त्यावेळी आता सारखे मोबाईल वगैरे नव्हते. असते तर किती बरं झालं असतं. विजयच्या कुटुंबाकडे बऱ्यापैकी पैसे आल्यावर त्यांनी पहिल्यांदा चैनीची म्हणता यावी अशी गोष्ट घेतली असेल तर ती म्हणजे टेलिफोन.त्या टेलिफोनवर विजयला तीनच मुलींचे फोन यायचे एक रश्मी, दोन निलिमा आणि तीन मेनका.मेनका बद्दल नंतर सांगू आधी शर्मिलाचं सांगतो. त्या शर्मिला पर्यत आपलं प्रेम पोहचवायच तर विजयकडे दोनच मार्ग होते. एक तिच्या समोर उभं राहून फेस टू फेस सांगणं आणि दुसरं प्रेमपत्र लिहिणं! पहिला मार्ग वापरायचा तर वाघाचं काळीज हवं होतं, ते विजयकडे नेमकं या बाबतीत नव्हतं! म्हणूनचं तो आजही अविवाहित आहे.
विजयने दुसरा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला. आणि एक प्रेमपत्र लिहायला घेतलं. म्हणजे त्याच्या आयुष्यातील पहिलं आणि शेवटचं प्रेमपत्र लिहायला घेतलं. ते प्रेमपत्र हजार शब्दांचं होतं. त्या पत्राच्या शेवटी त्याने त्याच्या आयुष्यातील पहिली कविताही लिहिली होती. ते पत्र जर त्याने शर्मिलाला दिले असते तर ती नाही म्हणणं अश्यक्य होतं. ते पत्र तिला द्यायला विजयला काही मुहूर्त भेटत नव्हता. त्यात विजयला तिचे नवनवीन मजनू जन्माला आलेले आणि तिने जन्माला घातलेले दिसत होते. त्यात विजयच्या खबऱ्याने विजयला अशी बातमी दिली की एक दिवस तिच्या हातातील बॅग तिच्या हातातून चुकून खाली पडली तर त्यात निरोधची पाकिटे होती म्हणे! हे सारे ऐकल्यावर विजयच्या प्रेमाचा कापूर झाला आणि जळून धुव्वा झाला. तरीही त्याचं तिच्यावरील प्रेम काही कमी झालं नव्हतं. पण आता तो तिच्यासाठी वेडापिसा नव्हता.
विजयकडे जरा पैसे आल्यावर तो बरा राहू लागल्यामुळे काही तरुणी त्याला भाव देऊ लागल्या होत्या. त्यामुळे शर्मिला त्याच्या आयुष्यातून वजा होत गेली. पण एक दिवस शर्मिलाने रश्मीकडे विजयची चौकशी केली असता ती शर्मिलाला म्हणाली, ” त्याला तुझी सगळी लफडी माहीत आहेत. तू त्याच्या भानगडीत पडू नकोस. आणि तिने हे विजयला सांगितल्यावर विजयने कपाळाला हात लावला. पण विजयची तिच्याशी एकदातरी मनमोकळेपणाने बोलण्याची सुप्त इच्छा होतीच ती कशीही असली तरी.. पण रश्मीच्या अति शहाणपणामुळेच विजयने ती संधी गमावली होती.
आता एक मराठी अभिनेत्री तिच्यासारखी दिसते. ती फक्त तिच्यासारखी दिसते म्हणून तो तिच्या मालिका बघतो. काही वर्षांपूर्वी तिने प्रेमविवाह केला. आणि ती तिच्या संसारात रमली. विजयही रमला त्याच्या प्रेमप्रकरणात. पण जेव्हां जेव्हां प्रेमपत्र हा शब्द कानावर येतो तेव्हां तेंव्हा विजयला शर्मिलाची आठवण येतेच.
आणखी एका गोष्टीसाठी तो तिचे ऋण मानतो ती गोष्ट म्हणजे त्याच्यातील कवीला तिने जन्माला घातले होते. ती त्याच्यातील कवीची जन्मदाती होती. त्यामुळे जोपर्यत विजय मध्ये कवी जिवंत आहे तोपर्यंत त्याच्या मनात शर्मिलाची आठवणही जिवंत राहील. पण एक तिच्या इतकी अष्टपैलू स्त्री विजयच्या आयुष्यात पुन्हा आली नाही कारण ज्या दिसायला खूप सुंदर होत्या त्या मेंदूने ढ! होत्या. आणि ज्या खूप हुशार होत्या त्या अभ्यास सोडून इतर बाबतीत खूप हुशार होत्या. अनामिका दिसायला खूप सुंदर होती. अभ्यासातही बरी होती. पण विचारांनी मात्र ढ! होती.
दिसायला सुंदर, अभ्यासात हुशार आणि विचारांनी प्रगल्भ असणारी अशी विजयच्या आयुष्यात एकच मुलगी आली होती ती म्हणजे निलिमा! विजय निलिमा सोबत असताना इतर मुली नुसत्या वळून वळून पहायच्या! बस मधील एक प्रसंग आठवून विजयला आजही हसू येतं. एक दिवस विजयला बस स्टॉपवर निलिमा भेटली. तिने मस्तपैकी त्यावेळी खूपच आधुनिक म्हणावा असा पोशाख परिधान केला होता. जीन्स आणि शर्ट त्यात ती आजच्या भाषेत खूपच हॉट दिसत होती. विजयला ती भेटताच विजयच्या तिच्यासोबत हसत गप्पा सुरु झाल्या पण त्याचवेळी विजय ज्या मुलींना भाव द्यायचा अशा दोन चार मुली त्या बस स्टॉपवर उभ्या होत्या. त्याही दिसायला खूप सुंदर होत्या पण घरगुती होत्या. त्यावेळी आजच्या सारखी लेडीज सीट वगैरे भानगड नव्हती. आजकाल तर कधी – कधी नवऱ्यालाही बसमध्ये बायकोच्या बाजूला बसता येत नाही. ती आणि विजय बसमध्ये चढले. साधारणत: विजयचा अनुभव होता की मुलगा मुलगी बसमध्ये चढल्यावर मुलगी खिडकीवर बसते कारण कोणी ओळखीचं भेटल्यास असं चित्र निर्माण व्हावं की तो मुलगा तिच्या बाजूला बसला होता. येथे निलिमा इतकी बिनधास्त होती की तिने विजयला खिडकीवर बसविले आणि स्वतः त्याच्या बाजूला बसून तिकीट काढली. त्या मुली त्यांच्यात काय संवाद होतो हे ऐकण्यासाठी त्यांच्या मागच्या पुढच्या सीटवर बसल्या! आणि त्यांच्यात गप्पा सुरु झाल्या.
गप्पांचा विषय विजयचा मित्र सुनिल हा होता. सुनिल आजही विजयचा चांगला मित्र आहे. काही दिवसांपूर्वीच एका एकांकिके बद्दल त्यांच्यात चर्चा झाली होती. निलिमाने कधीच विजयला त्याच्या लग्नाबद्दल अथवा त्याच्या आयुष्यातील स्त्री बद्दल विचारले नव्हते. तसे ते विजयनेही कधी तिला विचारले नाही. निलिमासोबत बोलता बोलता विजयने एका कागदावर नुकत्याच सुचलेल्या काही कवितेच्या ओळी लिहिल्या पण त्या मनासारख्या नाहीत हे पाहून तो कागद चुरगळला आणि तो खिडकीतून बाहेर फेकणार इतक्यात निलिमा म्हणाली, “तो कागद बाहेर फेकू नको हं! आणि ती स्वच्छतेवर लेक्चर द्यायला लागली. ते ऐकून पुढच्या मागच्या मुली गालातल्या गालात हसायला लागल्या. ते पाहून आपली गेलेली इभ्रत सावरण्यासाठी विजय म्हणाला, अगं! मी तो कागद बाहेर फेकतच नव्हतो! खिशात ठेवत होतो. उतरल्यावर कचराकुंडीत टाकणार होतो. तेंव्हा कोठे तिचा आणि विजयचाही जीव भांड्यात पडला. पण त्यानंतर विजयने कधीही बसमधून कागद बाहेर फेकला नाही. आता तर त्याला कागद लागतच नाही कारण आता शब्द त्याच्या बोटातून मोबाईलच्या स्क्रीनवर उतरतात अलगद.
— निलेश बामणे.
Leave a Reply