ही गोष्ट आहे नाटकवेड्या ठाणे शहरातल्या एका नाटकवेड्या मुलीची. मो. ह. विद्यालय, जोशी-बेडेकर महाविद्यालय या संस्थांमधून शिक्षण चालू असताना नाटक या प्रकाराने अनेकदा मोहात पाडलं. कधी स्पर्धेच्या निमित्ताने, कधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने तर कधी गडकरी रंगायतनच्या वास्तूने. आधी शिक्षण, पदवी, मग काय ती ‘नाटकं’ करा अशा शिक्षकी पेशातल्या संस्कारित घरातली मी कलावंत. विरोधासाठी विरोध नाही, पण शिक्षणाने कलेला उजाळा मिळतो या विचारधारेवर पोसलेलं माझं घर. स्पष्ट, स्वच्छ विचार देणाऱ्या घरातले माझे वडील मात्र अखंड नाट्यप्रेमात बुडालेले. नोकरीने हायकोर्ट रजिस्टार, पण मनाने मराठी नाटकाला वाहिलेले. आमच्या घरात जशी अन्य पुस्तके असत, पाठ्यपुस्तकं असत, तशीच नाट्यलेखकांच्या वाक्यांच्या वह्याही असत. एकेक नाटक 50-50 वेळा पाहणारे माझे वडील सदाशिव जोगळेकर ऊर्फ वसंता, हा एक असा नाटकप्रेमी माणूस होता की जो मराठी लेखकांवर नितांत प्रेम करून आम्हालाही त्याचं वेड लावू पाहत होता. त्यामुळे शिक्षणाबरोबरच आमच्या एकांकिका, वक्तृत्व, नृत्य याला भरभरून प्रोत्साहन मिळायचं.
मी ठाण्यात जन्मले हे माझं अहोभाग्य. कारण मला कलाकार न होण्याला एकही कारण ठाण्याकडे नव्हतं, उलट ही कलावंत कशी होत नाही हे पाहणारेच अवतीभवती होते. कथ्थक नृत्यगुरू डॉ. राजकुमार केतकर. अगदी हाकेच्या अंतरावर यांचे नृत्यवर्ग. गडकरी रंगायतनसारखी वास्तू दोन मिनिटांच्या अंतरावर आणि कलासरगम, मित्रसहयोग यांसारख्या नाट्यसंस्था संधी द्यायला उत्सुक. बालनाट्य, राज्यनाट्य, एकांकिका स्पर्धा यासाठी प्रचंड तयारी करून घेणारे उदय सबनीस, नरेंद्र बेडेकर, सुहास डोंगरे, प्रा. विजय जोशी, प्रा. अशोक बागवे, अशोक साठे, अशोक समेळ, दिलीप पातकर, शशी जोशी, मामा पेंडसे इत्यादी रंगकर्मी अवतीभवती. हळूहळू नाटकाच्या तालमीची एक झिंग चढायला लागली. नाटक ही एक अभ्यासपूर्ण करायची ‘चळवळ’ आहे हाच मुळी पहिला संस्कार या सर्व मंडळींनी केला. अतिशय हुशार, चळवळी, अभ्यासू आणि मेहनती मंडळींनाच डोळ्यासमोर सतत वावरताना पाहिलं असेल, तर संवेदनशील संपदा का नाही अभिनेत्री, दिग्दर्शिका होणार! कोणत्याही गोष्टीचे फाजील लाड या मंडळींनी केले नाहीत. मुख्य म्हणजे चांगल्या घरातल्या मुलींना एक सुरक्षित वातावरण या ठिकाणी मिळायचं. त्याचा फायदा असा झाला की या नाट्यक्षेत्राबद्दल जे काही शेरे, अफवा पसरायच्या त्यामुळे मी कधीच डळमळले नाही. कष्ट आणि अभ्यास करणाऱ्या गुणीजनांचं हे क्षेत्र आहे ही गोष्ट ठामपणे मनात नोंदवली व बिंबवली गेली.
मला वाटतं मला आठवतो तो काळ 1980 ते 95 हा दूरदर्शनच्या अतिरेकी प्रभावाने, मोबाईल, नेट, व्हॉट्सॲप, फेसबुक या कशानेही गिळलेला नव्हता. स्वत:ची नोकरी, अभ्यास करून व भरपूर वेळ स्वतच्या विचारांना फुलवण्यासाठी मिळायचा. अशा काळातले हे विधायक उद्योग होते. तोच सुवर्णकाळ आम्हाला आमच्या क्षेत्रात पाय घट्ट रोवून उभं राहायला कारणीभूत आहे.
आज नाट्यसंमेलनाची भूमी ‘ठाणे’ शहर ठरत आहे ती अगदी योग्य भूमी वाटते. रंगभूमीचा कणन् कण ठाण्याच्या मंडळींनी अनुभवलाय व अनुभवतायत. सत्यनारायणाची पूजादेखील बांधताना दिशा व ती जागा पवित्र, निर्मळ, स्वच्छ पाहून घेतो. या वर्षीचे नाट्यसंमेलनही अशाच निर्मळ जागी संपन्न होणार आहे, याचा एक रंगकर्मी म्हणून अभिमान वाटतो.
अभिनयाची कार्यशाळा असा काही प्रकार नसतो, तेव्हा या अशा प्रकारच्या संस्था जणू नाटकं बसवून कार्यशाळाच घडवत होत्या. पैशाची वारेमाप अपेक्षा नव्हती किंवा पैसा कमावण्याचा तो ‘प्लॅटफॉर्म’ नव्हता. अशा प्रकारे केवळ आणि केवळ अभिनयातून व्यक्त होण्याचा खळाळता उत्साह होता. त्यामुळे पाच वर्षांच्या मुलांना अभिनयाचे अतिरेकी पंख लावण्याचा अट्टहास नव्हता. पालकांची फसवणूक नव्हती. कोणताही एक विचार आणि आकृतिबंध घडवण्याची विचारबैठकच तेव्हा मिळत गेली. एखाद्या नाट्यकृतीला लागणाऱ्या प्रॉपर्टीपासून, कपड्यांपर्यंत, सेटमधल्या सोफा खुर्चीपासून गाण्यासाठीचा टेपरेकॉर्डर इथपर्यंत प्रत्येकाची खारीची जबाबदारी त्यात ओतलेली असायची. त्यातच कित्येकांची लग्ने जमली, मित्रमैत्रिणी घट्ट झाले, कुणी क्वचित शत्रूसुद्धा झाले. पण हे सर्व वैचारिक पातळीवर. राजकारणाचा अघोरी फड या संस्था झाल्या नाहीत.
61व्या साहित्य संमेलनालादेखील यजमान संस्थांमध्ये माझी कलासरगम संस्था होती. तेव्हा तर पाहुण्यांना आणणे, पोचवणे, चहापाणी, जेवणखाण, आलेल्या दूरदूरच्या साहित्यप्रेमींची निवासव्यवस्था, रांगोळी, मंडप या सर्व जबाबदारी निभावतानाही जणू नेतृत्वगुण शिकायला मिळाले. आता जेव्हा ‘सोबत – संगत’, ‘किमयागार’, ‘तिन्हीसांज’ या नाटकाचे दिग्दर्शन करते, तेव्हा या सगळ्या अनुभवातून शिकलेल्या गोष्टीच तर मी वापरते. कॉस्च्युम डिझायनरने चुकून जरी मला सांगितले की ड्रेसला हे बटण नाही लावता येत, तेव्हा हातात सुई-दोरा घेऊन ‘कसं नाही शक्य होत? हे बघ असं करायचं’ हे ठामपणे सांगताना या माझ्या भूतकाळाच्या FDज् मी मोडत असते.‘फिक्स डिपॉझिट’ हो! मॅच्युरिटी नंतर फायदा होतो तसंच काहीसं म्हणा ना!
— संपदा जोगळेकर – कुलकर्णी.
साभार: ठाणे रंगयात्रा २०१६.
Leave a Reply