलेले दिसायचे. त्यांना ध्यास असायचा तो चित्रपटांच्या बुकलेट्सचा! त्यासाठी कुठेही, कुणालाही भेटण्यासाठी ते वेळात वेळ काढून जात असत…
९ आॅक्टोबर १९३७ रोजी नारायण फडके यांचा पुण्यात जन्म झाला. उंबऱ्या गणपती समोर त्यांचा वडिलोपार्जित फडके वाडा होता. त्यांच्या आजीचा त्यांच्यावर प्रभाव होता. माणसं जोडणे, नाती टिकविणे हे त्यांच्यावर लहानपणापासून संस्कार झालेले होते. काव्य, शास्त्र, विनोद, कला, साहित्य या गोष्टींचं घरात कौतुक होतं. त्यातूनच नारायणला पहिला छंद जडला तो स्वाक्षरी संग्रह करण्याचा. पहिली स्वाक्षरी घेतली, ती स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची! नंतर विनोदी लेखक चिं. वि. जोशी यांची. अशाप्रकारे असंख्य नामवंतांना, कलाकारांना, संशोधकांना, साहित्यिकांना भेटून ते स्वाक्षरी घेत राहिले. चार हजारांहून अधिक स्वाक्षऱ्या त्यांच्या संग्रही जमल्या. प्रत्येक स्वाक्षरीमागचा किस्सा, तो संग्रह दाखवताना ते आवर्जून ऐकवायचे. त्या बाबतीत त्यांची स्मरणशक्ती वादातीत होती.
त्यांच्या संग्रहात साडे आठ हजार बुकलेट्स होती. त्याची सुरुवात झाली ती ‘लाखाची गोष्ट’ या मराठी चित्रपटापासून. त्यावेळी हा चित्रपट भानुविलाल थिएटरमध्ये लागला होता. थिएटरचे मालक व्ही. व्ही. बापट यांनी नारायण फडकेंना अनेक मराठी चित्रपटांची बुकलेट्स मिळवून दिली.
पुण्यातील त्या काळातील प्रभात, विजय, हिंद विजय (नटराज), ग्लोब (श्रीनाथ), डेक्कन, मिनर्व्हा अशा टाॅकीजवर नारायणराव फेऱ्या मारायचे, थिएटर मालकांना, चित्रपट निर्मात्यांना भेटून बुकलेट्स मागायचे. अशा अथक परिश्रमानंतर त्यांचा संग्रह वाढत गेला. १९८० सालापर्यंत मराठी चित्रपटांची असंख्य बुकलेट्स जमविल्यानंतर त्यांनी हिंदी चित्रपटांच्या बुकलेट्सचा संग्रह करण्यास सुरुवात केली. त्यासाठी मुंबईला जाणे सुरु केले. मुंबईला जाऊन अनेक स्टुडिओंचे, नाझ बिल्डींगमधील चित्रपट वितरकांचे उंबरे झिजविले, तेव्हा कुठे त्यांना यश मिळू लागले. या छंदासाठी त्यांना वेळ, पैसा आणि श्रम खर्ची करावे लागले.
हिंदी बुकलेट्ससाठी फडकेंनी आधी पुण्यातून एल. व्ही. प्रसाद, ताराचंद बडजात्या, रामानंद सागर, होमी वाडिया यांच्याशी पत्रव्यवहार केला, त्याला फारसा प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी मुंबई गाठली. तेव्हा ‘मेहबूब’ स्टुडिओच्या मालकाने फडकेंना लागलीच बुकलेट्स न देता पुण्याला पाठवून देतो, असे सांगून खरोखरच दोन दिवसांनी तो खजिना पाठवून दिला.
एका मुंबईच्या फेरीत ते फिअरलेस नादियाला प्रत्यक्ष भेटले. तिच्यासमवेत फोटो काढून घेतला. तिनेही त्यांना तिच्या काळातील फोटो व बुकलेट्स दिली. आर्टिस्ट श्रीकांत धोंगडे, स्व. भाई भगत, कुंदा भगत, किरण शांताराम यांनी त्यांच्या संग्रहात भर घालण्यासाठी अनमोल सहकार्य केले.
नारायण फडके असंख्य मान्यवरांना, नामवंतांना लेखी पत्राच्या स्वरुपात आठवणीने वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवीत असत. उलट टपाली त्या व्यक्तींचे हस्ताक्षरातील धन्यवादचे उत्तर येत असे. अशा पत्रांचा त्यांच्याकडे संग्रह होता. त्यामध्ये भारताचे सर्व पंतप्रधान, राष्ट्रपती, मुख्यमंत्री, राज्यपाल, अमिताभ बच्चन, मदर तेरेसा इत्यादींचा समावेश आहे.
आमचा त्यांच्याशी सुमारे अडतीस वर्षे संपर्क होता. कधी ते आमच्या आॅफिसवर यायचे. गप्पा मारताना दोन तास सहज निघून जायचे. आम्हाला कधी त्यांनी दुकाना समोरुन जाताना पाहिलं तर बोलावून घ्यायचे. नवीन संग्रहात आलेली बुकलेट्स दाखवायचे. मान्यवरांसोबत काढलेले फोटो दाखवून ‘ओळखा, कोण आहेत हे’ असं कोडं घालायचे. नाही ओळखू शकलो तर, हसून त्या व्यक्तीचं फक्त नावच नाही तर त्यांच्याबद्दलची विशेष माहिती सांगायचे. त्यांच्या संग्रहात अनेक बुकलेट्स, पुस्तकं, मासिकं, वार्षिकं, दुर्मीळ फोटो पाहिले आहेत. दोन तास झाले तरी तिथून आमचा पाय निघत नसे.
त्यांच्या या दुकानात अनेक चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ, लेखक, कवी, साहित्यिक, छांदिष्ट बसलेले पाहिले आहेत. जगदीश खेबुडकरांना मी त्यांच्याकडे पाहिलं आहे. कुणाला संदर्भासाठी बुकलेट्स, पुस्तकं हवी असतील तर ते देत होते. त्याबाबतीत त्यांनी सहकार्याची वृत्ती ठेवली होती.
या त्यांच्या योगदानाबद्दल दूरदर्शनवरील ‘सुरभि’ या कार्यक्रमात सिद्धार्थ काक व रेणुका शहाणे यांनी त्यांची विशेष मुलाखत घेतली होती. बुकलेट्सच्या संग्रहाबद्दल ‘लिम्का’ बुक्स आॅफ रेकाॅर्ड मध्ये त्यांची नोंद झाली आहे. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने त्यांना ‘चित्रकर्मी’ पुरस्कार देऊन गौरविले आहे.
२०१७ च्या अखेरीस ते थकल्यासारखे जाणवत होते. वयाची ८० गाठताना जीवनाच्या धावपळीत नारायण फडके आजारी दिसू लागले. भेटल्यावर संग्रहाबद्दल बोलायचे, हा संग्रह सरकारने संग्रहालय करुन जपून ठेवावा, अशी त्यांची इच्छा होती. तसं झालं असतं तर त्यांच्या मागे त्यांचं नाव राहिलं असतं. संग्रहालयाच्या बाबतीत त्यांना आश्वासने भरपूर मिळाली. मात्र प्रत्यक्षात काहीच घडले नाही. शेवटी त्यांनी हा संग्रह राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला द्यायचा शेवटचा पर्याय ठेवला होता. मात्र ते देखील झाले नाही…
३ जानेवारी २०१८ रोजी नारायण फडके अनंतात विलीन झाले. त्यांचं ‘सिने संग्रहालया’चं स्वप्नं अपुरं राहिलं…
आजच्या ‘जागतिक संग्रहालय दिनी’ नारायण फडके सारख्या ‘ना भुतो, ना भविष्यती’ सिने संग्राहकास विनम्र अभिवादन!!
© – सुरेश नावडकर १८-५-२०२१
मोबाईल ९७३००३४२८४
या रचनेचे सर्वाधिकार रचयिता © सुरेश नावडकर यांच्याकडेच आहेत
Leave a Reply